अमेरिकेच्या शेजारी मेक्सिकोत आलं डाव्यांचं राज्य

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष

फोटो स्रोत, Getty Images

डाव्या विचाराचे नेते अॅंड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांचा मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे. निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात ते म्हणाले, आम्ही मेक्सिकोत आमूलाग्र बदल घडवून आणू.

ओब्राडोर हे मेक्सिको सिटीचे माजी महापौर देखील आहेत. त्यांना तिथं अमलो या नावानं ओळखलं जातं. देशातला भ्रष्टाचार आणि हिंसा आटोक्यात आणणार असल्याचं वचन त्यांनी यावेळी दिलं. भ्रष्टाचारामुळेच देशात असमानता निर्माण झाल्याचं ते म्हणाले आहेत.

निवृत्तीधारकांच्या वेतनात दुपटीनं वाढ करण्यात येईल तसंच अमेरिकेबरोबर संबंध सुधारण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं.

डोनाल्ड ट्रंप अमेरिकेच्या अध्यक्षपदावर आल्यापासून मेक्सिको आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

मेक्सिकोतून येणाऱ्या स्थलांतरितांवर ट्रंप यांनी नेहमीच निशाणा साधला आहे. असं असलं तरी त्यांनी ओब्राडोर यांचं अभिनंदन केलं आहे.

मेक्सिकोमध्ये हिंसेनं अत्युच्च पातळी गाठली आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात 130 राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर हिंसा आटोक्यात आणली जाईल असं आश्वासन ओब्राडोर यांनी दिलं आहे.

धोरणात काय राबवणार?

मेक्सिकोतलं व्यापारी धोरण बदलण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. व्यवसायाला चालना मिळेल असं वातावरण निर्माण करण्याबाबत आपण आग्रही आहोत असं ते म्हणाले.

तसंच, खासगी व्यवसायांचं राष्ट्रीयीकरण होणार नसल्याची ग्वाही त्यांनी खासगी व्यावसायिकांना दिली आहे. करात कुठल्याही प्रकारची वाढ होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

स्पर्धकांकडून अभिनंदन

या निवडणुकीत द्वितीय क्रमांकावर असलेले कंझर्व्हेटिव पार्टीचे नेते रिकार्डो अनाया यांनी आपला पराभव मान्य करत ओब्राडोर यांचं अभिनंदन केलं आहे.

ओब्राडोर यांना 53 टक्के मतं मिळाली तर अनाया यांना 22.8 टक्के मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकवर आलेल्या होजे अॅंटोनियो मिइडे यांना 16 टक्के मतं मिळाली.

अमेरिकेबरोबरच्या नात्यावर परिणाम?

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ओब्राडोर यांनी ट्रंप यांना लक्ष्य केलं होतं. ट्रंप यांनी मेक्सिकोहून येणाऱ्या स्थलांतरितांवर कठोर कारवाई करू अशी भूमिका घेतली आहे. अमेरिका-मेक्सिको बॉर्डरवर भिंत उभी करणार असल्याचं त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवलं आहे.

तसंच नॉर्थ अमेरिकन फ्री-ट्रेड अॅग्रीमेंट (NAFTA) या करारावर पुनर्विचार करू असं ट्रंप म्हणाले होते.

ट्रंप यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे 2000 बालकांची आपल्या पालकांपासून ताटातूट झाली आहे. या धोरणात सुधारणा करू असं ट्रंप यांनी म्हटलं, पण अद्याप परिस्थितीमध्ये बदल झालेला दिसत नाही.

ओब्राडोर यांनी विजयाच्या भाषणावेळी अमेरिकेबरोबरचे संबंध सुधारू असं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)