ग्रीस : जंगलात लागलेल्या भीषण आगीत 60 ठार, अमेरिकेकडे मदतीची मागणी

आग Image copyright Reuters

ग्रीसची राजधानी अथेन्स येथून जवळच असलेल्या अट्टिका प्रांतातील जंगलात आग लागल्याने अंदाजे 60 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दशकभरातील ग्रीसमधली ही आगीची सर्वांत मोठी दुर्घटना असल्याचे म्हटले जात आहे.

अथेन्सच्या ईशान्य भागापासून 40 किमीवर असलेल्या एका खेड्यात सोमवारी आग लागली आणि मंगळवारी सकाळपर्यंत ही आग भडकलेली होती.

समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मती या गावात 26 मृतदेह सापडले आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अग्निशमन दलातर्फे एकूण 49 जणांच्या मृत्यूला दुजोरा देण्यात आला आहे. मृतांमधील बहुसंख्य लोक तरुण असल्याचं सांगण्यात येत आहे.

बेपत्ता झालेल्या लोकांच्या शोधासाठी बचाव पथक प्रयत्न करत आहे.

बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे. बचावपथक युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अग्निशमन दलाचे शेकडो जवान ही आग विझवण्याचं काम करत आहेत. प्रशासनाने या कामासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदतीची मागणी केली आहे.

"ही आग विझवण्यासाठी आम्ही शक्य ते सगळे प्रयत्न आम्ही करू," असं पंतप्रधान अलेक्सिस सिरपास यांनी वार्ताहरांना सांगितलं.

आगीचं कारण

अट्टिका भागातलं उष्ण वातावरण हे आगीचं मुख्य कारण आहे. सोसाट्याचा वारा असल्यामुळे ही आग आणखी भडकली.

AFP या वृत्तसंस्थेनं काही अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सांगितलं की काही लुटारुंनी बंद असलेली घरं लुटण्यासाठी ही आग लावलेली असावी.

Image copyright EPA

"अथेन्सच्या तीन वेगवेगळ्या भागात 15 आगी अचानक भडकल्या," असं सरकारचे प्रवक्ते दिमित्री झांकोपुलोस यांनी सांगितलं.

"एखादी संशयित हालचाल ओळखण्यासाठी ग्रीसनं अमेरिकेकडे ड्रोनची मागणी केली आहे," असंही त्यांनी सांगितलं.

मतीची आग किती भीषण आहे?

सोमवारी अथेन्सच्या ईशान्य भागापासून 40 किमीवर असलेल्या एका खेड्यात सोमवारी आग लागली आणि मंगळवारी सकाळपर्यंत ही आग भडकलेली होती.

इथून जवळ असलेल्या एका समुद्राच्या जवळ जाऊन लोकांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण आग आणि धुरानी त्यांना वेढलं. काही जणांचा इमारतीत आणि कारमध्ये मृत्यू झाला.

किनाऱ्यावर असलेल्या बोट्स आणि खासगी गाड्यांनी किनाऱ्यावर पोहोचलेल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

"सुदैवाने तेथे समुद्र होता आणि आम्ही तिथे गेलो. कारण आगीच्या ज्वाला अगदी पाण्यापर्यंत पोहोचल्या होत्या." असं या आगीतून बचावलेल्या कोस्टास लगानोस यांनी सांगितलं.

"आमची पाठ भाजली आणि आम्ही लगेच पाण्यात उडी मारली." ते पुढे म्हणाले.

हेही वाचलंत का?

मीराबाई चानू : बांबूच्या बारनं सराव करून असं मिळवलं गोल्ड मेडल

'ब्राझीलचे ट्रंप' उतरले राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूक रिंगणात

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)