इस्राईलचा हमासवर 2014नंतरचा सर्वांत मोठा हल्ला

गाझा, इस्राईल, हमास Image copyright ANADOLU AGENCY/GETTY IMAGES

इस्राईलनं उत्तर गाझा भागात सक्रिय असलेल्या हमासविरोधात जोरदार लष्करी कारवाई केली आहे. हमासकडून 90 हून अधिक रॉकेट इस्राईलवर डागण्यात आल्यानं हमासच्या अनेक ठाण्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचं इस्त्राईलनं स्पष्ट केलं.

गाझा शहरावर झालेल्या या इस्राईली हवाई हल्ल्यांत दोन जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

उत्तर गाझा भागातील हमासच्या बटालियनचं मुख्यालय आणि हमासद्वारे प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या ठिकाणांना इस्राईलनं प्रामुख्यानं लक्ष्य केलं आहे.

2014मध्ये हमाससोबत झालेल्या युद्धानंतर इस्राईलनं केलेली ही सर्वांत मोठी लष्करी कारवाई असल्याचं मानलं जात आहे.

अनेक ठिकाणी हल्ले

Image copyright AFP
प्रतिमा मथळा उत्तर गाझामधल्या हमासच्या ठाण्यांवर इस्राईलकडून जोरदार हवाई हल्ला करण्यात आला आहे.

इस्राईलच्या सुरक्षा दलांनी (IDF) दिलेल्या माहितीनुसार, गाझावर प्रभाव असलेल्या ठिकाणी हमासकडून वापरली जाणारी जागा, इथल्या बेट लाहिया भागातलं त्यांच्या बटालियनचं मुख्यालय, उत्तरी गाझामधल्या उंच इमारतीत बनवण्यात आलेली प्रशिक्षण केंद्र, शस्त्रागार आणि रॉकेट लाँचर्सच्या साठ्यांवर हल्ले करण्यात आले आहेत.

IDFने याबाबत ट्वीटकरुन अधिक माहिती दिली आहे. यात ते म्हणतात, "गेल्या एका तासांत IDF च्या लढाऊ विमानांनी गाझा पट्टीमधल्या हमासच्या चार लष्करी परिसरांवर हल्ला चढवला आहे. यात प्रामुख्यानं त्यांच्या बटालियनचं मुख्यालय लक्ष्य करण्यात आलं."

तर, दुसऱ्या एका ट्वीटमध्ये लिहीलं आहे की, "काही वेळापू्र्वीच IDF च्या लढाऊ विमानांनी गाझा भागातल्या अल-शटी शरणार्थी कँपमधल्या एका उंच इमारतीवर हल्ला केला. या इमारतीखाली तळघर बनवण्यात आलं होतं. जिथे नियमित हमासकडून प्रशिक्षण देण्याचं काम केलं जात आहे."

अभियान सुरुच राहणार

ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे संकेत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दिले आहेत. नेतान्याहू म्हणतात, "गरज वाटल्यास हमासवरील हल्ले वाढवण्यात येतील. जर हमासला आमचा आजचा संदेश कळत नसेल तर तो उद्या नक्की कळेल."

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्षदर्शींच्या मते एका रिकाम्या इमारतीवर इस्राईलकडून हल्ले करण्यात आले. या हल्ल्याची झळ आजूबाजूला असलेल्या सगळ्यांनाच पोहोचली.

हमासचं म्हणणं आहे की, शुक्रवारी सीमेवर झालेल्या आंदोलनादरम्यान इस्राईली सैनिकांकडून झाडण्यात आलेल्या गोळीने एका पॅलेस्टिनी नागरिकाचा मृत्यू झाला.

'डझनावारी रॉकेटचा मारा'

IDF चं म्हणणं आहे की, गाझातून इस्त्राईलच्या दिशेनं डझनावारी रॉकेट डागण्यात आली आहेत.

इस्त्राईलमध्ये 90 हून अधिक रॉकेट पडल्याचं बोललं जात आहे. एक रॉकेट स्देरॉत नावाच्या भागातील एका घरावर पडल्यानं तीन जण जखमी झाले आहेत. या भागात गेल्या काही महिन्यांत हिंसेच्या घटना वाढल्यानंतर हे हल्ले झाले आहेत.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा इस्त्राईलमध्ये 90 हून अधिक रॉकेट पडल्याचं बोललं जात आहे.

इस्त्राईल-पॅलेस्टिन सीमेवर सध्या जोरदार प्रदर्शनं सुरू आहेत. पॅलेस्टिनी नागरिकांना इस्राईलमधल्या त्यांच्या जुन्या घरांमध्ये परतायचं असून त्यासाठी ही आंदोलनं सुरू आहेत.

इस्त्राईल आणि इजिप्तच्या बाजूनं करण्यात आलेली नाकाबंदी हटवण्याची मागणीही पॅलेस्टिनी करत आहेत.

या आंदोलनांदरम्यान करण्यात आलेल्या कारवाईत इस्त्राईली फौजांकडून 130 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले असून 15000 हून अधिक जण जखमी झाल्याचा दावा गाझातील आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)