खतना करताना लेकीचा मृत्यू, तरी वडिलांकडून प्रथेचं समर्थन

सोमालिया, महिला हक्का Image copyright AFP
प्रतिमा मथळा सोमालियात स्त्रियांच्या जननेंद्रियाची शस्त्रक्रिया केली जाते.

स्वत:च्या दहा वर्षांच्या लेकीची खतना (जननेंद्रियाचा काही भाग कापण्याची प्रथा) करण्याचं धक्कादायक समर्थन सोमालियातील एका वडिलांनी केलं आहे. या शस्त्रक्रियेनंतर या मुलीचा मृत्यू झाला.

दाहीर नूर यांच्या मुलीला खतनासाठी नेण्यात आलं. 17 जुलैला प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू ओढवला.

Female genital mutilation (FGM) ही या देशाची प्रथा आहे. या भागातली लोकांना यात काही वावगं वाटत नाही. शस्त्रक्रियेतले धोके त्यांना ठाऊक आहेत, असं दाहीर यांनी 'व्हॉइस ऑफ अमेरिका'शी बोलताना सांगितलं.

युनिसेफच्या आकडेवारीनुसार सोमालियातली 98 टक्के स्त्रियांची एफजीएम शस्त्रक्रिया झालेली आहे.

सोमालियाच्या घटनेनुसार FGMवर प्रतिबंध आहे. पण ते बेकायदेशीर मानलं जात नाही. FGMमध्ये स्त्रीच्या जननेंद्रियाचा काही भाग कापला जातो. वैद्यकीय कारणांव्यतिरिक्त कारणांसाठी अशा प्रकारे जननेंद्रियाच्या बाह्य भागाला इजा झाली तर स्त्रीला कायमस्वरुपी आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात.

मी आयुष्यात अशा पद्धतीनं FGM झालेलं पाहिलेलं नाही, असं डॉ. अब्दीराहमान ओमार हसन यांनी सांगितलं. डॉ. अब्दीराहमान हे धुसमारेब शहरातील हन्नानो हॉस्पिटलचे डीन आहेत. दाहीर नूर यांच्या मुलीला त्याच हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आणलं होतं.

त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूत डॉ. अब्दीराहमान यांचा समावेश होता. त्या मुलीला धनुर्वात झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. खतना करताना निर्जंतुकीकरण करण्यात आलेली उपकरणं न वापरल्याने जंतुसंसर्ग होतो. मात्र या सगळ्यानंतरही आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचं नूर यांचं म्हणणं आहे.

मुलींच्या वडिलांची हे प्रकरण पुढे रेटण्याचा निर्णय घेतला असता तरी त्याचा उपयोग नव्हता, असं गालकायो एज्युकेशन सेंटर फॉर पीस अँड डेव्हलपमेंट या महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संचालिका हावा अदेन मोहम्मद यांनी स्पष्ट केलं. कारण या मुलीची खतना करणाऱ्या स्त्रियांना अटक झालेली नाही.

आणि समजा अटक झाली तरी त्यांना कठोर शिक्षा होईल असा कडक कायदा नाही, असं त्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितलं.

सोमालियात दररोज अशा शस्त्रक्रिया होत असतात असंही त्यांनी सांगितलं.

सोमालियात FGM कायदेशीर गुन्हा करण्याच्या प्रयत्नांना राजकारण्यांनी खीळ घातल्याचं चित्र आहे. याला विरोध केल्यास किंवा त्यावर बंदी घातल्यास मतदार दूर जाण्याची राजकारण्यांना भीती आहे. ही प्रथा धर्माशी जोडली जाते. ही प्रथा न पाळणाऱ्या मुलींना सतत ऐकवलं जातं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)