सिंगापूर परिषदेनंतरही उत्तर कोरियाकडून छुप्या पद्धतीनं अण्वस्त्रांची निर्मिती?

उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, अमेरिका, शांतता प्रक्रिया, आण्विक नि:शस्त्रीकरण Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचं लष्करी सामर्थ्य प्रचंड आहे.

आण्विक नि:शस्त्रीकरणासाठी प्रतिज्ञेसह शांततामय मार्गानं चर्चेचा मार्ग पत्करणारा उत्तर कोरिया छुप्या पद्धतीनं आण्विक अस्त्रांची निर्मिती करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांमुळे शांतता प्रक्रियेतील उत्तर कोरियाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणाच्या गोपनीय मात्र जाहीर झालेल्या अहवालानुसार उत्तर कोरिया अजूनही अण्वस्त्रांची निर्मिती करत असून, शस्त्रास्त्रांचं नूतनीकरण करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नक्की काय घडतं आहे?

आरोप काय आहेत?

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या साधारणत: अशा स्वरुपाच्या आहेत.

- उत्तर कोरियाच्या प्रमुख आण्विक अस्त्रांच्या निर्मितीचं केंद्र योंगबायोन आहे. हे केंद्र अद्यायवत करण्यात येत आहे.

- योंगबायोनव्यतिरिक्त उत्तर कोरिया अन्य दोन ते तीन गोपनीय ठिकाणी आण्विक अस्त्रांच्या निर्मितीचं काम करत आहे.

Image copyright kcna
प्रतिमा मथळा किम जोंग उन यांनी जानेवारी महिन्यात केलेल्या भाषणानुसार आण्विक अस्त्रं निर्मितीची गुप्त केंद्र सुरू आहेत.

- प्योंगयांग इथून बॅलिस्टिक मिसाइलसाठी मोबाइल लाँच व्हेईकल तयार करण्यात येत आहे.

- मिसाइलच्या प्रक्षेपणासाठी सोयीची अशी इंजिनं विकसित करण्यात येत आहेत.

या आरोपांत कितपत तथ्य आहे? उत्तर कोरियासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या या बातम्या आहेत. मात्र उत्तर कोरियाच्या अभ्यासकांनी या बातम्या अचूक असल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकी गुप्तचर यंत्रणेतल्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीवर या बातम्या आधारित आहेत. योंगबायोन केंद्राचे सॅटेलाइटनं टिपलेले फोटो पुरेसे बोलके आहेत.

हे किती गंभीर?

उत्तर कोरियाच्या हालचाली सिंगापूरमध्ये अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान झालेल्या कराराच्या कलमांचा भंग करणाऱ्या नाहीत असं विपीन नारंग यांनी सांगितलं. विपीन हे आण्विक नि:शस्त्रीकरण संदर्भातले जाणकार आणि MIT कॉलेजातले राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

सिंगापूर परिषदेत डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग उन यांच्यात झालेल्या चर्चेचा संपूर्ण वृत्तांत वाचण्यासाठी इथे क्लिक करा .

सिंगापूर परिषदेनंतर अमेरिका आणि उत्तर कोरियातर्फे संयुक्त निवेदन जाहीर करण्यात आलं होतं. कोरियन द्विपकल्पाच्या आण्विक नि:शस्त्रीकरणासंदर्भात प्योंगयांगनं केवळ होकार दिला होता. ही एक प्रदीर्घ प्रक्रिया असणार आहे.

या प्रक्रियेचे तपशील दोन्ही देशांनी निश्चित केलेले नाहीत. लवकरच दोन्ही देश यासंदर्भात ठोस माहिती देणार आहेत.

एका देशानं ठरवून आणि तात्काळ अंमलबजावणी होणाऱ्या या गोष्टी नाहीत, असं नारंग यांनी सांगितलं. त्यामुळे देशातलं आण्विक अस्त्रांच्या निर्मितीचं काम होतं त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे सुरू राहू शकतं, असं नारंग यांनी सांगितलं.

Image copyright kcna
प्रतिमा मथळा प्योंगयांगसाठी घन इंधनांवर चालणारी वाहनं क्षेपणास्त्रांच्या नेआणीसाठी उपयुक्त आहेत.

मात्र उत्तर कोरिया गुप्तपणे आण्विक अस्त्रांच्या निर्मितीचं काम करत असल्याच्या वृत्तामुळे सिंगापूर परिषदेचं महत्त्व कमी झालं आहे. त्याचवेळी प्योंगयांगच्या आण्विक नि:शस्त्रीकरणाच्या प्रयत्नातल्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांनी दिलेल्या सूचना आणि आदेशाप्रमाणे देशातले आण्विक अस्त्र निर्मितीचे कार्यक्रम पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू आहेत. जानेवारी महिन्यात किम यांनी भाषणादरम्यान यासंदर्भात घोषणा केली होती. त्यानुसार मिसाइलची निर्मिती करण्यात येत आहे असं द डिप्लोमॅट मॅगझिनचे संपादक अंकित पांडा यांनी सांगितलं.

बातमी मोठी का?

घन इंधनांवर चालणारी इंजिनं वाहतुकीच्या दृष्टीनं सोयीची आहेत. प्योंगयांगसाठी ही निर्णायक गोष्ट आहे. सोप्या भाषेत याचा अर्थ म्हणजे उत्तर कोरिया अगदी झटपट तयार होऊ शकतील असा ठिकाणांहून क्षेपणास्त्र सोडू शकतो. आणि याची माहिती सख्खा शेजारी दक्षिण कोरिया किंवा अन्य देशांना असणार नाही.

उत्तर कोरियाच्या गोपनीय आण्विक अस्त्रांच्या निर्मितीच्या केंद्राबाबत उघड झालेला तपशील महत्वाचा आहे. उत्तर कोरियानं आतापर्यंत केवळ योंगबायोन हे एकमेव आण्विक अस्त्र केंद्र असल्याचं सांगितलं होतं. नव्यानं उघड झालेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाच्या गुप्त आण्विक अस्त्र निर्मितीची माहिती समोर आली आहे.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन क्षेपणास्त्र चाचणीची पाहणी करताना.

उत्तर कोरियातर्फे एकापेक्षा जास्त ठिकाणी आण्विक अस्त्र निर्मितीचं काम सुरू असल्याचा संशय गेले अनेक वर्ष व्यक्त करण्यात येत होता.

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेमधील सूत्रांच्या हवाल्यानं NBCनं दिलेल्या वृत्तानुसार एका गुप्त ठिकाणी काम सुरू आहे आणि आणखी एका ठिकाणी शस्त्र निर्मितीचं काम सुरू असल्याचा बातमीत उल्लेख होता.

"नीट अभ्यास केला तर उत्तर कोरियाचे डावपेच समजू शकतात. आण्विक अस्त्र निर्मितीच्या सर्व केंद्रांची माहिती न देता उत्तर कोरिया ज्ञात केंद्र बंद करू असं सांगू शकतात. जेणेकरून त्यांच्यावरचे निर्बंध कमी होऊ शकतात," असं नारंग यांनी सांगितलं. त्याचवेळी ते गुप्तपणे छुप्या आण्विक अस्त्र निर्मिती केंद्रावर काम सुरू ठेवू शकतात.

अमेरिकेच्या गुप्तहेर विभागानं दिलेली माहिती आता उघड होण्याची ही वेळ देखील महत्त्वाची आहे. ही माहिती त्यांच्याकडे बऱ्याच काळापासून होती. सिंगापूर शिखर परिषदेआधी ही महत्त्वपूर्ण माहिती ट्रंप यांना देण्यात आली असण्याची शक्यता आहे.

मग आताच ही माहिती माध्यमांच्या हाती का ?

या अण्वस्त्र कार्यक्रमासंबंधी इतक्या मोठ्या प्रमाणात माहिती बाहेर पडणं हे शंकास्पद वाटतं, ही माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी अधिकृतरित्या कुणी प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे, असं अब्राहामियान यांना वाटतं.

ही माहिती आताच उघड होण्याची दोन कारणं आहेत असं तज्ज्ञांना वाटतं. सिंगापूर परिषद सफल झाली आणि उत्तर कोरियाकडून आता अण्वस्त्रांचा धोका नाही असं व्हाइट हाऊसकडून म्हटलं जात आहे. पण आण्विक अस्त्र निर्मितीचा तपशील उघड झाल्यानं ट्रंप यांच्यावर दबाव निर्माण होईल आणि त्यांना अशी जाणीव होईल की अद्याप आपलं उद्दिष्ट सफल झालेलं नाही. त्यामुळे ते उत्तर कोरियाबाबत मवाळ धोरण अवलंबणार नाहीत, हे एक कारण असू शकतं असं नारंग यांना वाटतं.

दुसरी शक्यता अशी आहे की ही माहिती ट्रंप यांच्या प्रशासनाच्या अनुमतीनंच लीक झाली असावी. अमेरिकन गुप्तहेर विभागाकडे असलेली माहिती थोड्या प्रमाणात उघड करून अमेरिका उत्तर कोरियावर दबाव टाकत आहे. अजूनही उत्तर कोरियात काही गुप्त ठिकाणी अण्वस्त्र कारवाया चालतात ही बाब उत्तर कोरियानं स्वीकारावी अशी नीती यामागे असू शकते.

अमेरिकेने नेहमी उत्तर कोरियाला त्यांचे अण्वस्त्र कार्यक्रम कुठे चालतात हे उघड करण्याची संधी दिली आहे. त्यांनी ज्या साइट्सशी माहिती दिली त्या माहितीची उलट तपासणी अमेरिकेनं आपल्या गुप्तहेर विभागाच्या मदतीनं केली. यावरून उत्तर कोरिया किती प्रामाणिकपणे वाटाघाटीमध्ये सहभाग घेत आहे याचा अंदाज बांधता येतो, असं पांडा सांगतात.

आता आपल्याकडे उत्तर कोरियाच्या न्युक्लियर साईटची माहिती आहे, तेव्हा आता आपण हे पाहू की उत्तर कोरिया स्वतःहून ही माहिती उघड करणार की नाही?

दबावतंत्र उपयोगी पडणार का?

आता प्रश्न हा आहे की सिंगापूर परिषदेनंतर उत्तर कोरियावर वठणीवर येण्याइतका दबाव निर्माण होईल की नाही?

सध्याच्या अहवालावरून तरी असं दिसतं की उत्तर कोरिया त्यांचा अण्वस्त्राचा कार्यक्रम पुढे राबवणारच.

उत्तर कोरियानं देखील काही आडाखे बांधलेले असू शकतात असं नारंग यांना वाटतं. उत्तर कोरियावरील निर्बंध उठवण्याबाबत चीनची भूमिका उत्तर कोरियाला अनुकूल आहे आणि अमेरिकेला उत्तर कोरियावरील निर्बंध सुरू ठेवावे असं वाटत असेल तर त्यांना चीनचं सहकार्य असणं आवश्यक आहे.

किम जाँग उन असं म्हणू शकतात, 'दबावासमोर टिकण्यासाठी जे काही करणं आवश्यक होतं ते सर्वकाही मी केलं.'

आणि मला वाटतं किम जाँग उन बरोबर आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)