ओशो : 'सेक्स गुरू'च्या अंगरक्षकाने उलगडली रजनीशपुरमची ही रहस्यं

रजनीश यांचा शिष्यावर प्रभाव होता. Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा ओशोंच्या स्वप्नांतलं रजनीशपुरम अवघ्या चार-पाच वर्षांतच धुळीस मिळालं.

`सेक्स गुरू` म्हणून ओळखले जाणारे भारतीय वंशाचे भगवान रजनीश यांची आठवण नुकतीच नेटफिल्क्सच्या Wild Wild Country या लोकप्रिय मालिकेच्या निमित्तानेपुन्हा एकदा जगाला झाली.

एका बाजूला चैतन्यदायी ठरणारं हे व्यक्तिमत्त्व तितकंच वादग्रस्त कसं झालं, अमेरिकेतील ओरॅगन राज्यात 64,000 एकरच्या विस्तीर्ण जागेवर त्यांचे हजारो अनुयायी कसे एकत्र आले, याची रोचक कथा या डॉक्युड्रामामधून मांडण्यात आली आहे.

जवळपास पाचेक वर्षं या हजारो रजनीशींचा ओरेगनच्या मूळ रहिवाशांबरोबर कायदेशीर संघर्ष झाला. सततच्या या खटक्यांमुळे परिस्थिती काही वर्षांतच एवढी ताणली गेली की हत्येचा कट रचण्यात आले, तसंच स्थानिक मतदानातील फेरफार, बेकायदेशीर हत्यारं बाळगणं, यासारखे प्रकार घडले. सोबतच माशांद्वारे मोठ्या प्रमाणात लोकांना विषबाधित करण्याचा प्रयत्न झाला, ज्यातून तब्बल 751 लोक आजारी पडले. या घटनेची तर अमेरिकेच्या इतिहासात सर्वांत मोठा जैविक दहशतवादी हल्ला म्हणून नोंद झाली आहे.

त्यामुळे हे स्वप्नांतलं रजनीशपुरम उभारल्याच्या अवघ्या चार-पाच वर्षांतच ओशोंचं प्रेमळ आणि दयाळू लोकांचा एक समुदाय एकत्र आणण्याचं त्यांचं भव्य स्वप्न अखेर धुळीस मिळालं.

Wild Wild Country मधून आपल्याला ओशोच नव्हे तर त्यांच्या विविध सेक्रेटरी, सहकारी, त्यांचे डॉक्टर्स, त्यांच्या रजनीशपुरम शहराचे महापौर आणि त्यांचे अंगरक्षक पाहायला मिळतात. यापैकीच एक व्यक्ती होती ह्यू माईल्न.

ह्यू हे ओशोंचे सुरुवातीच्या काळातले एक शिष्य होते. ते मूळ स्कॉटलंडची राजधानी एडिनबराचे.

ह्यू यांच्या म्हणण्यानुसार आश्रमात सेक्स करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं. Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा ह्यू यांच्या म्हणण्यानुसार आश्रमात सेक्स करण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य होतं.

पण त्याकाळी ह्यू हा एक तरुण स्कॉट होता, जो जवळपास दशकभर या गूढ भासणाऱ्या 'सेक्स गुरू'च्या सहवासात होता, त्यांच्या अंतरवर्तुळातला एक म्हणून गणला जायचा. असं म्हणतात की त्या काळी ओशोंकडे तब्बल 90 रोल्स रॉईस कार्स होत्या.

या कालावधीत आचार्य रजनीश यांनी त्यांना प्रेरित केलं, त्यांच्या मैत्रिणीसोबत सेक्स केला आणि त्यांना चिक्कार राबवूनही घेतलं.

आचार्यांचा अंगरक्षक म्हणून ह्यूंनी दहा वर्षं त्यांची सेवा केली. त्यांच्या शिष्यगणांना त्यांच्यापासून चार हात लांब ठेवणं, ही मोठी जबाबदारी ह्यूंकडे होती. याच काळात रजनीश यांच्या कार्याचा विस्तार एवढा झाला की त्यांच्या अनुयायींची संख्या "20 वरून जवळपास 20,000 झाली".

"हे 20,000 अनुयायी काही एखादं मासिकबिसिक विकत घेत नव्हते. तर त्यांनी स्वतःचं घरदार, कुटुंब सोडलं होतं," ह्यू सांगतात. "सगळं काही वाऱ्यावर सोडून ते आले होते आणि आठवड्यातले जवळपास 60 ते 80 तास ते कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता काम करत होते, आणि डॉमिट्रीत (वसतिगृहात) राहात होते. ती एक प्रकारची समर्पण वृत्तीच होती."

आश्रम सोडण्याआधी ह्यू हे दहा वर्षं रजनीश यांच्याबरोबर होते. Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा आश्रम सोडण्याआधी ह्यू हे दहा वर्षं रजनीश यांच्याबरोबर होते.

ह्यु सध्या सत्तरीच्या घरात आहेत. स्कॉटलंडमधील लॅनार्कमध्ये त्यांचा जन्म झाला. एडिनबरामध्ये त्यांची जडणघडण झाली. त्यांचे आजोबा जेम्स थॉम्सन यांनी सुरू केलेल्या किंगस्टन क्लिनिकशी त्यांच्या कुटुंबीयांचे ऋणानुबंध होते. थॉम्सन यांनी हायड्रोथेरपीसारख्या नैसर्गिक उपचार पद्धतींना तिथे प्रोत्साहन दिलं.

1973 मध्ये अस्थिरोगशास्त्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर ह्यू भारतात आले. रजनीश यांची व्याख्यानं ऑडिओ कॅसेटवर ऐकून ते प्रभावित झाले होते.

भारतात आल्यावर ह्यू स्वामी शिवमूर्ती नावानं संबोधलं जाऊ लागले. ते सांगतात की, "एवढ्या विलक्षण आणि असामान्य भासणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव एखाद्यावर नाही पडला तरच नवल."

रजनीश हे एक असाधारण व्यक्तिमत्व असल्याचं ह्यू म्हणतात. Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा रजनीश हे एक असाधारण व्यक्तिमत्व असल्याचं ह्यू म्हणतात.

"फार छान, विवेकीपणा, आकर्षण, ज्ञानग्रहणक्षम आणि अनिश्चितपणा या भावनांच्या छटा माझ्या मनात त्यावेळी होत्या," ते सांगतात.

"त्यांच्या पायाशी बसावं आणि शिकावं, बस्स एवढंच मला हवं होतं."

रजनीश यांच्यावर ह्यू यांनी `The God that Failed` हे पुस्तक लिहिलंय. ह्यू सांगतात की ख्रिश्चन धर्माच्या अनुषंगानं विचार केला तर ओशो कधीच गॉड किंवा देव नव्हते.

"त्यांचं व्यक्तिमत्त्व हळूहळू विकसित होताना मी जवळून पाहिलं. त्यासाठी आवश्यक असणारी संवेदना आणि समज त्यांना उपजतच होती."

1990 मध्ये मृत्यूच्या आधी भगवानांनी ओशो हे नाव धारण केलं. पण ह्यू सांगतात की भगवान एका अर्थी सरड्यासारखे होते - लोकांना ते जसे अपेक्षित होते, ते तसेच होऊन जायचे. लोकांच्या मागणीनुसार ते सतत स्वतःचं मन बदलायचे.

ह्यू माईल्न Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा ह्यू माईल्न

ओशो आश्रमात अनुयायांना भगवानांचं `दर्शन` घेण्याची, त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष एकांतात संवाद साधण्याची संधी कधीकधीच मिळायची. ह्यू सांगतात की या दर्शनांतून त्यांना स्वतःविषयी खूप गोष्टींची जाणीव झाली, पण सुरुवातीच्या काळात त्यांना "भारतात वास्तव्यात स्थिरावण्यासाठी काही काळ जावा लागला. ते तितकंसं सोप्पं नव्हतं."

पहिल्या 18 महिन्यांत आचार्य रजनीशांनी ह्यूच्या मैत्रिणीसोबत रात्री घालवल्या आणि मग त्यांना भारतातल्या एका लांबच्या अतिउष्ण ठिकाणी कामानिमित्त पाठवून दिलं.

ह्यू सांगतात की, रजनीश तेव्हा चाळीशीच्या घरात होते. महिला अनुयायांना त्यांचं 'स्पेशल दर्शन' पहाटे चार वाजता मिळायचं.

अनेक रोल्स रॉइस गाड्यांपैकी एका कारमधून बाहेर पडताना आचार्य रजनीश Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा अनेक रोल्स रॉइस गाड्यांपैकी एका कारमधून बाहेर पडताना आचार्य रजनीश

"काही काळानं त्यांना 'सेक्स गुरू' हे टोपणनाव पडलं, कारण ते तेव्हा संभोग आणि चरमसुखाचा क्षण (orgasm) या विषयांवर त्यांच्या व्याख्यानात बोलायचे, आणि एक प्रसिद्ध कारण हेही होतं की ते त्यांच्या स्त्री अनुयायांसोबत रात्र घालवत असत," असं ह्यू सांगतो.

आपण त्यावेळी थोडे जेलस होतो हे ह्यू मान्य करतात. "मी मग विचारपूर्वक आश्रम सोडायचं ठरवलं खरं, पण माझं मन सांगायचं की यातून काहीतरी चांगली गोष्ट घडेलही."

रजनीश यांची एक झलक पाहण्यासाठी शिष्य कैक तास प्रतीक्षा करायचे. Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा रजनीश यांची एक झलक पाहण्यासाठी शिष्य कैक तास प्रतीक्षा करायचे.

"ते सेक्स गुरू आहेत हे आम्हाला माहिती होतं. त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही," ते म्हणतात. "ही 1973 सालची गोष्ट आहे. आम्हाला तेव्हा लैंगिक स्वातंत्र्य होतं. त्यावेळी फारच थोडे लोक आपल्या साथीदाराशी एकनिष्ठ होते."

ह्यू सांगतात की रजनीश यांचं स्पेशल दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबरच्या त्यांच्या नात्याला एक नवीन दर्जा लाभला. पण त्यांचा हा आनंद अल्पावधीतच संपुष्टात आला, कारण भगवानांनी त्यांना 400 मैल दूर शेतकामासाठी पाठवलं.

तिथून परतल्यावर ह्यूंना रजनीशांची पर्सनल सेक्रेटरी माँ योग लक्ष्मीचा अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं.

ह्यूंनी रजनीशांचीही रक्षा करावी, असं लक्ष्मीनं त्याला सांगितलं होतं. Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा ह्यूंनी रजनीशांचीही रक्षा करावी, असं लक्ष्मीनं त्याला सांगितलं होतं.

लक्ष्मीनं ह्यूंना सांगितलं की एकदा एका संन्याशाला आचार्यांचं दर्शन नाकारल्यावर तिच्यावर हिंसक हल्ला झाला होता. म्हणून ह्यूंनी ओशोंचं रक्षण करावं, असं तिने त्यांना सांगितलं होतं.

ह्यू सांगतात की भक्तांना दर्शन नाकारणं ही कल्पना रजनीशांनाही अमान्य होती, पण "गुरूंना त्यांच्याभोवती लोकांनी गराडा घालणं, स्पर्श करणं किंवा त्यांच्या पावलांचं चुंबन घेणं अशा गोष्टी आवडत नव्हत्या".

सात वर्षं ह्यू भगवानांभोवतलच्या काही निवडक संन्याशांपैकी एक होते. याच आतल्या वर्तुळाने ओशोंभोवती "पावित्र्याचं" एक वलय तयार केलं होतं.

शिष्यांना कराटेचं प्रशिक्षणही दिलं जायचं. Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा शिष्यांना कराटेचं प्रशिक्षणही दिलं जायचं.

याच आतल्या वर्तुळात मा आनंद शीला होत्या, ज्या नेटफ्लिक्सच्या या डॉक्युड्रामामध्ये बऱ्यापैकी केंद्रस्थानी होत्या.

शीला या मूळ गुजरातच्या, पण न्यू जर्सीच्या महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं होतं. भगवानांसोबत अध्यात्माचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी एका अमेरिकन माणसाशी त्यांचं लग्न झालं होतं.

ह्यू सांगतात की पुणे आश्रमातल्या कँटीनमध्ये त्यांनी शीलाबरोबर काम केलं होतं. भगवानांच्या शिष्य समुदायाची संख्या याच काळात वाढू लागली होती.

माझं शीलाबरोबर जवळपास महिनाभर जोरदार अफेर चालू होतं, असं ह्यू सांगतात. पण तिच्या नवऱ्याला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने याबाबत रजनीशांना तक्रार केली आणि मग त्यांच्या सांगण्यावरून आमचं नातं तिथेच संपलं.

रजनीश यांची एक झलक पाहण्यासाठी शिष्य कैक तास प्रतीक्षा करायचे. Image copyright SAMVADO KOSSATZ
प्रतिमा मथळा रजनीश यांची एक झलक पाहण्यासाठी शिष्य कैक तास प्रतीक्षा करायचे.

त्यानंतर शीलाची ह्यूबरोबर वागणूक बदलली आणि जसजशी तिची आश्रमात पदोन्नती झाली तसतशा ह्यूच्या अडचणी वाढू लागल्या. मग तिने लक्ष्मीची जागा घेत रजनीशची पर्सनल सेक्रेटरी झाली.

पुण्यात रजनीशांच्या आश्रमात होणाऱ्या वर्तवणुकीवर वादळ उठलं होतं, आणि त्यामुळं त्यांना आहे त्याच परिस्थितीत मार्ग काढून स्थिरावायचं होतं, नवा शिष्य समुदाय तयार करायचा होता, हजारो शिष्यांना घडवायचं होतं.

मग ओशो आश्रम पुण्यातून ऑरेगॉनला हलवावं, ही शीलाचीच कल्पना होती. ऑरेगॉनमध्ये 64,000 एकरवर पसरलेलं Big Muddy Ranch (कुरण) 1981 साली शीलाने विकत घेतलं. रजनीश यांच्या कल्पनेतील विश्व साकारण्याच्या कामाला संन्याशांनी सुरुवात केली.

ह्यू सांगतात, "ऑरेगॉन हा एक चुकीचा निर्णय होता, असं मी मानतो. तो एक अनर्थकारी पर्याय होता."

शीला यांच्याबरोबर रजनीश Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा शीला यांच्याबरोबर रजनीश

सुरुवातीपासूनच काही स्थानिक नियम धाब्यावर बसवले गेले होते, त्यामुळे जाहीर मतभेद होऊ लागले.

शीला आणि समर्थकांचा एक गट त्यांनी ठरवलेल्या बेताप्रमाणं सगळ्या गोष्टींची अमलबजावणी करत होता. त्यांच्या या कृतींचा त्रास शेजारच्या अँटेलोप गावातल्या लोकांना होत होताच, शिवाय त्यांच्या मनात आता शीला आणि रजनीशपुरमच्या सन्याशींचा धाक बसला होता. एवढचं नव्हे तर ते काही सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करण्याचा घाटही घातला होता.

अनेक स्थानिक रेस्टॉरंटमध्ये सन्यांशानी केलेल्या माशांद्वारे केलेल्या विषप्रयोगातून 750हून अधिक लोक आजारी पडले. स्थानिक नगरपालिका निवडणुकीत मतदान प्रभावित करण्यासाठी हे करण्यात आलं, असं ह्यू म्हणतात.

समोरच्या बाइकवर मागच्या सीटवर बसलेली शीला. Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा समोरच्या बाइकवर मागच्या सीटवर बसलेली शीला.

रजनीशांच्या संन्याशांचा दावा होता की पुरातन मतांचे स्थानिक लोक आणि अधिकारी त्यांचा छळ करत होते, पण ह्यूंच्या मते या संन्याशांना कायद्याची फिकीरच नव्हती आणि त्यांनी ही परिस्थिती स्वतःवरच ओढवून घेतली होती.

"मला एप्रिल 1982मध्येच या आश्रमाविषयी शंका वाटू लागली," असं ह्यू सांगतात. ही जागा आता ध्यान, प्रेम आणि मायेसाठी एकत्र येण्याचं ठिकाण नव्हतीच.

ह्यू अस्थिशल्यचिकित्सक म्हणून तिथल्या आरोग्य केंद्रात काम करत होते. आठवड्याभरात 80 ते 100 तास काम करणारे संन्याशी पाहून त्यांना वाटू लागलं की आता हे आश्रम टिकू शकणार नाही, त्यांच्या कल्पनेच्या चिंधड्या उडू लागल्यागत वाटू लागलं.

आरोग्य केंद्रात या लोकांवर शीलाच्या मार्गदर्शनाखाली 'अमानुष' उपचार होत होते, असं ते म्हणतात. "त्यांना इंजेक्शन द्या आणि पुन्हा कामाला धाडा, असं ती सांगायची."

पुणे आश्रमात सकाळी ध्यानसाधना करणारे शिष्य Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा पुणे आश्रमात सकाळी ध्यानसाधना करणारे शिष्य

दुसऱ्या एका नाउमेद करणाऱ्या प्रसंग त्यांना अजूनही आठवतो. त्यांच्या मित्राची नाव नदीत उलटली होती, त्याला शोधायला जायचं होतं, पण त्यांना रोखण्यात आलं, काम सोडून जाऊ दिलं नाही.

"तेव्हा माझ्या मनात विचार आला की, आम्ही जणू राक्षस झालो आहोत... आणि असं असूनही मी अजून इथं का थांबलोय?"

1982 मध्ये ह्यूंनी ऑरेगॉन आश्रम सोडलं.

"काही काळ मी जणू एका जाळ्यात सापडलो होतो," ते म्हणतात. "मी गोंधळलेला होतो आणि एखाद्या वादळात सापडल्याप्रमाणं भिरभिरत होतो. साध्या साध्या गोष्टी करू शकत नव्हतो."

रजनीश Image copyright SAM PANTHAKY/AFP/GETTY IMAGES

मनोविकार तज्ज्ञांकडे ह्यूंनी सहा आठवडे घालवले आणि पुन्हा नव्यानं जीवनाचा श्रीगणेशा केला.

ह्यू माईल्न यांनी काही काळ एडिनबरामध्ये अस्थिशल्यचिकित्सक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी लंडन आणि झुरिकमध्ये काम करत, अखेर कॅलिफोर्नियाममध्ये 1985मध्ये आपलं बस्तान बसवलं.

Wild Wild Country या मालिकेत दाखवण्यात आलेले प्रसंग त्यांनी ऑरेगॉन सोडल्यानंतर घडले, म्हणून शीला तिथे कायकाय करत होती, याची आपल्याला फारशी काही माहिती नसल्याचं ह्यू सांगतात.

पण रजनीश आणि तिच्या समर्थकांना तिच्या या कृत्यांविषयी माहिती होती का?

ह्यू म्हणतो की, "त्यांना याबद्दल माहिती होती, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)