'पाकिस्तान निवडणुकीत इम्रान खान जिंकावा म्हणून लष्कर ढवळाढवळ करतंय'

पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान

पाकिस्तानच्या निवडणुकीत सुरक्षा दलांचा हस्तक्षेप सुरू असून इम्रान खान आणि त्याचा PTI या पक्षाला झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप 'डॉन' वृत्त समूहाचे CEO हमीद हारून यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत केला.

आठवड्यावर आलेल्या पाकिस्तान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातलं मोठा वृत्त समूह असलेल्या 'डॉन'च्या प्रमुखांनी बीबीसीला दिेलेल्या या मुलाखतीनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.

हारून आणि त्यांचं वृत्तपत्र हे माजी पंतप्रधान आणि इम्रान खान यांचे विरोधक नवाझ शरीफ यांच्या बाजूनं झुकलेलं असल्याचं म्हटलं जातं असं बीबीसीच्या 'HARDtalk' या शोमध्ये हारून यांना विचारण्यात आलं. हरून यांनी आरोप केले मात्र त्यासाठी लष्कराच्या विरोधात पुरेसे पुरावे दिले नसल्याची टीका करण्यात आली.

पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉनसह अनेक वृत्तपत्रांना सेन्सॉरशिप आणि धाकदपटशाचा फटका बसला आहे.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

पाकिस्तानी लष्कर इम्रान खानला पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे.

निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं वातावरण हिंसाचार आणि राजकीय वादांमुळे आणखी गढूळ होत आहे.

सोमवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत, ऑल पाकिस्तान न्यूजपेपर्स सोसायटीचे अध्यक्ष असलेल्या हारून यांनी प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर आजवर कधीही नव्हता एवढा हल्ला शक्तिशाली लष्करानं केला असल्याचा आरोप केला.

'HARDtalk'चे सादरकर्ते स्टीफन सॅकर यांच्याशी बोलताना, 'सरकार अंतर्गत सत्ताकेंद्र' काही ठराविक उमेदवारांना मदत करत असल्याचं हारून यांनी सांगितलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असा दावा इतर राजकीय निरीक्षकांनीही केला आहे.

फोटो कॅप्शन,

पाकिस्तानच्या डॉन वृत्त समूहाचे CEO हमीद हारून

पाकिस्तानला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्करानं अनेकदा राजकारणात ढवळाढवळ केली आहे. त्यातून पाकिस्तानमध्ये नागरी आणि लष्करी सत्ता आलटून पालटून आलेली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणुकीत आपला कोणत्याही प्रकारचा सहभाग नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलं आहे.

"त्या सत्ताकेंद्रांच्या तालावर नाचू शकतील असे दुसऱ्या फळीतले नेते आणि आघाड्या यांना आताच्या घडीला मदत केली जात आहे, असं मला वाटतं," असं हारून म्हणाले.

फोटो कॅप्शन,

बीबीसीच्या हार्ड टॉक कार्यक्रमात बोलताना हमीद हारून

तुमचा निर्देश इम्रान खान आणि त्यांचा पक्ष यांच्याकडे आहे का, असं विचारल्यावर ते म्हणाले, "काही वेळा सुरक्षा दलांकडचं इम्रानचं मूल्य वाढलेलं दिसतं. कधी कधी त्यांच्या पक्षातल्या लोकांचंही याबाबत नाव घेतलं जातं."

परंतु, असा आरोप करताना आपल्याकडे काही ठोस पुरावे आहेत का, असं विचारताच, हारून म्हणाले, "पाकिस्तानात सध्या पुरावे हवे असतील तर ते संदर्भानं शोधावे लागतील. मानवी हक्क संघटनांचं काम, राजकीय विश्लेषकांची निरीक्षणं यांच्यातून तो मिळू शकेल."

"मी सत्तेच्या विरोधात नव्हे तर, सत्तेच्या बाजूने माध्यमांशी निगडित बोलतो आहे. लोकशाहीतल्या सर्वसामान्य संस्था कार्यरत राहाव्यात, यासाठीच माझा प्रयत्न सुरू आहे," असंही हारून यांनी स्पष्ट केलं.

इम्रान खान यांनी या मुलाखतीनंतर ट्विवरवर प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या 'पक्षाबद्दल असलेला डॉनचा पूर्वग्रह' समोर आल्याचं म्हटलं.

तर काहींनी हारून यांनी ठोस पुरावे द्यायला हवे होते, अशी भूमिका घेतली.

तसंच, काही पत्रकार आणि सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱ्यांनी 'डॉन'ची पाठराखण केली. हारून यांनी स्वत:ला अडचणीत टाकल्याचंही काहींनी म्हटलं आहे.

याच मुलाखती, हारून यांनी डॉनसह काही वर्तमानपत्रांचं वितरण थांबवण्यात आल्याचं तसंच काही पत्रकारांवर स्वयंघोषित सेन्सॉरशिप लादल्याची माहिती दिली.

डॉननं नवाझ शरीफ यांची पाठराखण केल्याचं म्हटलं जात असल्याचं स्टीफन यांनी लक्षात आणून दिल्यावर हारून यांनी ही डॉनच्या विरोधातली पद्धतशीर बदनामी मोहीम असल्याचं सांगितलं.

"जे आपल्या मार्गात येतील त्यांच्या मागे लागायचं," असंच पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेचं काम असल्याचंही ते म्हणाले.

"डॉननं नागरी आणि लष्करी नात्यातल्या त्रुटी दाखवल्या. डॉन हे माध्यम आहे आणि (बदनामीची मोहीम) म्हणजे त्या माध्यमालाच लक्ष्य करण्याचा प्रकार आहे," असंही हारून म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)