FIFA WC 2018 फायनल : फ्रान्स - 4, क्रोएशिया - 2

कोण जिंकणार वर्ल्ड कप? Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कोण जिंकणार वर्ल्ड कप?

फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यात 2018 वर्ल्ड कप जेतेपदासाठी अंतिम सामना होईल, हे महिन्याभरापूर्वी कुणाला वाटलं होतं? पण तसं होतंय आज.

FIFA वर्ल्डकपचा अंतिम सामना मॉस्कोच्या लुझनिकी स्टेडिअममध्ये सुरू आहे.

फ्रान्सने जरी 4 गोल करून अजिंक्य वाटणारी आघाडी घेतली आहे, पण क्रोएशिया अजूनही झुंज देत आहेच. 69व्या मिनिटाला क्रोएशियाने आणखी एक गोल विरोधी नेटमध्ये धाडला आहेच. त्यामुळे हा सामना 70 व्या मिनिटाला 4-2 असा दिसतोय.

आणखी 20 मिनिटं उरली आहेत - क्रोएशिया आणखी किमान दोन गोल करू शकेल का? की यंदा फ्रान्स 20 वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा घडवणार.

संघांची तुलना

फ्रान्सचे मॅनेजर हे डिडिअर डेसकॅम्पस आहेत, तर क्रोएशियाचे मॅनेजर झ्लॅटको दालिक आहेत. त्यांनी क्रोएशियाच्या संघाचं व्यवस्थापन नऊ महिन्यांपूर्वी स्वीकारलं होतं.

क्रोएशियाची लोकसंख्या जेमतेम 41 लाख, म्हणजे कदाचित पुण्यात यापेक्षा जास्त लोक असतील. आणि जर तुम्हाला वाटत असेल की क्रोएशिया हा फुटबॉल वर्ल्ड कप फायनल खेळणारा सर्वांत छोटा देश असेल तर थोडं थांबा. 1930मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या उरुग्वेची लोकसंख्या आता 17 लाख आहे.

FIFAच्या रॅंकिंगनुसार क्रोएशिया 20व्या क्रमांकावर होता. इतक्या कमी रॅंकवरून फायनलपर्यंत मजल मारणारा क्रोएशिया हा पहिलाच देश आहे.

ड्रीम, ड्रीम, ड्रीम!

इंग्लंडचं वर्ल्ड कपचं स्वप्न उद्धवस्त करून क्रोएशियानं अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर क्रोएशियन जनता आनंदानं न्हाऊन निघाली आहे. राजधानी झॅग्रेबच्या रस्त्यांवर लोक गाणी म्हणताना, झेंडे फडकवताना दिसत आहेत.

Image copyright Getty Images

"ड्रीम, ड्रीम, ड्रीम! क्रोएशिया अंतिम फेरीत पोहोचला," असं क्रोएशियाच्या स्पोर्ट्स्के नोव्होस्ती या वृत्तपत्रानं म्हटलं आहे. "दालिक हे जिवंतपणीच महान झाले आहेत," असं वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

"क्रोएशियाचे धगधगते खेळाडू अंतिम फेरीत पोहचले आहेत. पूर्ण राष्ट्र आनंदाने भारावून गेलंय," असं त्यांनी लिहिलं आहे.

2016च्या पराभवाची जखम भरून निघणार का?

2016मध्ये युरोपियन चॅंपियनशिपच्या अंतिम फेरीत पोर्तुगालने फ्रान्सचा पराभव केला होता. फ्रान्सची ती जखम अजूनही ताजी आहे, असं स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलंय.

"2016साली झालेली जखम भरून काढण्याची ही संधी चालून आली आहे," असं सुडोएस्ट या वृत्तपत्रानं म्हटलं आहे. पुढं ते म्हणतात, "फ्रान्सच्या टीममध्ये अनेक बदल झाले आहेत. फ्रान्सची टीम प्रगल्भ झाली आहे. फॉरवर्ड खेळणारे खेळाडू फॉर्मात आहेत. टीमच्या भात्यात अनेक अस्त्रं आहेत ज्यांनी क्रोएशियाचं व्यूह भेदता येईल."

ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सीची शेवटची संधी हुकली

'या पिढीतील सर्वोत्तम खेळाडू', अशी ख्याती मिळवलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सीसाठी ही शेवटची संधी होती. पण त्या दोघांची टीम अंतिम 16 या स्टेजमधूनच बाहेर पडली. हे दोघं बाहेर पडल्यामुळे दुसऱ्या खेळाडूंना गोल्डन बॉलची संधी निर्माण झाली.

या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी वैयक्तिक स्तरावर खेळ चांगला केला असल्यामुळे नेमकं कुणाला 'गोल्डन बॉल' पुरस्कार मिळणार, हे सांगता येणं कठीण झालं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा क्रोएशियात आनंदाचं वातावरण आहे

गेल्या 24 वर्षांची ही परंपरा राहिली आहे की विजेत्या टीमच्याच खेळाडूलाच गोल्डन बॉल मिळाला आहे.

क्रोएशियाच्या मिडफिल्डर लुका मोद्रिकचा खेळ स्पर्धेत उल्लेखनीय झाला आहे. त्याच्या खेळाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

फ्रान्सच्या किलिएन एमबाप्पेची जादू फायनलमध्ये चालेल की नाही, याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर त्याने अंतिम सामन्यात गोल केला तर पेलेनंतर फायनलमध्ये गोल करणारा तो दुसरा टीनएजर ठरेल. एमबाप्पे 19 वर्षांचा आहे. त्याने अर्जेंटिनाविरुद्ध त्याने चांगला खेळ केला होता.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

या वृत्तावर अधिक