इम्रान खान यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यांमध्ये तथ्य किती?

पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान Image copyright AFP
प्रतिमा मथळा पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान

पाकिस्तान निवडणुकीत जिंकल्यानंतर पंतप्रधानपदाचे दावेदार इम्रान खान यांनी भारताबरोबर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील असे उद्गार काढले. पाकिस्तानचा सूत्रधार बदलल्यामुळे नेमके भारतावर काय परिणाम होतील याचं सुशांत सरीन यांनी केलेलं विश्लेषण.

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (काही लोक या निवडणुकीला लष्करप्रमुखाच्या मर्जीतल्या माणसाची निवड असं देखील म्हणत आहे) यश मिळवल्यानंतर इम्रान खान हे पंतप्रधान होणार निश्चित झालं. त्यानंतर त्यांनी भाषण दिलं. ते भाषण एखाद्या कसलेल्या मुत्सद्द्याप्रमाणे होतं. भविष्यात आपण काय करणार आहोत हे सांगण्यावर त्यांचा भर होता.

पाकिस्तानला कोणते प्रश्न भेडसावत आहे? त्यांना पाकिस्तानात काय बदल हवे आहेत? पाकिस्तानच्या समस्यांची त्यांच्याकडे काय उत्तरं आहेत याबद्दल ते बोलले. त्यांच्या भाषणातून त्यांनी प्रशासन, काटेकोरपणा, सुधारणा अर्थव्यवस्था या गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्याबरोबरच त्यांनी परराष्ट्र धोरणाबाबत पाकिस्तानला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागत आहे त्याचा ओझरता उल्लेख देखील त्यांनी आपल्या भाषणात केला.

त्यांनी चीनपासून सुरुवात केली. गेल्या काही दशकांमध्ये चीननं जी प्रगती साधली आहे त्याच्यापासून आपण किती प्रेरणा घेतली याचा उल्लेख त्यांनी केला. त्यानंतर ते वळले अफगाणिस्तानकडे.

या देशाबाबत एखादा पाकिस्तानी नेता जे काही बोलू शकतो ते सर्व ते बोलले. अफगाणिस्तानसोबत संबंध सुदृढ हवेत, शांतता हवी, खुल्या सीमा हव्यात इत्यादी इत्यादी. त्यानंतर त्यांनी आपला रोख वळवला तो इराणकडे. या देशावर एक दोन वाक्यं बोलून ते वळले सौदी अरेबियाकडे.

कठीण परिस्थिती असताना सौदी अरेबियानं कसं पाकिस्तानला तारलं या विषयी ते बोलले. आखाती देशांमध्ये संघर्षाची स्थिती असताना त्यांना कसं मध्यस्थ व्हावं वाटत होतं याचा उल्लेख करून ते सर्वांत शेवटी भारताबद्दल बोलले. अगदी औपचारिकरीत्या त्यांनी भारताबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

Image copyright Getty Images

इम्रान खान जे बोलले त्यात काहीच नवीन नव्हतं. मांडणी नवी नव्हती, नवा प्रस्ताव नव्हता की नवा संदेश नव्हता. ते जे बोलले ते सगळं छान-आखीव-रेखीव प्रकारात मोडणारं भाषण होतं.

आम्हाला भारतासोबत बोलणी करायची आहे. जर भारतानं एक पाऊल पुढे टाकलं तर आम्ही दोन पाऊल पुढे येऊ. आम्हाला भारतासोबत व्यापार करायचा आहे, जो दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरेल. आपल्याला एकत्र बसून आपले प्रश्न सोडवण्याची गरज आहे असं ते बोलले.

अर्थात ते काश्मीरविषयी देखील पट्टी पढवल्याप्रमाणे बोलले. काश्मीर हा मुख्य मुद्दा आहे या सरळरेषेवर ते बोलत गेले. काश्मीरमध्ये होणाऱ्या कथित मानवी हक्क उल्लंघनाबद्दल ते बोलले. मग त्यांनी काश्मिरी लोकांना सहन कराव्या लागणाऱ्या दुःखासाठी मगरीची अश्रू ढाळले. हा मुद्दा तातडीनं सोडवण्याची किती आवश्यकता आहे याबाबत ते बोलले.

इम्रान खान यांच्या भाषणानंतर सर्व राजकीय विश्लेषक ते काय बोलले याचं विश्लेषण करण्यात गढून गेले आहेत. पण ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ते जे बोलले त्यात नवं काहीच नाही. त्यांच्या आधी आलेल्या सत्ताधाऱ्यांची हीच भाषा होती. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आपण स्वतः काय केलं याचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. एका अर्थानं, त्यांची ही कृती म्हणजे एका हातानं देणं आणि दुसऱ्या हातानं काढून घेणं अशीच होती.

इम्रान खान आणि त्यांच्या आधीच्या सत्ताधाऱ्यांच्या ( विशेषकरून नवाझ शरीफ) भाषेत थोडा फरक आहे. जेव्हा त्यांनी भारतासमोर व्यापाराचा प्रस्ताव ठेवला होता तेव्हा इम्रान खान यांनी त्यांच्यावर टीका केली होती. शरीफ यांनी पाकिस्तानला विकलं, स्वतःच्या स्वार्थासाठी पाकिस्तानचं हित डावललं असे आरोप इम्रान खान यांनी केले होते.

शरीफ यांचे काही भारतीय व्यापाऱ्यांसोबत संबंध असल्याच्या कारणावरून इम्रान खान यांनी त्यांना लक्ष्य केलं. थोडक्यात शरीफ हे 'गद्दार' आहेत असं ते म्हणाले होते. नवाझ शरीफ यांचे गुंतलेले हितसंबंध आणि लष्कराचा नव्या व्यापारी करारामधला हस्तक्षेप यांचा त्यांना विसर पडला. निवडणुकीच्या प्रचारातच काय त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात देखील त्याचा उल्लेख केला नाही.

इम्रान खान यांच्या सरकारमधल्या एका मोठ्या नेत्याने म्हटलं होतं की काश्मीरचा मुद्दा सोडवला जाईपर्यंत कोणताच व्यवहार होणार नाही. याचा देखील त्यांना लगेच विसर पडला.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा पाकिस्तानी लष्कर इम्रान खानला पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे.

भारतानं एक पाऊल उचललं तर दोन पाऊल उचलू असं ते म्हणाले. पण प्रश्न हा आहे की, त्यांना दोन पावलं तर सोडा अर्धं पाऊल देखील कोणी उचलू देणार आहे का?

भारताबद्दलचं धोरण हे रावळपिंडीतले 'बॉइज' (लष्कर) ठरवतात आणि भारतासोबत संबंध सुधारण्यासाठी आवश्यक पावलं ते उचलत नाहीत तोपर्यंत काही होऊ शकत नाही. दहशतवादाला खतपाणी घालणारी आणि सातत्यानं दहशतवाद्यांची निर्यात करणारी शिबिरं जोपर्यंत ते पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाहीत तोपर्यंत भारत-पाकिस्तान संबंधांत सुधारणा होणं कठीण वाटतं.

फक्त खोटी आश्वासनं देण्यापेक्षा त्यांनी ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे. आता सध्या जे चित्र दिसत आहे त्यावरून तर असं वाटत नाहीये की, पाकिस्तान खोटी आश्वासनं देण्यापलीकडं काही करत आहे.

इम्रान खान यांचं म्हणणं आहे की, भारतीय माध्यमांनी त्यांना बॉलीवुड व्हिलनसारखं रंगवलं आहे. हे थोडंसं विचित्र आहे. पाकिस्तानी माध्यमात जे चित्र दिसत आहे, तसंच भारतीय माध्यमांनी त्यांच्याबाबतच वार्तांकन केलं आहे. पाकिस्तानमध्ये एकही भारतीय पत्रकार नाही. त्यामुळे त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही.

पाकिस्तानी माध्यमांनी जी काही विशेषणं लावली ती त्यांचीच कमाई आहे. त्यांनी प्रचारादरम्यान जी भाषणं केली त्यामुळे त्यांना तालिबान खान किंवा लष्कराचा हस्तक किंवा भारतविरोधी अशी विशेषणं लावण्यात आली. भारतीय माध्यमांवर ताशेरे ओढण्याआधी त्यांनी स्वतःच्या उक्ती आणि कृतीकडे पाहायला हवं होतं.

आता प्रश्न आहे की, इम्रान खान यांच्यामुळे भारत पाक संबंधात काही सुधारणा होणार होईल का? त्यांना निदान काही सुधारणा घडवून आणाव्याशा वाटत आहेत का? दोन्ही प्रश्नांचं उत्तर हे नकारात्मक आहे. 'मोदींचा यार' आणि 'पाकिस्तानचा गद्दार' अशी नवाझ शरीफ यांची हेटाळणी केल्यावर त्याच मार्गावर चालणं इम्रान खान यांना परवडणारं नाही.

Image copyright Reuters

त्यांना काही वाटलं तरी एक गोष्ट निश्चित आहे. ती म्हणजे त्यांच्या हातात फारसं काही नाही. खरी शक्ती लष्कराच्याच हातात आहे. पाकिस्तानी लष्कराला भारताबद्दल वाटणारा द्वेष आणि तिरस्कार इम्रान खान यांच्यासारखा नेता आल्यामुळे जाणार नाही.

भारत-पाक संबंध सुधारण्याबद्दल बोलणं तर सोडा पण असलेले संबंध बिघडण्याची शक्यता जास्त आहे. भारत आणि पाकिस्तान संबंध ताणले जाण्याची शक्यताच अधिक आहे. इम्रान खान यांचं सातत्यानं भारताविरोधात बोलणं यामुळे वातावरण बिघडू शकतं. नवाझ शरीफ यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवत भारताविरोधात काही बोलणं टाळलं पण त्यांच्या साथीदारांनी मात्र भारताविरोधात बोलणं सुरूच ठेवलं. पण इम्रान खान हे स्वतःच भारताविरोधात बरं-वाईट बोलू शकतात.

Image copyright Sean Gallup/Getty Images

भारत पाक संबंधांमध्ये सध्या तरी सुधारणा होण्याची शक्यता कमी दिसत आहे. पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत, तर पुढच्या वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत भारत-पाकिस्तान संबंधात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यानच्या काळात पाकिस्तान चाणाक्षपणा दाखवून आपणही काही केलं असं आपल्या पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांना दाखवू शकतो. म्हणजे सीमेवरील लष्कर काही मागे घेणं, परस्पर सहमतीनं सैनिकांची संख्या कमी करणं या गोष्टी पाकिस्तान करू शकतो.

भारताने या गोष्टींचं फारसं स्वागत केलेलं दिसत नाही. या व्यतिरिक्त पाकिस्तानकडून भारताने फार काही अपेक्षा ठेऊ नये. भारताला कठोर शब्दांशिवाय काही मिळणं सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये दुरावा वाढेल ही देखील वस्तुस्थिती आहे.

(सुशांत सरीन हे ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये संशोधन करतात. त्यांनी मांडलेली मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)