अनेक वर्षांच्या मूर्खपणामुळे अमेरिका-रशियामधले संबंध बिघडले : ट्रंप

पुतिन आणि ट्रंप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांच्यात फिनलँडची राजधानी हेलसिंकी इथे महत्त्वपूर्ण बैठक झाली.

दोन तास बंद दाराआड झालेल्या या बैठकीत नेमकं काय बोलणं झालं, हे पूर्णपणे स्पष्ट नाही. मात्र कुठलाही विशेष अजेंडा या भेटीसाठी ठरला नव्हता, असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन म्हणाले.

अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक मुद्द्यांवर अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. 2016मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याच्या आरोपांनंतर या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता अधिकच वाढली.

पण या गडबडीत रशियाचा हात असल्याच्या आरोपांबद्दल पुतिन यांना चर्चा अपेक्षित असेलच, असं बोल्टन म्हणाले. "या भेटीचं एक कारण हे होतंच ना, की आपले राष्ट्राध्यक्ष त्यांना समोरासमोर भेटून याबद्दल जाब विचारतील," असं ते ABC न्यूजबरोबर बोलताना म्हणाले.

पण बैठकीनंतर ट्रंप यांनी ट्वीट करत "दोन्ही देशांतल्या संबंध बिघडणवण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेला मूर्खपणा जबाबदार" असल्याचं म्हटलं आहे. "नुसती कटकारस्थानं," असं ते पुढे म्हणाले.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

Twitter पोस्ट समाप्त, 1

त्यावर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेही "एकदम बरोबर" म्हटलं आहे.

ही बैठक का होती महत्त्वाची? जाणून घेऊ या.

1. अमेरिका आणि रशियात का आहेत मतभेद?

या प्रश्नाच्या उत्तरासाठी इतिहासात डोकवावं लागेल. या मतभेदांची सुरुवात 1945 ते 1989 एवढा मोठा काळ चाललेल्या शीतयुद्धामुळे झाली. अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत युनियन यांच्यातील संबंध या काळात ताणले गेले होते.

या दोन्ही देशांमध्ये थेट युद्ध कधी झालं नाही. पण सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर आणि अमेरिका जगातील एकमेव महासत्ता म्हणून पुढे आल्यानंतरही त्यांच्यातले संबंध ताणलेलेच राहिले.

या इतिहासातून आतापर्यंत पुढे येऊयात. सध्याचे राष्ट्रपती पुतिन यांनी रशियाला पुन्हा एकदा जागतिक महासत्ता म्हणून पुढे आणण्यासाठी उघडपणे प्रयत्न सुरू केले आहेत.

रशियावर आजवर लागलेले सगळे आरोप पुसण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग होता. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी नेहमीच अमेरिकेशी संघर्षाची भूमिका स्वीकारली.

2014 मध्ये युक्रेनच्या क्रिमियावर रशियानं कब्जा मिळवल्यावर या दोन्ही देशांमधला तणाव आणखी वाढू लागले. अमेरिकेनं आणि काही देशांनी लगेच रशियावर आर्थिक निर्बंध लादले.

2. ट्रंप-पुतिन भेट महत्त्वपू्र्ण का?

अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांच्या संबंधावर संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं असतं.

2016च्या अमेरिकन निवडणुकांमध्ये रशियानं ट्रंप यांच्या बाजूनं निकाल लागावा यासाठी प्रयत्न केल्याचा अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणांना संशय आहे. पण मॉस्कोने याचा सातत्याने इन्कार केला आहे.

रशियानं नेमका हस्तक्षेप केला होता काय, ट्रंप यांच्या टीमकडून त्यांना सहकार्य मिळालं होतं का, यावर अमेरिकेतले गुप्तहेर यंत्रणेतले विशेष अधिकारी रॉबर्ट मुल्लेर तपास करत होते. पण त्यांच्यावर ट्रंप यांनी त्यांच्यावर 'अकार्यक्षमते'चा ठपका ठेवत निलंबित केलं.

ही विरोधकांनी उठवलेली आवई असून निवडणूक हरल्याने ते आपल्या विरोधात कारस्थान करत आहेत, असं ट्रंप यांचं म्हणणं आहे.

जानेवारी 2017मध्ये सत्तेत आल्यानंतर ट्रंप यांनी दोन्ही देशांतले संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले. रिपब्लिकन पक्षाच्या पारंपरिक धोरणांविरोधातलं हे पाऊल ठरलं.

गेल्या महिन्यात, औद्योगिकदृष्ट्या प्रगत राष्ट्रांच्या समूहात रशियाला पुर्नप्रवेश मिळावा या भूमिकेला ट्रंप यांनी पाठिंबा दिला होता.

3. ट्रंप आणि पुतिन एकमेकांबद्दल काय म्हणतात?

ट्रंप यांनी पुतिन यांचं अनेकदा कौतुक केलं आहे. 2016 मध्ये पुतिन चांगले नेते असल्याचं ते म्हणाले होते. तसंच, बराक ओबामांना उद्देशून त्यांनी आपल्या नेत्यापेक्षा ते चांगले नेते आहेत, असं म्हटलं होतं.

गेल्या वर्षी ते पुतिन चिवट असल्याचंही म्हणाले होते. तर मार्च महिन्यात पुतिन यांनी वादग्रस्त निवडणूक जिंकल्यानंतर ट्रंप यांनी त्यांचे अभिनंदनही केले होते. ट्रंप यांनी पुतिन यांचं अभिनंदन करू नये, असा सल्ला त्यांना सल्लागारांनी दिला असतानाही त्यांनी पुतिन यांचं अभिनंदन केलं होतं, हे विशेष.

पुतिन यांनी ट्रंप यांच्या बद्दल हातचं राखूनच आजपर्यंत मतं व्यक्त केली आहेत. पण, तरीही पुतिन यांनी ट्रंप हुशार आणि प्रभावी व्यक्ती असल्याचं वक्तव्य मध्यंतरी केलं होतं.

4. ट्रंप आणि पुतिन कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करतील?

या दोन्ही नेत्यांमधल्या चर्चेबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध उघड करण्यात आली नसली तरी, पुढील मुद्द्यांवर त्यांच्यात चर्चा होणं अपेक्षित होतं.

  • शस्त्रांवर नियंत्रण : दोन्ही नेते एकमेकांच्या अण्वस्त्रांच्या क्षमतेवर चर्चा करू शकतील आणि हा चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा ठरेल असं तज्ज्ञांना वाटतं. रशिया आणि अमेरिका यांच्यात एक करार झाला असून या करारानुसार त्यांना त्यांची अण्वस्त्र कमी करायची आहेत. 2021पर्यंत ही अण्वस्त्र कमी करायची आहेत. तसंच, 1987मध्ये त्यांच्यात झालेल्या एका क्षेपणास्त्र करारावर देखील दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
  • अमेरिकेचे निर्बंध : रशियानं युक्रेनच्या क्रिमियावर अतिक्रमण केल्यानंतर अमेरिकेनं रशियातील उद्योग आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींवर निर्बंध लावले होते. रशियाच्या युक्रेन आणि सीरियामधील कारवायांमुळेही हे निर्बंध अजून दूर झालेले नाहीत.
  • युक्रेन : अमेरिकेनं युक्रेनला लष्करी मदत देऊ केली आहे. ही मदत जर, अमेरिकेनं मागे घेतली तरी याचा आनंद पुतिन यांना होईल. तसंच, रशियानं क्रिमियावर केलेलं अतिक्रमणही मान्य केल्यासारखं होईल. दोन्ही नेते पूर्व युक्रेनमधल्या वादग्रस्त भागात आंतरराष्ट्रीय शांतता दूतांना प्रवेश देण्याची मान्यता देतील. या भागात आतापर्यंत 10000 जणांचा मृत्यू झाला आहे.
  • सीरिया : अमेरिेकेचा प्रमुख साथीदार असलेल्या इस्राईलला इराण आणि त्यांच्या फौजा या दक्षिण-पश्चिम सीरियापासून दूर हव्या आहेत. ट्रंप हा मुद्दा उचलण्याची शक्यता आहे. पण, पुतिन इराणच्या कारवायांना पायबंद घालतील का याबाबत राजकीय तज्ज्ञ साशंक आहेत.

5. ट्रंप यांचे साथीदार चिंतेत का आहेत?

गेल्या आठवड्यांत नाटो राष्ट्रांच्या बैठकीत सर्वांचे रशियाच्या आक्रमक शैलीचा निषेध करण्याबाबत एकमत झालं. यात ट्रंप यांचाही समावेश होता. हा विषय ट्रंप रशियाच्या अध्यक्षांकडे उपस्थित करतील का, हा प्रश्न ट्रंप यांच्या सहकारी राष्ट्रांना सतावतो आहे.

ट्रंप हेलसिंकीमध्ये होणाऱ्या या बैठकीत नेमकी काय चर्चा करणार आहेत, याबाबत त्यांचे युरोपातील सहकारी देश अनभिज्ञ असल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत.

युरोपीय देशांच्या भेटीनंतर ट्रंप पुतिन यांच्याशी सौम्यपणे संवाद साधतील अशी भीती तिथल्या देशांना आहे.

ट्रंप यांनी संरक्षण क्षेत्रावरील खर्चावरून नाटो राष्ट्रांना नुकतंच धारेवर धरलं होतं. जर्मनी नैसर्गिक वायू रशियाकडून आयात करत असल्यानं जर्मनीचं नियंत्रण रशिया करत असल्याचा ट्रंप यांनी आरोप केला होता. तर UKच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या ब्रेक्झिटच्या प्लॅनवरूनही ट्रंप यांनी त्यांची समीक्षा केली.

7. बाहेरच्या जगासाठी याचा अर्थ काय?

अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. सीरिया, युक्रेन, क्रिमिया यांसारख्या अनेक ज्वलंत मुद्द्यांचा परिणाम जगावरही होतो आहे.

तसंच, बऱ्याच देशांवर लादण्यात आलेले निर्बंध हे जगासाठी घातक असल्याचं पुतिन यांचं म्हणणं आहे.

हे सगळं बाहेरून पाहणारे युरोपीयन देश मात्र चिंतेत आहेत. रशियाच्या आक्रमकपणामुळे हे देश बिथरलेले असले तरी रशियाकडील उर्जा स्त्रोतांवर हे युरोपीय देश अवलंबूनही आहेत.

ट्रंप यांनी जर्मनीला रशियाकडून नैसर्गिक वायू घेण्याच्या मुद्द्यावरून धारेवर धरलं. वादग्रस्त नॉर्ड स्कीम 2 प्रकल्पातून रशियातला नैसर्गिक वायू बाल्टिक समुद्र ओलांडून पुढे जाणार आहे. मध्य आणि पश्चिम युरोपात जाणारा हा प्रकल्प युक्रेन, बाल्टिक राष्ट्र आणि पोलंड यांना ओलांडून जाणार असून या देशांनी याला विरोध दर्शवला आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा होईल याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)