FIFA वर्ल्डकप : इंग्लडला हरवून फायनलला पोहोचलेल्या क्रोएशियाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?

क्रोएशिया Image copyright Getty Images

प्रसिद्धीपासून, चर्चेपासून दूर असलेल्या क्रोएशियाने कुणाच्याही नजरेत न येता वर्ल्डकपची फायनल गाठली आणि स्वतंत्र छाप उमटवली आहे.

फुटबॉल वर्ल्डकपचे पडघम वाजू लागल्यानंतर ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगाल, जर्मनी या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असणाऱ्या संघांबद्दल चर्चांना उधाण आलं. मात्र जसजसा वर्ल्डकपचा मेळा पुढे सरकू लागला तसं एकेक करून या बलाढ्य संघांना गाशा गुंडाळावा लागला.

वर्ल्डकपचा हिरो म्हणून तुम्ही कोणत्याही एका खेळाडूला निवडा. मात्र जेतेपद तोच संघ पटकावतो जे एकोप्याने एकत्र येऊन खेळतात. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो या दोघांनाही आपला करिश्मा दाखवता आला नाही. मेस्सीचा अर्जेंटिना संघ आणि रोनाल्डोचा पोर्तुगाल दोन्ही संघ जेतेपदापासून हजारो मैल दूरच राहिले.

सेमी फायनलमध्ये बेल्जियमला चीतपट करने फ्रान्सने अंतिम फेरीत धडक मारली. बचाव आणि आक्रमण या दोन्ही आघाड्यांवर मजबूत खेळ करत अंतिम मुकाबल्यात फ्रान्सला हरवणं सोपं असणार नाही हे पक्कं झालं आहे. फ्रान्सला आता क्रोएशिया टक्कर देणार आहे.

फक्त 40 लाखांची लोकसंख्या असलेल्या क्रोएशियातील फुटबॉलप्रेमींसाठीही त्यांच्या संघाचं यश आश्चर्यचकित करणारं आहे. इतिहास घडवण्यापासून क्रोएशियाचा संघ केवळ एकच विजय दूर आहे याचीही त्यांच्या चाहत्यांना जाणीव आहे.

Image copyright Google Maps
प्रतिमा मथळा क्रोएशियाचं युरोपातलं स्थान

इंग्लंड असो की क्रोएशिया दोन्ही संघांसाठी सेमी फायनलचा मुकाबला अत्यंत प्रतिष्ठेचा होता. एकेकाळी त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही अशी चर्चा असं इंग्लंडबद्दल म्हटलं जात असे. त्यामुळे इंग्लंडबाबत अनेकांना बरीच माहिती आहे मात्र क्रोएशिया आजही अनेकांसाठी अज्ञात आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर क्रोएशियाने सहापैकी पाच वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा मान मिळवला. यापैकी 1998 वर्ल्डकपमध्ये क्रोएशियाने सेमी फायनलपर्यंत धडक मारण्याची किमया केली होती. मात्र या सातत्यपूर्ण वाटचालीचा गुरुमंत्र काय? याचं उत्तर क्रोएशियाकडेही नाही.

'द सन' वृत्तपत्राने क्रोएशियाच्या वाटचालीचं मर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पूर्वीच्या युगोस्लाव्हियाचा भाग असणाऱ्या क्रोएशियाचं यशाचं गुपित आधीच्या देशातल्या फुटबॉलसाठीच्या शिस्तबद्ध यंत्रणेत आहे. म्हणूनच देश म्हणून बाळसं धरत असतानाच फुटबॉलच्या पटावर क्रोएशियाची वाटचाल दमदार होती.

1987 मध्ये क्रोएशियानं चिलीत झालेल्या अंडर20 चॅम्पियनशिप स्पर्धेचं जेतेपद पटकावत दणका उडवून दिला होता. स्वतंत्र देश म्हणून पहिला सामना खेळायला क्रोएशियाला सात वर्ष लागली.

युगोस्लाव्हियाचा कालखंड

चिली, ब्राझील, वेस्ट जर्मनी या ताकदवान संघांना नमवल्यानंतर युगोस्लाव्हियाचा युवा संघ भविष्याची आशा असल्याची चर्चा होती. मात्र तसं झालं नाही.

चारच वर्षांत म्हणजे 1991 मध्ये बाल्कन युद्धाला तोंड फुटलं. या युद्धाने युरोप खंडासमोर अनेक अडचणी वाढून ठेवल्या. सात वर्षांनंतर 1998 साली फ्रान्समध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये लाल-पांढऱ्या जर्सीत खेळलेल्या क्रोएशियाच्या खेळाडूने आपली चमक दाखवून दिली होती.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा क्रोएशियाने फुटबॉल वर्ल्डकपमध्ये बलाढ्य संघांना चीतपट करत वाहवा मिळवली आहे.

युद्धाचे व्रण ताजे असतानाच अवघ्या तीन वर्षात क्रोएशियाला मिळालेलं यश स्वतंत्र देश म्हणून ओळख देणारं होतं.

या झंझावाती वाटचालीत 'डिनामो झाग्रेब अकादमी'चा उल्लेख करणं अत्यावश्यक आहे. याचं कारण याच अकादमीने लुका मोड्रिक, डेझान लोवरन, सिमे विरास्लाजको, मारिया मंडझुकिक आणि मातेओ कोवासिच यासारखे खेळाडू दिले. मात्र हे यश साजरं करत असतानाच क्रोएशियाने अन्य आघाड्यांवर कडवा संघर्षही केला.

क्रोएशियाचा इतिहास

फुटबॉल वर्ल्डकपच्या निमित्ताने क्रोएशियाबद्दल जाणून घेणं उचित ठरतं. हा देश मध्य आणि दक्षिण पूर्व युरोपच्या केंद्रस्थानी वसला आहे. क्रोएशियाला एड्रियाटिक समुद्राची साथ लाभली आहे.

झाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी आहे. 56 हजार किलोमीटर एवढाच पसारा असणाऱ्या क्रोएशियातील बहुतांशी नागरिक रोमन कॅथलिक आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी आहे.

सहाव्या शतकात क्रोएशियाचे नागरिक इथे येऊन स्थायिक झाले. टोमिस्लाव्ह क्रोएशियाचे पहिले राजे होते. 1102 मध्ये त्यांनी हंगेरीची साथ दिली. 1527 मध्ये ऑटोमन साम्राज्याचा पसारा वाढत गेला. क्रोएशियाच्या संसदेनं फर्डिनांड ऑफ हॅब्सबर्ग यांना आपले राजे मानलं.

19व्या शतकाच्या सुरुवातीला या देशाचे तुकडे होऊन फ्रान्सिसी इलीरियर प्रॉव्हिन्सचा भाग झाले. ऑस्ट्रिया-हंगेरी यांनी बोस्निया-हर्जेगोविनावर कब्जा केला.

हा सगळा वाद 1978 मध्ये बर्लिन कराराद्वारे सोडवण्यात आला.

नाझी प्रभाव

1919 मध्ये क्रोएशियाच्या संसदेनं स्वतंत्र झाल्याची घोषणा केली. स्टेट ऑफ स्लोव्हेन्स, क्रोएट्स अँड सर्बशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला.

1941 मध्ये नाझी जर्मनीच्या नेतृत्वाखालील एकत्र आलेल्या देशांनी युगोस्लाव्हियावर कब्जा केला. त्यावेळी क्रोएशियाचा मोठा भाग नाझी समर्थक क्लाइंट प्रांतात समाविष्ट झाला.

यानंतर संघर्षाला सुरुवात झाली. याची परिणती म्हणजे फेडरल स्टेट ऑफ क्रोएशियाची निर्मिती झाली. त्यानंतर हा देश 'सोशलिस्ट फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाव्हिया'चं संस्थापक सदस्य आणि सांघिक घटक ठरला.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा नाझींचं क्रोएशियावर वर्चस्व होतं.

1918 ते 1991 या कालावधीत क्रोएशिया हा युगोस्लाव्हियाचा भाग होता. 1991 मध्ये क्रोएशियातल्या स्लोव्हेनिया प्रांतात लढाईला सुरुवात झाली.

मात्र सोव्हियत रशिया आणि युगोस्लाव्हियाचं विघटन झाल्यानंतर आणि त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीचा फटका क्रोएशियाला बसला.

क्रोएशियासमोरच्या अडचणी

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर क्रोएशियाने 25 जून 1991 रोजी स्वातंत्र्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा मूर्त स्वरुपात येण्यास 8 ऑक्टोबर 1991 तारीख उजाडली.

ढासळलेल्या परिस्थितीत युगोस्लाव्ह पब्लिक आर्मी आणि सर्ब पॅरामिलिटरी गटांनी क्रोएशियावर हल्ला चढवला.

1991च्या उत्तरार्धात क्रोएशियाकडे स्वत:ची अशी केवळ एक तृतीयांश जमीन उरली. क्रोएशियाचं मूळ असणाऱ्या लोकांना लक्ष्य करण्यात आलं. लाखो जणांनी जीव गमावला तसंच अनेक जण बेघर झाले.

Image copyright DEA/BIBLIOTECA AMBROSIANA
प्रतिमा मथळा युद्धाचा मोठा फटका क्रोएशियाला बसला.

जानेवारी 1992 मध्ये क्रोएशियाला युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीची मान्यता मिळाली. त्यानंतर काही दिवसात संयुक्त राष्ट्रांनी त्यांना अधिकृत मान्यता दिली. ऑगस्ट 1995 मध्ये युद्ध संपलं ते क्रोएशियाचा विजय होऊनच.

या विजयासह बंडखोर प्रांतातून दोन लाख सर्बियन वंशाच्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. ही जागा बोस्निया आणि हर्जेगोविना येथून आलेल्या क्रोएशियाच्या शरणार्थींना देण्यात आलं. तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं.

पुनर्उभारणी

कब्जा करण्यात आलेला बाकीचा प्रदेश क्रोएशियाच्या अधिपत्याखाली यायला नोव्हेंबर 1995 उजाडलं. त्यासाठी एक करार झाला. मात्र युद्धानंतरही क्रोएशियाच्या समस्या संपुष्टात आल्या नाहीत. क्रोएशियाला स्वयंपूर्ण व्हायला खूप वेळ लागला.

2000 नंतर क्रोएशियाची लोकशाही बळकट झाली. आर्थिक विकास तसंच सामाजिक सुधारणांचं पर्व सुरू झालं. मात्र त्याच वेळी बेरोजगारी, भ्रष्टाचार, संघटनात्मक अनागोंदी या क्रोएशियासमोरच्या अडचणी होत्या.

मात्र क्रोएशियाने हार न मानता हळूहळू सकारात्मक वाटचाल केली. क्रोएशिया हा देश युरोपियन युनियन, संयुक्त राष्ट्र संघटना, युरोपियन परिषद, नाटो यांच्यासह जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा क्रोएशिया फुटबॉल समर्थक

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या विशेष दलाचा भाग असल्याने क्रोएशियाने अनेकदा जागतिक मोहिमांमध्ये आपलं सैन्य पाठवलं.

आजच्या घडीला क्रोएशियाची अर्थव्यवस्था सेवा, उद्योग आणि शेती यांच्यावर आधारित आहे. पर्यटनाच्या माध्यमातून क्रोएशियाने निधीउभारणी केली आहे. जगातल्या सर्वोत्तम वीस पर्यटन स्थळांमध्ये तसंच देशांमध्ये क्रोएशियाचा समावेश होतो.

विकासाची आस आणि दुसरीकडे संघर्षमय वाटचाल ही दुहेरी कसरत सांभाळतानाच क्रोएशियाने फुटबॉलच्या कॅनव्हासवर खास ठसा उमटवला आहे. जुन्या कटू आठवणी बाजूला सारत इतिहास घडवण्यासाठी क्रोएशियाचा संघ सज्ज आहे. हे यश पडत्या काळातल्या जखमांवरची ठोस मलमपट्टी ठरेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)