टाटा स्टीलचा UKमधला उद्योग 'थिस्सेनक्रुप्प'मध्ये विलीन

स्टील कंपनी Image copyright Getty Images

भारतातील आघाडीची स्टील उत्पादक कंपनी टाटा स्टील आणि युरोपातली सगळ्यांत मोठी कंपनी थिस्सेनक्रुप्प यांनी विलीनीकरणाची घोषणा केली आहे. एकत्रित कंपनी युरोपातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी होणार आहे.

टाटा स्टीलचे UKमधल्या टॅलबोट या बंदरावर असलेले स्टीलवर्कचे प्लान्ट युरोपातल्या या बड्या कंपनीत समाविष्ट होतील. या करारानंतरही UKमधले प्लान्ट बंद करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचं टाटाकडून स्पष्ट करण्यात आलं.

या विलीनीकरणामुळे गुंतवणूक वाढेल आणि नोकरीतली सुरक्षितता कायम राहील अशी आशा या दोन्ही कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या युनियननी बोलून दाखविली. युनियनचे कम्युनिटी जनरल सेक्रेटरी रॉय रिखस म्हणाले की, "या करारामुळे दीर्घ काळापर्यंत स्टील उत्पादनाची परंपरा आणि नोकऱ्यांची सुरक्षा वाढेल."

अर्थात, योग्य आणि विचारपूर्वक गुंतवणूक केल्यावरच हा व्यवसाय फलदायी ठरेल असंही रिखस यांनी स्पष्ट केलं.

गेल्या शुक्रवारी मूळ जर्मन कंपनी असलेल्या थिस्सेनक्रुप्प कंपनीच्या कार्यकारी मंडळानं या विलीनीकरणाला हिरवा कंदिल दाखवला. या दोन्ही कंपन्या गेल्या वर्षभरापासून विलीनीकरणाच्या प्रक्रियेबद्दल चर्चा करत होत्या.

टाटा स्टील आणि थिस्सेनक्रुप्प या दोन्ही कंपन्यामध्ये मिळून सुमारे 48 हजार कामगार आहेत.

नोकऱ्या जाण्याची भीती

विलीनीकरणानंतर दोन्ही कंपन्या 350 मिलियन पाऊंड ते 440 मिलियन पाऊंड वर्षाला वाचवणार आहेत. विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गेल्या सप्टेंबरमध्ये दोन्ही कंपन्यांकडून जवळपास 4000 नोकऱ्या कमी करण्यात येतील असं सुतोवाच करण्यात आलं होतं. यातल्या अर्ध्या कंपन्या उत्पादन विभागात तर अर्ध्या नोकऱ्या व्यवस्थापन विभागात आहेत.

UK मधल्या वेल्समधले जवळपास 7000 जण टाटामध्ये कार्यरत आहेत. तर, टॅलबोट बंदरावरील टाटाच्या प्लॅन्टमध्ये जवळपास 4000 कामगार काम करत आहेत.

UKमधल्या टाटाच्या सगळ्या प्लॅन्टची विक्री करण्याची घोषणा टाटानं 2016मध्ये केली होती.

'मैलाचा दगड'

थिस्सेनक्रुप्प कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह हेनरिक हेसिंजर यांनी या विलीनीकरणाविषयी बोलताना सांगितलं की, "चांगल्या कार्यक्षमतेसाठी या दोन्ही कंपन्या एकत्र येण्याची गरज होती. कारण, आयातीसाठी कंपन्यांवर मोठा दबाव आहे. तसंच, उत्पादनाची अधिक क्षमता कंपन्यांमध्ये असल्याचंही त्यांनी सांगितलं."

"टाटा स्टीलसोबत विलीन होण्याचा हा निर्णय हा मैलाचा दगड असून हा खूप मोठा बदल आहे. यामुळे भविष्यात या उद्योगात खूप मोठी आर्थिक वाढ होईल,"असं थिस्सेनक्रुप्प कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

कराराच्या अंतिम मसुद्यावर लवकरच सह्या होणार आहेत. त्यासाठी लागणारी सगळी कायदेशीर प्रक्रिया आणि युरोपीयन युनियनची मान्यता या बाबी लवकरच पूर्ण होणार असल्याचं या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं.

याबाबत बोलताना टाटा स्टीलचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले, "ही टाटा स्टीलसाठी मोठी झेप आहे. दीर्घकालीन संबंध टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा नवा प्रयोग भागधारकांसाठी फायदेशीर ठरेल."

या विलीनीकरणामुळे आर्सेलर-मित्तलनंतर टाटा स्टील-थिस्सेनक्रुप्प ही युरोपातली सगळ्यात मोठी स्टील कंपनी ठरणार आहे. या नव्या कंपनीची वार्षिक विक्री 13 बिलियन पाऊंडच्या आसपास असणार आहे. तर, या कंपनीचं कार्यालय नेदरलँड्समध्ये असेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)