Hug Day: मिठी म्हणजे मिठी असते आणि प्रत्येकालाच ती स्वीकारायची नसते

मिठी मारणं

मिठी या शब्दात किती मिठास आहे

नुसता उच्चारला तरी कृतीचा भास आहे असं म्हणतात.

मिठी मारणं किंवा हग करणं हे हल्ली अगदी सामान्य समजलं जातं. सलगी किंवा आपुलकी दाखवण्याचं मिठी हे उत्तम माध्यम आहे. खूप वर्षांनी एखादा मित्र किंवा मैत्रीण भेटल्यावर कडकडीत मिठी मारण्यासारखं सुख नाही. अवघड प्रसंगी आधार देण्यासाठी मिठीत घेतलं की मणामणाचं ओझं दूर होतं.

12 फेब्रुवारी 'व्हॅलेंटाईन वीक' मधला Hug Day किंवा 'मिठीचा दिवस' म्हणून ओळखला जातो. म्हणून तुमच्याआमच्यावरही असे अनेक हल्ले होऊ शकतात.

जसं जसं कार्पोरेट कल्चर भारतात वाढत चाललं आहे, तसं पाश्चात्यांकडे असणारे हस्तांदोलनासोबतच मिठी मारण्याचे संस्कारही रूळत आहेत. तुम्ही कोणत्या कॅटेगरीत मोडता? हस्तांदोलन करणाऱ्यांच्या की मिठी मारणाऱ्यांच्या की यापैकी कोणत्याच नाही?

आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी किंवा कधी खेळीमेळीचं मिठी मारणं ठीक असतं. त्यानं ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांमधला ताण हलका होतो असं तज्ज्ञांचं मतं आहे.

पण वेगवेगळ्या सर्व्हेतून हेही समोर आलंय की बऱ्याच जणांना ही अशी मिठी मारलेली आवडत नाही. अमेरिकेतल्या अन्न आणि खाद्यप्रक्रिया उद्योगात केलेल्या एका सर्व्हेत 25 टक्क्यांहून अधिक स्त्रियांनी सांगितलं की त्यांना मिठी मारल्यानंतर अवघडल्यासारखं वाटतं. बऱ्याच जणींना अशी मिठी मारलेलं आवडत नाही.

अमेरिकेतल्या जॉर्जियामधील केनसॉ विद्यापीठात मानववंशशास्त्राच्या सहायक प्राध्यापक असणाऱ्या डेबरा वॉलस्मिथ सांगतात की, "मिठी मारल्यानंतर कोणाला किती अवघडल्यासारखं वाटतं किंवा राग येतो हे त्या दोन व्यक्तींमधलं नातं आणि आवडी-निवडी यावर ठरतं."

"सगळ्यात कमी त्रासदायक मिठी म्हणजे एका हातानं मारलेली मिठी. यात दोन्ही व्यक्ती शेजारी-शेजारी उभ्या असतात एकमेकांच्या कमरेभोवती हात घालून मिठी मारतात."

"सर्वाधिक त्रासदायक म्हणजे गुदमरवून टाकणारी असते ती गळाभेट. कॉलेजमधले प्राध्यापक आणि माजी बॉस यांनी अशी कडकडून मिठी मारली की सगळ्यात जास्त अवघडल्यासारखं वाटतं."

कॅनडास्थित बिझनेस कोच कारा डेरिंगर सांगतात की, "कोण कोणाला कोणत्या परिस्थितीत मिठी मारत आहे यांच्या संदर्भावर ठरतं की ती मिठी त्रासदायक आहे की दिलासादायक."

त्या हेही मान्य करतात की, "मिठी मारणं हे भूसुरूंगापेक्षा कमी नाही. कधी त्याचा अनर्थ होईल सांगता येत नाही."

मिठी मारल्यानं नाती दृढ होतात हे कारा यांना पटतं. "तरीही लोकांनी काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं कारण अशा मिठीतून खूप जणांचे गैरसमज होताना पाहिले आहेत."

मिठी मारण्यापूर्वी समोरच्या माणसाच्या देहबोलीचं निरीक्षण करण्याचा सल्लाही कारा देतात.

"मी कोणाला भेटले आणि भेट संपवून निघताना त्या व्यक्तीला हात पुढे करताना पाहिलं तर कळतं की ही व्यक्ती हस्तांदोलन करण्याऱ्यातली आहे. मग मी त्या व्यक्तीला मिठी मारत नाही."

फोटो कॅप्शन,

मिठी मारण्यापूर्वी समोरच्या माणसाच्या देहबोलीचं निरीक्षण करा असा सल्ला कारा देतात

मिठी मारताना सामाजिक स्थान, संस्कृती आणि लिंग अशा अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. "शारीरिक स्पर्शाचे प्रत्येकाचे स्वतःचे असे नियम असतात. त्यांच्या सामाजिक जाणीवेवरही ते ठरतं. मी पहिल्याच भेटीत कोणाला मिठी मारत नाही," कारा पुढे सांगतात.

ट्रेसी स्मोलिंस्की यांच्या ऑफिसमध्ये एकमेकांना मिठी मारणं ही अगदीच सामान्य गोष्ट आहे.

"आमच्या ऑफिसमध्ये खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. आम्ही एकमेकांना कायम मिठी मारतो. कधी कधी गालावर किसही करतो. पण अनोळखी लोकांच्या बाबतीत मात्र आम्ही असं करत नाही," त्या सांगतात.

अनोळखी व्यक्तीच्या बाबतीत मिठी मारताना काळजी घ्यावी हा कॉमनसेन्स आहे. पण जर तुम्ही अशा ऑफिसमध्ये काम करत असाल जिथे मिठी मारणं सर्वसामान्य गोष्ट आहे पण तुम्हाला ते आवडत नाही?

प्रत्येकाला मिठी मारलेली आवडत नाही, भलेही त्यात वाईट उद्देश नसला तरी.

फोटो कॅप्शन,

समोरच्याची इच्छा नसताना मिठी मारणं टाळावं

कॅलिफोर्नियाच्या पोलीस दलात काम करणाऱ्या व्हिक्टोरिया झेटविक यांनी त्यांचे सीनिअर शेरिफ यांच्या विरोधात कोर्टात दाद मागितली.

व्हिक्टोरिया यांनी सांगितलं की, गेल्या बारा वर्षांत त्यांच्या बॉसने त्यांना शंभरहून अधिक वेळा मिठी मारली आहे. तीही त्यांची इच्छा नसताना. कोर्टानं म्हटलं की, त्या मिठ्यांमुळे ऑफिसमधलं वातावरण व्हिक्टोरियांसाठी 'प्रतिकूल' बनलं.

कॅनडात कामगार वकिल असलेले शॉन बर्नस्टाईन सल्ला देतात की, "ऑफिसमध्ये शक्यतो मिठ्या मारू नयेत. मिठ्यांचा अर्थ चुकीचा घेतला जाऊ शकतो. बऱ्याचदा ही कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक आहे असंही वाटू शकतं. त्यामुळे कारवाई होऊ शकते."

फोटो कॅप्शन,

जर व्दिधा मनस्थिती असेल तर कधीही मिठी न मारलेलीच बरी.

"मुख्य म्हणजे जर अधिकारपदावरच्या व्यक्तीने हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीला मनाविरुद्ध मिठी मारली तर त्याचे परिणाम गंभीर असू शकतात," असंही बर्नस्टाईन सांगतात.

कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक थांबवण्यासाठी विशाखा समितीसारखे उपाय कंपनीने योजावेत अशी अपेक्षा असते.

टोरांटोतल्या नॅपकिन मार्केटिंग मधल्या अदिना झायंटोझ नमूद करतात, "जर द्विधा मनस्थिती असेल तर कधीही मिठी न मारलेलीच बरी. कारण ऑफिसमधले मित्र खरे मित्र असतीलच असं नाही. कारण खरे मित्र कधीच तुमच्याविरूद्ध HR कडे तक्रार करत नाहीत."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)