पाकिस्तानच्या निवडणुकीत या तरुण चेहऱ्यांची आहे चर्चा

बिलावल Image copyright Getty Images

गेल्या सात दशकांपासून पाकिस्तानच्या राजकारणावर काही शक्तिशाली घराण्यांचं वर्चस्व आहे. या काळात पाकिस्तानच्या राजकारणात अनेक चढउतार आले. पण त्या घराण्यांचा पाकिस्तानच्या राजकारणावरचा प्रभाव कायम आहे.

पाकिस्तानच्या राजकारणाचं केंद्र देशातल्या काही प्रमुख घराण्यांच्याच भोवती राहिल्याचं मत 'दुनिया' या चॅनेललं व्यक्त केलं आहे. यावेळी देखील परिस्थिती फारशी वेगळं नाही.

पाकिस्तानमधल्या पाच राजकीय घराण्यातील तरुण मैदानात सर्व शक्तिनिशी उतरले आहेत. या तरुण रक्ताच्या नेत्यांची ओळख आपण करून घेऊया.

बिलावल भुत्तो झरदारी

पाकिस्तानच्या राजकारणात भुत्तो हे घराण्याला विशेष महत्त्व आहे. बिलावल भुत्तो झरदारी हे तीन ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहेत. ते पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक लढवत आहेत. 2016मध्ये त्यांनी पोटनिवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते.

बिलावल यांची आई बेनझीर भुत्तो यांनी पाकिस्तानचं पंतप्रधानपद दोनदा भूषवलं होतं. बिलावल यांचे वडील असिफ अली झरदारी हे 2008-2013 या काळात राष्ट्रपती होते. बिलावल हे 19व्या वर्षीच पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष झाले होते. बेनझीर यांची 2007मध्ये हत्या झाल्यानंतर त्यांच्याकडे पक्षाची सूत्रं आली होती.

2013मध्ये ते निवडणुकीला उभे राहिले नाहीत. निवडणुकीस उभे राहिल्यास तालिबानकडून त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता होती. पण यावेळी मात्र ते निवडणुकीत सहभागी झाले आहेत आणि प्रचाराची धुरादेखील त्यांच्याकडे आहे.

मरियम नवाझ शरीफ

पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवणाऱ्या महिलांची संख्या अत्यल्प आहे. मरियम नवाझ शरीफ या निवडणूक लढवणार होत्या. पण त्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दोषी आढळल्यानंतर त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवलं गेलं. त्या निवडणूक लढवणार नसल्या तरी त्यांची चर्चा माध्यमात आहे.

Image copyright Getty Images

मरियम यांच्याकडे त्यांचे पिता नवाझ शरीफ यांच्या राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जातं. भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळल्यानंतर 2017 सुप्रीम कोर्टानं नवाझ शरीफ यांना कोणत्याही सरकारी पदावर राहता येणार नाही असं घोषित केलं होतं.

मरियम या 2011मध्ये सक्रीय राजकारणात उतरल्या. 2013मध्ये त्या प्राइम मिनिस्टर युथ प्रोग्रॅमच्या प्रमुख बनल्या. या पदाचा वर्षभरानंतर त्यांनी राजीनामा दिला. पण पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ) या पक्षात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली.

विरोधकांवर टीका करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. पाकिस्तान तेहरीक ए इन्साफचे अध्यक्ष इमरान खान यांना मरियम यांनी लक्ष्य केलं होतं. नवाझ शरीफ यांचे एकेकाळचे जवळचे मित्र चौधरी निसार अली खान म्हणाले होते की, मरियम यांच्या बोलण्यामुळे पक्षावर नामुष्कीची वेळ येईल.

2016मध्ये मरियम यांचं नाव पनामा पेपर्समध्ये आलं होतं. त्यांनी आरोप फेटाळून लावले. पण 2018मध्ये त्यांना सुप्रीम कोर्टानं भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात सात वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यांचे वडील नवाझ शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठावली.

हमझा शाहबाझ

हमझा शाहबाझ हे नवाझ शरीफ यांचे पुतणे आणि मरियम यांचे चुलतभाऊ आहेत. शाहबाज शरीफ यांचे वडील पीएमएल पक्षाचे अध्यक्ष आहेत. हमझा यांनी 2013ची सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. लाहोरमध्ये एकूण 14 मतदारसंघ आहेत. त्यापैकी एका मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील.

Image copyright Getty Images

हमझा हे उद्योजक आहेत. न्यूज इंटरनॅशनल यांनी त्यांना 'किंग ऑफ पोल्ट्री फीड' (कोंबड्यासाठी खाद्य) म्हटलं आहे. त्यांची एकूण संपत्ती 41 कोटी पाकिस्तानी रुपये इतकी आहे. त्यांच्या वडिलांपेक्षा त्यांची संपत्ती अधिक असल्याचं पाकिस्तानी माध्यमांचं म्हणणं आहे.

पनामा पेपर प्रकरणानंतर शरीफ कुटुंबातल्या सदस्यांमधील दरी वाढत असल्याची चर्चा पाकिस्तानात होती. पण हमझा यांनी तसं काहीही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. "शरीफ कुटुंबीयांना याहून अधिक खडतर काळाचा सामना करावा लागला आहे. आमचे समर्थक नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांनी आमच्या कुटुंबासाठी त्याग केला आहे," असं हमझा म्हणाले.

तलहा सईद

जमात-उद-दावाचे संस्थापक हाफिज सईद यांचे पुत्र तलहा सईद हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून 'अल्लाह-ओ-अकबर तहरीक' या पक्षातर्फे ते निवडणूक लढवणार आहेत.

हाफिज सईद यांच्यावर मुंबई हल्ल्याची आखणी केल्याचा आरोप आहे. नोव्हेंबर 2008मध्ये झालेल्या हल्ल्यात 174 जण ठार झाले होते. अमेरिकेने सईद पिता-पुत्रांना दहशतवादी घोषित केलं आहे.

जिहादची पार्श्वभूमी असलेले लोक आता राजकारणात उतरत आहेत. यापूर्वी देखील असं झालं आहे. आपल्या मुलांना राजकारणात आणून मुख्य प्रवाहात आणण्याचा ट्रेंड सुरू असल्याचं उर्दू दैनिक 'औसाफ'नं म्हटलं आहे.

ऐमल वली खान

खैबर पख्तुनवा प्रांतातून आवामी नॅशनल पार्टीतर्फे (ANP) ऐमल वली खान हे निवडणुकीला उभे राहणार आहेत. ऐमल वली खान हे आवामी नॅशनल पार्टीचे प्रमुख असफनदयार वली खान यांचे पुत्र आहेत. या प्रांतातील सर्व प्रभावशाली व्यक्ती त्यांच्या मुलांना राजकारणात आणण्याचाचा प्रयत्न करतात. तसंच ते एकावेळी अनेक मतदारसंघातून उभे राहतात, असं डॉननं म्हटलं आहे.

ANPला पाकिस्तानी तालिबानचा कट्टर विरोधक समजलं जातं. त्यामुळे ANPचे अनेक सदस्य तालिबान्यांकडून ठार झाले आहेत. 10 जुलै तालिबानच्या हल्ल्यात ANP नेते हारून बिलौर यांचं निधन झालं होतं.

खैबर प्रांत हा ANPचा गड मानला जातो पण 2013च्या निवडणुकीत इमरान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ पार्टीला जास्त जागा मिळाल्या होत्या.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)