सुटकेसाठी तिनं केलं अपहरण करणाऱ्याशी प्रेमाचं नाटक

  • साराह बेल
  • व्हिक्टोरिया डर्बीशायर प्रोग्राम
क्लोए एलिंग
फोटो कॅप्शन,

क्लोए एलिंग

गेल्या वर्षी एका बातमीने जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. इटलीमध्ये क्लोए एलिंग हीच अपहरण करून तिला 6 दिवस ओलीस ठेवलं होतं. तिला बेशुद्ध करून एका बॅगेत घालून मिलानपासून दूर नेण्यात आलं. 6 दिवसांनंतर तिची सुटका करण्यात आली. पण तिची सुटका झाली तरी कशी? या अपहरणनाट्यावर अनेकांनी शंका ही घेतली होती. या सगळ्या प्रकरणावर एलिंगनंच प्रकाश टाकला.

बीबीसी व्हिक्टोरिया डर्बिशायर कार्यक्रमात एलिंग हिना संपूर्ण घटनाक्रम उलगडला.

दोन दिवस एका बंद खोलीत डांबून ठेवल्यानंतर क्लोए अपहरणकर्त्याबरोबर शैय्या सोबत करण्यास तयार झाली.

ती म्हणाली, "आम्ही जेवढं एकमेकांशी बोललो तेवढी आमच्यात जवळीक निर्माण झाली. तो माझ्या प्रेमात पडल्याचं मला दिसत होतं. तिथंच मी या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं. त्याचं प्रेमात पडणं माझ्यासाठी फायद्याचं ठरणार होतं."

दक्षिण लंडनमध्ये राहणारी 20 वर्षीय क्लोए एलिंग सांगते, "गेल्या वर्षी जुलै महिन्यात 30 वर्षीय लुकाज हर्बा याने फोटोशूटसाठी तिला मिलान शहरात बोलावलं होतं."

मिलानमध्ये पोहचल्यानंतर मात्र तिला केटामाइन ड्रगचं इंजेक्शन देण्यात आलं. तिचे कपडे उतरवण्यात आले आणि बेड्या घालून एका बॅगमध्ये कोंबण्यात आलं होतं. यानंतर ही बॅग गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून मिलानपासून 120 किलोमीटर दूरवर एका फार्महाऊसमध्ये नेण्यात आलं.

फोटो कॅप्शन,

लुकाज हर्बा

एलिंगचं म्हणते, जेव्हा ते फार्महाऊसवर पोहचले तेव्हा अपहरण करणाऱ्या हर्बाने तिच्याकडे तीन लाख युरोची मागणी केली. इतक्या पैशांचा बंदोबस्त न झाल्यास तिला विकण्याची धमकी त्याने दिली.

ती म्हणते, "तो जे काही बोलत होतो, ते सगळं खरं वाटत होतं. कारण तो माझ्या प्रत्येक प्रश्नाचं विस्तारानं उत्तर देत होता."

पण या दरम्यान हर्बाने एलिंगला एक प्रश्न विचारला,"मी तुला किस करू शकतो का? आपल्या दोघांमध्ये नवं नातं निर्माण होऊ शकतं का?"

हर्बाच्या या प्रश्नाने एलिंगला एक आशेचा किरण दिसला. स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तिला ही चांगली संधी वाटली.

तो नविन नात्यासाठी उत्साहित होता

"पुढे मागं यावर काही तरी घडू शकतं असं सांगत मी त्याची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला," असं ती म्हणाली.

तो फारच उत्साहात होता आणि नवं नातं निर्माण करण्याविषयी विचार करत होता. तो नेहमी मला याच विषयावर बोलायचा. मलाही त्याच्या प्रेमात पडल्याचं नाटक कराव लागणार असल्याचं मला दिसलं, असं एलिंगा सांगते.

खंडणी मिळणार नाही, हे लक्षात आल्यानंतर हर्बाने एलिंगला मिलानच्या ब्रिटिश उच्चायुक्तालनजीक सोडून दिलं.

जेव्हा ते ब्रिटिश उच्चायुक्तालय उघडण्याची प्रतीक्षा करत होते, तेव्हा काही प्रत्यक्षदर्शींनी त्यांना कॅफेमध्ये थट्टामस्करी करताना बघितलं होतं.

एलिंग म्हणते "हे कदाचित विचित्र वाटू शकेल. ज्या व्यक्तीला तुम्ही आवडता आणि जो तुमच्याप्रति असलेल्या भावनांमुळे तुमची सुटका करण्यास तयार आहे अशा व्यक्तिसोबत तुम्ही कसं वागू शकता."

"तो माझ्या प्रेमात पडावा यासाठी जे शक्य ते मी केलं," असं ती सांगते.

मिलानच्या न्यायालयात या प्रकरणात मूळचा पोलंडचा नागरिक असलेल्या हर्बाला सोळा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

आपल्या बचावात हर्बाने न्यायालयात एलिंगावर प्रेम असल्याचं आणि तिला आधी भेटल्याचं सांगितलं होतं.

एलिंगला प्रसिद्धी मिळावी आणि त्यातून तिला करिअरसाठी मदत मिळावी यासाठी हा बनाव रचला होता, असंही हर्बाने म्हटलं होतं.

महिलांनीच केली सर्वाधिक टीका

एलिंग म्हणते. "त्याने दोन वर्षांपूर्वी मला फेसबुकवर अॅड केलं होतं. त्याने मला निवडलं यामागचा अर्थ फक्त पैसा असू शकत नाही. तो फार पूर्वीपासून माझा पाठलाग करत होता. कदाचित माझ्यासाठी तो वेडा झालेला असावा. मला अजूनही त्याचा हेतू कळालेला नाही."

हर्बाच्या तावडीतून सुटल्यानंतर ब्रिटनला पोहचलेल्या एलिंगने आपल्या घराबाहेर पत्रकारांना प्रतिक्रिया दिल्या होत्या.

एलिंग फारच आनंदित दिसत होती. काही लोकांनी यावरूनच तिच्यावर टीका केली. तिने ज्यापद्धतीचे कपडे घातलेले होते, त्यावरूनही लोकांनी तिच्यावर टीका केली.

घरी परतण्याचा मी कधीच विचार केला नव्हता, म्हणून घरी परत आल्याने मला फार आनंद झाला होता, असं ती म्हणाली.

विमानातून उतरल्यानंतर ती थेट घरी आली. यावेळी तिने टॉप आणि शॉर्ट्स परिधान केली होती.

"लोकांना वाटतं की मी सतत रडत रहावं आणि जगापासून स्वतःला तोडून टाकावं. पण या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी मी लोकांमध्ये मिसळण्याचा आणि लोकांत वेळ घालवण्याच निर्णय घेतला."

एलिंगने या घटनेवर एक पुस्तकही लिहिलं आहे. हर्बाला शिक्षा झाल्यानंतर लोक माझ्यावर शंका घेत आहेत, पण हे सगळं हास्यास्पद आहे, असं ती सांगते.

तिच्यावर टीका करण्यात महिला पुढं होत्या आणि हे सगळं माध्यमांमुळे घडल्याचं ती सांगते.

"माध्यमांनी कुणाला वादग्रस्त ठरवलं तर त्या व्यक्तीबद्दल अधिक शोधाशोध करतात. लोकांनी माझा तिरस्कार करावा आणि त्यांचा टीआरपी वाढावा, असाच उद्देश होता."

एलिंग म्हणते, "माझ्यासोबत असं काही घडेल आणि अशा परिस्थितीला तोंड द्यावं लागेल, असा मी कधीच विचार केलेला नव्हता. इतकी वाईट परिस्थिती माझ्यावर येईल आणि माझेच लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, याची मी कधीच कल्पना केली नव्हती. "

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)