विदर्भासारखं तापलं जपान, उष्माघाताने 30 लोकांचा बळी

जपान एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला होता. Image copyright Reuters
प्रतिमा मथळा जपान एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला होता.

जपान सध्या नागपूर-चंद्रपूरसारखं तापलंय, ज्यामुळे उष्माघाताचे आतापर्यंत 30 बळी गेले आहेत.

गेल्या दोन आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे हजारो लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सरकारने लोकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

पण नेमकं ऊन किती आहे?

या आठवड्याच्या सुरुवातीला मध्य जपानमध्ये पारा 40.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होता. गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद आहे.

क्योटो शहरात सात दिवसांपासून तापमान 38 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. 19व्या शतकात तापमानाची नोंद ठेवण्यास सुरुवात केल्यापासून पहिल्यांदाच अशी उष्ण लाट रेकॉर्ड होत आहे.

आयची प्रदेशात एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा उष्माघातानं मृत्यू झाल्यानंतर जपानच्या शिक्षण मंत्रालयानं बचाव करण्यासाठी शाळांना योग्य त्या उपाययोजना करण्यास सांगितलं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सार्वजनिक उद्यानांमध्ये उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

जपानच्या हवामान खात्याने लोकांना उष्ण हवामानामुळे जाणवणारा थकवा टाळण्यासाठी पुरेसं पाणी पिण्याचा आग्रह केला आहे.

पश्चिम जपानमध्ये पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर मदत करणाऱ्या स्वयंसेवकांना उष्माघाताचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या कामातही अडथळे येत आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला पुरानंतर जमीन खचल्यामुळे जपानमध्ये 200 लोकांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)