हे विम्बल्डनमध्ये 97 वर्षांनंतर घडतंय...

टेनिसपटू केविन अँडरसन

विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक वेळ चाललेल्या सामन्यांपैकी दक्षिण आफ्रिकेचा केविन अँडरसन आणि अमेरिकेचा जॉन इस्नर यांच्यातला शुक्रवारी झालेला सामना होता. तब्बल 6 तास 35 मिनिटं चाललेल्या या सामन्यात केविननं विजय मिळवत पुरुषांच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.

विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर हा ऐतिहासिक सामना रंगला होता. केविन अँडरसननं हा सामना 7-6 (8-6) 6-7 (5-7) 6-7 (9-11) 6-4 26-24 अशा सेटनंतर खिशात घातला. या सामन्यातली आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे शेवटाचा सेट 2 तास 50 मिनिटं रंगला.

आता या सामन्यात विजयी झालेला अँडरसन राफेल नदाल आणि नोवाक जोकोविक यांच्यातल्या विजयी स्पर्धकाशी पुरुष गटाचा अंतिम सामना खेळेल. जोकोविक आणि नदाल यांच्यात शुक्रवारी रात्री अपूर्ण राहिलेला सामना शनिवारी पूर्ण होईल. त्यात, जोकोविक 2-1नं आघाडीवर आहे.

लांबलेले सामने

इस्नर विरुद्ध अँडरसन हा आतापर्यंत सर्वांत लांबलेल्या सामन्यांपैकी एक आहे. यापूर्वी 2013मध्ये एका उपांत्य सामन्यात जुआन मार्टीन डेल पोर्टो याचा पराभव करण्यासाठी नोवाक जोकोविक याला 4 तास 44 मिनिटं लागली होती.

तर, जॉन इस्नर आणि फ्रान्सचा निकोलस माहूत यांच्यात 2010मध्ये विम्बल्डनचाच एक सामना तब्बल 11 तास आणि 5 मिनिटं चालला होता. 70-68 एवढे गेम्स हा खेळ चालला.

तसंच, 2015मध्ये डेविस कप स्पर्धांच्या पहिल्याच राऊंडमध्ये अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मायेर आणि ब्राझीलच्या जोआ सुआझा यांच्यात झालेला सामना 6 तास 43 मिनिटं चालला होता.

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू 97 वर्षांनंतर

विम्बल्डनच्या अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवलेल्या केविन अँडरसनच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. तब्बल 97 वर्षांनंतर एका दक्षिण आफ्रिकेतल्या खेळाडूनं विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे.

यापूर्वी 1921मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ब्रायन नॉर्टन यांनी विम्बल्डनच्या अंतिम सामन्यांत प्रवेश मिळवला होता.

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन हे एकाच वर्षी जिंकणं कठीण का आहे?

केविन अँडरसननं 33 वर्षीय जॉन इस्नर याला अखेर 49व्या गेममध्ये मात दिली. त्याआधीचे दोन्ही सेट अटीतटीचे झाल्यानं सामन्याच्या निकालात अखेरपर्यंत चुरस कायम राहिली.

'सामन्याचे ते क्षण कठीण होते'

सामना पूर्ण झाल्यानंतर बीबीसी स्पोर्ट्सच्या प्रतिनिधीनं केविन अँडरसननं संवाद साधला.

अँडरसन म्हणाला, "आता काय बोलायचं हे सुचत नाही. सामन्याचे तो काळ फार कठीण होता. सामना बरोबरीतच सुटल्यासारखं वाटत आहे. कारण, दोघांनी एवढी मेहनत सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत घेतली. पण कोणाला एकाला जिंकावं लागणार होतं. जॉन हा उत्तम खेळाडू असून मला त्याचा अभिमानही वाटतो. मी त्याला अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यानं माझ्या करिअरमध्ये मला अनेकदा मदत केली आहे."

जॉन इस्नरनंही त्याच्या भावना बीबीसी स्पोर्ट्स प्रतिनिधीकडे व्यक्त केल्या. इस्नर म्हणाला की, "माझ्या पायाला फोड आल्यामुळे मला खेळताना अडचण येत होती. तरी मी जोरदार लढत दिली. त्यामुळेच सामना इतका वेळ रंगला. अखेरच्या क्षणी उत्तम खेळ केल्यानं तो विजयी झाला."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)