अमेरिकेतील स्थानिक वृत्तपत्रांना घरघर का लागली आहे?

  • टेलर केट ब्राऊन
  • बीबीसी न्यूज, बोल्डर, कोलोरॅडो
वर्तमानपत्र

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या दशकभरात अमेरिकेतील शंभरपेक्षा जास्त वृत्तपत्रं एकतर बंद झाली आहेत किंवा त्यांचं विलीनीकरण झालं आहे. एकाबाजूला हे होत असताना याचा समाजावर काय परिणाम होत असेल?

साधारण 120 वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी व्याख्यानं आणि विविध शैक्षणिक कार्यक्रम राबवणाऱ्या चाऊटाक्वा चळवळीचा भाग म्हणून कोलोराडोच्या बोल्डर येथील टेकड्यांवर एक लाकडी सभागृह उभारण्यात आलं होतं. जून महिन्यामध्ये याच चाउटाक्वा सभागृहात डेव्ह क्रेगर यांनी शहरातील नागरिकांसमोर त्यांना एका स्थानिक वृत्तपत्रानं नोकरीवरून काढून टाकल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी स्थानिक बातम्यांचं भविष्य धोक्यात असल्याचं सांगितलं.

बोल्डर हे काही अमेरिकेतलं साधं शहर नाही. एक लाख लोकसंख्येच्या हा शहरात केंद्र सरकारची विविध संशोधन संस्था सुरू आहेत. एका कुटुंबाला पुरेल अशा घराची किंमत इथं 10 लाख डॉलर्स इतकी जास्त आहे.

पण तरीही इथल्या स्थानिक दैनिकांना घरघर लागली आहे. काही वृत्तपत्रं तर अगदी मरणपंथाला लागली आहेत.

अशा वृत्तपत्रांमध्ये चाउटाक्वाच्या आधी स्थापन झालेल्या आणि बोल्डर येथेच सुरू झालेल्या 'डेली कॅमेरा' या वृत्तपत्राचाही समावेश आहे.

किती काळ तगणार?

128 वर्षं जुनं वृत्तपत्र आणखी कितीकाळ जगणार, असा प्रश्न इथले लोक विचारत आहेत.

युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनामधील संशोधकांकडून आलेल्या माहितीनुसार, 2004पासून साधारणपणे 1,800 स्थानिक वृत्तपत्रं बंद पडली आहेत किंवा त्यांचं विलीनीकरण झालं आहे. वृत्तपत्र बंद पडण्याची कारणंसुद्धा नेहमीची आहेत.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

इंटरनेटवरच्या जाहिरातींमुळे पारंपरिक व्यवसायाचा आराखडा बदलत आहे. वाचक अधिकाधिक ऑनलाइन वाचणं पसंत करतात आणि यासारखी आणखी काही कारणं आहेत. बोल्डर आणि डेनवेर इथे वृत्तपत्रांच्या मालकीबाबतसुद्धा प्रश्न आहेत.

पण स्थानिक वृत्तपत्रं बंद होण्याचा समाजावर काय दृश्य परिणाम होतात, याबद्दल मात्र फारसं कोणाला माहिती नाही.

दहा वर्षांपूर्वी या प्रश्नाच्या अनुषंगाने डेनवेर येथे एक घटना घडली.

'द रॉकी माउंटन न्यूज' हे शहरातील पहिल्या दोनमधलं अव्वल वृत्तपत्र बंद झालं. या वृत्तपत्रात 200 कर्मचारी होते.

'डेनवेर पोस्ट' हे 'रॉकी'चं स्पर्धक वृत्तपत्र होतं. परंतु 'पोस्ट'मधल्या पत्रकार आणि स्तंभलेखक सुसान ग्रीन यांना त्याचा अजिबात आनंद झाला नव्हता.

"पत्रकारिता हा स्पर्धात्मक व्यवसाय आहे. यामुळेच आम्हाला जे लिहायचंय किंवा जी बातमी द्यायची आहे, त्याचं नेहमी स्वातंत्र्य मिळालं," त्या सांगतात.

"हे बदल घडल्यावर लक्षात आलं की परिस्थिती वेगानं बदलते आहे. राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, शहरातील बड्या असामी किंवा जाहिरातदारांना एखाद्या बातमीबद्दल आक्षेप असेल किंवा एखादी बातमी छापून येऊ नये असं वाटत असेल, तर वृत्तपत्राची मूकसंमती मिळवणं अतिशय सोपं झालं आहे," ग्रीन म्हणाल्या होत्या.

महत्त्वाचे बदल

पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटीमधून राजकारण आणि प्रसारमाध्यमं यांचा अभ्यास केलेल्या ली शाकेर यांना वृत्तपत्रांच्या न्यूजरूम बाहेरही बदल झाल्याचं दिसून आलं.

बातमीदारीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं, स्थानिक नागरी संस्थाच्या बैठकांना उपस्थित राहणं आदी गोष्टी 'रॉकी' बंद झाल्यानंतर संपल्या.

अगदी अलीकडे राज्यशास्त्राचे तज्ज्ञ जेनिफर लॉलेस आणि डॅनी हेज यांनी वृत्तपत्र बंद पडल्यानं कमी झालेल्या प्रेस कव्हरेजचा अमेरिकेतील प्रतिनिधी निवडणुकांवर काय परिणाम झाला याचा अभ्यास केला आहे.

ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवर असली तरी मतदार मात्र स्थानिकच असतात.

हेज म्हणाले की, जेव्हा एखादं वृत्तपत्र बंद पडतं किंवा त्यातल्या बातम्यांचं प्रमाण कमी होतं तेव्हा लोकांना कोण उमेदवार आहेत, त्याची सध्याची परिस्थिती काय आहे आणि उमेदवारांची भूमिका काय आहे, हे समजत नाही. त्यामुळे लोक मतदानासाठी येण्याची शक्यताही कमी होते.

"स्थानिक वृत्तपत्रं जेव्हा अशी बातमीदारी बंद करतात तेव्हा त्यांची जागा घेण्यासाठी इतर पर्याय नसतात," असंही ते म्हणाले. स्थानिक बातम्यांवर प्रयोग करणारे ऑनलाइनमध्ये बरेच प्रयोग झाले आहेत, पण त्यांचं लक्ष्य सार्वजनिक धोरणांवर कमीच असतं.

ते म्हणाले, याचा परिणाम सर्वांवर होतो हे नक्की. अगदी राजकीयदृष्ट्या सक्रिय असणाऱ्यांवरही याचा परिणाम होतोच.

"मला बऱ्याच काळापासून शंका आहे की, राजकीयदृष्ट्या जे लोक सक्रिय असतात ते कोणत्याही प्रकारे त्यांच्या सहभागाची पातळी राखतातच."

"पण त्यांना जेवढी माहिती असणे आवश्यक आहे, ती असेल का या बद्दल मला शंका आहे,'' असं त्या म्हणाल्या.

वृत्तपत्र बंद होण्याचे इतरही परिणाम दिसून येत आहेत.

अलीकडे झालेल्या सर्वेक्षणानुसार, वृत्तपत्रं बंद झाल्यानंतर शहरातील रस्ते आणि शाळा बांधण्यासाठी जे कर्ज घेतले जातात, ते जास्त दराने घेतले जात आहेत, असे दिसून आलं आहे. त्यामुळे या प्रकल्पांचा खर्च वाढत आहे. याचा अर्थ असा की याचा फटका नागरिकांनाच बसत आहे.

स्थानिक वृत्तपत्रं बंद झाल्याने प्रशासना करत असलेल्या खर्चाची पडताळणी कोण करत नाही, त्यामुळे सार्वजनिक निधीचा होणारा गैरवापर पुढं येत नाही, असं म्हणता येऊ शकतं.

स्थानिक वृत्तपत्रं बंद पडल्याने आरोग्य समस्याही वाढतील असं आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटतं.

माहितीचा साठा बंद?

पिनलोप मुस अबर्टनिटी या नॉर्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक आणि संशोधक आहेत. त्यांच्या मते, वृत्तपत्रं बंद होणे म्हणजे माहितीचा साठा आटणं.

सार्वजनिक लक्ष वेधून घेणारे, स्थानिक व्यवसायांशी स्थानिक लोकांना (जाहिराती किंवा बातम्यांतून) जोडून प्रादेशिक व्यवसायांच्या विकासाला प्रोत्साहन देणारे आणि देशाचे प्रश्न स्थानिक पातळीवर नेणे आणि सार्वजनिक चर्चेचा अजेंडा ठरवणं अशी कामं स्थानिक वृत्तपत्र करतात, असे त्या म्हणतात.

"तुम्ही ज्या लोकांना ओळखत नाही, अशांशी तुम्ही कसं जोडलेले असता, हे दाखवण्याचं काम सामर्थ्यवान वृत्तपत्रं करतात,"असे अॅबर्टनिटी म्हणतात.

बोल्डरमधली ही शनिवारची सकाळ आहे आणि शेतकऱ्यांचा बाजार भरून गेला आहे. फुलं, मध यांच्यापासून ताज्या माशांपर्यंत विविध पदार्थ विकले जात आहेत. एका बाजूला गिटारवादक कला सादर करत आहे, तर दुसरीकडे आणखी दोघेजण दुसरं वाद्य वाजवत आहेत. बोल्डरमधल्या नष्ट होणाऱ्या खाडीजवळ काही कुटुंब सहलीसाठी जमलेली आहेत.

इथे सुसान सीपोर्ट बोल्डरवासीयांच्या सह्या गोळा करत होती, तेव्हा मी तिला थांबवलं. वर्दळ असलेल्या भागातील उघड्या विहिरी बंद करण्यासाठी ही याचिका होती. प्रादेशिक प्रश्नांचा स्थानिक जीवनावर कसा परिणाम होतो हे यातून दिसून येतं.

सुसान डेली कॅमेराच्या वर्गणीदार आहेत. स्थानिक वृत्तपत्रांनी सबस्क्रिप्शनची रक्कम 25 टक्क्यांनी वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं.

यापैकी कुणी त्यांचं सबस्क्रिप्शन कायम ठेवणार आहे का?

"हाच संवाद नेहमी माझ्या घरात होत आहे," सुसान म्हणाल्या.

त्यांच्याबरोबर असलेला माणूस म्हणाला, "प्रत्येकाच्याच घरात असा संवाद होतोय."

पण यातील कुणालाचं वृत्तपत्र पूर्ण बंद करायचं नाही.

कॅमेराचं सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांपैकी अनेकांच वय 50च्या वर आहे. शेतकरी आणि तरुण बोल्डरवासीयांना अर्थात कॅमेराबद्दल माहीत होते - पण त्यांना सबस्क्रिप्शन घेण्याची कोणतीही गडबड नव्हती.

एक महिला म्हणाली, ती कॅमेरावर ऑनलाईन पाहाते. "बऱ्याच गोष्टी पाहिल्यानंतर तुम्हाला पैसे द्यावे लागतात. त्यामुळे मी फारशी काळजी करत नाही."

शेतकरी बाजारात एक चित्र रंगवणारा एक माणूस म्हणाला, की "त्यातले लेख अगदीच संक्षिप्त असतात आणि तितके सखोल विचार मांडलेले नसतात."

डेव क्रेगर यांचं बोलणं ऐकणारी एक महिला म्हणाली की ती काही नियमित वाचक नाही, पण ट्विटरवर पत्रकारांना फॉलो करते. "एखाद्या बातमीबद्दल तुम्ही ऐकता आणि मग ऑनलाइन सर्च करता," ती म्हणाली.

तांत्रिक आणि आर्थिक गोष्टींचा भार

तांत्रिक आणि आर्थिक गोष्टींचा भार स्थानिक वृत्तपत्रांवर फारच पडत आहे. तरीही काहीजण स्थानिक वर्गणीदार आणि स्पर्धा नसल्याने तगण्याचा प्रयत्न करत आहेत. जी उर्वरित वृत्तपत्रं आहेत, त्यांच्या नव्या मालकांमुळे त्यांची विक्रीसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे.

डेनवेर पोस्टसह, 'द कॅमेरा' डिजिटल आणि इतर 96 वृत्तपत्र डिजिटल फर्स्ट मीडिया (डीएफएल) चेनचा भाग आहेत.

न्यूयॉर्कमधील अॅल्डेन ग्लोबल कॅपिलटची मोठी भागीदारी डीएफएलमध्ये आहे.

अर्थात यात वेगळं असं काहीच नाही. कारण अमेरिकेतील 1000 म्हणजे एकूण वृत्तपत्रांच्या 15 टक्के वृत्तपत्रांची मालकी मोठ्या गुंतवणुकदारांची आहे, असं अॅबर्टनिटी यांच्या संशोधकातून दिसून आलं आहे.

हे मालक वृत्तपत्रांचा वापर कॅश पॉइंट म्हणून करतात, असा आरोप टीकाकार करतात. नफा कमवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कमी करणं आणि किंमत वाढवणे, असे प्रयोग केले जातात. हे प्रमाण राष्ट्रीय पातळीवरील वृतपत्रांपेक्षां जास्त आहे.

नफ्यासाठी आग्रही असताना, वृत्तपत्रांमध्ये कोणतीही नवीन गुंतवणूक केली जात नाही, असे अॅबर्टनिटी म्हणतात.

अनेक वर्षांपासून, कर्मचारी कपात आणि मालकीच्या संदर्भातील वाद अंतर्गत मानले गेले आहेत.

अॅल्डन यांच्या मालकीच्या वृत्तपत्रातही एप्रिल महिन्यात मोठा बदल झाला.

2013मध्ये पुलित्झर पुरस्कार मिळाल्यानंतर लगेचच 'द डेनवेर पोस्ट'मध्ये Op-ED पानावर कर्मचाऱ्यांचा फोटो छापण्यात आला. पण नंतर कामावरून काढून टाकलेल्या किंवा सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांना या कंप्युटरच्या साहायने फोटोतून हटवण्यात आलं.

संपादकीय मंडळाची सही असलेल्या एका आणि इतर दोन संपादकीयमध्ये अॅल्डन यांच्या धोरणांवर टीका करण्यात आली. वर्गणीत वाढ करत असताना पानांची संख्या कमी करणे आणि ज्या व्यवसायांचा वृत्तपत्रांशी संबंध नाही अशांमध्ये प्रचंड गुंतवणूक करणे यावर ही टीका होती.

"डेनवेर पोस्टचा त्यांच्या मालकांनी खून केलाय," असं एका पत्रकाराने ट्विट केलं होतं.

सात लाख लोकसंख्येचे शहर दैनिकाशिवाय राहू नये, यासाठी जाणीवपूर्वक आम्ही हा धोक्याचा इशारा देत आहोत, असं संपादकीय मंडळाने म्हटले आहे.

कॅमेरा वृत्तपत्राच्या कर्मचाऱ्यांचीसुद्धा हीच व्यथा होती, डेन क्रेगर नोव्हेंबर 2014मध्ये संपादकीय पानाचे संपादक झाले तेव्हा वृत्तपत्राची ऐतिहासिक इमारत बऱ्यापैकी विकली गेलेली होती आणि कर्मचाऱ्यांचीही कपात झालेली होती.

कर्मचारी कपात थोडी थोडी होत होती, पण त्याही पेक्षा सगळ्यात वाढती चिंता म्हणजे या लोकांना दुसरीकडे जाण्यास वाव नव्हता.

"आम्ही संपत चाललो होतो, चांगले दिवस संपले, आमच्या ऑफिसमध्ये आम्ही केवळ सहा पत्रकार शिल्लक राहिलो,'' असे क्रेगर म्हणाले. "तुम्ही सिटी हॉल, पोलीस, न्यायालये, सार्वजनिक शिक्षणाबद्दल बोलताय, पण एक विज्ञानाचा पत्रकार किंवा एक व्यवसायासंबंधीचा पत्रकार यांनी पूर्णपणे उच्चतम तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि कोलोराडोचं संपूर्ण स्टार्ट चालवण्याइतकं सक्षम असावं असं वाटतं.''

ते पुढे म्हणाले, म्हणजे शहरात या घाडमोडी घडत आहेत, याचंच वार्तांकन होऊ शकत होतं. शोधपत्रकारिता, नवीन काही करणं, जादा काही माहिती देणं शक्य नव्हतं, असं ते म्हणतात.

क्रेगर यांना काही काळापूर्वीच एक चांगला वाचक भेटला होता, त्यांना नुकती प्रकाशित झालेल्या अग्रलेखांवर त्यांची तक्रार होती. वृत्तपत्रांची किंमत वाढत असताना, वृत्तपत्रांचा आकार कमी होत आहे, अशीही त्यांची तक्रार होती.

डीएफएमच्या मालकीच्या वृत्तपत्रातील माजी पत्रकार ज्युली रेनॉल्ड्स यांच्या शोधपत्रकारितेमुळे अॅल्डन यांचे नाव पुढे येऊ लागले. ज्युली सध्या सेंटर फॉर इन्व्हेस्टेगेटिव्ह रिपोर्टिंगसाठी काम करतात आणि चेनच्या मालकाबद्दल अधिक खोलात शोध घेण्याचं काम त्या करत आहेत.

वाचकाला धक्काच बसला.

"हा माणूस महापालिकेतील राजकारणाशी जोडलेला होता आणि त्याला याची कल्पनाच नव्हती," क्रेगर म्हणाले.

कोलोराडो पत्रकारिता सप्ताहात त्यांनी अॅल्डन यांच्यावर ताशेरे ओढणारे संपादकीय लिहिले. ते न छापल्यामुळे त्यांनी स्वतःच्याच वेबसाइटवर ते संपादकीय टाकलं. त्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

बीबीसीने या विषयी अॅल्डन यांना त्यांची भूमिका विचारली. पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

कंपनीसाठीचा वेळ त्यांनी दुसऱ्या वेबसाईटवर संपादकीय लिहिण्यासाठी वापरला, हे कारण देऊन त्यांना कामावरून काढण्यात आलं. पण बीबीसीने याबद्दल विचारणा केली असता कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

अॅलेक्स बर्नेस हे मे महिन्यापर्यंत द कॅमेरामध्ये पत्रकार म्हणून कार्यरत होते. ते म्हणाले की, नोकर कपात होत असली, तरी अद्याप समुदायातील स्थानिक बातम्यांसाठीचे सर्वात महत्त्वाचे सोर्स याच वृत्तपत्राकडे आहेत, असं ते म्हणाले.

जर काही घडत असेल तर द कॅमेरामध्ये ते वाचायला मिळणारच.

बर्नेस म्हणतात, कर्मचारी कपात केल्यानंतर संपूर्ण वृत्तपत्रं त्याच जोमाने सुरू ठेवण्याचा ताण इतर कर्मचाऱ्यांवर होता.

बर्नेस आणि क्रेगर अशा दोघांनाही बोल्डरमधील पैसा आणि तंत्र पाहता, कॅमेराला कधीही ऑनलाईनशी स्पर्धा करण्याची वेळ कशी आली नाही, याचं आश्चर्च वाटतं.

एका वेळी वाटायचं की, वृत्तपत्राकडे चांगला पैसा येतोय आणि स्थानिक बातम्यांमध्ये वृत्तपत्राला चांगला रसही आहे. पण नवीन काही सुरू करण्याबाबत अजिबातच उत्साह नसायचा. खाद्यपदार्थांच्या दुकाना उपाशी राहण्यासारखा हा प्रकार होता, असं बर्नेस म्हणातात.

डेनवेरमध्ये स्थानिक बातम्या देण्यासाठी स्टार्ट अप सुरू करण्यासाठी मोठा उत्साह दिसतो.

Denveriteने गेली दोन वर्षं राज्यातील सर्वांत मोठ्या शहराला ऑनलाईन कव्हरेज दिलं होतं. तर गेल्या काही आठवड्यांत डेनव्हेर पोस्टमधील बरेच कर्मचारी ब्लॉकचेन स्टार्टअप सुरू करत असलेल्या कोलोराडो सनमध्ये रुजू झाले आहेत.

'कोलोराडो इंडिपेडंट' राज्यातील बातम्या देतं. त्यासाठी फाउंडेशन, वैयक्तिक देणग्यांवर हे चालतं. सुसान ग्रीन सध्या कोलोराडो इंडिपेडंटच्या संपादक आहेत.

प्रत्येक शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्कूल बोर्डच्या बातम्यांसाठी आमची साईट नाही, असं त्या म्हणतात.

राज्यावर परिणाम करणारी घटना असेल तर आम्ही दखल घेतो किंवा राज्याच्या धोरणाच्या अनुषंगाने आम्ही लिहितो, असं त्या म्हणाल्या.

इंडिपेडंट वेगळा असल्याने त्याच्या वाचकांच्या प्रतिक्रियाही येतात, असे ग्रीन म्हणाल्या. आफ्रिकन अमेरिकन, तरुण आणि नवीन कोलोराडोवासी आणि एलजीबीटी असा आमचा मोठा वाचकवर्ग आहे, असं त्या म्हणाल्या.

"जरी आमच्याकडे दोन वृत्तपत्र असली तरी ते राज्यातील गरीब, कृष्णवर्णीय समुदाय यांचे विषय हाताळण्यात योग्य काम करत असतीलच असं नाही," असं त्या म्हणाल्या.

वृत्तपत्राकडे सर्व माहिती असणं ही अतिशय उत्तम आणि सुंदर कल्पना आहे, पण प्रत्यक्षात ती राबवली जातेच असं नाही, असंही त्या म्हणाल्या.

तरुण वाचकांना माहितीची भूक असते, पण पारंपरिक वृत्तपत्र ज्या पद्धतीनं ही माहिती देतात, ती त्यांना नको असते, असं त्या म्हणाल्या.

पण देशपातळीवर स्थानिक वृत्तपत्रांना घाऊक पर्याय उपलब्ध झालेला नाही. तर ना नफा तत्त्वावर सुरू असलेल्या साईट मोठ्या शहरांतच सुरू आहेत.

2011च्या आकडेवारीचा विचार केला तर रेडिओ स्टेशन फक्त 40 टक्के अमेरिकेतच पोहोचतात. स्थानिक टीव्ही चॅनल्सकडे वृत्तपत्राएवढेच कर्मचारी असतात पण त्यांचं कार्यक्षेत्र मोठं असतं. हवामान, क्रीडा आणि गुन्हेगारी असे विषय ते हाताळत असतात.

अॅबर्टनिटी म्हणतात, वृत्तपत्र पुन्हा कात टाकू शकतात पण जुन्या पद्धतीचा अवलंब करून ते होणार नाही.

"सर्वांत पहिली गोष्ट म्हणजे आपण हे समजून घ्याव लागेल की आपल्या बातम्यांसाठी जाहिरातींकडून सबसिडी मिळालेली असते. तसंच स्थानिक वृत्तपत्रांचं व्यावसायिक मॉडेल बदलायचं म्हणजे एक गोष्ट प्रामुख्याने करायला हवी, ती म्हणजे पहिल्यांदा जाहिरातींवर अवलंबून राहणे टाळावे," असं त्या म्हणाल्या.

प्रश्न असा आहे की बोल्डर आणि अमेरिकेतील इतर लोक हे समजून घेणार आहेत का?

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)