'... आणि वाघाने आमच्या अंगावर उडी मारली!'

  • जयदीप हर्डीकर
  • बीबीसी मराठीसाठी नागपूरहून
वाघ

फोटो स्रोत, Getty Images

शेतामधल्या समाधीवर लिहिलंय, "चेतन दादाराव खोब्रागडे. जन्म: 8/8/1995. मृत्यू : 13/5/2018."

म्हणजे अवघ्या 22 वर्षांचं आयुष्य! हे काही मरण्याचं वय नाही. आणि ही मारण्याची रीत देखील नव्हे. मृत्यू, मागून चोरपावलांनी आला असेल. चेतनला त्याची कल्पना नसावी. आता 22व्या वर्षीच त्याने एक मुक्त जीवन जगायला नुकतीच सुरुवात केली होती. त्याला आधी त्याच्या मोठ्या बहिणीचं लग्न करायचं होतं आणि नंतर स्वतःचं.

"इकडे वाघ फिरत असतो असं आम्ही ऐकून होतो", चेतनची मोठी बहीण प्रियंका (25) निर्विकार चेहऱ्याने म्हणते, "पण तो माझ्या भावालाच मारून टाकेल आणि तेही आमच्याच शेतात याची कल्पना कधी स्वप्नातही करणं शक्य नव्हतं."

उन्हाळ्यातली संध्याकाळची वेळ होती. घामाने जीव नकोसा झाला होता. संध्याकाळी सहा वाजता चेतन गुरांसाठी हिरवा चारा आणायला शेतात गेला.

खोब्रागडेंचं पाच एकर शेत गावाच्या केवळ 500 मीटर अंतरावर आहे. अगदी घरासमोर. रस्त्याच्या एका बाजूला शेतं आणि एका बाजूला गावच्या घरांची रांग. घराच्या छतावरून आवाज दिला तर तो शेतात ऐकायला येणार. शेताच्या पलीकडे साग आणि बांबूचं घनदाट जंगल आहे.

तासभर होऊन गेला, तरी चेतन परतला नाही म्हणून चेतनचा लहान भाऊ साहिल आणि चुलत भाऊ विजय खोब्रागडे त्याला शोधायला शेतात गेले. चेतनचा कोयता त्यांना शेतात पडलेला दिसला, पण चेतनचा कुठेच पत्ता नव्हता. चेतन पुन्हा परतलाच नाही.

फोटो स्रोत, Jaideep Hardikar

फोटो कॅप्शन,

वीरसिंह

थोड्याच वेळात अंगावर काटा आणणारं दृश्य दोघांना दिसलं आणि ते "वाघ, वाघ" म्हणून ओरडायला लागले. त्यांच्यापासून जवळच असलेल्या हिरव्या कदयाळूच्या पिकामध्ये त्यांना चेतन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. चेतन जिथे पडला होता, तिथेच बोट दाखवत विजयने गावकऱ्यांना सांगितलं की, त्यांनी वाघाला तिथून जंगलात पळून जाताना पाहिलं. चेतनवर हल्ला करणारा वाघ जवळपासच फिरत आहे, हे गावकऱ्यांना माहीत होतं. तो पूर्ण वाढ झालेला आणि तहानभुकेने कासावीस झालेला वाघ असावा, असा अंदाज होता.

अचानक उद्भवणारे संघर्ष

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

नागपूरपासून जेमतेम 50 किमी अंतरावर असलेल्या बोर व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या आमगाव (जंगली) या गावात उत्कंठा, भय आणि उदासीनतेचं वातावरण आहे.

बोर व्याघ्र प्रकल्प देशातला नवा आणि सर्वात लहान प्रकल्प आहे. गावाच्या राजकीय सामाजिक चळवळीत आघाडीवर असणारा एक उमदा तरुण वाघाच्या भक्ष्यस्थानी पडल्यापासून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

"आम्हाला इथून लगेच हटवा आणि मोकळं करा", 65 वर्षीय माजी सरपंच बबनराव येवले म्हणतात.

पूर्व महाराष्ट्रात असलेल्या एकूण पाच व्याघ्र प्रकल्प आणि इतर वन्य प्रकल्प असलेल्या विदर्भातले आमगाव (जंगली) हे गाव या उन्हाळ्यात अचानकच मानव-वाघ संघर्षाचा केंद्रबिंदू बनले. गावकऱ्यांना जंगल काही नवीन नाही. प्राणीही नवीन नाही. पण यावेळी प्रथमच इथे एक माणूस वाघाच्या भक्ष्यस्थानी पडला.

इथल्या भूभागातल्या मूळ गौळव जातीच्या गाई पाळणारे नंदा गवळी समुदायाचे येवले पुढे म्हणतात, " यापूर्वी कधीही आमच्यावर असे संकट आले नव्हते".

नंदा गवळी समुदायाचे या भागात प्राबल्य आहे. येवले सांगतात, "शतकानुशतकं आमच्या समाजानं इथल्या जंगलातल्या हिरवळीवर आपली गुरं चारली आहेत. चारताना गुरं राखणाऱ्याला याची जाणीव असायची की, वाघ काही जनावरांवर हल्ला करेल. आम्ही कळपाच्या परिघावर मुद्दामच नर जनावर ठेवायचो, जेणेकरून वाघाने त्याच्यावर हल्ला केला तरी चालेल. नर गुरांना वाघाने खाल्लेलं आम्हाला चालत होतं."

नंदा गवळी उन्हाळा ते दिवाळी सहा महिन्यांसाठी रोज जंगलात गुरं घेऊन जायचे आणि जंगलात सोडून द्यायचे. हा सिलसिला जंगल व्याघ्र प्रकल्प म्हणून आरक्षित होईपर्यंत चालला. त्यानंतर जंगलात कोणत्याही मानवी हस्तक्षेपाला बंदी घालण्यात आली. "आमगाव(जंगली) बफर झोन मध्ये येतं आणि वन विभागाचे कडक नियम आम्हाला आणि आमच्या जनावरांना तिथे जाण्याला कडक निर्बंध घालतात. त्यात पाळीव जनावरांनी जंगलात जाऊन चरण्यावरचे निर्बंधही आले, येवले सांगतात."

फोटो स्रोत, jaideep hardikar

"आमच्यात आणि जंगलात परस्परावलंबी संबंध होते, जे बोर व्याघ्र प्रकल्प आरक्षित झाल्यामुळे तुटले," येवले म्हणतात. आता वाघांची संख्या वाढली म्हटल्यावर वाघ प्रकल्पाच्या ठरलेल्या सीमेच्या बाहेर यायला लागले आहेत. विदर्भातल्या सर्वच आरक्षित जंगलांच्या सीमेवर अगदी हेच हाल आहेत. यंदाच्या मार्च ते जून या काळात वाघांच्या माणसांवरती अचानक हल्ल्यांची संख्या वाढली आहे, आणि हे हल्ले आरक्षित जंगल सीमेच्या बाहेर होतात आहे, हे विशेष.

आतापर्यंत नागपूरपासून 150 किमी दूरच्या ताडोबा-अंधेरी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेबाहेर जे प्रकार घडत होते, ते आता विदर्भातल्या सर्वच व्याघ्र प्रकल्पांच्या सीमेबाहेर घडायला लागले आहेत. त्यात नागपूरच्या उत्तरेला, यवतमाळचे झुडपी जंगल, बोर आणि विदर्भातले सर्वच वनक्षेत्र आले.

या सर्व हल्ल्यांमध्ये एक विलक्षण साम्य आहे. सर्व हल्ले शेतात किंवा गावांना लागून असलेल्या जंगली भागात अचानक होत आहेत.

दामू आत्राम हे कोलाम आदिवासी शेतकरी त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील हिवरा(बरसा) या गावातील शेतात काम करत होते. पांढरकवड्यापासून अगदी 25 किमी अंतरावरचं गाव. गावालगत जंगल. हरीण, गव्हे, रानडुक्कर वगैरे असतात आजूबाजूला. पण वाघ! पट्टेदार वाघ आजूबाजूला कुठे असू शकतो याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. तेव्हा अचानक वाघाने त्यांच्यावर झडप घेतली.

"त्याने माझ्यावर झडप घेतली, पण मी ओरडलो तेव्हा तो पळून गेला". डोक्यावर आणि मानेवर जखमा झाल्या पण आत्राम यांच्या मदतीला लगेचच गावकरी धावून आल्यामुळं ते वाचले. "अजूनही माझं डोकं मला भारी भारी वाटतं," ते सांगतात. त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली म्हणून ते वाचले.

हिवरा बरसा पासून 225 किमी दूर, नागपूरच्या उत्तरेस पेंच व्याघ्र प्रकल्पा लगत पिनकेपार गावात 25 वर्षीय गोंड शेतकरी बीरसिंह बीरेलाल कोडवते अजूनही त्यांच्यावर झालेल्या वाघाच्या हल्ल्याच्या धक्क्यातून ते अजूनही सावरलेले नाहीत.

एके दिवशी मे महिन्यात ते त्यांच्या ३ वर्षीय मुलाला, विहानला, त्यांच्या दुचाकीवर बसवून जंगलात तेंदूपत्ता गोळा करायला निघाले. यापूर्वी कधीही त्यांचा वाघाशी सामना झाला नव्हता. हा भाग पेंच व्याघ्र प्रकल्पालगत येतो. हा पट्टा नवेगाव आणि गोंदियातील नागझिरा प्रकल्पांना जोडणारा वाघांचा कॉरिडॉर आहे.

"कोणीतरी आमच्या अंगावर धाडदिशी उडी मारली. मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तो वाघ होता!" कोडवते म्हणतात. ते दोघेही जमिनीवर पडल्यावर त्यांनी कशीबशी गाडी उभी केली, सुरू केली, आणि भयंकर जखमी अवस्थेत घराकडे दामटली. हे दोघंही नागपूरच्या सरकारी दवाखान्यात औषधोपचारासाठी जवळपास आठवडाभर होते. त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा भरायला लागल्या आहेत, पण मनावर बसलेला भीतीचा पगडा अजूनही जात नाही.

"वाघ रस्त्याच्या वळणावर कडेला लपून होता. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्याने आमच्यावर झडप घेतली आणि पंजाने आमच्यावर वार केला. त्याच्या जबड्यात आम्ही आलो नाही, नशीब! नाहीतर आम्ही मेलोच असतो," कोडवते सांगत असताना त्यांचा थरकाप उडतो.

कोडवते यांच्या जखमा ताज्या आहेत. त्यांच्या कानावर वाघाच्या नखांच्या जखमा आहेत. डोळे सुजले आहेत. चेहऱ्यावर डाव्या बाजूला आणि डोक्यावर खोल घाव आहेत. विहानची आई सुलोचना म्हणतात, "आता विहान एकटा झोपत नाही, त्याच्या डोक्याला आठ टाके आहेत. तो कसाबसा वाचला". हा आमचा दुसरा जन्म आहे, असंच कोडवते मानतात.

प्रश्न जुना, चिंता नव्या

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाशेजारी सिंदेवाही पासून चार मैलांवर मुरमाडी गाव आहे. गेल्या दोनच महिन्यात इथली दोन माणसं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. सिंदेवाही, तळोधी, आणि चिमूर अशा तीन ब्लॉक मध्ये किमान दहा माणसं वाघांच्या हल्यात दगावली आणि त्याहून अधिक जखमी झाली आहेत.

या हल्ल्यांनी २००५-०६च्या काळातल्या स्मृती जाग्या केल्या आहेत. वाघ-मानव यांच्यातला एवढा तीव्र संघर्ष जगाच्या पाठीवर कदाचित इतर कुठेही होत नसावा. हे सर्व हल्ले-संघर्ष एक तर गावांना लागून असलेल्या जंगलांमध्ये होत आहेत किंवा जंगल परिघाबाहेरच्या शेतांत होत आहेत.

फोटो स्रोत, jaideep hardikar

फोटो कॅप्शन,

मुरमाडीचे महादेव गेडाम यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी.

उदाहरणार्थ: मुरमाडीचे महादेव गेडाम चार जूनला स्वतःच्याच शेतातून जळणासाठी लाकूड फाटा आणायला गेले तेव्हा त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यांच्या शेताच्या भोवती थोडं जंगल आहे. गेडाम स्वतःला वाचवण्यासाठी झाडावर चढले, पण वाघाने त्यांना खाली खेचलं. अजस्त्र वाघाच्या शक्तीपूढे एका म्हाताऱ्याचे काय चालणार?

गीताबाई पेंदाम या आणखी एक साठीतल्या आदिवासी महिला गावालगतच्या जंगलात जळणासाठी लाकूडफाटा आणायला गेल्या असताना वाघाच्या हल्ल्यात मरण पावल्या. हे जंगल गावापासून केवळ 500 ते 800 मीटर दूर आहे.

गेडाम यांच्यावर हल्ला होण्याच्या पंधरा दिवस आधीच किन्ही गावातला तरुण मुकुंदा भेंडारे असाच जवळच्या जंगल पट्ट्यात वाघाच्या हल्ल्यात मारला गेला. वाघाने त्याचा देह छिन्नविछिन्न केला होता. सहा जूनला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या उत्तरेला असलेल्या चिमूर ब्लॉकमध्ये एका वाघाने शेतात काम करणाऱ्या चार महिलांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिघी जखमी झाल्या.

तरुण वनरक्षक स्वप्नील बडवाईक सांगत होता, "माझ्या अखत्यारीत येणाऱ्या या भागात पूर्ण वाढ झालेले दोन ते तीन वाघ आहेत. या वाघांनी इतक्यातच काही हल्ले केले आहेत. पण सिंदेवाही भागात हल्ले करणारे ते वाघ हेच आहेत का, हे कळलेलं नाही. CCBM कडे पाठवलेल्या लाळेच्या आणि अन्य नमुन्यांच्या परीक्षणावरून हे सिद्ध होईल की, हा एकच वाघ आहे की आणखी अनेक आहेत."

जर एखादाच वाघ त्रासदायक ठरला असेल तर वन विभाग त्याचा बंदोबस्त करू शकेल.

संघर्ष वाढण्याची कारणं काय?

या वर्षी दुष्काळामुळं परिस्थिती जास्त बिघडली, असं स्थानिक सांगतात. उन्हाळ्यात तेंदू पत्ता जमवण्यासाठी माणसं जंगलात शिरतात तर वाघ पाणी आणि अन्न यांच्या शोधत बाहेर पडतो. संरक्षित जंगलाबाहेर या दोन्ही गोष्टी मिळेनाशा होतात.

त्यात पुन्हा भर पडली आहे ती वयात येऊ घातलेल्या वाघांच्या वाढत्या संख्येची! अशा वाघांमध्ये आपापला इलाका प्रस्थापित करण्याची स्पर्धा लागलेली असते. स्वत:चं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ताडोबा-अंधारीतून बाहेर पडलेल्या आणि वयात येणाऱ्या वाघांनीच सिंदवाहीजवळ झालेले हल्ले केले असावेत, असा अंदाज वन विभागाचे कर्मचारी व्यक्त करत आहेत.

अलीकडे वन-खात्याच्या अधिकाऱ्यांनी सिंदेवाहीच्या हल्यांच्या मागे एकच वाघ असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचं काय करायचं याची चर्चा अजून सुरू आहे.

फोटो स्रोत, AFP

2010 नंतर जंगली जनावरांच्या मुख्यत्वे वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील 330 लोक मृत्युमुखी पडले, 1234 जणांना गंभीर दुखापती झाल्या, तर 2776 जणांना छोट्या मोठ्या जखमा झाल्या अशी माहिती महाराष्ट्राच्या वन खात्याच्या वन्यप्राणी विभाग(wildlife wing) कडे आहे. ही माहिती जरी संपूर्ण राज्याची असली, तरी यातल्या ब घटना विदर्भातल्या व्याघ्र प्रकल्पांच्या अवतीभवती घडलेल्या आहेत.

याच काळात बरेच वाघ संघटित तस्कर टोळ्यांनी मारले, काही वनविभागाला मारावे लागले तर काही पकडून सुधारगृहात (rehab centre) किंवा प्राणी संग्रहालयात पाठवले गेले. काही विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडले.

जंगलांचा ऱ्हास

अशोक मिश्रा, मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) महाराष्ट्र म्हणतात, "संघटित वाघ तस्करीवर नियंत्रण आणल्यामुळे एकीकडे वाघांची संख्या वाढली आहे, तर दुसरीकडे मानवाचं जंगलांवरचं अवलंबित्व आणि लोकसंख्या वाढ हेही वाघ मानव संघर्षाचे प्रमुख कारण आहे."

जरा विस्ताराने या प्रश्नाकडे पाहिले, तर लक्षात येते की, केवळ विदर्भातल्याच नाही, तर मध्य भारतातल्या अनेक विकासकामांमुळे जंगलांचे तुकडे पडत चालले आहेत. त्यामुळे संरक्षित वनं आणि व्याघ्र प्रकल्प यांची बेटं तायर होत आहेत.

ही प्रक्रिया विदर्भात वाढत जाणाऱ्या या मानव-वाघ संघर्षाच्या मुळाशी आहे.

मिश्रा म्हणतात की वाघांचे निवास क्षेत्र लहान होत असतांनाच एकमेकांपासून तुटत देखील चाललंय, त्यामुळे वाघांना फिरायला जागाच राहिलेली नाही. त्यातून मानव-वाघ संघर्ष होणार नाही तर काय होईल? "आणि आताच यावर तोडगा काढला नाही तर हा संघर्ष आणखी वाढत जाईल हे नक्की," ते म्हणतात.

डेहराडूनमध्ये असलेल्या वाइल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया (WII) ने त्यांच्या खात्यासाठी नुकताच पूर्व विदर्भातल्या व्याघ्र संरक्षित क्षेत्रांच्या पडत जाणाऱ्या तुकड्यांची कारणमीमांसा करणारा एक अहवाल सादर केला आहे. पूर्वीही असे अभ्यास झाले आहेत, त्याचाच हा पुढचा भाग होता.

GIS मॅपिंगचा उपयोग करून विश्लेषण केलेला हा 37 पानी अहवाल म्हणतो की, वाघांसाठी योग्य म्हणता येईल अशा फक्त 500 चौरस किलोमीटरचं क्षेत्रफळ असलेल्या जंगलांचे फक्त सहाच तुकडे विदर्भात उरले आहेत. यातील सलग चार तुकडे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातल्या जंगलात येतात. पण या भागात वाघांचं निवासस्थान असल्याचा इतिहास फार काही मोठा नाही. मेळघाटचं जंगल आणि ताडोबा एवढाच पट्टा वाघांसाठी उरला आहे.

2011 सालच्या व्याघ्रगणनेत 2006च्या तुलनेत 10-12 टक्के वाढ नमूद केली गेली होती आणि त्याच बरोबर मानव-वाघ संघर्ष वाढेल असाही अंदाज व्यक्त केला गेला होता. त्याला कारण म्हणजे देशातले जननक्षमता असलेले वाघ केवळ 10 टक्के वनक्षेत्रात सामावले असल्याचे म्हटले गेले होते. आता पुन्हा व्याघ्रगणना होणार आहे व त्यात वाढच झाल्याचा अंदाज अधिकारी व्यक्त करत आहेत. परिणामतः मानव-वाघ संघर्ष वाढेल हे निश्चित.

विदर्भातील विकासकामं आणि वाघ

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस नागपुराचे आहेत तर वन आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरचे आहेत, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरच्या ग्रामीण भागातून आहेत. केंद्रीय वाहतूक आणि जहाज मंत्री नितीन गडकरी नागपूरचे आहेत. इतके सगळे योग जुळून आल्यावर बांधकाम आणि रस्ते निर्माणाच्या कार्यक्रमाला वेग येणे स्वाभाविक आहे. पण वाघांना त्यांच्या संरक्षित जंगलाभोवती फिरायला, एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जायला सुरक्षित क्षेत्र हवं, याचं भान सुटत चाललं आहे.

पूर्व-पश्चिम चारपदरी हायवे(NH-42) आणि उत्तर-दक्षिण कॉरिडॉर(NH-47) या दोन नागपुरातून जाणाऱ्या चौपदरी सिमेंट मार्गांनी विदर्भातलं पेंच, बोर आणि नवेगाव-नागझिरा वन क्षेत्र कापून काढलं आहे. हे पुरेसं नव्हतं म्हणून की काय महाराष्ट्र सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी राखीव वनक्षेत्रातली मूल-सिंदेवाही-तलोधी भागात असलेली स्टेट हायवे अंतर्गत निर्माण झालेली रस्त्यांची कैची आणखी रुंद करण्याचा निर्णय घेतलाय. हे नवीन चारपदरी रस्ते ताडोबा-अंधेरी राखीव वनक्षेत्राचा वाघांच्या मुक्त संचारासाठी असलेल्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉर मध्ये अडथळा निर्माण करणार आहे.

त्यात आणखी भर पडली ती भंडारा जिल्ह्यातील भव्य गोसीखुर्द धरणातून निघणाऱ्या उजव्या किनाऱ्यावरील कालव्याची. हा कालवा ताडोबा-अंधारीच्या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरला चिरतो.

वाढता असंतोष

या भागात मानव-वाघ संघर्ष वाढलेले असून कागदावर मात्र त्यातून उद्भवणारे मृत्यू, गुरांचे मृत्यू, वाघांचे मृत्यू, वाघांचे एन्काऊंटर गेल्या दशकभरात जवळपास स्थिर आकडा दाखवत आहेत. प्रत्यक्षात हे आकडे जास्त आहेत आणि त्याच प्रमाणात असंतोष वाढतो आहे.

उदाहरणार्थ चेतन खोब्रागडेच्या मृत्यूनंतर मे महिन्यात संरक्षित जंगलाच्या भोवतीच्या 50 गावांमध्ये वन विभागाच्या अनास्थेविरोधात प्रचंड निषेध आंदोलन झाले. रस्त्यांवरून मोर्चे काढले गेले, गावांभोवती फेऱ्या झाल्या, वर्ध्याच्या फॉरेस्ट कॉन्झरवेटरच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन झाले. त्यांची मागणी होती की आम्हाला इथून पूर्णपणे हटवा. आणखीही अन्य मागण्या होत्या.

ताडोबा-अंधारी भोवतीसुद्धा अशीच आंदोलनं खूप आधीपासून होत आहेत. या ताडोबा भोवतीच्या बफर झोन मधल्या माणसांना सतत वन्य प्राण्यांसोबतच्या संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे आणि त्याचा कुठेच अंत होताना दिसत नाही. सर्व पूर्वसूरींच्या सरकारांनी नुकसानभरपाई तेवढी दिली आहे, पण त्यावर कायमचा तोडगा काढलेला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)