थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्वांची सुटका

थायलंड Image copyright THAI NAVY SEA
प्रतिमा मथळा थायलंड इथल्या गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढल्यानंतर गुहेत मागे थांबलेले डायव्हरही बाहेर बाहेर आले.

गेले 2 आठवडे थायलंडच्या गुहेत अडकून पडलेल्या 12 मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे. रविवार सकाळपासून त्यांना बाहेर काढण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. ही मुलं एका स्थानिक फूटबॉल टीममधील असून या टीमचं नाव वाईल्ड बोर असं आहे.

मुलांना बाहेर काढल्यानंतर गुहेत मागे राहिलेले डायव्हरही बाहेर आले आहेत. नौदलाने या डायव्हरचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. गुहेतून सर्वांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर थायलंडमध्ये आनंद साजरा करण्यात आला.

रविवारी दिवसभरात 4 मुलांची सुटका करण्यात आली. तर सोमवारी 4 जणांची सुटका करण्यात आली. मंगळवारी उरलेली 4 मुलं आणि प्रशिक्षक यांना बाहेर काढण्यात आलं. सर्वांना उपचारासाठी चिआंग रायी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्वांची प्रकृती चांगली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

11 ते 16 वयोगटातील ही मुलं आणि 25 वर्षांचा प्रशिक्षक 23 जूनला बेपत्ता झाले होते. 'वाईल्ड बोर' या फुटबॉल टीमचे हे खेळाडू आहेत. ही मुलं आणि प्रशिक्षक इथल्या थाम लुआंग या गुहेत गेले होते. पण मोठा पाऊस सुरू झाल्याने गुहेत पाणी भरू लागले. पुराचं हे पाणी वाढू लागल्याने त्यांनी गुहेत सुरक्षित आसारा घेतला.

मुलांशी कसलाच संपर्क होत नसल्याने शोधाशोध सुरू झाली. गुहेत शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. तब्बल 9 दिवसांनी गुहेत जवळपास 4 किलोमीटर आत शोध घेतल्यानंतर ही मुलं आणि प्रशिक्षक एका कोरड्या ठिकाणी एका कपारीत बसल्याची दिसून आली. त्यानंतर अथक प्रयत्नांनी त्यांना बाहेर काढण्यात आलं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गुहेच्या बाहेर आनंदच वातावरण

सुरुवातीला या मुलांना बाहेर काढण्यासाठी कसलाही धोका पत्करणार नाही, असं लष्कराने सांगितलं होतं. थायलंडमध्ये मोठा पाऊस सुरू झाल्याने गुहेतलं पाणी वाढण्याची भीती होती. शिवाय या मुलांना डायव्हिंग येत नसल्याने त्यांना बाहेर कसं काढायचा हा प्रश्न होता. त्यामुळे पाऊस संपेपर्यंत मुलांना तिथं थांबाव लागेल, अशी भीती ही व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान मुलांना ऑक्सिजन पुरवताना एका डायव्हरचा मृत्यूही झाला.

Image copyright FACEBOOK/EKATOL

गुहेतील पाणी मोटरींच्या मदतीने बाहेर काढण्याचं कामही सुरू करण्यात आलं होतं.

सोमवारी गुहेतील पाणी कमी झाल्याने मुलांना बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येक मुलाच्या मागे 1 डायव्हर आणि पुढे 1 डायव्हर असं नियोजन करून एकेक मुलाला बाहेर काढण्याचं काम सुरू झालं. मुलासाठीचा ऑक्सिजन सिलिंडर पहिल्या डायव्हरकडे देण्यात आला होता. अशा पद्धतीने मुलांना बाहेर काढण्यात आलं.

जी मुलं जास्त अशक्त झाली आहेत, त्यांना प्राधान्यानं बाहेर काढण्यात आलं. गुहेच्या बाहेर हेलिकॉप्टर आणि अँब्युलन्समध्ये सज्ज ठेवण्यात आली होती. मुलांना बाहेर काढल्यानंतर तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात हलवण्यात आलं.

सुटका करण्यात आलेल्या मुलांपैकी काहींनी हॉस्पिटलमध्ये खाण्यासाठी ब्रेड आणि चॉकलेट मागितलं होतं, ते त्यांना देण्यात आला. तर रविवारी काही मुलांनी फ्राईड राईस मागितला होता.

थायलंडने आंतरराष्ट्रीय सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

मोहीम प्रमुख आणि या प्रांताचे गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न यांनी या मोहिमेचं वर्णन युनायटेड नेशन्स टीम असं केलं आहे.

Image copyright Reuters

या मोहिमेला युनायटेड किंगडम, चीन, म्यानमार, लाओस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान आणि इतर विविध देशांनी सहकार्य केलं.

या गुहेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी मोहिमेत सहभागी लोकांसाठी जेवण बनवणे, त्यांचे कपडे धुणे, वाहतूक सुविधा देणं अशा प्रकारे मदत केली.

जगभरातील तज्ज्ञ डायव्हरनी या मुलांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. गुहेच्या परिसरात आनंदाचं वातावरण असलं तरी अनेकांना समन गुनाम यांची आठवण आल्या शिवाय राहणार नाही. थायलंडच्या नौदलातील माजी डायव्हर असलेले गुनाम यांनी या मोहिमेत जीव गमावला. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

या मोहिमेत 90 डायव्हरनी भाग घेतला. यातील 40 थायलंडमधील होते. ही मोहीम कठीण होती कारण गुहेत चालणं, पोहण, क्लाईंब या सगळ्या कसरती करत मुलांपर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यांना घेऊन परत बाहेर यायचं होतं.

हे वाचलं का?

हे पाहिलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
गेल्या आठवड्यात थायलंडच्या गुहेत काहीजण अडकले होते.
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांना असं बाहेर काढत आहेत

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)