थायलंड गुहेत मुलांच्या सुटकेसाठी गेलेल्या डायव्हरचा ऑक्सिजनअभावी मृत्यू

थाई नौदलानं पाणबुड्यांसाठी हे ऑक्सीजन सिलेंडर आणले आहेत. Image copyright EPA
प्रतिमा मथळा थाई नौदलानं डायव्हर्ससाठी ऑक्सीजन सिलेंडर आणले आहेत.

थायलंडमधील पाण्याने भरलेल्या गुहेत अडकलेली 12 मुलं आणि त्यांच्या प्रशिक्षकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी गेलेल्या एका डायव्हरचा मृत्यू झाला आहे.

गुहेत ऑक्सिजन सिलेंडर्सचा पुरवठा करण्याचं काम 38 वर्षीय समान गुनन या थायलंडच्या डायव्हरकडे होतं. ऑक्सिजनचा पुरवठा करून परतत असताना त्यांना स्वत:साठी पुरेसा ऑक्सिजन उरला नाही. त्यामुळे त्यांची शुद्ध हरपली. त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ते वाचू शकले नाही.

गुनम यांनी नौदलातून निवृत्ती पत्करली होती, मात्र गुहेत अडकलेल्यांसाठी आयोजित मदत कार्यात ते स्वतः सहभागी झाले होते.

गुनम अव्वल धावपटू आणि सायकलपटू होते. गुहेत अडकलेल्या मुलांसाठी बचाव पथक तयार करण्यात आलं. गुनम या पथकाचा महत्त्वाचा घटक होते. दोन आठवड्यांपासून गुनम गुहेत जात होते.

शुक्रवारी सकाळी गुनम यांचा मृत्यू झाल्याचं डेप्युटी गव्हर्नर चिआंग राय यांनी सांगितलं.

12 मुलं आणि त्यांच्या फुटबॉल प्रशिक्षकाला वाचवण्यासाठीच्या बचाव पथकात 1,000 जणांचा समावेश आहे. यामध्ये नेव्ही डायव्हर्स, लष्कराचे अधिकारी तसंच स्वयंसेवकांचा समावेश आहे.

गुनन यांच्या मृत्यूमुळे बचाव पथकाच्या कामातील धोके स्पष्ट झाले आहेत. गुनम यांच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे, मात्र तरीही बचावाचं काम नेटाने सुरू राहील, असं थाई सील कमांडर अपाकोर्न योकोंगकाऊ यांनी सांगितलं.

प्रतिमा मथळा बचाव पथकं मुलांपर्यंत कशी पोहोचली त्याचा नकाशा.

मुलं तसंच प्रशिक्षकांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त काळजी घेऊ, असं आश्वासन अपाकोर्न यांनी दिलं.

दरम्यान, गुहेतली ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी 5 किलोमीटरची केबल टाकण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

नऊ दिवसांनंतर सोमवारी बचाव पथकं 12 मुलं आणि त्यांच्या प्रशिक्षकांपर्यंत पोहोचू शकली. मात्र गुहेतली पाण्याची पातळी वाढत असल्याने त्यांच्या सुटकेत अडथळे निर्माण झाले.

या मुलांची तब्येत चांगली असल्याचा व्हीडिओ गुरुवारी प्रसिद्ध झाला होता. त्यांच्या सुटकेबाबत आशावादी चित्र निर्माण झाले असतानाच डायव्हरचा मृत्यू झाल्याने वातावरण चिंतेचं झालं आहे.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : थायलंडच्या गुहेत मुलं सुरक्षित पण सुटका कठीण

पाण्याची पातळी वाढल्यास मुलांना डायव्हिंग करण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. पाण्याची पातळी कमी न झाल्यास या मुलांना तसंच प्रशिक्षकांना काही महिने गुहेतच काढावे लागतील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)