ट्रंप यांचं पुतिन यांना अमेरिका भेटीचं निमंत्रण

डोनाल्ड ट्रंप आणि व्लादिमिर पुतिन

फोटो स्रोत, Reuters

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांना वर्ष अखेरीस अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं आहे, अशी माहिती ट्रंप यांच्या प्रेस सेक्रेटरी सारा सँडर्स यांनी दिली.

पुतिन यांनी भेटीसाठी यावं यासाठीची चर्चा ही आधीपासूनच सुरू होती, असं ट्वीट सँडर्स यांनी केलं आहे.

अमेरिकी नागरिकांना रशियात प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी असा प्रस्ताव पुतिन यांनी ट्रंप यांना दिला होता. मात्र, हा प्रस्ताव ट्रंप यांनी फेटाळून लावला होता.

या दोन्ही नेत्यांमध्ये फिनलंडची राजधानी हेलसिंकी इथे गेल्या सोमवारी बैठक झाली होती. मात्र, या बैठकीतले फार थोडेच मुद्दे बाहेर आले आहेत.

मात्र, या दुसऱ्या भेटीबाबत रशियाकडून अजूनही कोणतंही अधिकृत उत्तर आलेलं नाही.

हेलसिंकी इथे झालेल्या परिषदेत ट्रंप यांनी अमेरिकन निवडणुकांबाबत केलेल्या वक्तव्यावर पुन्हा विरोधी मत व्यक्त केल्यानं वाद उफाळून आला आहे.

परंतु, गुरुवारी ट्रंप यांनी हेलसिंकी परिषदेत खूप मोठं यश मिळाल्याचं जाहीर करत ते पुन्हा दुसऱ्या बैठकीच्या प्रतीक्षेत आहेत, असं ट्वीट केली.

USच्या नॅशनल इंटिलिजन्सचे संचालक डॅन कोट्स यांनी एका मुलाखती दरम्यान या भेटीचं सूतोवाच केलं. अॅस्पेन सिक्युरिटी फोरमच्या कोलोरॅडो इथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी याबाबत माहिती दिली.

"ही भेट खूपच खास ठरेल," असं ते सूचकपणे यावेळी म्हणाले. तसंच, हेलसिंकी इथे झालेल्या बैठकीत ट्रंप आणि पुतिन यांच्यात नेमकी कोणती चर्चा झाली याबाबतचा तपशील त्यांच्याकडेही नसल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत केवळ या दोन्ही नेत्यांच्या दुभाषांकडेच ही माहिती उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले.

अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक मुद्द्यांवर अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. 2016मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकांमध्ये रशियानं हस्तक्षेप केल्याच्या आरोपांनंतर या दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये कटुता अधिकच वाढली आहे.

व्हीडिओ कॅप्शन,

पाहा व्हीडिओ : 'रशियाशी दुरावलेले संबंध हा मूर्खपणाच'

या पार्श्वभूमीवर गेल्या सोमवारी ट्रंप आणि पुतिन यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. पण, या परिषदेचा तपशील बाहेर न आल्यानं आणि ट्रंप यांनी बैठकीतील जाहीर वक्तव्याला छेद देणारी वक्तव्य केल्यानं त्यांच्या भेटीची उत्सुकता वाढली आहे.

USच्या सिनेटमधले डेमोक्रॅटिक नेते चक शूमर हे या भेटीबाबत म्हणाले की, "ट्रंप आणि पुतिन यांच्यात नेमका काय संवाद झाला तो त्यांनी तत्काळ सांगावा. जोपर्यंत या भेटीचा तपशीला देशाला कळत नाही, तोवर ट्रंप यांनी पुतिन यांनी रशिया किंवा अमेरिका अशा कुठल्याही ठिकाणी भेटू नये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)