विम्बल्डन 2021 : अॅश्ले बार्टीने पटकावलं महिला एकेरी विजेतेपद, प्लिस्कोवावर केली मात

  • ऋजुता लुकतुके
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
अॅश्ले बार्टी

फोटो स्रोत, Clive Brunskill/getty images

फोटो कॅप्शन,

अॅश्ले बार्टीने चुरशीच्या सामन्यात कॅरोलिया प्लिस्कोवावर विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाची टेनिसपटू अॅश्ले बार्टी हिने विम्बल्डन 2021 च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.

बार्टीने विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झेक गणराज्यच्या 13 व्या मानांकनप्राप्त कॅरोलिना प्लिस्कोवा हिला 6-3, 6-7, 6-3 अशा फरकाने हरवून विजेतेपद पटकावलं.

अॅश्ले बार्टी हिचं हे पहिलंच विम्बल्डन विजेतेपद आहे.

या विजयामुळे आपलं लहानपणीचं स्वप्न पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया बार्टीने विजयानंतर दिली.

स्पर्धेच्या एक दिवस आधी बार्टीला झोप आली नव्हती. आपण हरलो तर काय होईल या विचाराने तिने अख्खी रात्र जागवून काढल्याचं तिने सांगितलं.

विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत मिळवलेला विजय हा अविश्वसनीय आहे, असंही तिने म्हटलं.

बार्टीने अंतिम सामन्यातील तिची प्रतिस्पर्धी कॅरोलिना प्लिस्कोवा हिचंही अभिनंदन केलं. भविष्यात प्लिस्कोवा हिच्याविरुद्ध अनेक सामने खेळावे लागतील, याची मला खात्री आहे. स्वतःचं परीक्षण करणं आपल्याला आवडतं, असंही ती म्हणाली.

विजेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर बार्टीने स्टेडियममधील सर्व प्रेक्षकांचेही आभार मानून त्यांना अभिवादन केलं. तसंच तिने तिचे प्रशिक्षक क्रेग टायझर यांचेही आभार मानले आहेत.

दोन्ही खेळाडूंनी हा सामना जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 2012 नंतर पहिल्यांदाच विम्बल्डन अंतिम सामना 3 सेटपर्यंत चालला. यावरूनच हा सामना किती चुरशीचा झाला, याची कल्पना येऊ शकते.

विम्बल्डन स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात बार्टीने 2018 ची चॅम्पियन कर्बर हिला 6-3, 7-6(3) च्या फरकाने पराभूत केलं होतं. तर प्लिस्कोवा हिने सेमीफायनल सामन्यात दुसऱ्या मानांकनप्राप्त आर्यना सबालेंका हिच्यावर 5-7, 6-4, 6-4 अशी मात केली होती.

कथा विम्बल्डनची : हिरवळीवरचं टेनिस, राजघराणं आणि स्ट्रॉबेरी क्रीम

आमच्या साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळत नाही, असं ब्रिटिश अभिमानाने म्हणायचे. दुसऱ्या महायुद्धानंतर परिस्थिती हळूहळू बदलली.

ब्रिटिश राष्ट्रकुलातले एकेक देश स्वतंत्र झाले. राज्य गेलं, पण ब्रिटिशांनी आपली परंपरा मात्र अव्याहत जपली. 2 जुलैपासून लंडनजवळच्या छोट्या उपनगरात सुरू झालेली विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा हा या परंपरेचाच एक भाग.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

2 जुलैपासून लंडनजवळच्या छोट्या उपनगरात विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा सुरू झाली

विशेष म्हणजे हट्टाने हिरवळीवर स्पर्धा घेणं, खेळाडूंना पांढरे शुभ्र कपडे घालणं बंधनकारक करणं, या परंपरावादी अटी असल्या तरी तंत्रज्ञान आणि आयोजनाच्या सोयीसुविधांमध्ये सातत्याने आधुनिकता आणल्यामुळे आजही ही स्पर्धा टेनिस जगतात प्रतिष्ठेची आणि पहिल्या क्रमांकाची आहे. आणि या स्पर्धेला तब्बल 141 वर्षांचा इतिहास आहे.

'Tennis in an English Garden'

विम्बल्डन स्पर्धेच्या वेबसाईटवर आणि स्पर्धेच्या प्रवक्त्यांकडून मीडियाला जी प्रसिद्धीपत्रकं जातात, त्यात एक वाक्य ठळकपणे लिहिलेलं असतं - 'Tennis in an English Garden'.

'इंग्लिश बागेतलं टेनिस' असा त्याचा सरळ अर्थ होतो. पण नीट वाचलंत तर जाणवतं स्पर्धेचं स्वरूप कसं असेल, याचा पायंडाच या शब्दांनी घालून दिला आहे.

फोटो कॅप्शन,

ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपन या इतर ग्रँडस्लॅम स्पर्धा हार्डकोर्टवर खेळवल्या जाऊ लागल्या. पण, ब्रिटिशांनी हिरवळीचं कोर्ट सोडलं नाही. शिवाय इथं प्रायोजकांची एकही जाहिरात नाही.

इथलं टेनिस असेल ब्रिटिशांसारखं - नियम काटेकोर असतील आण ते खेळाडू, प्रेक्षक, रेफरी आणि बॉल बॉईजबरोबरच आयोजकांनाही लागू असतील.

आयोजनात ब्रिटिश शिस्त असेल, असं हे घोषवाक्य तर आपल्याला सांगत नाही का? पण या नियमांनीच स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि लोकप्रियताही जपली आहे, हे तितकंच खरं.

या नियमांना ब्रिटिश नियम नाहीच तर ब्रिटिश परंपरा मानलं जातं. खेळाडूंचीही त्याला ना नाहीये.

काय आहे ब्रिटिश परंपरा?

लॉन टेनिस म्हणजे हिरवळीवरचं टेनिस इंग्लंडमध्येच सुरू झालं, असं मानलं जातं. त्यापूर्वी बंदिस्त कोर्टमध्ये टेनिस खेळलं जायचं.

इंग्लंडमधल्या सगळ्यांत जुन्या All England Tennis and Croquet Club मध्येच खुल्या मैदानात हिरवळीवर टेनिस खेळण्याचा शोध लागला, आणि या खेळाला नाव पडलं लॉन टेनिस.

या शोधाचा मान जातो ब्रिटिश सैन्यातले मेजर वॉल्टर विंगफिल्ड यांना. लागलीच क्लबचं जुनं नाव बदलून ते All England Lawn Tennis and Croquet Club असं करण्यात आलं. या सगळ्या घडामोडी 1876 मध्ये घडल्या, आणि 1877मध्ये पहिली विम्बल्डन स्पर्धा झाली.

फोटो कॅप्शन,

1877 पासून हा क्लब विम्बल्डन चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन करत आहे. पुढे नावातलं क्रॉके काढून टाकण्यात आलं.

तो काळ खुल्या टेनिसचा म्हणजे व्यावसायिकतेचा नव्हताच मुळी. त्यामुळे पहिली स्पर्धा निमंत्रितांची होती. लॉन टेनिस हीच संकल्पना असल्यामुळे स्पर्धा हिरवळीवरच होणार होती.

ऑल इंग्लंड क्लब लंडनमधला प्रतिष्ठित. त्याला राजघराण्याचा सुरुवातीपासून पाठिंबा. त्यामुळे पहिल्या स्पर्धेपासून राजघराण्याच्या कुण्या विशिष्ट सदस्याची हजेरी होती.

तर 1907 पासून अधिकृतपणे स्पर्धेला राजघराण्याचं पालकत्व मिळालं. राजघराण्यातल्या लोकांसाठी विशेष बॉक्स तेव्हाच तयार झाला. स्पर्धेची बक्षीसं राजघराण्यातील व्यक्तीने देण्याची पद्धतही तिथेच रूढ झाली.

फोटो कॅप्शन,

राजघराण्यातल्या लोकांसाठी असलेला खास रॉयल बॉक्स. 1993मध्ये तेव्हाची प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना हिने हजेरी लावली होती

रॉयल मामला असल्यामुळे खेळाडूंचे कपडे तेव्हाच्या शिरस्त्याप्रमाणे पांढरेच असणार. त्यात नावालाही दुसरा एखादा रंग मिसळलेला नको, हे ही नक्की झालं.

इंग्लंडमध्ये शुभ्र पांढरा हा उन्हाळ्याचा रंग मानला जातो. स्पर्धेसाठी अधिकृत रंगसंगती गडद हिरवा रंग आणि जोडीला जांभळा, हे ही तेव्हाच ठरलं. इंग्लंडमधल्या उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला स्पर्धा घ्यायचं ठरलं.

ब्रिटिश उन्हाळ्याची सुरुवात आणि स्ट्रॉबेरीची सुरुवात एकत्र होते. त्यामुळे विम्बल्डन स्पर्धेदरम्यान स्ट्रॉबेरी क्रीम या पदार्थाचा जो प्रघात पडला, तो ही अगदी सुरुवातीपासूनच.

पण ब्रिटिश खासियत किंवा बाणा हा की, विसाव्या शतकात टेनिसमध्ये हार्डकोर्ट आलं. व्यावसायिकतेमुळे जाहिरातदार आले, जगातले इतर सगळे खेळ आणि स्पर्धा बदलल्या. पण विम्बल्डन स्पर्धेनं या बदलांना साफ नकार दिला.

जाहिरातींच्या या युगात विम्बल्डनच्या कोर्टवर तुम्हाला एकही जाहिरातीचं होर्डिंग दिसणार नाही. मुख्य दोन प्रायोजकांचं नाव दिसेल पण, ते ही निवडक ठिकाणी.

फोटो कॅप्शन,

पुरुषांमध्ये रॉजर फेडररने सर्वाधिक 8वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेसाठी पांढऱ्या शुभ्र कपड्यांचा नियम तर आहेच. शिवाय प्रायोजकांचं नावही लिहायला बंदी आहे.

खेळाडूंच्या पाण्याच्या बाटल्या खोक्यात ठेवण्याची सक्ती आहे, बाटल्यांवरचे ब्रँड दिसू नयेत म्हणून. खेळाडूंचे कपडे फक्त पांढरेच हवेत, असं नाही तर त्यावर ते जाहिरात करत असलेले ब्रँड अजिबात दिसता कामा नयेत, असा दंडकच आहे.

मैदानात मॅच बघण्यासाठी राजघराण्यातले लोक असतील तर त्यांना लवून नमस्कार करणं सगळ्यांसाठी बंधनकारक आहे(हा नियम पुढे 2003 मध्ये प्रिन्स विल्यम्स यांच्या विनंतीवरून बंद करण्यात आला).

फक्त हर मॅजेस्टी द क्वीन किंवा प्रिन्स ऑफ वेल्स उपस्थित असतील तर त्यांनाच वंदन करायचं आहे.

परंपरा आणि आधुनिकताही

19व्या शतकातले हे नियम अलीकडच्या व्यावसायिक खेळाडूंना कदाचित जाचक वाटू शकतील. पण प्रत्यक्षात काही अपवादात्मक विरोधाचे प्रसंग सोडले तर खेळाडूंनी नियम मान्य केलेले दिसतात.

याला आणखी एक कारण आहे स्पर्धेच्या आयोजनातली शिस्त, सुविधा आणि तंत्रज्ञानातली आधुनिकता.

खेळाडूंना सराव, ड्रेसिंग रूम आणि मैदानावरच्या सुविधा पुरवण्याबाबत ही स्पर्धा सर्वांत पुढे असल्याचं मानलं जातं. कुठल्याही दुखापतीवर उपचार शक्य होतील, अशी वैद्यकीय टीम मैदानावर हजर असते.

फोटो कॅप्शन,

स्पर्धेनं आधुनिकताही जपली आहे. स्पर्धेचं ठिकाण आधुनिक आणि सुसज्ज असावं असा आयोजकांचा आग्रह असतो. म्हणूनच 2007मध्ये नवं सेंटर कोर्ट उभं राहिलं. आणि पावसाचा व्यत्यय नको म्हणून सरकतं छप्पर इथं 2009मध्ये बसवण्यात आलं

शिवाय तंत्रज्ञान म्हणाल तर कॅमेराच्या मदतीने बॉल रेषेच्या आत आहे की बाहेर, हे ठरवण्यासाठी Hawkeye प्रणाली, पावसामुळे वेळ वाया जाऊ नये, म्हणून कोर्टवर सरकतं छप्पर बांधण्याची कल्पकता, या सोयी टेनिसमध्ये सगळ्यांत आधी विम्बल्डनमध्येच पाहायला मिळाल्या.

स्पर्धा जिथे होते ते ठिकाण आधुनिक असावं, यासाठी विशिष्ट कालमर्यादेत तिथल्या इमारतींची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. जुन्याच्या जागी नवं सेंटर कोर्टही (स्पर्धेची फायनल होते ते मध्यवर्ती कोर्ट) तत्परतेनं उभं राहिलं आहे.

ब्रिटिश परंपरेनुसार कोर्टाची नावं नाहीत तर क्रमांक असतात. जुन्या खेळाडूंची नावं देणं इथं निषिद्ध आहे. त्यामुळे सेंट्रल कोर्ट बरोबरच कोर्ट क्रमांक 1, 2 आहेत.

विम्बल्डनचे किस्से

स्पर्धेचे नियम आणि त्यांचं पालन करताना काही मजेशीर घडलेले किस्सेही आहेत.

मागच्याच वर्षीची गोष्ट. मुलांच्या गटात तिसऱ्या राउंडची मॅच सुरू होणार होती. 18 वर्षांचा ज्युरिक रोडिओनोव्ह त्यासाठी मैदानात उतरला. अचानक चेअर अंपायरने त्याला रोखलं.

ज्युरिककडून एका नियमाचा भंग झाला होता. टी-शर्ट आणि शॉर्ट्स पांढरी घालताना हा नियम अंडरवेअरलाही लागू आहे, हे तो विसरला. त्याने नियमाप्रमाणे बदल केल्यावर खेळ पुढे सुरू झाला.

पुरुषांचा माजी चँपियन अमेरिकन खेळाडू आंद्रे आगासीला रंगांचं भारी वेड. विम्बल्डनचा पांढऱ्या टी-शर्टचा नियम त्याला झेपेना. 2000नंतर तो नियम अधिकच कडक केल्यावर आगासीने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता.

पण तीन वर्षं फारकत घेतल्यानंतर स्पर्धेच्या लौकिकामुळे तो परतला.

आणखी एक अमेरिकन खेळाडू आणि चँपियन जॉन मेकॅन्रोलाही पांढऱ्या कपड्यांचा नियम जाचक वाटतो. वेळोवेळी आधी खेळाडू म्हणून आणि आता समालोचक म्हणून त्यांनी तसं बोलून दाखवलं आहे.

फोटो कॅप्शन,

महिलांमध्ये मार्टिना नवरातिलोवाने सर्वाधिक 9वेळा विजेतेपद पटकावलं आहे. महिलांच्या ट्रॉफीला रोझ वॉटर डिश म्हणतात.

महिलांमध्ये नऊ वेळा चॅम्पियन ठरलेली मार्टिना नवरातिलोवा हिच्या ड्रेसवर एकदा किया शब्द लिहिलेले होते. ही प्रायोजक कंपनी नाही, असं आयोजकांना पटवणं तिला खूपच कठीण गेलं.

तिने शेवटी ड्रेसच बदलला. मॅच त्यासाठी बराच वेळ थांबली होती.

विम्बल्डन हे लंडनच्या नैऋत्येला असलेलं उपनगर. आणि तिथलं हे स्टेडिअम म्हणजे भरवस्तीतलं ठिकाण आहे. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या रविवारी शक्यतो इथे मॅच होत नाहीत. तो सुटीचा दिवस असतो.

शिवाय रात्री अकरानंतर खेळ बंद होतो आणि पुढच्या दिवसावर ढकलला जातो. याचा फटका एकदा ब्रिटिश खेळाडू अँडी मरेलाच बसणार होता. फायनल मॅच खेळत असताना ती चार सेटपर्यंत गेली.

11.02 वाजता ती मॅच मरेनं जिंकली म्हणून ती पूर्ण झाली. नाहीतर आयोजकांनी ती पुढच्या दिवशी खेळण्याची विनंती करून झाली होती.

बॉलबॉईज आणि गर्ल्स

हा नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यांच्या हालचाली एखाद्या रोबोसारख्या शिस्तबद्ध असतात. कुणाच्या नजरेत न येण्यासारखं अलिप्त वागणं त्यांची वैशिष्ट्य. पण असं वागण्याचंही त्यांना रीतसर प्रशिक्षण दिलेलं असतं.

मैदानावर खेळाडूंच्या मदतनिसाची भूमिका पार पाडणं, खेळाडूंकडून सुटलेला बॉल त्यांना आणून देणं, हे त्यांचं काम.

फोटो कॅप्शन,

बॉलबॉईज् आणि गर्ल्स यांच्यासाठी सात महिने आधीपासून ट्रेनिंग वर्ग भरतो

स्पर्धा जुलैमध्ये होते. त्यापूर्वी सात महिने म्हणजे डिसेंबरमध्ये लंडनमधल्या शाळांमधून या मुलांची निवड होते. टेनिसचे नियम आणि वागणं बोलण्याची पद्धत यावरून पारख केली जाते.

आणि मग त्यांना कोर्टावरचे नियम समजावून सांगण्यासाठी खास प्रशिक्षण वर्ग भरतो. स्पर्धेच्या पंधरा दिवसांसाठी साधारण 250 मुलं आणि मुली हे काम करतात. त्यांना याचे पैसेही मिळतात.

मॅचसाठी मोफत प्रवेश

स्पर्धेची तिकीट विक्री ठराविक दिवशी सुरू होते आणि अलीकडे इंटरनेटवर ड्रॉच्या माध्यमातून ती केली जाते. विक्री सुरू झाल्याची घोषणा झाली की तुम्ही आपलं नाव नोंदवायचं आणि ड्रॉच्या दिवशी तुम्हाला तिकीट मिळणार की नाही, हे ठरतं.

पण या व्यतिरिक्त विम्बल्डन ही एकमेव स्पर्धा आहे जी काही निवडक कोर्टवर 500 प्रेक्षकांना मोफत मॅच बघायची संधी देते. त्यासाठी स्पर्धेच्या एक दिवस आधी कोर्ट बाहेर रांग लागते. आणि सुरक्षा रक्षकांच्या मार्फत टोकन जारी करून तिचं नियोजनही करण्यात येतं. अगदी फायनललाही अशी तिकीटं मिळतात.

स्ट्रॉबेरी क्रीम

हे तर स्पर्धेच्या परंपरेचाच एक भाग बनलं आहे. ब्रिटिश उन्हाळ्यात टेनिस स्पर्धेचा आनंद लुटायचा तर तो स्ट्रॉबेरी क्रीम बरोबर अशी ही परंपरा आहे.

मागच्या वर्षी स्पर्धेच्या पंधरा दिवसांत 34 हजार किलो स्ट्रबेरी आणि 10 हजार लीटर क्रीम विकलं गेलं.

फोटो कॅप्शन,

स्ट्रॉबेरी क्रीम ही विम्बल्डनची परंपरा आहे. ब्रिटिश उन्हाळी हंगामाचं ते प्रतीक मानलं जातं

स्पर्धेचं स्वरूप

1877 मध्ये स्पर्धा सुरू झाली, हे आपण बघितलं. तेव्हा ही स्पर्धा निमंत्रितांसाठी होती. आणि पहिली स्पर्धा इंग्लंडच्या स्पेन्सर गॉर यांनी जिंकली होती. गतविजेत्याला पुढच्या वर्षी थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार.

आणि इतरांनी पात्रता फेऱ्या खेळायच्या असा नियम पूर्वी होता. पण पुढे यात अनेक बदल झाले. 1884 मध्ये पुरुषांबरोबरच महिला एकेरीचाही समावेश झाली आणि डबल्स म्हणजे दुहेरीलाही सुरुवात झाली.

1968 मध्ये स्पर्धा खुली झाली. म्हणजे जागतिक टेनिस फेडरेशनच्या नियमांनुसार आणि खेळाडूंच्या क्रमवारीनुसार ती व्हायला लागली. सध्याच्या बहुतेक सर्व ATP स्पर्धा या खुल्याच आहेत. व्यावसायिक खेळाडूच यात खेळू शकतात.

फोटो कॅप्शन,

महिला आणि पुरुषांना मिळणारी चॅम्पियनशिप ट्रॉफी. ही फिरती आहे. त्यामुळे ऑल इंग्लंड क्लबच्या संग्रहालयात ती ठेवलेली असते. विजेत्यांना त्याची प्रतिकृती देण्यात येते

खेळाडूंचा स्कोअर जाहीर करताना चेअर अंपायरने नावं कशी घ्यायची याचीही पद्धत आहे. पुरुष खेळाडूचा उल्लेख मिस्टर आणि पुढे आडनाव असा होतो. तर महिलांना मिस म्हणायची पद्धत आहे.

पण महिलांमधली गतविजेती खेळाडू ख्रिस एव्हर्ट लग्न झालेली होती. तेव्हा तिचा उल्लेख ब्रिटिश पद्धतीने मिसेस ऑफ जॉन लॉईड असा करण्यात आला होता.

अशी ही स्पर्धा अशा सर्वच कारणांमुळे खेळाडू आणि फॅन्समध्येही लोकप्रिय आणि तितकीच प्रतिष्ठेची आहे. इथं जिंकण्यासाठी खेळाडू अक्षरश: जीवाची बाजी लावतात.

पूर्वी अगदी काटेकोरपणे जूनचा शेवटचा आणि जुलैचा पहिला आठवडा पकडून ही स्पर्धा होत होती. पण अलीकडे जागतिक टेनिसमधलं वेळापत्रक गृहित धरून जुलैच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धा सुरू होते.

आणि मग खेळाडू आणि फॅन्समध्ये गप्पा रंगतात या स्पर्धेच्या आणि तिच्या परंपरेच्या.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)