पाकिस्तान : बलुचिस्तानमध्ये निवडणूक प्रचारसभेत बाँब हल्ला, 85 ठार

बलुचिस्तान

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

बलुचिस्तान

माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानात परत येत असल्याचं वृत्त असतानाच दुसरीकडे बलुचिस्तानातल्या एका निवडणूक प्रचार सभेत झालेल्या बाँब हल्ल्यात 70 जण ठार झाले. बलुचिस्तान पीपल्स पार्टीचे उमेदवार सिराज रैसानी यांचाही या स्फोटांत मृत्यू झाला आहे.

या स्फोटामध्ये सिराज यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला त्यांचे बंधू आणि माजी संसद सदस्य लष्करी रैसानी यांनी दुजोरा दिला. ते बीबीसीशी यासंदर्भात बोलले. 2011 मध्येही सिराज यांच्यावर अशाच स्वरुपाचा हल्ला झाला होता. मात्र त्यावेळी ते वाचले होते.

क्वेटा शहराच्या दक्षिणेला 35 किमी अंतरावर असणाऱ्या एका गावात इलेक्शन रॅली सुरू होती. तिथे हा बाँबस्फोट झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. आठ ते दहा किलोग्रॅम स्फोटकांचा हल्ल्यासाठी वापर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. बॉल बेअरिंगच्या साह्याने हा स्फोट घडवण्यात आला.

दरम्यान बानू शहराजवळ झालेल्या बाँब हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला. निवडणुकीसंदर्भातील सभेवेळी हा स्फोट झाला.

हा बाँबस्फोट एवढा मोठा होता की 8 ते 10 किलोमीटरपर्यंतचा प्रदेश यामुळे हादरला. गेल्या 24 तासांत बलुचिस्तान प्रांतात झालेला हा तिसरा हल्ला आहे. पहिला बाँबस्फोट नैर्ऋत्य बलुस्तानमध्ये झाला. यात 10 लोकांचा मृत्यू झाला. या स्फोटांची जबाबदारी पाकिस्तानातल्या कट्टरवादी संघटनांनी घेतली आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

बाँबस्फोटानंतर जखमींना रुग्णालयात नेताना

या निवडणुकांमध्ये सहभागी होऊ नये यासाठी कट्टरवादी लोकांवर दबाव आणत आहेत.

25 जुलैला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. 342 जागांसाठी मतदार होणार आहे. नवाझ शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग, माजी क्रिकेटपटू इम्रान खानप्रणित पाकिस्तान तहरीक-इ-इन्साफ, बिलावल भुट्टो झरदारी यांचा पाकिस्तान पीपल पार्टी हे पक्ष रिंगणात आहेत. नागरी सत्ताधाऱ्यांनी कार्यकाळ पूर्ण करून सत्ता सोपवण्याची पाकिस्तानमधली ही केवळ दुसरीच वेळ असणार आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन,

पाकिस्तानातील बाँबस्फोटावेळचं दृश्य

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चळवळवादी, पत्रकार आणि सत्ताधारी लष्कराचे विरोधक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाया चर्चेत आहेत. निवडणुका सुरक्षित वातावरणात व्हाव्यात यासाठी 371, 000 एवढं प्रचंड सुरक्षादल तैनात करण्यात येणार आहे. शुक्रवारी झालेल्या बाँबस्फोटांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हल्ले अनपेक्षित

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

एम. इल्यास खान, बीबीसी इस्लामाबाद प्रतिनिधी

संवेदनशील भागातून कट्टरवादी लोकांना पकडण्यात आल्याचा दावा पाकिस्तान लष्कराने केला होता. म्हणूनच शुक्रवारी झालेले हल्ले अनपेक्षित मानले जात आहेत.

2013 सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी कट्टरवाद्यांनी इशारा दिला होता. याचा परिणाम म्हणजे धर्मनिरपेक्ष पक्षांनी मूक स्वरुपात प्रचार केला होता. त्या पक्षांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

त्याच पक्षांना यावेळी लक्ष्य करण्याचा कट्टरवाद्यांचा प्रयत्न आहे.

अनेक वादविवादांनी पाकिस्तानमधील निवडणुका झाकोळल्या आहेत. शुक्रवारी झालेल्या बाँबहल्ल्यामुळे देशात काळजीचं वातावरण पसरलं आहे.

विशेष म्हणजे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या मायदेशी परतण्याच्या घटनेदिवशीच हे बाँबहल्ले झाले आहेत.

शरीफ आपल्या कन्येसह युकेतून लाहोरला येण्याच्या काही तास आधी पाकिस्तानच्या विविध भागात हल्ले घडवून आणण्यात आले. शरीफ यांचे समर्थक आपल्या नेत्याच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानातल्या सर्व प्रमुख शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)