ट्रंप म्हणतात, मी चुकून चुकीचं बोललो : अमेरिकन निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप

ट्रंप, पुतीन Image copyright AFP

2016मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियानं हस्तक्षेप केल्याचा FBIचा निष्कर्ष मान्य असल्याचं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, सोमवारी त्यांनी अमेरिकेतील निवडणुकीत रशियाला हस्तक्षेप करण्याचं काही कारण नव्हतं असं स्पष्टपणे म्हटलं होतं.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर फिनलंडला येथे झालेल्या शिखर परिषदेच्या दरम्यान अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या (FBI) विरोधात ट्रंप यांनी विधान केलं होतं.

सोमवारी आपल्या बोलण्यात चूक झाल्याचं ट्रंप यांनी मान्य केलं. रशियानं हस्तक्षेप केला आहे, यावर विश्वास न ठेवण्याचं काहीच कारण दिसत नाही, असं आपल्याला म्हणायचं होतं, असा खुलासा त्यांनी केला आहे.

पुतीन यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर त्यांनी केलेल्या मूळ विधानामुळे ट्रंप यांच्यावर टीकेचे मोहोळ उठले होते.

ट्रंप यांच्या काही सहकाऱ्यांनीही त्यांना या विषयावरची भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं होतं.

ताज्या खुलाशात ट्रंप यांनी, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवर पूर्ण विश्वास असल्याचंही म्हटलं आहे.

ते तेव्हा काय म्हणाले?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी 2016 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याच्या FBIच्या दाव्याविरोधात पुतिन यांची बाजू उचलून धरली होती.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबरोबर फिनलंडला झालेल्या शिखर परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना ट्रंप यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या (FBI) विरोधात विधान केलं होतं.

व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार,

पत्रकार: राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी 2016च्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्था म्हणतात की त्यांनी (रशिया) हस्तक्षेप केला. माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की, सर, आपण कोणावर विश्वास ठेवता?

Image copyright AFP

ट्रंप: माझे अधिकारी म्हणतात, त्यांना रशियाचा संबंध आहे असं वाटतं. माझी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर चर्चा झाली. ते नाही म्हणाले. मला असं वाटतं की, तसा काही संबंध असेल असं काही कारण मला दिसत नाही.

.... आता ते म्हणतात!

पत्रकार परिषदेचा सगळा वृत्तांत मी वाचला. त्यानंतर काही गोष्टींचं स्पष्टीकरण करावसं वाटतं, असं ट्रंप म्हणाले.

"एका महत्त्वाच्या विधानात, मी 'नाही' असं म्हटलं होतं. प्रत्यक्षात मला 'का नाही' किंवा रशिया का असणार नाही, असं म्हणायचं होतं," असा खुलासा ट्रंप यांनी केला.

"रशियानं निवडणुकांत हस्तक्षेप केला होता या गुप्तचरांनी काढलेल्या निष्कर्षाशी मी पूर्णत: सहमत आहे. आणखी इतरांचाही हस्तक्षेप असू शकतो,"असंही ट्रंप म्हणाले आहेत.

वाद का?

ट्रंप यांच्या रशियाची बाजू उचलून धरणाऱ्या भूमिकेवर अमेरिकेत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

अमेरिकेच्या सिनेटचे सभापती पॉल रायन म्हणाले, "रशिया आपलं मित्रराष्ट्र नाही हे ट्रंप यांनी लक्षात ठेवावं."

"रशिया आणि अमेरिका यांचे नैतिक पातळीवर कुठेही विचार जुळत नाही. हे आमच्या मूळ तत्त्वांच्या विरुद्ध आहे," असंही ते म्हणाले.

रिपब्लिक पक्षाचे नेते जॉन मॅकन म्हणाले की, "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची ही निराशाजनक कामगिरी आहे."

रिपब्लिकन पक्षाचे नेते लिंडसे ग्रॅहम हे सिनेट आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीचे सदस्य आहेत. त्यांनी एका ट्वीटमध्ये "2016च्या निवडणुकीबाबत रशियाला जाब विचारण्याची एक संधी गमावली", असं लिहिलं.

डेमॉक्रॅटिक पक्षाचे नेते चक शुमर यांनी लागोपाठ केलेल्या ट्वीट्समध्ये म्हणाले, "यामुळे आमच्या स्पर्धकांची ताकद वाढली आहे आणि त्याचवेळी आमच्या आणि मित्रपक्षांच्या संरक्षण यंत्रणा दुर्बळ करण्याचा हा प्रकार आहे."

जे नुकसान व्हायचं ते तर झालंच....

बीबीसीचे वॉशिग्टंनमधील प्रतिनिधी अँथनी झुर्कर म्हणतात, ट्रंप यांचा विचित्र रूपकांवर विश्वास आहे का? कारण त्यांनी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवर विश्वास व्यक्त केला आणि व्हाईट हाऊसमधल्या त्या खोलीतले लाईट काही काळ गेले.

लाईट आल्यावर, अंधाराचा उल्लेख करत ट्रंप म्हणाले, "हेलसिंकीतल्या परिषदेनंतर एका दिवसात त्यांच्या अध्यक्षपदाभोवती निर्माण झालेल्या वादळामुळे मी अंधारातच होतो. ते विधान ही एक चूकच होती."

अर्थात, ट्रंप यांच्या विधानामुळे जे नुकसान व्हायचं ते झालेलंच आहे. आता व्हाईट हाऊसमध्ये ट्रंप यांनी कितीही पत्रकं काढली, तरी एका मोठ्या व्यासपीठावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या शेजारी उभे असताना ट्रंप गोंधळले हे सगळ्या जगानं पाहिलं.. ती वस्तुस्थिती कशी बदलणार?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)