विक्रमी वनडे : पाकिस्तानची सलामीला 300 धावांची भागीदारी, झमनचं पहिलं द्विशतक

पाकिस्तान, झिम्बाब्वे, वर्ल्ड रेकॉर्ड, क्रिकेट, खेळ Image copyright Twitter
प्रतिमा मथळा फखर झमन आणि इमाम उल हक

फखर झमन आणि इमाम उल हक या पाकिस्तानच्या सलामी जोडीने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी 304 धावांची विक्रमी भागीदारी रचली. याआधी पहिल्या विकेटसाठीचा सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड 286 धावांचा होता, जो श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि उपुल थरंगा या जोडीच्या नावावर होता.

सोबतच या वनडे सामन्यात आणखी दोन विक्रम रचले गेले.

फखर पाकिस्तानतर्फे द्विशतक झळकावणारा पहिलावहिला खेळाडू ठरला. आणि सलामीच्या भागीदारीत फखर झमनच्या या द्विशतकाच्या बळावर पाकिस्तानने 399 धावांची मजल मारली. हा पाकिस्तानचा सर्वोच्च सांघिक स्कोअर आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा फखर झमन

झिम्बाब्वेच्या बुलावेयो शहरात होत असलेल्या या चौथ्या वनडेत 40व्या षटकात वेलिंग्टन मासाकाटझाच्या गोलंदाजीवर फखरने चौकार लगावला आणि या जोडीने नवा विक्रम रचला.

या आधीची विक्रमी भागीदारी जयसूर्या आणि थरंगा यांनी इंग्लंडविरुद्ध लीड्स केला होती.

फखरचा भागीदार इमाम उल हकने 122 चेंडूत 8 चौकारांसह 113 धावा केल्या. इमामचं वनडे क्रिकेटमधलं हे पहिलंच शतक आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा इमाम उल हक

दरम्यान ब्लेसिंग मुझाराबानीच्या गोलंदाजीवर चौकार खेचत फखर झमनने पाकिस्तानकडून पहिलंवहिलं वैयक्तिक वनडे द्विशतक झळकावलं. एकंदर वनडे क्रिकेटमधलं हे आठवं द्विशतक आहे.

त्याने 156 चेंडूत 24 चौकार आणि 5 षटकारांच्या साह्याने नाबाद 210 धावांची मॅरेथॉन खेळी केली.

पण पाकिस्तानला आजही 400चा जादुई आकडा गाठता आला नाही. पण टीमची यापूर्वीची 385 ही वनडे क्रिकेटमधली सर्वोच्च धावसंख्या ओलांडत त्यांनी आज 399 रन केले. आता झिम्बाब्वेला 400 धावांचं आवाहन आहे.

वनडे क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी
खेळाडू धावा संघ प्रतिस्पर्धी ठिकाण तारीख
झमन- इमाम उल हक 304 पाकिस्तान झिम्माब्वे बुलावेयो 20 जुलै 2018
थारंगा-जयसूर्या 286 श्रीलंका इंग्लंड लीड्स 1 जुलै 2006
वॉर्नर-हेड 284 ऑस्ट्रेलिया पाकिस्तान अॅडलेड 26 जानेवारी 2017
डीकॉक-अमला 282* दक्षिण आफ्रिका बांगलादेश किंबर्ले 15 ऑक्टोबर 2017
थारंगा-दिलशान 282 श्रीलंका झिम्बाब्वे पल्लेकल 10 मार्च 2011
खेळाडू धावा संघ प्रतिस्पर्धी ठिकाण तारीख
रोहित शर्मा 264 भारत श्रीलंका कोलकाता 13 नोव्हेंबर 2014
मार्टिन गप्तील 237 न्यूझीलंड वेस्ट इंडिज वेलिंग्टन 21 मार्च 2015
वीरेंद्र सेहवाग 219 भारत वेस्ट इंडिज इंदूर 8 डिसेंबर 2011
ख्रिस गेल 215 वेस्ट इंडिज झिम्बाब्वे कॅनबेरा 24 फेब्रुवारी 2015
फखर झमन 210* पाकिस्तान झिम्बाब्वे बुलावेयो 20 जुलै 2018
रोहित शर्मा 209 भारत ऑस्ट्रेलिया बेंगळुरू 2 नोव्हेंबर 2013
रोहित शर्मा 208* भारत श्रीलंका मोहाली 13 डिसेंबर 2017
सचिन तेंडुलकर 200* भारत दक्षिण आफ्रिका ग्वाल्हेर 24 फेब्रुवारी 2010

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)