अमेरिकेत वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला, 5 ठार

पोलीस Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अमेरिकेतील मेरीलँड इथं वृत्तपत्राच्या कार्यालावर गोळीबार झाल्यानंतर या इमारतींतील कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

अमेरिकेतील एका वृत्तपत्र कार्यालयावर झालेल्या गोळीबारात 5 ठार झाले असून काही जखमी झाले आहेत. गोळीबार करणाऱ्या संशियाताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मेरीलँड प्रांतात ही घटना घडली आहे.

कॅपिटल गॅझेट असं या वृत्तपत्राचं नाव आहे. अटक केलेल्या व्यक्तीच वय 30 आहे.

एका पत्रकारानं दिलेल्या माहितीनुसार या बंदूकधाऱ्या व्यक्तीनं कार्यालयाच्या काचेच्या दरवाजाच्या दिशेनं गोळीबार केला. दरवाजाच्या पलीकडे मोठ्या संख्येनं कर्मचारी होते.

कॅपिटल गॅझेट या दैनिकाची वेबसाईटही आहे. बाल्टीमोर सन मीडिया ग्रुपशी संबधित हे वृत्तपत्र आहे.

संशयिताच्या बॅगेत काही बनावट हातबाँब आणि धुराचे बाँब सापडले आहेत.

पोलीस अधिकारी विल्यम क्रांफ म्हणाले की कार्यालयाच्या बाहेर एक स्फोटक मिळालं असून ते निकामी करण्यात आलं आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर या इमारतीमधून 170 कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. या इमारतीमध्ये इतरही काही कार्यलयं आहेत.

या वृत्तपत्राचे संपादक जिमी डेबट्स यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

पत्रकार फिल डेव्हिस म्हणाले, "तुम्ही तुमच्या डेस्कच्या खाली लपलेले आहात आणि अनेक लोकांना गोळ्या लागत असतात, यापेक्षा भीतीदायक काही नसेल. हे का घडलं याच कारण माहीत नाही."

Image copyright AFP/Getty

पत्रकार डॅनिएल ओल म्हणाल्या, "संपादकीय विभागात 20 कर्मचारी होते. तर जाहिरात विभागात कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. आम्ही एक कुटुंब आहोत, झालेली घटना धक्कादायक आहे."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. माझ्या प्रार्थना मृतांसोबत आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत, अशा शब्दांत या घटनेवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव सारा सँडर्स यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर मेरीलँडचे राज्यपाल लॅरी होगमन यांनी या घटनेमुळे धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

न्यूयॉर्क शहर पोलीस विभागाने न्यूयॉर्क शहरातील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयांना संरक्षण देण्यात आल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)