'मला 63व्या वर्षी कळलं की माझे वडील फॉर्म्युला 1 चॅंपियन होते आणि मी कोट्यधीश झालो'

फॅंगिओ

फोटो स्रोत, BBC Sport

रुबेन हुआन वॅझकेझ हे 57 वर्षांचे होते. रिटायरमेंटच्या वयाला टेकलेले असताना ते अर्जेंटिनाची राजधानी ब्येनोज आयरीझच्या एका हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम करत होते.

एके दिवशी तिथं आलेला एक पर्यटक रुबेनना म्हणाला, "तुम्ही अगदी अर्जेंटिनाचे फॉर्म्युला 1 चॅंपियन हुआन मॅन्युएल फॅंगिओ यांच्यासारखे दिसतात."

त्या पर्यटकाने त्यांना हेदेखील सांगितलं की "फॅंगिओ यांना एक मुलगा होता. तो अंदाजे तुमच्याच वयाचा असला असता. तुम्हीच तर नाही ना तो?"

फॅंगिओ यांनी वर्ल्ड ड्रायव्हर चॅंपियनशिप पाच वेळा जिंकली होती. त्यांचा विक्रम नंतर जर्मनीच्या मायकल शुमाकर यांनी मोडला होता. 1995 साली फॅंगिओ यांचं निधन झालं.

जेव्हा रुबेन यांनी हे ऐकलं तेव्हा ते फॅंगिओ यांच्या ग्लॅमरस जगापासून दूर होते आणि एक खूप वेगळं आयुष्य जगत होते.

आधी रुबेन राजधानीच्या 350 किमी दक्षिणेस असलेल्या पिनामार शहरात राहत होते. 1990 साली रेल्वेतली नोकरी गेल्यावर ते हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम करू लागले.

फोटो स्रोत, BBC Sport

फोटो कॅप्शन,

हुआन मॅन्युएल फॅंगिओ

रुबेन यांना त्या व्यक्तीने फॅंगिओ यांच्याबद्दल सांगितल्यानंतर विशेष काही वाटलं नाही. कारण तसं काही असू शकेल, अशी शक्यता त्यांना वाटली नाही. पण त्यांनी त्यांची आई कॅटलिना बेसिली यांना याबद्दल विचारलं.

सुरुवातीला कॅटलिना यांनी नकार दिला. पण पाच वर्षांनंतर त्यांच्या पतीचं निधन झालं, तेव्हा त्यांनी रुबेन यांना खरं काय ते सांगितलं.

फॅंगिओ आणि कॅटलिना अल्पकाळासाठी एकमेकांच्या प्रेमात होते. त्याच अधुऱ्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे रुबेन असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या व्यक्तीनं रुबेन यांना सांभाळलं ते तुझे वडील नाहीत, असं रुबेन यांना अखेर त्यांच्याच आईकडून कळलं.

बेसिली आणि फॅंगिओ यांचे प्रेमसंबंध 1940 साली फुलले. काही काळीसाठी पतीपासून दूर गेल्यानंतर त्या फॅंगिओच्या सहवासात आल्या. त्यानंतर त्या गरोदर राहिल्या.

कायदेशीर लढाई

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

रुबेन यांना त्यांनी सर्व हकिगत सांगितल्यावर रुबेन यांनी वकिलाचा सल्ला घ्यायचा ठरवलं. बेसिली यांनी त्यांच्या मुलाची मदत करण्याचं ठरवलं. त्यांनी रुबेन यांचे वडील म्हणून फॅंगिओ यांचं नाव नोंदवलं. त्यानंतर दीर्घकाळासाठी कायदेशीर लढाई झाली.

2012 साली बेसिली यांचंही निधन झालं. त्यावेळी त्या 103 वर्षांच्या होत्या.

रुबेन जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना असा संशय यायचा की त्यांचं आणि फॅंगिओ यांचं काही नातं आहे. फॅंगिओ यांच्या प्रमाणेच रुबेन यांचा जन्म ब्येनोस आयरीझ भागातल्या बालकार्समध्ये झाला होता. एवढंच नव्हे तर किशोरवयात रुबेन यांनी फॅंगिओ यांच्याकडे नोकरीही मागितली होती.

"जेव्हा रुबेन माझ्याकडे आले आणि म्हणाले मी फॅंगिओचा मुलगा आहे, तेव्हा मला त्याबद्दल काहीच शंका नव्हती. त्या दोघांमध्ये इतकं कमालीचं साम्य होतं," असं रुबेनचे वकील मिग्वेल एँजल पियरी सांगतात.

त्यावेळी रुबेन यांचं वय 63 वर्षं होतं आणि त्यानंतर त्यांना पुढील 13 वर्षांसाठी कायदेशीर लढा द्यावा लागला.

सर्वांत आधी त्यांना DNA पुरावे गोळा करणं भाग होतं. त्यासाठी 2015 साली फॅंगिओच्या कबरीतून त्यांचा DNA नमुना घेण्यात आला आणि तब्बल दोन वर्षांनंतर तपासणीतून स्पष्ट झालं की फॅंगिओ हेच रुबेन यांचे वडील आहेत. त्यानंतर रुबेन यांनी आपलं नाव बदलून रुबेन हुआन फॅंगिओ असं ठेवलं.

खात्री पटावी म्हणून तपासात कोणतीच कसर बाकी ठेवण्यात आली नाही - अगदी त्या दोघांच्या आवाजाचे नमुनेही एका अमेरिकेच्या संस्थेमार्फत मॅच करण्यात आले.

फोटो स्रोत, BBC Sport

शेवटचा टप्पा होता तो मुलगा म्हणून फॅंगिओ यांच्या संपत्तीवर दावा करण्याचा. फॅंगिओ यांच्या नावे पाच कोटी डॉलरची संपत्ती आहे. फॅंगिओंचे वकील त्यांची जमीन, गाड्या आणि इतर मालमत्तेची यादी करत आहेत.

एवढंच नव्हे, फॅंगिओ यांच्या नावाचा आता एक ब्रॅंड आहे. त्यातून त्यांना किती महसूल मिळतो?

फॅंगिओ यांच्या मृत्यूनंतरचा वारसदार म्हणून रुबेन यांना जाहिराती आणि ब्रॅंडच्या महसुलाचा योग्य तो वाटा मिळणार, असा निर्णय कोर्टाने दिला.

"ही न्यायलयीन लढाई दीर्घकाळ चालली. पण एकदा मला कळलं की मीच फॅंगिओंचा मुलगा आहे, तेव्हा मला खात्री पटली होती. माझी खरी ओळख जगाला पटल्याचा आता मला आनंद आहे. आणि एका महान फॉर्म्युला 1 चँपियनचा मी मुलगा आहे, याचा अभिमान वाटतो," असं ते सांगतात.

रुबेन आता 76 वर्षांचे आहेत. त्यांना तीन मुलं आणि सात नातवंडं आहेत. आता ते निवृत्त झाले आहेत आणि आपण कोट्यधीश आहोत, याबद्दल त्यांना फारसं काही वाटत नाही.

"मला याविषयी फारसं बोलायला आवडत नाही. पण मी तुम्हाला सांगू शकतो, जे काही झालं ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. मला माझी ओळख मिळाली आणि हे सर्व योग्य पद्धतीनं झालं," ते सांगतात.

वयाच्या सत्तरीत भाऊ

रुबेन यांचे ताजे फोटो पाहिलेत तर त्यांच्यात आणि हुआन मॅन्युएल फॅंगिओ यांच्यात खूप साधर्म्य आढळून येतं.

ट्रॅकच्या बाहेर फॅंगिओ यांनी प्रकाशझोतात राहणं टाळलं. अधिकृतरीत्या तरी त्यांना मूल नव्हतंच.

पण नुकत्याच झालेल्या DNA चाचणीतून रुबेन यांना आणखी एक भाऊ असल्याचं स्पष्ट झालंय. ऑस्कर 'काचो' फँगिओ नावाचे त्यांचे भाऊ त्यांच्यापेक्षा वयानं 4 वर्षं मोठे आहेत.

तरुण वयात काचो फॉर्म्युला 3 ड्रायव्हर होते. ते आणि त्यांची आई फॅंगिओ यांच्यासोबत राहायचे. काचो यांना ट्रॅकवर 'फँगिओ' या टोपणनावाने ओळखलं जायचं. पण त्यांनी त्यांचं कायदेशीर नाव नुकतंच बदललं आहे.

ऑस्करचे वकील स्कारसेला म्हणतात, फॅंगिओ आणि ऑस्कर यांच्या आई एकत्र राहत होत्या. त्यांची पत्रं आणि एकत्रपणे जर्मनी आणि युरोपमध्ये इतर ठिकाणी फिरतानाचे फोटो आणि व्हीडिओ आहेत.

हे दोघंही फँगिओचे कायदेशीर वारसदार आहेत, असं दोघांच्या वकिलांनी सांगितलं.

आता ऑस्कर आणि रुबेन एकमेकांना भाऊ म्हणतात. आता ते सत्तरीत आहेत. हे दोघं स्पेन आणि इंग्लंडमध्ये एकत्र फिरत आहेत.

फॅंगिओ यांचे फॅन्स असलेल्या ब्रिटिश ड्रायव्हरच्या गटाने त्यांना बोलवलं होतं. तेव्हा "मी माझ्या भावाबरोबर फिरत आहे आणि आम्ही आनंदात आहोत," असं रुबेन सांगतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)