तुमच्या आजाराचं कारण ऑफिसमधील तणाव तर नाही ना?

वर्किंग प्लेस
प्रतिमा मथळा कामाचं ठिकाण कर्मचाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरतं आहे.

सध्याच्या आधुनिकतेचा साज ल्यायलेल्या ऑफिसांमधून अतिशय धोकादायक ठरू शकणाऱ्या ताणाची वादळं घोंघावत आहेत.

'डाइंग फॉर अ पेचेक' या पुस्तकाचे लेखक जेफ फिअर यांचं असं म्हणणं आहे की, हे असंच चालू राहिलं तर ते कंपन्यांना साहाय्यभूत ठरणार नाही. शिवाय त्यांनी सरकारलाही इशारा दिला आहे की, सामान्यांच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या आणि वेगाने वाढणाऱ्या या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

सहा आकडी पगार कमावणाऱ्या यूकेमधल्या उबरमध्ये काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने २०१६मध्ये आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या कार्यलयातील ताणामुळे हे घडल्याचा आरोप केला होता.

लंडनमधली मेरिल लिंच ही अवघ्या २१ वर्षांची शिकाऊ उमेदवार सगल ७२ तास काम केल्यानंतर कोसळली आणि मरण पावली. एअरोसेल-मित्तल कंपनीने ताब्यात घेतलेला स्टील प्लांट बंद केला आणि त्यानंतर तीनच आठवड्यांत ५६ वर्षांच्या एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. त्यांनी या घटनेचा धसका घेतला, असं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं होतं.

कामाच्या ठिकाणची सुरक्षा आणि आरोग्य या संदर्भात काम करणाऱ्या एका युरोपीयन संस्थेच्या अहवालानुसार ५५ कोटी कामाच्या दिवसांपैकी जवळपास अर्ध्याहून अधिक दिवस कर्मचारी दरवर्षी गैरहजर असतात. याचं मुख्य कारण म्हणजे ताणतणाव हेच आहे.

२०१५मध्ये जवळपास ३०० विविध अभ्यासांचा पाहणीनंतर कामाच्या ठिकाणीच्या कार्यपद्धती जीवितहानीला कारणीभूत ठरू शकतात, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. डॉक्टरांच्या मते ताण हाही एक प्रकारचा आजार आहे. दुसऱ्यांनी केलेल्या धूम्रपानामुळे जसा कर्करोग होऊ शकतो तसाच हा प्रकार आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कामाचा ताण असह्य होतो

कामाचे लांबत जाणारे तास, काम की कुटुंब यात होणारा सततचा संघर्ष, नोकरी गेल्यामुळे उद्भवणारी आर्थिक दोलायमान परिस्थिती, कामाच्या अनियमित वेळा किंवा कामाच्या वेळेचा अंदाजच न येणे, नोकरीच्या कामाच्या स्वरूपावर फारसा ताबा नसणे, अमेरिकेसारख्या ठिकाणी आरोग्यविम्याची सोय नसणे अशा अनेक प्रकारांमुळे ताणतणावात भर पडत आहे.

काम करायचे ठिकाणच जर लोकांना आजारी पाडणारे असेल किंवा अगदी त्यांच्या मृत्यूला कारण ठरणार असेल तर लोकांनीच या विषयी काळजी घेणं आवश्यक ठरते. जगभरातच आरोग्याशी निगडित प्रश्न आणि त्यावरचे उपचार महागडे होत आहेत. त्यातही कामाच्या ठिकाणामुळे- कामामुळे लोकांचे आजारी पडणे हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो आहे.

बॅरी वेमिलर या मॅन्युफॅक्चरिंग फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब चॅपमन मायो क्लिनिकचा हवाल देऊन सांगतात, "तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर तुमचा सुपरवाईजर तुमच्या फॅमिली डॉक्टरपेक्षा महत्त्वाचा ठरतो."

'द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या अंदाजानुसार जगभरात आरोग्याची काळजी घेण्यासाठी जवळपास तीन चतुर्थांश टक्के रक्कम खर्च होते. तर दीर्घकालीन आणि संसर्गजन्य नसणाऱ्या आजारांमुळेही मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण एकूण मृत्यूच्या एकूण प्रमाणापैकी ६३ टक्के मृत्यू यामुळे होतात. दीर्घकालीन आजार हे ताणतणावामुळे जडतात. अनारोग्यकारक वर्तनामुळे उदाहरणार्थ - ध्रूमपान, मद्यपान, अंमली पदार्थांचे सेवन आणि अतिताणामुळे भारावून अतिखाणे यामुळे आजार विविध आजार उद्भवतात.

अनेक सर्वेक्षणांमध्ये असं दिसून आलं आहे की, कामाच्या ठिकाणी ताण येतो आणि त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने या अत्यंत महत्त्वाचे कारण ठरतं.

प्रतिमा मथळा कामाच्या ठिकाणी ताण वाढतो आहे.

अगदी नावच घेऊन सांगायचं झालं तर अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रेसच्या दाव्यानुसार अमेरिकन अर्थव्यवस्थेतील दरवर्षी जवळपास 300 अब्ज डॉलर इतका पैसा कामाच्या ताणामुळे खर्ची पडतो.

एका प्रतिथयश नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा मी सहलेखक होतो. त्यानुसार अमेरिकेत जवळपास वर्षभरात 1,20,000 मृत्यू झाले असून त्यामागची कारणे व्यवस्थापनाची अयोग्य कार्यपद्धती आहे. तर यामुळे दरवर्षी आरोग्यावर 190 अब्ज डॉलर इतका खर्च वाढत आहे.

यामुळे कामाच्या ठिकाणी येणारा ताण हे मृत्युमुखी पडण्यासाठीचे पाचवं कारण ठरत आहे. मूत्रपिंड विकार आणि स्मृतिभ्रंश या आजारांहूनही ताणतणाव हे प्रमुख कारण ठरत आहे.

यूकेमधील (इंग्लंड) आरोग्य आणि सुरक्षा अंमलबजावणी खात्याने दिलेल्या अहवालानुसार 2016-2017 या वर्षात १ कोटी २५ लाख तास कामाशी निगडित ताण, औदासीन्य किंवा चिंतेमुळे वाया गेले आहेत.

कामाच्या ठिकाणी येणाऱ्या ताणामुळे नकारात्मक परिणाम होऊन त्यामुळे कंपनीचे नुकसानच होत असते. कामाचे लांबणारे तास असतील तर त्यातली नकारात्मकता वाढते. कामाचे दीर्घतास आणि उत्पादकता यांचं व्यस्त प्रमाण असल्याचे दिसून आलं आहे.

टाळेबंदी, कर्मचारी कपात असा उपायांमुळे संस्थात्मक कामगिरी उंचावेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. यामुळे अनेकदा असेही दिसते की, चांगले कर्मचारी वारंवार रजेवर जातात आणि त्यामुळे एका परीने त्याची थेट किंमत चुकवावी लागते.

ग्राहकांसोबतचे चांगले संबंध असलेले कर्मचारी गमावण्यामुळे कंपनी प्रत्यक्षात पैसे वाचवू शकत नाही. दर वेळी पैसे वाचवूनच सगळे काही करता येते असे नाही. काही दशकांच्या अभ्यासानुसार लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे तरीही नियमांच्या चौकटीत राहून काम करायची मुभा दिली गेली तर त्यांचा काम करायचा हेतू साध्य होतो.

तणावग्रस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा राजीनामा देण्याकडे कल दिसून येतो. आता या सगळ्यांमुळे जर खर्च वाढला तर त्यात आश्चर्य ते काय?

संशोधनानुसार अगदी स्पष्टपणं दिसून आलं आहे की आजारी, तणावग्रस्त कर्मचाऱ्यांपेक्षा चांगलं आरोग्या असणारे कर्मचारी जास्त कार्यक्षम असतात.

कामाचा दर्जा खालावत जाणे हे या संदर्भातली वाईट म्हणावी अशी एक खूण आहे. नोकर कपात ही एके काळी अगदीच वाईट आर्थिक परिस्थिती ओढवली तर केली जात असे. आता तोही एक शिरस्ताच पडून गेलेला दिसतो. हाईंझ अँण्ड क्राफ्ट ही अवाढव्य अन्नपदार्थांच्या कंपनीचे ३जी कॅपिटलसोबत एकत्रीकरण झाल्यावर २० टक्के कर्मचाऱ्यांवर कपातीची कुऱ्हाड कोसळली. कंपनी व्यवस्थापनाने ठामपणे ठरवून अतिरिक्त उत्पादन आणि कर्मचारीसंख्या कमी केली.

प्रतिमा मथळा विविध कारणांमुळे ऑफिसमधला ताण आटोक्याबाहेर जातो आहे.

"gig economy" गिग इकॉनॉमी म्हणजे अर्थिक परिस्थिती डळमळीत झाल्यामुळे असुरक्षितपणाच्या पातळीत वाढ होणे. अशा परिस्थितीत लोकांना कल्पनाही नसते की, त्यांचा पगार एखाद्या आठवड्यानं मिळेल की तो मिळणे आणखी पुढे ढकलले जाईल.

एका ठराविक सॉफ्टवेअरमुळे दिसून आलं की, परवानाप्राप्त किरकोळ वस्तूंचं दुकानदार आणि इतर उद्योग उदाहरणार्थ हॉटेल आणि रेस्तराँ या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदलत्या पगाराच्या आकड्यांबद्दलचा अंदाज वर्तवता येतो आणि त्यामुळे त्यांना कौटुंबिक जबादाऱ्या पेलण्याची, त्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्याची तितकीशी क्षमता नसते.

अगदी मूलभूत पद्धतीने पाहायला गेलो तर १९५० आणि १९६०च्या दशकांतील कार्यकारी अधिकारी (सीईओ) त्या संस्थेचे भागधारक, ग्राहक, कर्मचारी आणि समाज यांच्यातला दुवा ठरून एक जबाबदारी घेत. त्याला स्टेकहोल्डर कॅपिटॅलिझम (भागधारकांची भांडवलशाही) असे म्हटले गेले.

सध्या भागधारकांचे वर्चस्व वाढताना दिसते आहे. वरकरणी पाहाता फारच थोड्या मालकांना ही परिस्थिती समजते आहे. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक हिताचा निर्णय घेणे हे त्या मालकांच्या हाती आहे.

काही जणांना याची कल्पना आल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाच्या कामकाजाची पद्धत गंभीरपणे बदलेली दिसते. पॅटागोनिया, कलेटिव्ह हेल्थ, सॅस इन्स्टिट्यूट (SAS Institute), गुगल, झिलो आणि कर्मचाऱ्यांची मालकी असणारी जॉन लुईस पार्टनरशिप अशा कंपन्यांनी वेगळी कार्यपद्धती स्वीकारली आहे.

लोकांना भरपगारी सुटी दिली जाते आणि त्यांनी या सुट्ट्यांचा वापर करणं अपेक्षित असतं. मॅनेजरने त्यांना दर तासाला ईमेल्स पाठवू नये किंवा सतत मेसेजेस पाठवू नयेत, असं अपेक्षित असतं. लोकांनी काम करावं, घरी जावं आणि आराम करून ताजेतवानं व्हावं. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या घराची सोय केली आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांनी काम आणि कुटुंबाला योग्य वेळ देता येईल.

लोकांना लहान मुलांप्रमाणे न वागवता त्यांचा प्रौढपणा लक्षात घेणं आवश्यक असतं. त्यांच्या कामावर योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवावं आणि लोकांना त्यांच्या कामाच्या जबाबदारीची जाण व्हावी. पण त्याचं सूक्ष्म नियोजन करू नये.

सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीच्या प्रती प्रत्येकाने आपलं काही एक कर्तव्य आहे ही भावना गंभीरपणे अंगी बाणवायला हवी. सॅस इन्स्टिट्यूटमधील मुख्य आरोग्य अधिकाऱ्याच्या कामाचे स्वरूप खर्चावर नियंत्रण ठेवणं हे नसून कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगले कसं चांगलं राहील हे पाहणं हे आहे. बॉब चॅपमन हे स्वतः मान्य करतात की, बॅरी वेमिलरमधल्या सर्व कर्मचाऱ्यांना एखाद्या लाडक्या मुलासारखं किंवा कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच वागवले जाते.

पॅटागोनियाच्या संस्थापकांनी लिहिलेल्या 'लेट माय पीपल गो सर्फिंग' या प्रसिद्ध पुस्तकात या संदर्भात काही लिहिलं आहे. ते म्हणतात की, सध्याच्या अत्यंत जीवघेणी स्पर्धात्मकता असणाऱ्या औद्योगिक क्षेत्रात पॅटागोनियाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा आरोग्यविमा नोकरीवर रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी काढला जातो आणि तर दुसरा वीकएण्ड हा दोन नव्हे तर तीन दिवसांचा असतो, म्हणजे लोक बाहेरगावी जाऊन सुटीचा आनंद घेऊ शकतात.

लोक त्यांची नोकरी निवडताना केवळ पगार आणि बढतीची संधी इतक्याच गोष्टी बघत नाहीत तर ती नोकरी करताना त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही चांगलं राहावं, अशी अपेक्षा मनोमन करतात. त्यामुळे उद्योगांच्या मालकांनी केवळ फायद्याकडे लक्ष न देता आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे आवश्यक आहे.

आणि सरकारनेही कामाच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या ताणतणावाच्या वाढत्या समस्याकडे काळजीपूर्वक पाहाणं गरजेचं आहे. कारण कामाच्या जागी निर्माण झालेल्या तणावामुळे लोक आजारी पडतात किंवा वैतागतात. केवळ दरमहा वेतन मिळवण्यासाठी कुणी मृत्यूशी गाठ बांधण्याची अजिबात गरज नाही.

हे पाहिलंत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)