थायलंड : गुहेत बेसकॅम्प तयार करण्याचा बचाव पथकाचा प्रयत्न

थायलंड Image copyright AFP
प्रतिमा मथळा गुहेत बेसकॅम्प तयार करण्याचा डायव्हर्सचा प्रयत्न आहे.

थायलंडच्या गुहेत अडकलेली 12 मुलं आणि त्यांचे फुटबॉल प्रशिक्षक यांना बाहेर काढणं हे मदत पथकासमोरचं मोठं आव्हान आहे.

खायला प्यायला काहीही नाही तसंच प्रकाशाची तिरीप नाही असे नऊ दिवस या मुलांनी तसंच त्यांच्या प्रशिक्षकांनी गुहेतच काढले. सोमवारी मदत पथकं त्यांच्यापर्यंत पोहोचली.

मात्र गुहेतली पाण्याची पातळी ओसरेपर्यंत या सगळ्यांना काही महिने गुहेतच राहावं लागेल असे संकेतही मदत पथकानं दिले आहेत.

त्यांना बाहेर काढणार कसं?

गुहेच्या बोगद्यांमधून बाहेर पडण्यासाठी या मुलांना पोहण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. स्कुबा डायव्हिंग तंत्राच्या माध्यमातून पोहायला शिकवण्यात येईल.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : थायलंडच्या गुहेत मुलं सुरक्षित पण सुटका कठीण

डायव्हिंगच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांत कमी वेळात बाहेर आणता येऊ शकतं मात्र त्यात धोका जास्त आहे असं अन्मर मिर्झा यांनी सांगितलं. अन्मर हे US Cave रेस्क्यू कमिशनचे राष्ट्रीय समन्वयक आहेत.

जगातल्या सर्वोत्तम अशा डायव्हर्सना या चमूपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस लागले. अडकलेल्या मुलांपैकी अनेकांना पोहता येत नाही. गुहेत अडकलेले असताना या सगळ्यांनी पाण्यातले वेगवान प्रवाह, धुसर प्रकाश आणि चिंचोळे रस्ते यांचा सामना केला.

Image copyright facebook
प्रतिमा मथळा अडकलेल्या मुलांचा फेसबुकवरील फाइल फोटो.

संपूर्ण चेहरा झाकला जाईल असे मास्क अडकलेल्या मुलांना तसंच प्रशिक्षकांना देण्यात येतील. डायव्हिंग करण्यासाठी एक मार्ग आखला जाईल तसंच ऑक्सिजनचे टँकही देण्यात येतील.

अंधारातून मार्ग काढण्यासाठी या मुलांना मदत पथकाद्वारे ग्लो स्टिक्स देण्यात येईल. मात्र एवढं करूनही या मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या जीवाला धोका असेल.

दुसरा पर्याय म्हणजे पावसाचा जोर ओसरण्याची वाट पाहणं. धुवांवार पावसामुळे गुहेत मोठ्या प्रमाणावर पाणी साठलं होतं. परंतु पावसाचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे. त्यामुळे पाऊस थांबण्यासाठी अनेक महिने वाट बघावी लागू शकते. अशा परिस्थितीत अडकलेले सर्व जण चालत बाहेर येऊ शकतात, मात्र यामध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे.

गुहेला वरून भगदाड करून अडकलेल्या सर्वांना हवाईमार्गे बाहेर काढण्याचा विचारही मदतकार्य पथकानं केला मात्र यातही बराच धोका आहे.

नक्की धोका काय आहे?

अडकलेली 12 मुलं साधारण 11 ते 16 वयोगटातली आहेत. त्यांच्या फुटबॉल प्रशिक्षकाचं वय 25 आहे. ते सगळेजण गुहेतल्या छोट्या दगडामुळे निर्माण झालेल्या जागेवर स्थिरावले आहेत.

पाऊस आणि पूरस्थितीमुळे आतलं वातावरण गच्च ओलसर आहे. या सगळ्यांनी स्वत:ला उबदार ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा त्यांना हायपोथर्मिया अर्थात शरीराचं तापमान कमी होण्याचा आजार होऊ शकतो.

गुहेत वरून सुटणारे दगड हे अडकलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकतात, मात्र त्याहीपेक्षा जास्त धोका वाढणाऱ्या पूरस्थितीपासून आहे. वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढला तर गुहेत हवा खेळती राहण्याचा मार्गच बंद होऊ शकतो.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा बचाव पथकं सुटकेसाठी अथक प्रयत्न करत आहेत.

दरम्यान सुटका होईपर्यंत या मुलांनी शांत राहून त्या दगडावर बसून राहणे आवश्यक आहे, असं अँडी एव्हिस यांनी सांगितलं. एव्हिस हे ब्रिटिश केव्हिंग असोसिएशनचे माजी प्रमुख आहेत.

मुलांनी तसं केलं नाही तर एखादा दगड त्यांच्या डोक्यात पडू शकतो किंवा ते पाण्यात वाहून जाऊ शकतात. काळोखात वावरणं अत्यंत धोकादायक आहे.

मदत कुठल्या स्वरुपाची?

या सगळ्या मुलांना तसंच प्रशिक्षकांना खाणंपिणं आणि औषधं देण्यात येत आहेत. हाय कॅलरी असणाऱ्या पदार्थांचा यात समावेश आहे.

12 मुलं आणि त्यांच्या प्रशिक्षकांना चार महिने पुरेल एवढा अन्नसाठी पुरवण्यात येईल. पाण्याची कमी होत असतानाच त्यांना डायव्हिंगचं प्रशिक्षण देण्यात येईल असं नौदल कप्तान आनंद सुरुवान यांनी सांगितलं. थायलंडच्या लष्करानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

प्रतिमा मथळा बचाव पथकं मुलांपर्यंत कशी पोहोचली त्याचा नकाशा.

अडकलेले मुलांपैकी बहुतांशी जणांची प्रकृती चांगली आहे. मात्र काहींना अशक्तपणा जाणवत आहे तर काहींना दुखापती झाल्या आहेत. अडकलेल्या मुलांसाठी डॉक्टर आणि नर्स यांना गुहेत पाठवण्यात आलं आहे. एका जागेवरून ते दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात का? याबाबत डॉक्टर निर्णय घेणार आहेत.

दरम्यान डायव्हर्स मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा साठा घेऊन गुहेत जात आहेत. गुहेत आत बेसकॅम्प तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

मुलं मानसिक कणखरता दाखवणार का?

"गुहेत जाणवणारं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे गडद काळोख. त्या मुलांकडे बॅटऱ्या असतील, मोबाइलमधली टॉर्च असेल मात्र तासनतास ते सगळे काळोखात बसून आहेत. त्यामुळे डायव्हर्स गुहेत जाताना प्रकाशाची व्यवस्था घेऊन जात आहेत," असं एव्हिस यांनी सांगितलं.

मुलांना आपल्या पालकांशी बोलता यावं यासाठी टेलिफोन यंत्रणा सुरू करण्याचा डायव्हर्सचा प्रयत्न आहे. सध्याची परिस्थिती पाहता अडकलेल्या 13 जणांची स्थिती चांगली आहे.

प्रतिमा मथळा थायलंडमधील हजारहून अधिक माणसं बचाव प्रक्रियेत सहभागी आहेत.

या सगळ्यांची मानसिक स्थिती उत्तम आहे आणि ही अगदीच चांगली गोष्ट आहे असं बेल्जियम डायव्हिंगपटू बेन रेमेनंट्स यांनी सांगितलं. अडकलेल्या 13 जणांना गुहेतून बाहेर काढण्यासाठी बेन मदत पथकाला मदत करत आहेत.

या सगळ्या मुलांना एकत्र आणण्याचं काम त्यांचे प्रशिक्षक करत आहेत. या सगळ्यांमधली एकीची भावना प्रशिक्षकांनी जपली आहे, असं बेन यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics