साडे 7 अब्ज रुपये खर्चून बनवलेला सिनेमा चीनमध्ये आपटला; सिनेविश्व हादरलं

असुरा Image copyright youtube/asurafilmofficial

चीनच्या इतिहासातील सर्वाधिक बजेट लावून बनवण्यात आलेला सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला. थिएटरमधून हा सिनेमा उतरवण्यात आला असून त्याच्यात काही बदल करण्यात येणार आहेत. त्यानंतर तो पुन्हा रीलिज करण्यात येणार आहे.

चीनमध्ये तब्बल 766 कोटी रुपये (112 मिलियन डॉलर्स) खर्च करून असुरा नावाचा सिनेमा बनवण्यात आला होता. चीनमध्ये प्रसिद्ध असलेल्या असुरा या दंतकथेवर हा सिनेमा आधारित आहे. तगडी स्टारकास्ट आणि स्पेशल इफेक्टसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले पण वीकएंडला सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच्याकडे प्रेक्षकांनी साफ पाठ फिरवली.

वीकएंडला केवळ सुमारे 48 कोटी रुपयांची (7 दशलक्ष डॉलर) कमाई झाल्यानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट थिएटरमधून काढून घेण्याचा निर्णय घेतला.

चीनच्या चित्रपट निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या अलिबाबा पिक्चर्स, झेनजियान फिल्म स्टुडिओ आणि निंगशिया फिल्म ग्रुप यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

Image copyright youtube/asurafilmofficial

'असुरा' या चित्रपटाची कथा बौद्ध परंपरेवर आधारित आहे. एक मेंढपाळ आपल्या स्वर्गीय राज्याचा परकीय आक्रमणापासून बचाव करतो असं या दंतकथेचं कथानक आहे.

सिनेमा रीलिज होण्यापूर्वी चीनच्या सरकारी माध्यमांनी सिनेमाचं खूप कौतुक केलं होतं. त्याचा फायदा सिनेमाला मिळालाच नाही.

गेम ऑफ थ्रोन्स किंवा लॉर्ड ऑफ द रिंग्ज यांच्यासारखा चित्रपट बनवण्याचा निर्मात्यांचा विचार होता. चीनमध्ये हॉलीवुडचे चित्रपट चांगले चालतात. जर चीनच्याच कथा घेऊन चित्रपट काढला तर इथल्या तंत्रज्ञांचा, कलाकारांचा आत्मविश्वास वाढेल असं आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही हा चित्रपट तयार केला, असं निंगशियानं म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)