टाईम मशीनने खरंच भूतकाळ किंवा भविष्यकाळात जाणं शक्य होणार?

विज्ञान, तंत्रज्ञान,

फोटो स्रोत, Alamy

फोटो कॅप्शन,

टाईम मशीनने खरंच काळात प्रवास करणं शक्य आहे का?

प्रत्येक सेकंदागणिक पुढे पुढे सरकणारा काळ. या काळासोबत भ्रमंती करणं हे एखाद्या कल्पनाविष्काराचा भाग वाटत असेल. मात्र कदाचित हे सत्यात येऊ शकेल, असा विश्वास काही भौतिकशास्त्रज्ञांना वाटत आहे.

काळ अर्थात वेळ म्हणजे विज्ञानाचा अविभाज्य भाग. या वेळेशी निगडीत असलेली कल्पना सत्यात उतरवण्यासाठी ज्या सर्वाधिक आश्वासक संकल्पना आज आहेत- त्याचा बीबीसी हॉरिझॉननं घेतलेला हा वेध.

रॉन मॅलेट यांचे एक स्वप्न आहे: त्यांना वेळेबरोबर भ्रमंती करायची आहे.

हे फक्त स्वप्नरंजन नाही - कारण मॅलेट भौतिकशास्त्राचे नमांकित प्राध्यापक आहेत. "एखाद्या विषयाबाबत आवड असलेला, त्याचा ध्यास असलेला मी एक सामान्य माणूस आहे, असा स्वतःबद्दल मी विचार करतो. आणि हाच ध्यास वेळेसोबतची भ्रमंती सत्यात येण्याची शक्यता आहे," असे ते सांगतात.

प्रा. मॅलेट यांना उर्वरित आयुष्यात टाईम मशीन बनवायचे आहे. ते सांगतात, या त्यांच्या ध्यासाची पाळंमुळं त्यांच्या आयुष्यात लहानपणीच घडलेल्या दुःखद घटनांमध्ये दडलेली आहेत.

मॅलेट यांचे वडील, सिगरेटचे शौकीन, त्यांचं वयाच्या 33 व्या वर्षीच हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. तेव्हा प्रा. मॅलेट फक्त 10 वर्षांचे होते.

कोवळ्या मनावर आघात झाल्यानं ते सैरभैर झाले. आयुष्यात आलेल्या दुःखाचा विसर पाडण्यासाठी त्यांनी स्वतःला पुस्तकांच्या जगात ढकललं.

"या घटनेच्या साधारण वर्षभरानंतर, मी 11 वर्षांचा असेन, एक पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि त्यानं माझं जग, माझ्या जगण्याची दिशा सारंच बदलून टाकलं. ते पुस्तक होतं एच.जी. वेल्स यांचे 'द टाइम मशीन'," कनेक्टीकट विद्यापीठात भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या मॅलेट यांनी बीबीसी हॉरिझॉनच्या कार्यक्रमात ही माहिती दिली.

"पुस्तकाच्या मुखपृष्ठानं माझं लक्ष वेधून घेतले. त्यात लिहलं होतं, 'काळ अथवा वेळ म्हणजे फक्त एक निर्वात पोकळी आहे, वैज्ञानिकांना हे चांगलंच माहिती आहे. ही निर्वात पोकळी असल्यानं आपण वेळेच्या मागे-पुढे असं भ्रमण करू शकतो. अगदी तसंच जसं आपण अंतराळात करतो. मी हे वाचले आणि 'हे चमत्कारिक आहे.' अशी आपसूकच प्रतिक्रिया माझ्याकडून आली."

"मला वाटलं जर मी टाईम मशीन बनवू शकलो, तर मी भूतकाळात प्रत्यक्ष जाऊ शकेन आणि माझ्या वडिलांना पुन्हा पाहू शकेन. कदाचित त्यांचा जीवही वाचवू शकेन आणि सगळं बदलून टाकू शकेन," प्रा. मॅलेट अधिक विस्तारानं सांगू लागतात.

वेळेत भ्रमण करणं कदाचित अशक्य वाटू शकेल, पण यासारख्या अनेक नैसर्गिक चमत्कारांचा उलगडा वैज्ञानिक करत आहेत. त्यामुळे कोण जाणे कदाचित मॅलेट यांचंही स्वप्न सत्यात येऊ शकेल.

फोटो कॅप्शन,

रॉन मॅलेट

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

अवकाशाच्या त्रिमिती अर्थात थ्री डायमेन्शन्स या काळाशी निगडीत असल्या पाहिजेत, असा विचार अल्बर्ट आइनस्टाइननं केला होता. या शक्यतेनं चौथ्या मितीचा जन्म झाला. या प्रणालीला त्यानं स्पेस-टाईम असं नाव दिलं आणि विश्वाचं जे मॉडेल आपण आज अभ्यासासाठी वापरतो ते हेच आहे.

मात्र, हा स्पेस-टाईम दुमडणे शक्य आहे. त्यामुळे दोन दूरच्या ठिकाणांना जोडणारा शॉर्टकट तयार होईल, असाही विचार आइनस्टाइनने केला होता.

या स्थितीला त्यानं वॉर्महोल असं नाव दिलं. आणि दोन्ही बाजूला दोन टोक असणारा एखादा बोगदा, ज्याचे प्रत्येक बिंदू स्पेस-टाईममध्ये वेगळ्या ठिकाणी अस्तित्वात असते, हे डोळ्यासमोर आणून त्याची कल्पना आपण करू शकतो.

कदाचित निसर्गतः आकाशगंगेत वॉर्महोल्स अस्तित्वातही असू शकतील; खरं तर रशियातले वैज्ञानिक रेडिओ टेलिस्कोपच्या साहाय्यानं त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण वेळेत भ्रमण करण्यासाठी वॉर्महोलचा वापर करणं असं सहजशक्य नाही.

सर्वांत नजीकची वेळ जरी शोधली तर ती कित्येक प्रकाशवर्षांच्या अंतरावरची असेल. आणि समजा तुम्ही काळाच्या फूटपट्टीवरपच्या त्या ठिकाणी जरी पोहोचलात आणि या भ्रमणात तग धरून जिवंत राहू शकलात तरी तुमचा हा प्रवास कुठे संपेल याची काय खात्री?

पण काही भौतिकशास्त्रज्ञांनी असं अनुमान काढलं आहे की भविष्यात काहीतरी करून हे वॉर्महोल्स शोधण्यात, त्यांची मांडणी करण्यात आपल्याला यश येईल, मात्र कसं, याचं उत्तर त्यांच्याकडे आता नाही.

हे वॉर्महोल्स एकमेकांवर आदळत असले पाहिजेत, त्यांच्याआत जे काही असेल त्याचा चक्काचूर करत असावेत, असा अंदाज भौतिकशास्त्रज्ञ करतात. म्हणून जर टाईम मशीन प्रत्यक्षात आलं, तर आपल्याला त्याचं हे गैरसोयीचं लक्षण रोखण्याचा मार्ग प्राधान्यानं शोधला पाहिजे.

गडद ऊर्जा अर्थात डार्क एनर्जी या गूढ स्थितीमुळे कदाचित यावर उपाय मिळू शकेल. 1990 साली, अंतराळ वैज्ञानिकांच्या एक बाब लक्षात आली की विश्वाचा विस्तार कमी-कमी होत जाण्याऐवजी अधिक वेगाने होतो आहे. वास्तविक विश्वाच्या विस्ताराचा वेग कमी होत असल्याचं तोपर्यंत गृहित धरलं जात होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

द टाईम मशीन नावाच्या चित्रपटातील दृश्य.

"त्यामुळे गुरूत्वाकर्षणाच्या शक्तीच्या विरूद्ध बाजूनं कार्यरत असेल अशी एखादी शक्ती अस्तित्वात असावी. जी गुरुत्वाकर्षणाच्या बाजूनं नाही तर विरुद्ध काम करत आहे. हे नेमकं काय आहे याची आम्हाला कल्पना नाही, पण संपूर्ण विश्वाचा बहुतांश भाग या शक्तीनं भरलेला आहे. आम्ही तिला गडद ऊर्जा असं म्हणतो," असं प्रा. तमारा डेव्हिस सांगतात. त्या ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलॅंड विद्यापीठात खगोलशास्त्राज्ञ आहेत.

मात्र काळामध्ये भ्रमण करण्यासाठी वॉर्महोलची संकल्पना तरच कार्यात्वित होऊ शकेल जर वॉर्महोलचं कोणत्याही एका बाजूचं तोंड शक्य तितकं अधिक उघडं राहू शकेल, जेणेकरून त्याच्या आतून एखादी गोष्ट प्रवास करू शकेल. त्यासाठी ज्याला आपण ऋण ऊर्जा (निगेटिव्ह एनर्जी) असं म्हणू त्याची गरज आहे. जी प्रत्यक्षात आपल्या दैनंदीन जगण्याचा भाग नाही.

मात्र गडद ऊर्जा जी संपूर्ण विश्वात झिरपली आहे, अगदी चपखल असं तिचं समायोजन आहे- ही ऊर्जा काय आहे हे जर आपण शोधू शकलो, तर कदाचित आपण वॉर्महोलचं तोंड हे एखादी गोष्ट त्यातून आरपार जावी आणि पलीकडून बाहेरही पडावी इतका वेळ उघडं ठेवू शकतो.

"आपण वॉर्महोल बनवू शकतो की नाही हे आपल्याला माहिती नाही, ते तांत्रिकदृष्ट्या आपल्या क्षमतेच्या कक्षेत आहे किंवा नाही याची आपल्याला कल्पना नाही. मात्र भविष्यातल्या मानवी संस्कृती काय करू शकतील कुणास ठाऊक? नाही का," प्रा. डेव्हिस सांगतात.

"तंत्रज्ञान इतक्या वेगानं प्रगती करत आहे की कदाचित थेट अवकाश आणि वेळ याच गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली येतील."

भौतिकशास्त्राच्या एका शक्याशक्यतेच्या टोकावर वॉर्महोल्सचं अस्तित्त्व आहे. ज्यामुळे काळाबरोबर भ्रमण करण्याच्या विचारांना, त्या दृष्टिकोनाला एक दिशा मिळत आहे. पण रॉन मॅलेट यांच्याकडे आणखी एक दृष्टिकोन आहे.

त्यांनी प्रत्यक्ष टाईम मशीन तयार करण्याचा आराखडा बनवला आहे आणि याबाबतची त्यांची संकल्पना त्यांनी 11व्या वर्षी वाचलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनच्या समिकरणांवरून प्रेरीत आहे.

फोटो कॅप्शन,

मॅलेट यांना वडिलांमुळे टाइम मशीनची गोडी लागली.

प्रा. मॅलेट यांनी एक टेबलटॉप उपकरण बनवलं आहे. प्रत्यक्षातलं, कार्यान्वित असलेलं टाईम मशीन बनवण्यासाठी ज्या नियमांचा आधार घ्यावा लागेल त्याचीच सिद्धता या उपकरणाद्वारे त्यांनी केली आहे.

पहिल्यांदा, लेझरच्या मदतीनं गोलाकार प्रकाशझोत तयार करुन घेतला. त्यानंतर त्या लेझर वर्तुळातील पोकळी पिरगाळल्यासारखी भासली पाहिजे. कॉफीचा कप ढवळताना दिसतो अगदी तशा प्रकारे. कनेक्टीकट विद्यापीठाचे प्राध्यापक अधिक उदाहरण देऊन स्पष्टीकरण देतात.

कारण अवकाश आणि वेळ हे जोडलेले आहेत, मग अवकाशाला गुंडाळलं तर वेळही गोलाकार पिळला गेला पाहिजे. प्रा. मॅलेट यांच्या सैद्धांतिक प्रयोगानं ते दाखवून दिलं आहे, एका लहानशा अवकाशातून पुरेसा तीव्र लेझर जर पार जाऊ दिला, तर सामान्य एकरेषीय कालरेषा, ज्यात आपण सगळे वावरत आहोत, त्या कालरेषेला बदलणं शक्य असलं पाहिजे.

"जर हे अवकाश पुरेशा तीव्रतेनं बदलण्याजोगी परिस्थिती निर्माण केली, तर ही एकरेषीय कालरेषा पिरगळल्यासारखी होऊन त्याचा एक लूप तयार होईल. मग जर काळ अचानक बदलून त्याचा लूप तयार केला तर हा लूप आपल्याला त्यातून भ्रमण करण्याची, भूतकाळात डोकावण्याची शक्यता प्रदान करू शकते," असं प्रा. मॅलेट सांगतात.

मात्र, हे प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी, या संकल्पनेसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज लागेल आणि प्रत्येक गोष्ट सूक्ष्म पातळीवर आक्रसली जाण्याची सोय होऊ शकेल असा मार्गही लागेल.

मात्र जरी आपण टाईम मशीन बनवलं, तरी त्याचा यशस्वीपणे वापर करण्यासाठी आपल्याला काळ या संकल्पनेचं तपशीलवार ज्ञान असणं अत्यावश्यक असेल.

फोटो कॅप्शन,

प्राध्यापक तमारा डेव्हिस यांनी टाईम मशीनसंदर्भात काम केलं आहे.

विश्व म्हणजे स्पेस-टाईमचा एक स्थिर, अचल असा हिस्सा आहे, अशी एक सर्वसाधारण धारणा आहे. या तुकड्याला 'ब्लॉक' असं संबोधलं गेलं आहे, आइनस्टाइनच्या समीकरणांवरून ही कल्पना उदयाला आली आहे.

"या मॉडेलविषयी महत्त्वाची बाब म्हणजे, भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तीनही स्थिती तितक्याच, समप्रमाणात खऱ्या आहेत ही यामागे असलेली कल्पना. या आधारावर आपण जवळपास सगळ्या गोष्टी ज्या पूर्वी अस्तित्वात होत्या, आता आहेत आणि भविष्यात राहतील या सगळ्या स्पेस-टाईमचा कुठेतरी भाग आहेत असा विचार करू शकतो," असं स्पष्टीकरण सिडनी विद्यापीठातले 'सेंटर फॉर टाइम' या विभागाचे संचालक डॉ. क्रीस्ती मीलर यांनी दिलं आहे.

"भूतकाळात कुठेतरी डायनासॉर त्यांच्या खास पद्धतीनं धुमाकूळ घालत असतील, आता या क्षणी आपण इथं आहोत आणि आजचं भविष्यसुद्धा कुठेतरी या स्पेस-टाईमच्या पोकळीचा भाग आहे."

ब्लॉक मॉडेलच्या रचनेचा अंदाज घेण्याचा एक मार्ग म्हणजे काळाच्या संदर्भानं अस्तित्त्वात असलेल्या ठिकाणांचा विचार अवकाशात इतर अनेक ठिकाणं जशी अस्तित्वात आहेत त्याच धर्तीवर करणं हा आहे: "आपण आता सिडनीमध्ये आहोत, पण त्याचवेळी सिंगापूर आणि लंडनमध्येही काही लोक आहेत. त्या जागाही पूर्णपणे खऱ्या आहेत, फक्त आपण त्या ठिकाणी आता उपस्थित नाही," असं डॉ.मिलर सांगतात.

म्हणूनच काळात भ्रमण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे, कारण आता आपण कुठे आहोत त्या ठिकाणून आणखी एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या काळात थेट जा-ये करू शकतो.

मात्र तितकंच महत्त्वाचं म्हणजे, याचा अर्थ असाही होतो की भूत, वर्तमान आणि भविष्य हे आधीच ठरलेले आहेत, मग जर आपल्याला भूतकाळात भ्रमण करायचं असेल तर आपण तेथं पोहोचलो तरी त्यात फेरफार करू शकणार नाही.

एक उदाहरण पाहू- एखाद्याच्या आजोबांना आपण भूतकाळात जाऊन मारू शकणार नाही कारण भविष्यात त्यांच्या वारसदारांचं अस्तित्व आपण रोखू शकणार नाही.

ब्लॉक मॉडेल आपली दैनंदिन आयुष्यातली काळ ही संकल्पना निव्वळ एक आभास असल्याचं सांगते, वास्तवाचं भान येण्यासाठी मानवानं केलेल्या सूसूत्रीकरणाचा एक मार्ग. मात्र कॅनडाच्या प्रीमियर इन्सिट्यूट इन वॉटरलूचे प्राध्यापक ली स्मोलीन या तर्काशी असहमती दर्शवतात.

काळाचा टप्पा वा पल्ला हा वास्तव आणि मूलभूत स्थिति आहे, असा त्यांचा विश्वास आहे.

"काळात भ्रमण करणं कदाचित अशक्य आहे," असं ते म्हणतात.

त्यांच्यामते वास्तव काय आहे तर आत्ताचा क्षण. भूतकाळ फक्त आठवणी किंवा त्याबाबतच्या वर्तमानात असलेल्या नोंदी यांच्यापुरतंच सत्य आहे आणि भविष्य तर अजून उदयाला यायचं आहे. त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रश्नच नाही."

त्यांचे सहकारी प्रिमियर इन्सिट्यूटचे संचालक असलेले प्रा. नील टूरॉक वेगळंच मत मांडतात. ते म्हणतात क्वाँटम भौतिकशास्त्राच्या आगळ्या-वेगळ्या जगाला या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड होईल.

या भौतिकशास्त्राचा आवाका अगदी सूक्ष्म स्तरावर अवतरतो, जिथं आपण शाळेच्या पुस्तकात शिकलेले भौतिकशास्त्राचे सर्वसाधारण नियम लागू होत नाहीत. उदा- क्वाँटमच्या सिद्धांतांमध्ये एखादा पदार्थाचा कण एकाचवेळी अनेक ठिकाणी असू शकतो.

"आपण कालरेषेवर मागे, भूतकाळात जाऊन भ्रमंती करू शकतो अशी थोडी शक्यता आहे असं मला वाटतं," असा आशावाद ते वर्तवतात.

"क्वाँटम भौतिकशास्त्रात काहीही अशक्य नाही- पदार्थकण भिंतीतूत आरपार प्रवास करू शकतात!"

प्रा. टुरॉक अधिक स्पष्टीकरण देतात- ते म्हणतात, काळसोबत भ्रमण करणं ही फार दूरवरची आशा आहे कारण कुणाकडेही आता याक्षणी भूतकाळात कसं जायचं याबाबतची संभाव्य संकल्पना तयार नाही. अर्थात ही काळ्या दगडावरची रेघ नाही. कारण एखादा कुणी विद्वान येईल आणि नियमांना अपवाद कसे शोधायचे हे शिकवू शकेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)