थायलंड : गुहेतून 4 मुलं सुरक्षित बाहेर काढली; मोहीम सकाळपर्यंत थांबवली

थायलंड

फोटो स्रोत, Getty Images

थायलंडमध्ये गुहेत अडकून पडलेल्या 12पैकी 4 मुलांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मोहिमेचे प्रमुख नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तुर्तास ही मोहीम थांबवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. सोमवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरू केली जाणार आहे.

ते म्हणाले, "बाहेर काढण्यात आलेल्या मुलांची प्रकृती उत्तम आहे. उर्वरित मुलांना काढण्यासाठी पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करण्यास 10 तास तयारी करावी लागणार आहे. या तयारीसाठी ही मोहीम थांबवण्यात आली आहे."

या मोहिमेत 60 डायव्हर्स सहभागी झाले होते. यातील 40 थायलंडमधील तर 50 इतर देशांतून आले आहेत.

फोटो स्रोत, EPA

आज दिवसभरात काय घडलं?

  • स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता मुलांना बाहेर काढण्याची मोहीम सुरू झाली.
  • स्थानिक वेळेनुसार 5 वाजून 40 मिनिटांनी पहिल्या मुलाला गुहेतून बाहेर काढण्यात आलं.
  • आजच्या मोहिमेत चार मुलांना गुहेतून बाहेर काढण्यात आलं आहे. सर्व मुलांना जवळच्या चाईंग राई या हॉस्पिलटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मुलांची प्रकृती चांगली असल्याचं सांगण्यात आलं.
  • रात्री 9 वाजता मोहीम थांबवण्यात आली.
  • सोमवारी सकाळी मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार असून उरलेली 8 मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जातील.

फोटो स्रोत, Getty Images

स्थानिक वेळेनुसार 5वाजून 40 मिनिटांनी पाहिल्या मुलाला बाहेर काढण्यात आलं. चारही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

(बीबीसीचे प्रतिनिधी घटनास्थळाहून देत असलेल्या माहितीनुसार ही बातमी सतत अपडेट करण्यात आली आहे.)

7.44 वा. चार जणांना बाहेर काढलं.

पत्रकार परिषदेत आतापर्यंत झालेल्या मोहिमेची माहिती देण्यात आली.

7.20 वा. चाईंग राई हॉस्पिटलला 2 रुग्णवाहिका पोहोचल्या

बीबीसीचे नीक बैक यांनी चाईंग राई हॉस्पिटलचा फोटो पाठवला आहे. तिथे आतापर्यंत दोन रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत.

फोटो स्रोत, AFP/Getty Images

7.15 वा. आणखी रुग्णवाहिका रवाना

बीबीसीचे हॉवर्ड जॉन्सन यांनी आणखी रुग्णवाहिका रवाना झाल्याचं कळवलं आहे.

7.00 वा. सहा मुले बाहेर आली

गुहेतून आतापर्यंत 6 मुलांना बाहेर काढल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक माध्यमं तसेच एएफपी या वृत्तसंस्थेनं ही बातमी दिली आहे. बीबीसीला या माहितीची स्वतंत्रपणे खातरजमा करता आलेली नाही.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिका या मोहिमेत थायलंडसोबत काम करत असल्याचं म्हटलं आहे. मोहिमेत सहभागी टीमचं त्यांनी कौतुक केलं आहे.

लेफ्टनंट जनरल काँगचीप टंट्रावनीट यांनी सांगितलं. अजून चार मुलं काही वेळातच गुहेतून बाहेर येतील. गुहेतील डायव्हरच्या बेस कॅंपवर ही मुलं पोहोचली आहेत, ही मुलं काही वेळातच बाहेर येतील, असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, AFP/GETTY IMAGES

चाईंग प्रांताचे मुख्य आरोग्य अधिकारी टोसाथेप बूंथाँग यांनी दोन मुलांना या गुहेतून बाहेर काढण्यात आल्याचं म्हटलं आहे. ही मुलं सध्या गुहेनजीक उभारण्यात आलेल्या फिल्ड हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात येत असून अजून त्यांना चाईंग राई हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलेलं नाही, असं त्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Helier Cheung/Twitter

फोटो कॅप्शन,

पहिली रुग्णवाहिका निघाली.

गुहेपासून सर्वांत जवळचं हॉस्पिटल 1 तासाच्या अंतरावर आहे, अशी माहिती बीबीसीचे प्रतिनिधी जॉन्सन यांनी दिली. हॉस्पिटलच्या जवळ या मुलांचे पालक आणि नातेवाईक थांबले आहेत.

प्राधान्य कसं ठरवलं?

शनिवारी या गुहेत डॉक्टरांनी मुलांच्या आरोग्याची तपासणी केली. त्यानंतर ज्या मुलांची प्रकृती अशक्त आहे, त्यांना प्राधान्यानं बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती जॉन्सन यांनी दिली.

23 जूनपासून थायलंडमधील गुहेत अडकलेल्या 12 मुलांना आणि त्यांच्या 1 प्रशिक्षकाला बाहेर काढण्याची मोहीम सकाळी 10 वाजल्यापासून सुरू करण्यात आली आहे.

पुराचं पाणी ओसरू लागल्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. याआधी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ज्यांची आवश्यकता नाही त्यांना, तसंच गुहेबाहेर उपस्थित पत्रकारांना परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आलं.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

थायलंड लष्कर आणि स्थानिक लोकांनी पुढे येऊन बचावकार्यात हातभार लावला आहे.

"येत्या चार-पाच दिवसांमध्ये गुहेच्या परिसरातलं वातावरण आणि पाण्याचं प्रमाण बचावकार्याला अनुकूल असणार आहे. मुलांचं आरोग्यही त्या दृष्टीने योग्य आहे," असं चिआंग राय प्रांताचे गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काल या मुलांनी आपल्या पालकांना पत्र लिहून 'आम्ही सुरक्षित आहोत, डोंट वरी', असे संदेश दिले होते. वाचा त्यांची पत्रं इथे.

ही गुहा खूप लांब आहे आणि आत पाणी शिरलेलं आहे. जिथे पाणी नाही, तिथे सर्व डाइव्हर्स तळ बनवून थांबले आहेत.

मुलांना आधी एक-एक करून या तळावर आणलं जाईल आणि मग तिथून त्यांना गुहेबाहेर काढून हॉस्पिटलमध्ये नेलं जाईल, अशी त्यांची योजना आहे.

थायलंडच्या नौसैनिकांनी त्यांचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी एकमेकांचा हात पकडला आहे. या ऑपरेशनची घोषणा झाल्यावर त्यांनी हा फोटो टाकला आहे.

परदेशाहून आलेले 13 डायव्हर्स आणि थायलंड नौसेनेतील अधिकाऱ्यांचं पथक त्या मुलांना बाहेर काढण्याचं काम करत आहे. पहिला मुलगा बाहेर येण्यासाठी 10-11 तास लागू शकतात, असा अंदाज आहे.

या ऑपरेशनची मुलांच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. मुलांना तिथून परत कसं आणलं जाणार आहे, हे मात्र अजूनही स्पष्ट नाही.

"या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी कोणतीही घाई केली जाणार नाही. कमीत कमी धोका पत्करून त्यांना बाहेर काढलं जाईल, कारण या सगळ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे," असं गर्व्हनर ओसोट्टानाकॉर्न यांनी आधीच सांगितलं होतं.

बीबीसीचे प्रतिनिधी जॉनथन हेड यांनी माहिती दिली की, बचाव कामातील सर्वांत मोठी अडचण आहे ती म्हणजे या मुलांनी यापूर्वी कधीही डायव्हिंग केलेलं नाही. शिवाय या मुलांना डायव्हिंगची उपकरणं सोबत घेऊन पोहायचं आहे.

गुहेतील पाणी अतिशय थंड आहे. मुलांना काही तास याच पाण्यात पोहावं लागणार आहे. त्याचा मुलांना त्रास होऊ शकतो. इतका वेळ पाण्यात पोहावं लागल्याने शरीर बधीर होऊ शकतं.

तसंच मुलांना इन्फेक्शनही होऊ शकतं. या गुहेत असलेले वटवाघूळासारखे प्राणी चावण्याचीही भीती आहे.

या 13 जणांना बाहेर काढण्यासाठी किमान 3 दिवस लागू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

आतापर्यंत या गुहेतून 12.8 कोटी लीटर पाणी बाहेर काढलं आहे.

मुलांना बाहेर काढण्याचा निर्णय का?

पाऊस थांबेपर्यंत मुलांना गुहेतच थांबावं लागेल असं चित्र होतं. पण थायलंडमध्ये पाऊस नुकताच सुरू झाला आहे. त्यामुळे गुहेतील पाण्याची पातळी सध्या आहे त्यापेक्षा वाढली तर परिस्थिती अधिकच गंभीर होऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images

काही दिवसांपासून गुहेतील पाणी मोटरने बाहेर काढलं जात आहे आणि पाण्याची पातळी कमी झाली आहे, म्हणून मुलांना गुहेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुहेत मुलांपर्यंत पोहचणं आणि पुन्हा बाहेर येण अशा एका फेरीला 11 तासांचा वेळ लागणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)