पाकिस्तानात राजकीय नाट्य, नवाझ शरीफ रावळपिंडीच्या कारागृहात

@MARYAMNSHARIF Image copyright @MARYAMNSHARIF

पाकिस्तानमध्ये शुक्रवारचा दिवस राजकीय खळबळ माजवणारा ठरला. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ शुक्रवारी रात्री लाहोरमध्ये उतरले, त्याच्या काही वेळ आधीच एका प्रचारसभेत स्फोट होऊन 85 लोक ठार झाले. शरीफ यांना पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी कोर्टानं बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती, त्यामुळे त्यांना उतरल्यावर ताबडतोब अटक करण्यात आली.

कॅन्सरग्रस्त पत्नीवर लंडनमध्ये उपचार सुरू असल्यानं शरीफ लंडनमध्ये होते.

त्यांच्या गैरहजेरीत गेल्याच आठवड्यात शिक्षा सुनावण्यात आली होती. गेल्या वर्षी कोर्टाने त्यांना पंतप्रधानपदावर राहण्यास अपात्र घोषित केल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

पाकिस्तानमध्ये 25 जुलैला राष्ट्रीय निवडणुका आहेत. त्यामुळे देशातलं वातावरण प्रचाराने तापलं आहे. दोषी ठरल्यामुळे नवाझ शरीफ स्वतः निवडणूक लढवू शकत नाहीयेत.


स. 6.30 - नवाझ शरीफ अडियालामध्ये

बीबीसी प्रतिनिधी फरहत जावेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाझ शरीफ यांना अडियाला कारागृहात येथे ठेवण्यात आलं आहे. तर, मरियम यांना वैद्यकिय तपासणीनंतर इस्लामाबादमधल्या पोलीस अकादमीच्या सिहाला विश्रामगृहात ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान, कोर्टानं रावळपिंडीच्या अडियाला कारागृह प्रमुखांना, नवाझ शरीफ यांना कोर्टात हजर न करताच अटक करण्याचे अधिकार दिले.

Image copyright NAB

रात्री 10.43 - तुरुंगात रवानगी सकाळी

नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोमधल्या अधिकाऱ्यांनी बीबीसी प्रतिनिधी शहजाद मलिक यांना सांगितलं की सूर्यास्तानंतर कुणालाही तुरुंगात पाठवता येत नाही. त्यामुळे नवाझ आणि त्यांची मुलगी मरियम यांना आज रात्री नजरकैदेत ठेवलं जाण्याची शक्यता आहे.


रात्री 10.22 - शरीफ निघाले लाहोरहून

नवाझ आणि मरियम शरीफ यांना घेऊन एक छोटं विमान लाहोरहून निघालं आहे. ते कुठे जात आहे, याविषयी स्पष्ट माहिती नसली तर ते इस्लामाबादच्या दिशेने जात आहे, असं स्थानिक मीडियाने म्हटलं आहे.


रात्री 10.07 - शरीफांना इस्लामाबादला नेणार

नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम शरीफ यांना छोट्या विमानातून इस्लामाबादला नेलं जात आहे.


रात्री 9.48 - नवाझ शरीफांना घेतलं ताब्यात

नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो आणि रेंजर्सनी नवाझ शरीफ आणि मरियम शरीफ यांना ताब्यात घेतलं आहे, असं पाकिस्तानमधले स्थानिक चॅनल्स सांगत आहेत.

प्रतिमा मथळा पाकिस्तानी मीडियात ब्रेकिंग न्यूज

रात्री 9.15 - नवाझ शरीफ लाहोरमध्ये पोहोचले

नवाझ शरीफ यांचं विमान लाहोरमध्ये लँड झालं आहे. ते आता विमानातून उतरत आहेत. विमानतळात आणि बाहेर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.


रात्री 9:10 - पंजाबमध्ये विमान दाखल

Image copyright flightradar24.com
प्रतिमा मथळा विमानाचं लाईव्ह लोकेशन

फ्लाईट रडार या वेबसाईटनुसार नवाझ आणि मरियम शरीफ यांना घेऊन येणारं विमान पंजाब राज्याच्या हवाई हद्दीत शिरलं असून ते पुढच्या काही मिनिटात लाहोरला उतरतील.


रात्री 9:00 : लाहोरमध्ये शरीफ समर्थक जमू लागले

पंजाबची राजधानी असलेल्या आणि शरीफ यांच्या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या लाहोरमध्ये शरीफ यांच्या PML-N या पक्षाचे कार्यकर्ते विमानतळाच्या जवळ गर्दी करू लागले आहेत.

पुढच्या दहा मिनिटात शरीफ यांचं विमान लँड होण्याची शक्यता आहे.

प्रतिमा मथळा संध्याकाळपासून लाहोर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शरीफ समर्थक जमत आहेत.

रात्री 8.55: विमान कुठे उतरणार?

नवाझ शरीफ लाहोरला पोहोचणार आहेत. पण त्यांचं विमान इस्लमाबादला वळवलं जाईल, अशी शक्यता पाकिस्तानमधले उर्दू न्यूज चॅनल्स वर्तवत आहेत.


संध्याकाळी 7.00 - शरीफ अबूधाबीतून निघाले

त्यांच्यासोबत त्याच विमानातून निघाले आहेत बीबीसीचे रिपोर्टर सिकंदर करमानी. त्यांनी पाठवलेला हा फोटो.


सकाळी 8.00 : अबूधाबीत उतरले

Image copyright EPA

नवाझ शरीफ यांच्यासोबत त्यांनी मुलगी आणि PMN-Lची निवडणुकीतली उमेदवार मरियम परतत आहे. लंडनहून ते दोघेही आधी अबूधाबीला उतरले. तेथून ते संध्याकाळी पाकिस्तानच्या दिशेने निघतील.


सुरक्षा दलांनी आपल्या विरोधात कट केल्याचा आरोप नवाझ शरीफ यांनी केला आहे.

"पूर्वी ते (लष्कर) सत्ते अंतर्गत असलेली एक सत्ता होते आता ते सत्तेच्या डोक्यावर चढून बसले आहेत," असं त्यांनी बुधवारी पाकिस्तानी मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन)च्या कार्यकर्त्यांशी लंडनहून साधलेल्या संवादात म्हटलं.

"तुरुंग मला दिसतो आहे, पण तरीही मी पाकिस्तानमध्ये येणारच," असंही ते म्हणाले.

शरीफ यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते विमानतळावर येण्याची शक्यता आहे.

प्रतिमा मथळा लंडनच्या घरातून निघताना नवाझ शरीफ आणि मरियम यांनी कुटुंबीयांचा निरोप घेतला.

शरीफ यांनी मोठ्या संख्येनं लोकांनी जमावं असं आवाहन केलं आहे. त्यामुळे, शरीफ यांच्या शेकडो समर्थकांना लाहोरमध्ये ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे.


शरीफ खटला : आत्तापर्यंत काय घडलं?

28 जुलै 2017 - भ्रष्टाचार आणि उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणी पाकिस्तानी सुप्रीम कोर्टानं नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदावर राहण्यास अयोग्य ठरवलं. त्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

8 सप्टेंबर 2017 - सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर National Accountability Bureauनं नवाझ शरीफ यांच्यासह त्यांचे दोन मुलगे हसन आणि हुसैन, मुलगी मरियम आणि जावई सफदर यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रकरणी खटला दाखल केला.

19 ऑक्टोबर 2017 - नवाझ शरीफ, मरियम आणि सफरदर यांना कोर्टानं दोषी ठरवलं. दोषी ठरवण्यास स्थगिती देण्याची मागणी करणारी त्यांची याचिका कोर्टानं फेटाळून लावली.

4 डिसेंबर 2017 - कोर्टानं शरीफ यांचे दोन्ही मुलगे हसन आणि हुसैन यांना फरार घोषित केलं.

23 मे 2018 - नवाझ शरीफ यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण

24 मे 2018 - मरियम यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण. लंडनमध्ये फ्लॅट असल्याचे आरोप मरियम यांनी अमान्य केले. तसंच नेल्सन आणि नेसकॉल नावाच्या ऑफशोअर कंपन्यांशी संबंध नसल्याचं म्हटलं. फक्त नवाझ शरीफ यांची मुलगी आहे म्हणून या केसमध्ये गोवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

11 जून 2018 - ख्वाजा हरीस यांनी नवाझ शरीफ यांच वकिलपत्र मागे घेतलं.

20 जून 2018 - ख्वाजा हरीस यांनी शेवटच्या सुनावणी दरम्यान शरीफ यांची बाजू मांडतांना त्यांच्याकडे लंडनमध्ये कुठलेही प्लॅट्स नसल्याचं ठासून सांगितलं.

28 जून 2018 - नजाझ शरीफ यांच्या बाजूनं प्रतिवाद पूर्ण

3 जुलै 2018 - National Accountability Bureau कोर्टात सुनावणी पूर्ण. कोर्टानं त्यांचा निकाल राखून ठेवला.

6 जुलै 2018 - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा, मुलगी मरियम यांना 7 वर्षं तुरुंगवास


पाकिस्तानच्या निवडणुका

  • पाकिस्तानात 25 जुलै रोजी सार्वजनिक निवडणुका होत आहेत.
  • पाकिस्तानच्या नॅशनल असम्बेलीच्या 342 जागांसाठी निवडणूक होत आहे.
  • नवाझ शरीफ यांचा पीएमएल-एन, माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पीटीआय आणि बिलावल भुत्तो झरदारी यांचा पीपीपी हे तीन मुख्य पक्ष आहेत.
Image copyright EPA
  • निवडणुका मुक्तपणे आणि नि:पक्ष व्हाव्यात यासाठी देशभरात तीन लाख 71 हजार जवान तैनात करण्यात आल्याचं लष्कराचं म्हणणं आहे.
  • निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून दुसऱ्या नागरी सरकारकडे सत्ता सोपवण्याची पाकिस्तानच्या इतिहासातली ही दुसरीच वेळ आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)