'बाई वाड्यावर या... ही निळू फुलेंची खरी ओळख नाही'

निळू फुले Image copyright YOUTUBE/RAJSHREEMARATHI

'बाई वाड्यावर या' हे गाणं ज्या ज्या वेळेस मी पाहतो त्या त्या वेळेस मी खट्टू होतो. 'बाई वाड्यावर या' असं म्हणणारे निळू फुले आजकाल जास्त 'फेमस' झालेत आणि तीच त्यांची ओळख बनली आहे.

डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि तोंडाचा चंबू करून बेरकीपणानं हुंकारत निळूभाऊ बोलत.

ती त्यांची 'स्टाईल' होती. अनेक मिमिक्रीवालेसुद्धा निळूभाऊंची एवढीच नक्कल करत आणि करतात. प्रसंगी पदरची वाक्ये बोलतात आणि निळूभाऊंच्या नावावर खपवतात.

'बाई वाड्यावर या' हे वाक्य कदाचित त्यातलेच! पण हे वाक्य म्हणजे निळूभाऊंची खरी ओळख नव्हे.

खरंतर हे वाक्य निळूभाऊंनी कुठल्या चित्रपटात उच्चारलं होतं याविषयी कोणालाही माहिती नाही. (अगदी त्यांच्या मुलीला, गार्गीलाही ते असं कुठल्या चित्रपटात बोललेत का याविषयी शंका आहे.)

त्यामुळे आजच्या लोकांना 'बाई वाड्यावर या' ही निळूभाऊंची एवढीच आणि अशी ओळख राहणे हे माझ्या खट्टू होण्याचे कारण आहे.

सातारा-पुणे रस्त्यावर खंबाटकी घाटाच्या अलीकडे गेली 9 वर्षे निळूभाऊंचा फोटो रस्त्याच्या कडेला आहे आणि खाली लिहिलं आहे 'मोठा माणूस!'

निळूभाऊंची हीच ओळख मला आहे. 'मोठा अभिनेता' यापेक्षाही 'मोठा माणूस' ही निळूभाऊंची ओळख देखणी आणि खरी आहे.

चित्रपटातून दिसणारे निळू फुले मी वर्षानुवर्षे पाहतच होतो. त्यांची अनेक कामे मी पाहिलेली होती. त्यांच्याविना कुठलाही मराठी चित्रपट पूर्णच होऊ शकत नव्हता.

निळू फुले म्हणजे मराठी चित्रपटातील अमिताभ बच्चन! अनभिषिक्त सम्राट!

निळूभाऊंचं राजकारण

या सम्राटानं महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागावर राज्य केलं. महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतील काँग्रेस नेता त्यांनी हुबेहूब साकारला. अमर्याद सत्ता आणि त्यातून येणारा माज निळूभाऊंनी अनेक भूमिकांतून दाखवला.

Image copyright Atul Pethe
प्रतिमा मथळा निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू

माझ्या मते लोहियावादी असणाऱ्या निळूभाऊंनी काँग्रेसवर असा राग काढला. साखर कारखानदार नेत्यांना चव्हाट्यावर आणून बदनाम करण्यात यांचा मोठा वाटा आहे.

हे सारं राजकारण निळूभाऊंना पूर्णतः ठाऊक होतं. किंबहुना हेच निळूभाऊंचं राजकारण होतं. त्याची समज या कामांमधून दिसायची. अशा प्रकारच्या भूमिका करत असताना आवाज, नजर आणि देहबोली या तीन गोष्टींवर निळूभाऊंची हुकूमत विलक्षण होती.

मराठी भाषेचे आणि त्यातल्या विविध बोलींचे त्यांना विचक्षण ज्ञान होते. ही त्यांची भाषा लोकनाट्यातून तयार झालेली होती. ती अस्सल रांगडी मराठी होती.

याचे प्रत्यंतर 'कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'सखाराम बाईंडर' या नाटकातूनही येत असे. बेदरकार, बेमुर्वतखोर आणि बेजबाबदार हे तीन अवगुण ते सखाराममध्ये पुरेपूर ओतत. त्यातूनच माणसाच्या रासवटपणाचं भेदक दर्शन ते घडवत. पण हे नाटक-सिनेमातले निळूभाऊ साऱ्यांच्याच परिचयाचे होते. तसेच ते माझ्याही माहितीतले होते.

मात्र मला निळूभाऊ उमगू लागले ते साधारण 1994/95 सालानंतर.

डॉक्टर लागूंशी दोस्ती

नाशिकला एके ठिकाणी व्याख्यानामध्ये त्यांनी माझं नाव जाहीरपणे घेतलं आणि प्रयोगशील नाटक करण्याबद्दल कौतुक केले. याबाबतची बातमी स्थानिक वृत्तपत्रातून आली होती. मी कमालीचा सुखावलो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डॉ. श्रीराम लागू

1997 सालची गोष्ट. निळूभाऊंच्या समानशील डॉ. श्रीराम लागूंनीही माझं कौतुक केलं. नाटकासाठी देणगी दिली आणि नव्या नाटकाची पृच्छाही केली.

प्रसिद्ध लेखक श्याम मनोहर लिखित 'प्रेमाची गोष्ट?' या नाटकाची संहिता मी डॉक्टरांच्या हातात दिली. डॉक्टरांना नाटक आवडले आणि त्यांनीच निळूभाऊंचे नावही सुचवले.

इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या घरातून निळूभाऊंना थेट फोन लावला. निळूभाऊंनी डॉक्टरांना होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी निळूभाऊंच्या घरी गेलो. त्यावेळेस निळूभाऊ पुण्यात आयडियल कॉलनीच्या ग्राउंड जवळ राहात.

सकाळी दहा-अकराची वेळ. मी सकाळपासूनच तयारी करत होतो. मनात प्रचंड धडधड. निळूभाऊंना भेटायची कमालीची आस. अभिनयामुळे मी जसा प्रभावित होतो तशाच त्यांच्या माणूसपणाच्या अनेक गोष्टींनी मी आकर्षित होतो.

राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकातून लिहिलेली आणि केलेली वगनाट्य, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन अशी बहुविध कामं मला त्यांच्याजवळ जायला उत्सुक करत होती.

'सिंहासन' चित्रपटातील पत्रकार दिगू मला खूप जवळचा वाटत होता. काँग्रेसच्या उथळ राजकारणावर हा माणूस घाला घालतो आहे अशी प्रामाणिक भावना माझी होती. हे सर्व माझ्या मनात उचंबळून येत होतं.

मी दारावरची बेल वाजवली. दार उघडले गेले आणि साक्षात निळूभाऊ समोर उभे होते. पुंडलिकाला परब्रह्म भेटल्याचे जे परमसुख मिळालं असेल तेच मला मिळालं. लुंगी गुंडाळलेली होती आणि वर खादीचा झब्बा. हातात सिगारेट. खर्जातील आवाजात 'या' एवढेच म्हणाले.

माझी नजर त्यांचं व्यक्तिमत्त्व टिपून घेत होती. अत्यंत साधा भाव त्यांच्या नजरेत होता. उभे राहण्यात लीनपणा होता. नाटकात असतात तितक्याच नैसर्गिक हालचाली त्यांच्या होत होत्या.

मी त्यांना नाटकाची संहिता दिली. त्यावर ते 'करूया. डॉक्टरांची इच्छा पूर्ण करूया' एवढंच उद्गारले.

Image copyright DILIP THAKUR
प्रतिमा मथळा 'हमाल दे धमाल' या चित्रपटातील एक प्रसंग (फोटो - दिलीप ठाकूर यांच्या संग्रहातून)

मग निळूभाऊ इतर अनेक गोष्टींविषयी विचारू लागले, बोलू लागले. त्याच भेटीमध्ये त्यांनी मला डॉ. आ. ह. साळुंखे यांचं 'चार्वाक' हे पुस्तक भेट दिलं. चहा पिता पिता निळूभाऊ अनेक विषयांवर बोलले. त्यांना विद्रोही तुकारामावर चित्रपट करायचा होता.

निळूभाऊंची भेट घेऊन मी निघालो. मी पूर्णपणे बदललो होतो. निळूभाऊंचा समाजवादी प्रखर विचार काँग्रेसच्या सरंजामदारी वृत्तीवर जसा प्रहार करत होता तसाच नव्यानं सुरू झालेल्या लालकृष्ण अडवाणी प्रणीत हिंदुत्ववादी राजकारणावरही आघात करीत होता.

अनेक वेळा त्यांना धर्मांध राजकारणामुळे कमालीचं अस्वस्थ झालेले मी पाहिलं आहे. नथुराम गोडसे त्यादृष्टीनं खलनायक होता. त्याचं उदात्तीकरण करणारं नाटक हा त्यांच्या चिंतेचा विषय होता.

मनुष्याबद्दल कळवळा

ब्राह्मणी राजकारणाचा आणि मनुवादी वृत्तींचा त्यांना पराकोटीचा राग होता. इतकंच नव्हे तर महात्मा जोतीराव फुले यांना तत्कालीन समाजानं अडाणीपणानं झिडकारले तसंच माळी समाजानंही नाकारले होते याचंही दुःख ते बोलून दाखवत.

मनुष्याबद्दल कळवळा असणारा हा निळूभाऊंचा स्वभाव त्यांना माणूस म्हणून मोठा करणारा होता.

निळू फुले आणि डॉक्टर लागू ही जोडगोळी महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. त्या दोघांना पाहिले की मला 'शेजारी' चित्रपटाची आठवण होई. त्यातील हिंदू-मुसलमान मित्र जसे घट्ट छंदिष्ट होते तसेच हे दोघेही होते.

डॉक्टर लागू आणि निळूभाऊंची पार्श्वभूमी वेगळी आणि अभिनयाची शैलीही निराळी. डॉक्टर शास्त्रीय पद्धतीनं अभिनयाचा विचार करणारे तर निळूभाऊ नैसर्गिक पद्धतीनं भूमिकेला भिडणारे! डॉक्टरांचा प्रेक्षक वर्ग शहरी होता तर निळूभाऊंचा ग्रामीण!

दौऱ्याला निघालेली गाडी एखाद्या धाब्यावर थांबली की याचं प्रत्यंतर येई. त्या काळात मोबाईलचा सुळसुळाट नव्हता. तरीही अर्ध्या तासामध्ये सुमारे दोनशे माणसं निळूभाऊंच्या आजूबाजूला धाब्यावर जमत. तेवढ्या वेळात कुठून कॅमेरा आणत कोण जाणे. पण फोटो निघत.

Image copyright DILIP THAKUR
प्रतिमा मथळा निळू फुले आणि वर्षा उसगावकर 'मालमसाला' सिनेमाच्या पत्रकार परिषदेत.

अनेकदा निळूभाऊ विशिष्ट घरामध्ये जेवायला गाडी थांबवत. मग तिथे राजकीय गप्पांचा फड बसे. मिश्किल आणि थेट घणाघाती बोलण्याच्या जोडीला मद्यपान आणि मांसाहार.

निळूभाऊंच्या बोलण्यात त्यावेळेस गौतम बुद्धाविषयी आणि बुद्ध धर्माविषयी अनेक गोष्टी येत. हिंदू धर्मातील जाती व्यवस्था त्यांना अस्वस्थ करे. इतकी की आपणही बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असे ते म्हणत. हा दृष्टिकोन मला नवा होता.

त्यांच्याशी चर्चा म्हणजे शिबिरच...

निळूभाऊंनी मला अनेक पुस्तकं भेट दिली. अनेक विषयांवर त्यांनी मला ठणकावलं आणि वाचायला उद्युक्त केलं. नाटकाच्या प्रयोगानंतर होणाऱ्या चर्चा हे खरं तर माझ्यासाठी शिबीर झालं. अचंबित होऊन ऐकणार्‍या आम्हा सगळ्यांचा तो अभ्यास वर्ग असे.

मी आजही आणखी एका आठवणीनं थक्क होतो. त्या काळात पुण्यामध्ये नाटकाची बस झोपून जायला उपयुक्त अशी नव्हती. कलाकारमंडळी बसमधील बाकड्यांवरच आडवी व्हायची. डॉक्टर लागू त्यांची गादीची वळकटी आणायचे. तर निळूभाऊ मधल्या पट्ट्यात नाटकातल्या गादीवर झोपायचे.

रात्री-अपरात्री गाडी थांबली की लोक काळजीपूर्वक बाकड्यांवर पाय ठेवत आणि कसरत करत गाढ झोपलेल्या निळूभाऊ आणि डॉक्टरांना ओलांडून जात. हे दृश्य मला गलबलून टाके.

आपल्या साऱ्या व्यवस्थांचा राग येई. पण या दोघांचा थोरपणा हा की त्यांनी याविषयी एका शब्दानंही वाच्यता केली नाही. ठिकठिकाणी प्रचंड उकाडा असून कधी एसीची मागणी केली नाही की कुलरची!

आम्ही कलकत्त्याला 'नांदीकार'च्या नाट्यमहोत्सवात गेलो तेव्हाही निळूभाऊ आणि डॉक्टर आमच्याच बरोबर आगगाडीतून आले. दौऱ्यात मला निळूभाऊंनी तीन पानी पत्ते खेळायला शिकवलं.

निळूभाऊ कुठल्याही विषयावर पारदर्शीपणे बोलायचे. आयुष्यात अनाहूतपणे घडलेल्या चुकाही ते निर्धास्तपणे सांगायचे. अशा वेळेस मी त्यांना 'ते आत्मकथा का लिहीत नाहीत' असं विचारलं तर 'खरं लिहायचं धैर्य माझ्यात नाही आणि थापा मारण्यात रस नाही' असं त्यांनी मला निर्मळपणे सांगितलं.

एकच प्रसंग, पण...

'प्रेमाची गोष्ट?' या नाटकात खरंतर एकच प्रसंग निळूभाऊंना होता. 'हिंदमाता रद्दी डेपो' हे रद्दीचं दुकान चालवणारा मराठा तात्या ही भूमिका ते अफलातून करत.

त्यांच्या एंट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. या प्रसंगात त्यांचे डॉक्टर लागूंबरोबरचे जुने मैत्र अनुसंबंध ते विलक्षण ओलाव्यानं दाखवत.

त्या नाटकातील हा प्रसंग कौतुकाचा ठरलेला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता बी. व्ही. कारंथ यांनी निळूभाऊंच्या या कामाचं गुणगान केलं आहे.

Image copyright DILIP THAKUR
प्रतिमा मथळा चित्रपट - गोष्ट छोटी डोंगराएवढी (फोटो - दिलीप ठाकूर यांच्या संग्रहातून)

निळूभाऊ मेकअपरूममध्ये सतत मान खाली घालून पुस्तक वाचत असलेले मला आठवतात.

नाटकावर श्रद्धा इतकी की, माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाला त्यांनी त्यावेळीस कधीच कुठलाही त्रास तर दिला नाहीच, पण नाटकावर काहीशी टीका होत असूनही माझ्या पश्चात एका शब्दानंही ते आडवे बोलले नाहीत.

'बांधिलकी' या शब्दाचा व्यापक अर्थ मला इथे उमगला. वाक्यांमधले आणि वागण्यामधले राजकारण काय असते, याचे शहाणे धडे मला निळूभाऊंनी दिले.

वंचित, शोषित आणि पीडित समाजाची दुःख सांगत असताना निळूभाऊंचा गळा दाटून येई. भारतीय मुस्लीम समाजाची स्थिती आणि गती दाखवणारा 'सच्चर समिती'चा रिपोर्ट त्यांनी मला वाचायला दिला होता.

नाटक, चित्रपट आणि जगणं हे निळूभाऊंसाठी एक आंदोलन होतं. या साऱ्या गोष्टी आणि घटना मला आजच्या काळात अजब वाटतात. माणसाला महान व्हायला अशी मानवतावादी मूल्यं लागतात.

'मोठा माणूस' या निळूभाऊंना मिळालेल्या उपाधीचा अर्थ मग उमजतो !

(लेखातील नावं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)