अमेरिका : रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात तेलंगणाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

शरत कोप्पू

फोटो स्रोत, facebook/sharath koppu

फोटो कॅप्शन,

शरत यांनी तेलंगणातील वासवी इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि ते पुढील शिक्षणासाठी जानेवारीमध्ये मिसोरी विद्यापीठात आले होते.

अमेरिकेत कॅन्सास सिटीमधील एका रेस्टॉरंटमध्ये झालेल्या गोळीबारात तिथेच पार्ट-टाइम काम करणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

25 वर्षीय शरत कोप्पू हे इंजिनिअरिंगची पदवी मिळाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी तेलंगणातून मिसोरी युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते. ते शिकत असतानाच जेज् फिश अॅंड चिकन मार्केट या रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाइम जॉब करत होते.

शुक्रवारी या रेस्टॉरंटमध्ये सशस्त्र दरोडा पडला. या दरोड्यादरम्यान संशयिताने गोळीबार केला, ज्यात शरत यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती शरत यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

गोळीबार करणारी संशयित व्यक्ती CCTVमध्ये कैद झाली आहे. त्याची ओळख पटल्याचं पोलिसांनी सांगितलं असून पोलिसांनी एक व्हीडिओही प्रसिद्ध केला आहे. यातल्या संशियाताबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी 10,000 डॉलरचं बक्षीस जाहीर केलं आहे.

वर्षभरापूर्वी कॅन्सास सिटीमध्ये श्रीनिवास कुचिभोतला यांचा मृत्यू गोळीबारात झाला होता.

शरत यांनी तेलंगणातील वासवी इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण घेतलं आणि ते पुढील शिक्षणासाठी जानेवारीमध्ये मिसोरी विद्यापीठात आले होते.

त्यांचे वडील राम मोहन हे BSNLमध्ये काम करतात. तीन वर्षांपूर्वी त्यांचं कुटुंब वारंगलहून हैदराबादला आलं होतं. शरत यांचे पार्थिव अमेरिकेहून घरी आणण्यासाठी शरत यांचे चुलत भाऊ पैसे जमा करत असल्याची माहिती बीबीसी तेलुगूने दिली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)