जगातल्या सगळ्यांत एकाकी माणसाचा व्हीडिओ झाला व्हायरल

Footage of an uncontacted indigenous man in Brazil, known as the Hole Indian, released by Funai agency on 18 July 2018 Image copyright Funai

'जगातल्या सगळ्यांत एकाकी माणसाचा' एक दुर्मिळ व्हीडिओ सध्या बाहेर आला आहे. जगभरात सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हीडिओ आहे अॅमेझॉनच्या जंगलातला. यात 50 वर्षांचा एक माणूस ब्राझीलच्या जंगलात गेल्या 22 वर्षांपासून अगदी एकटा राहत आहे.

22 वर्षांपूर्वी त्याच्या टोळीतल्या काही लोकांची हत्या झाली होती. त्यानंतर त्या टोळीतली हा शेवटचा जिवंत माणूस.

ब्राझील सरकारच्या फुनाय एजन्सीने हा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. काहीसं अस्पष्ट चित्रण असलं तरी यात एक पिळदार शरीरयष्टी असलेला माणूस कुऱ्हाडीनं झाड कापत असल्याचं दिसत आहे.

हा व्हीडिओ सध्या संपूर्ण जगभर पोहोचला असून या माणसाच्या जंगलात एकटं राहण्याबद्दल कमालीचं कुतूहल आहे.

कसा झाला हा व्हीडिओ?

वायव्य ब्राझीलमधल्या रोंडोनिया प्रदेशातील एका जंगलात हा माणूस फिरतो. फुनाय ही एजन्सी 1996 पासून या माणसाचं निरीक्षण करत आहे. तो अजूनही जिवंत असल्याचा पुरावा त्यांना गोळा करायचा आहे, जेणेकरून तो ज्या भागात फिरतोय तो भाग संरक्षित राखता येईल.

जवळपास 4,000 हेक्टरचा हा परिसर खासगी शेतजमिनींनी वेढलेला आहे. तसंच या भागात प्रवेश करण्यासाठी आणि या माणसाला इजा करणाऱ्या कोणत्याही कृत्यावर बंदी आहे.

ब्राझील सरकारच्या राज्यघटनेत इथल्या मूळ आदिवासींना भूभागाचा हक्क देण्यात आला आहे.


हा दुर्मिळ व्हीडिओ इथे पाहा:


आदिवासींच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या Survival International या संस्थेच्या संचालक फियोना वॉटसन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "हा माणूस जिवंत आहे, हे त्यांना वारंवार सिद्ध करणं आवश्यक आहे."

तसंच, यामागे राजकीय कारणही आहे, असं त्या सांगतात. "इथल्या काँग्रेसवर शेतीसंबंधित व्यवसायाचा पगडा आहे. त्यामुळे फुनाई एजन्सीसाठीचा आर्थिक तरतूद कमी झाली आहे. यामुळे इथल्या आदिवासींच्या हक्कांवर मोठी गदा आली आहे."

या माणसाबद्दल काय माहितीये?

त्याच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. या माणसावर यापूर्वीही अनेक संशोधनं आणि बातम्या झाल्या आहेत. त्याच्यावर 'The Last of the Tribe: The Epic Quest to Save a Lone Man in the Amazon' हे पुस्तकसुद्धा अमेरिकन पत्रकार माँटे रील यांनी लिहिलं आहे.

अधिकृत माहितीनुसार या माणसाशी अद्याप तरी कुणी संपर्क साधलेला नाही. 1995मध्ये या माणसासह अजून पाच लोक या जंगलात राहायचे. पण शेतकऱ्यांनी त्यांच्यावर मोठा हल्ला केला. त्यातून हा एकटाच बचावला.

त्याचं कूळ किंवा जमात अजूनही ओळखता आलेलं नाही किंवा तो कोणती भाषा बोलतो, संवाद कसा साधतो याबद्दलही माहिती उपलब्ध नाही.

गेली अनेक वर्षं ब्राझिलियन माध्यमं त्याला 'द होल इंडियन' नावानं संबोधतात, कारण तो जंगलात ठिकठिकाणी खड्डे खणतो. यांचा वापर तो सावज पकडण्यासाठी किंवा लपण्यासाठी करत असावा, असा अंदाज आहे.

याआधी त्यानं झोपड्या, स्वतः तयार केलेली हत्यारं, बाण, भाले एका ठिकाणी सोडून आपला मुक्काम दुसरीकडे हलवला आहे.

हा व्हीडिओ दुर्मिळ का?

आजवरपर्यंत या माणसाचा एकमेव धुसरसा फोटो उपलब्ध आहे. 1998 मध्ये कोरंबियारा नावाच्या ब्राझिलियन डॉक्युमेंट्रीसाठी एका फिल्ममेकरनं फुनाय एजन्सीबरोबर भटकताना या माणसाचा फोटो काढला होता. नंतर त्या डॉक्युमेंट्रीतही त्याला काही क्षणांसाठी दाखवण्यात आलं होतं.

Image copyright SURVIVAL
प्रतिमा मथळा मेझॉनच्या जंगलात उरलेल्या या एकमेव माणसाचं घर 2005 मध्ये चित्रित करण्यात आलेलं हे घर. काही दिवस राहून या माणसानं हे घर सोडून दिलं होतं.

या माणसाचं आरोग्य अजूनही चांगलं असल्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. फुनाय एजन्सीचे विभागीय समन्वयक अल्टेअर अल्गायेर यांनी द गार्डियनसोबत बोलताना सांगितलं की, "त्याची तब्येत उत्तम आहे. तो पपई आणि मक्याची शेतीही करतोय."

अशा एकांतवासातल्या जमाती, टोळ्यांशी संपर्क साधणं फुनाय एजन्सीच्या धोरणात नाही. या माणसानंही याआधी त्याच्याशी संपर्क साधणाऱ्यांवर बाणांनी हल्ला करून, आपल्याला कुणाशीही संपर्क साधण्यात रस नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणी भेट दिलेल्या फियोना वॉटसन सांगतात, "त्यानं अशी हिंसा पाहिली, अनुभवली आहे, की त्याच्यासाठी आता हे जग खूप धोकादायक आहे."

हे व्हीडिओ अनेकांना आनंद देणारा वाटत असला तरी ते त्याच्या संरक्षणासाठी आवश्यक असल्याचं वॉटसन सांगतात.

तो खूप धोकादायक अवस्थेत का आहे?

1970 ते 1980च्या दशकांत या भागात उद्योगांसाठी रस्ता बांधण्यात आला. त्यावेळी उद्योगाच्या वाढत्या मागणीसाठी जंगलांची कत्तल करण्यात आली. त्याच दरम्यान या जमातीला नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न झाले.

आजही शेतकरी आणि झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करणाऱ्यांना त्याची जागा हवी आहे. त्यामुळे अनेकदा त्याला काही सशस्त्र घुसखोरांचा सामना करावा लागतो.

2009 मध्ये फुनाय एजन्सीमार्फत या माणसासाठी एक तात्पुरता कँप उभारण्यात आला होता. पण हा कँपही काही सशस्त्र गटांनी उद्ध्वस्त केला. तसंच धमकीची सूचना म्हणून तिथे काही बंदुकीची काडतुसंही ठेवण्यात आली होती.

Survival International संस्थेच्या मते, जगात विजनवासात असलेल्या सर्वांत जास्त मानवी जमाती अॅमेझॉनच्या या सदाहरित जंगलात इथे आहेत.

बाहेरील जगाशी त्यांचा संपर्क आला तर त्यांना ज्वर, कांजण्या यासारख्या संसर्गजन्य रोगांची लागण होऊन या जमातींना धोका निर्माण होऊ शकतो.

अखेरीस वॉटसन म्हणतात, "या माणसाबद्दल आपल्याला काही माहिती करून घेण्याची गरजही नाही. पण त्याला जपणं काळाची गरज आहे, कारण मानवी जमातींच्या वैविध्याचा तो एक अनमोल ठेवा असून त्याला गमावणं हे मोठी संस्कृती गमावण्यासारखं आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)