मुसळधार पावसामुळे धरण फुटलं, लाओसमध्ये शेकडो बेपत्ता, 20 ठार

लाओस Image copyright EPA
प्रतिमा मथळा पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी घराच्या छतावर आश्रयाला गेलेले लोक

लाओसच्या सरकारी मीडियाच्या म्हणण्यानुसार देशातल्या नैऋत्य भागात बांधकाम सुरू असलेलं धरण फुटल्यानं 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक बेपत्ता झाले आहेत.

जवळपास 100 लोक बेपत्ता असून सहा हजारहून अधिक लोकांची घरं पाण्याखाली गेली आहेत.

लाओस न्यूज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सोमवारी अटापू प्रदेशातल्या जलविद्युत प्रकल्पासाठीचं बांधकाम सुरू असलेलं धरण फुटलं. या धरणातल्या पाण्यानं सहा गावं पाण्याखाली गेली आहेत.

Image copyright EPA

एजन्सीचं म्हणनं आहे की, या घटनेनंतर अनेक लोक बेपत्ता झाले असून पुराच्या पाण्यात अनेकजण अडकले आहेत.

2013 मध्ये शे पियान शे नामनॉय धरणाचं बांधकाम सुरू झालं होतं. पुढच्या वर्षापर्यंत हे बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित होतं.

Image copyright EPA

थायलंडची राचाबुरी इलेक्ट्रिसिटी जनरेटिंग होल्डिंग आणि दक्षिण कोरियाची SK इंजिनिअरींग अँड कंस्ट्रक्शन कंपनी या धरणाचं काम करत होत्या.

राचाबुरी कंपनीच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की, त्यांना मिळालेल्या अहवालानुसार 16 मीटर उंच आणि 770 मीटर लांबीच धरण फुटले आहे.

सततच्या पावसामुळे धरणाच्या भिंतीवर दबाव निर्माण झाल्यानं ही घटना घडली, असं त्याचं म्हणणं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)