टोकियो मेट्रोत विषारी वायूने हल्ला करणाऱ्या जपानी बाबाला फाशी

शोको असाहारा Image copyright AFP
प्रतिमा मथळा ऑम शिनरिक्यो या पंथाचे प्रमुख शोको असाहारा

जपानमधील वादग्रस्त पंथ ओम शिनरिक्योचा प्रमुख शोको असाहारा याला फाशी देण्यात आल्याचे माध्यमांनी म्हटलं आहे. 1995 मध्ये टोकिओच्या भुयारी मेट्रोत विषारी वायूच्या हल्ल्याचा सूत्रधार शोको असाहारा होता.

अख्खं जपान हादरवणाऱ्या या हल्ल्यात सरीन या विषारी वायूचा वापर झाला होता. त्यात 13 जणांचा मृत्यू तर हजारो जणांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला होता.

जपानी माध्यमांनुसार शोको असाहारा व्यतिरिक्त ओम शिनरिक्यो पंथांतील आणखी 6 जणांना फाशी देण्यात आहे. तर इतर सहा जणांनाही मृत्युदंड ठोठावण्यात आला आहे.

बाराही जणांच्या दयायाचनेवर सुनावणी पूर्ण होईस्तोवर त्यांची फाशीची अंमलबजावणी होणार नव्हती. जानेवारी महिन्यात त्यांच्या याचिकांवरील सुनावणी पूर्णत्वास आली होती.

काय होतं प्रकरण?

20 मार्च 1995 रोजी साकाहारा यांच्या अनुयायांनी टोकिओतील भुयारी मेट्रोत सरीन या विषारी वायूच्या द्रव्य रूपातील पिशव्या ठेवल्या होत्या. त्या पिशव्यांना छिद्रं पाडण्यात आली होती.

या पिशव्यांमधून वाफा बाहेर येऊ लागल्या आणि त्यामुळे डोळ्यांना जळजळ होऊ लागली, असं त्यावेळी प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. हा वायू इतका विषारी होता की त्याच्या संपर्कात येताचा नागरिकांचा जीव गुदमरू लागला, त्यांना उलट्या सुरू झाल्या, काही जण अंध झाले तर काहींना पक्षाघात झाला.

गुन्हेगारीचं प्रमाण कमी असलेल्या जपानला हा हल्ल्यामुळे धक्का बसला होता. या पंथांच्या अनेक सदस्यांवर खटला चालवण्यात आला, त्यापैकी 13 जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली, तर सहा जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
व्हीडिओ : टोकिया हल्ल्यात काय घडलं होतं? काही दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतात.

ओम शिनरिक्यो पंथ आहे तरी काय?

ओम शिनरिक्यो या शब्दाचा अर्थ आहे 'अंतिम सत्य'. 1980मध्ये सुरू झालेल्या या पंथात सुरुवातीला हिंदू आणि बौद्ध धर्मातील विचारांचा समावेश होता. नंतर ख्रिश्चन धर्मात विश्वाच्या अंतासंदर्भात जी भाकितं नोंदवण्यात आली आहेत, त्यावर हा पंथ काम करू लागला.

या पंथाचे प्रमुख असाहारा यांनी स्वतःला येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्धानंतरची पहिली 'प्रबुद्ध' व्यक्ती म्हणून घोषित केलं होतं.

1989 साली ओम शिनरिक्योला जपान सरकारनं धार्मिक संस्थेचा दर्जा दिला. त्यानंतर त्यांच्या पंथात जगभरातून हजारो लोक सामील झाले होते.

त्यानंतर शिनरिक्यो हा पंथ प्रलयवादी झाला. सृष्टीचा अंत होईल आणि केवळ शिनरिक्यो पंथातील लोकच वाचतील, अशी त्यांची धारणा होती.

1995च्या हल्ल्यानंतर हा पंथ भूमीगत झाला पण सक्रिय राहिला. त्या काळात या पंथाचं नाव 'आलेफ' किंवा 'हिकारी नो वा' असं होतं.

Image copyright AFP

ओम शिनरिक्योला अमेरिका आणि इतर देशांमध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पण जपानमध्ये आलेफ आणि हिकारी नो वा'ला कायदेशीर मान्यता आहे. पण धोकादायक धर्म म्हणून त्यांची तिथे नोंद असून त्यांच्यावर पोलिसांची करडी नजरही असते.

अजूनही या पंथाचे अनेक अनुयायी जपानसह जगभरात आहेत. 2016 साली रशियन पोलिसांनी या पंथाच्या संशयित अनुयायींच्या मॉस्को आणि सेंट पीट्सबर्गमधील ठिकाणांवर छापे मारले होते.

शिक्षेच्या अंमलबजावणीसाठी विलंब का झाला?

जपानच्या कायद्यानुसार, एखाद्या खटल्यात जर समूहाचा सहभाग असेल तर त्यातील सर्व आरोपींचे खटले पूर्णत्वास जाऊन त्यांची शिक्षा निश्चित होईपर्यंत मृत्युदंडाची अंमलबजावणी होऊ शकत नाही.

जानेवारी महिन्यात या प्रकरणाच्या शिक्षेची सुनावणी संपली. सर्वोच्च न्यायालयाने एका आरोपीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवत त्याला जन्मठेप सुनावल्यानंतर या खटल्याचं कामकाज संपल्याचं न्यायालयाने जाहीर केलं.

जपानमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेवर असणारी तात्पुरती बंदी 2010मध्ये उठवण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत वर्षाला आठ जणांना फाशीची देण्यात आली आहे.

फक्त अतिभीषण प्रकरणांमध्ये जपानमध्ये मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी दोषीला फासावर लटकावून होते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)