ओशोंशी सेक्सवरून माझ्या मनात ईर्षा का असेल? - आनंद शीला

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : ओशोंशी सेक्सवरून मनात ईर्षेचा प्रश्नच नाही - मा आनंद शीला

"माझ्यासोबत सेक्स करण्याची तिची इच्छा होती पण ती पूर्ण न झाल्याने तिच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली होती," असं वक्तव्य भगवान रजनीश किंवा ओशो यांनी त्यांच्या खासगी सचिव मा आनंद शीला यांच्याबाबत केलं होतं. ओशोंच्या या आरोपाला अनेक दिवसांनी मा आनंद शीला यांनी बीबीसी स्टोरीजच्या डॉक्युमेंटरीमध्ये उत्तर दिलं आहे. नेटफ्लिक्सने वाइल्ड वाइल्ड कंट्री ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित केली आणि त्यानंतर मा आनंद शीला पुन्हा एकदा चर्चेत आल्या.

रोल्स रॉयस गाड्यांचा ताफा, रोलेक्स घड्याळं, डिझायनर कपडे आणि फ्री सेक्सला समर्थन केल्यामुळे ओशो किंवा भगवान रजनीश हे वादग्रस्त ठरले होते. 70च्या दशकात भगवान रजनीशांना भारतात अमाप प्रसिद्धी मिळाली होती आणि 80च्या दशकात अमेरिकेतून ते भारतात परतले. सुमारे वीस वर्षांच्या काळात ओशोंचा समुदाय जगभर पसरला. या विस्तारात त्यांच्या खासगी सचिव मा आनंद शीला यांचा मोठा वाटा होता.

भारतात ओशोंच्या शिष्यांची संख्या दिवसेगणिक वाढू लागली होती. अमेरिकेतही ओशोंचा समुदाय वाढू लागला होता. त्यांच्या वाढणाऱ्या समुदायाचा आवाका लक्षात घेता पुण्यातील आश्रमाची जागा अपुरी पडू लागली आणि भगवान रजनीश आपल्या नव्या आश्रमासाठी जागेचा शोध घेऊ लागले. त्यांना ज्या प्रकारचा आश्रम बांधायचा होता त्यासाठी हजारो एकर जागा लागणार होती. पण भारतात भगवान रजनीशांचा समुदाय वादग्रस्त ठरत असल्यामुळे त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात जागा मिळण्यासाठी अनंत अडचणी येऊ लागल्या. रजनीश यांच्या खासगी सचिव लक्ष्मी यांनी अनेक प्रयत्न करूनही हवी तशी जागी मिळत नव्हती.

त्यावेळी एक तरुणी पुढं आली आणि ओशोंना म्हणाली, "जर तुमची इच्छा एखाद्या व्यक्तीला पूर्ण करता येत नसेल तर दोष त्या व्यक्तीचाच आहे. जर भारतात हवी तशी जागा मिळत नसेलही पण दुसऱ्या देशात तर मिळू शकते ना?"

त्या तरुणीची जिद्द पाहून ओशोंनी लक्ष्मी यांना हटवलं आणि मा आनंद शीला या ओशोंच्या खासगी सचिव झाल्या. ओशोंचं खासगी सचिव होणं म्हणजे आश्रमाचं सर्व प्रशासन तुमच्या हाती येणं असं समीकरण होतं.

शीला पटेलच्या त्या मा आनंद शीला झाल्या

1949मध्ये मा आनंद शीला यांचा बडोद्यात जन्म झाला. त्यांचे वडील अंबालाल पटेल हे ओशोंचे शिष्य होते. ओशो नेहमी त्यांच्या घरी येत असत. त्यावेळी शीला या 16 वर्षांच्या होत्या. त्या सांगतात, "ओशोंना पाहिलं आणि मी तात्काळ त्यांच्या प्रेमात पडले आणि संन्यास घेतला." नंतर त्या अमेरिकेत शिक्षणासाठी गेल्या आणि भारतात परतल्या. त्यानंतर त्या ओशोंच्या पुणे येथील आश्रमात राहू लागल्या.

Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा शीला यांच्याबरोबर रजनीश

ओशोंना काय हवं आहे, त्यांच्या विस्ताराच्या काय योजना आहेत याचा शीला यांना योग्य अंदाज येत असे.

नेटफ्लिक्सची डॉक्युमेंट्री वाइल्ड वाइल्ड कंट्रीमध्ये त्या सांगतात, आम्हाला ज्या गोष्टी साकारायच्या होत्या त्यासाठी पैशांची गरज होती आणि ओशोकडे मेडिटेशन हे प्रोडक्ट होतं. ओशोंकडे मार्केटिंगची क्षमता होती त्यांनी ते प्रोडक्ट तयार केलं आणि मला संस्था कशी चालवायची हे माहीत होतं.

आश्रम नव्हे हे तर शहरच

भारतात जागा मिळत नसल्यामुळे त्यांनी आश्रम अमेरिकेत स्थापन करायचा असं ठरवलं. अमेरिकेतच शिक्षण घेतल्यामुळे तिथं कामं कशी करून घेता येतात हे शीला यांना चांगलं ठाऊक होतं. त्यामुळेच त्यांनी ओशोंना सांगितलं आपण अमेरिकेत जाऊ मी जागा शोधते. ओशोंनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ओरेगॉन येथे 64,000 एकर जागा विकत घेतली.

Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा पुणे आश्रमात जागा अपुरी पडत असल्यामुळे ओशोंनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला होता.

त्या ठिकाणी आश्रम बांधण्यास सुरुवात झाली. तो आश्रम नव्हताच ते एक शहरच होतं. सर्व सोयी सुविधांनी सज्ज असं ते शहर वसवण्यात आलं. त्या ठिकाणी शेती करून अनुयायांची अन्नाची गरज भागवायची, सर्व दृष्टीनं परिपूर्ण असं शहर वसवायचं असा ओशोंचा विचार होता. हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी झटत होत्या त्या आनंद शीला.

जर 150च्या वर लोक एकत्र आले आणि त्यांनी मतदान करून ठराव मंजूर केला तर त्यांना अमेरिकेत शहराची स्थापना करता येते. याच नियमाचा आधार घेऊन रजनीशपूरमची स्थापना झाल्याचं जाहीर करण्यात आलं. तिथं काउन्सिलची स्थापना झाली. तिथं निवडणूकही होत असे. अर्थात हा देखावा असे शीला यांच्या मर्जीतील व्यक्तीचीच काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड होत असे.

'मला एखाद्या सम्राज्ञीसारखं वाटत असे'

अनेक महिने झटून खडकाळ माळरानावर शहर बनवलं गेलं. त्यानंतर तिथे ओशोंचं आगमन झालं. जगभरातले शेकडो अनुयायी त्या ठिकाणी आले. या आश्रमाला कम्युन म्हटलं जात असे. सर्व अनुयायांच्या देखभालीची जबाबदारी, पैशाचे सर्व व्यवहार, आश्रमाची सुरक्षा ही सर्व जबाबदारी मा आनंद शीला यांच्या हातात होती. आश्रमातल्या लोकांच्या गळ्यातील त्या ताईत बनल्या होत्या.

त्या म्हणतात, "मी एखाद्या सम्राज्ञी सारखं स्वतःला समजत होते."

Image copyright HUGH MILNE
प्रतिमा मथळा समोरच्या बाइकवर मागच्या सीटवर बसलेली शीला.

"जेव्हा आश्रमासाठी पैसा कमी पडत असे तेव्हा भगवान प्रबुद्धतेचं गाजर दाखवत असत. एकदा का त्या व्यक्तीला प्रबुद्ध घोषित केलं तर ती व्यक्ती त्याची सर्व संपत्ती दान करत असे. यासाठी तुम्ही केवळ ओशोंना जबाबदार धरू नका. त्यांना पैसे देणारे हे सर्व शहाणे लोक होते." असं त्यांनी बीबीसी स्टोरीजला सांगितलं. त्यातून त्यांनी खूप पैसा उभा केला पण जसा पैसा वाढू लागला तसे त्यांचे विरोधकही वाढले.

'कायद्यातील पळवाटा शोधल्या नाहीत तर तुमचेच नुकसान'

नाइके कंपनीचे संस्थापक बिल बोवरमन ओरेगॉनमध्येच राहत असत. त्यांच्या पुढाकाराने 1000 फ्रेंड्स ऑफ ऑरेगॉन या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेनी रजनीशपूरमला कायदेशीररीत्या विरोध करण्यास सुरुवात केली. रजनीशपूरमला उत्पादनं बनवण्याची परवानगी नाही असं म्हणत कम्युनला नोटीस पाठवण्यात आली. दिवसेंदिवस रजनीशपूरममध्ये राहणं कठीण होऊ लागलं. जर रजनीशपूरममध्ये काही गोष्टींना कायदेशीर परवानगी नाही तर आपण अॅंटलोपमध्ये जाऊन राहू असं शीला म्हणाल्या.

"जर तुम्हाला कायद्यातील पळवाटा शोधता येत नसतील तर ते तुमचं नुकसान आहे," असं शीला यांनी नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंट्रीत म्हटलं आहे.

रजनीशपूरमपासून 19 मैल अंतरावर असलेल्या अॅंटलोप येथे राहू लागले. अॅंटलोपची लोकसंख्या केवळ 45 इतकी होती. जास्त पैसे मोजून त्यांनी अॅंटलोपमध्ये जागा घेण्यास सुरुवात केली. अनेक दिवसांपासून स्थानिकांच्या जागेला भाव मिळत नव्हता. अचानक इतका पैसा पाहून ते हो म्हणू लागले पण काही स्थानिकांनी मात्र आपल्या जागा विकल्या नाही. ज्यांनी जागा विकली नाही त्यांचा आणि अनुयायांचा संघर्ष होऊ लागला. काही अनुयायी आश्रमात तर काही अनुयायी अॅंटलोपमध्ये राहत असत.

Image copyright SAMVADO KOSSATZ
प्रतिमा मथळा रजनीश यांची एक झलक पाहण्यासाठी शिष्य कैक तास प्रतीक्षा करायचे.

गावकरी आश्रमावर हल्ला करू शकतील अशी भीती शीला यांना वाटू लागल्यानंतर त्यांनी अत्याधुनिक शस्त्रं आश्रमात आणली आणि अनुयायांना शस्त्र चालवण्याचं ट्रेनिंगही दिलं.

गावकऱ्यांनी विरोध करू नये म्हणून तिथलं काउन्सिल आपल्या हातात घेण्यासाठी देखील शीला यांनी प्रयत्न सुरू केले. तिथल्या काउन्सिलवर देखील त्यांनी आपला ताबा मिळवला. आता गावकरी विरोध करू शकत नव्हते पण अजूनही त्या भागातले म्हणजेच काउंटीतील लोक त्यांना विरोध करू शकत होते. रजनीशपूरम वास्को काउंटीत राहावं की नाही यावर जर मतदान झालं असतं तर तिथून सर्वांना निघून जावं लागलं असतं. त्यामुळे वास्को काउंटीवर आपली सत्ता यायला हवी. असं शीला यांना वाटत होतं.

शीला यांनी ओरेगॉन आणि डल्लास या भागातील बेघरांना आश्रमात आणलं. त्यांना खाऊपिऊ घातलं. म्हणजे जेव्हा मतदान होईल तेव्हा ते लोक आपल्या बाजूने मतदान करतील आणि रजनीशपूरम याच ठिकाणी राहील असा त्यांचा विचार होता. पण ऐनवेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं इतर भागातून आणलेल्या बेघरांना मतदानाचा अधिकार नाही. त्यासाठी ते स्थानिकच हवेत.

जैविक हल्ला

जर स्थानिकांनी मतदान केलं तर आपण नक्की हरणार हे शीला यांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी पूर्ण ओरेगॉनवर जैविक हल्ला करायचं ठरवलं. त्यासाठी एक योजना आखली गेली. 1983मध्ये शहरातल्या हॉटेलमध्ये सालमोनेला या जीवाणूचा हल्ला करायचा म्हणजे जे लोक ते अन्न खातील ते टायफॉइडने आजारी पडतील. योजनेप्रमाणे त्यांच्या सहकाऱ्यांनी स्प्रेच्या साहाय्याने हॉटेलमधील अन्नावर सालमोनेलाचा हल्ला केला. त्यांच्या या कृतीमुळे 751 जण आजारी पडले होते.

"इतक्या लोकांना जीव धोक्यात तुम्ही घातला त्याबद्दल काय सांगाल?" असं बीबीसी स्टोरीजने त्यांना विचारलं असता त्या म्हणतात, "मी एका कारणासाठी त्या विषयावर बोलणं टाळते, ते म्हणजे मी जे काही केलं त्याची मी शिक्षा भोगली. एकदा त्या व्यक्तीनं शिक्षा भोगली तर तिला समाजात आल्यावर निर्दोष व्यक्तीसारखं वागवलं गेलं पाहिजे. माझ्या चुकांची शिक्षा मला जन्मभर देणं योग्य नाही."

'सेक्समुळे ईर्षा उत्पन्न होण्याचा प्रश्नच नव्हता'

त्यांच्या या हालचाली सुरू असतानाच ओशो आणि त्यांच्यातील कुरबूर वाढत गेली. ओशोंनी आपलं मौन सोडलं आणि शीला यांच्यावर आरोप केले. "शीला ही भ्रष्टाचारी, लोकांच्या हत्येचा प्रयत्न करणारी महिला आहे," असं ते म्हणाले. त्यांच्या या बोलण्यामुळे खूप दुःख झाल्याचं त्या सांगतात.

ओशो म्हणाले होते, "शीलाच्या मनात ईर्षा आहे. त्यांना माझ्यासोबत सेक्स करायचं होतं. पण माझा एक नियम होता की खासगी सचिवासोबत कधीच शरीरसंबंध ठेवायचे नाहीत त्यामुळे मी तसं केलं नाही."

Image copyright osho international foundation

या संदर्भात बीबीसी स्टोरीजच्या प्रतिनिधीने मा आनंद शीला यांना विचारला असता त्या सांगतात माझ्या मनात ईर्षा नव्हती. मला बरेच प्रियकर होते. त्यामुळे आमच्यात सेक्सचा काही प्रश्न नव्हता."

'लोकांचं आयुष्य घोटाळ्यांनी भरलेलं आहे'

ओशोंना न भेटताच त्यांनी अमेरिका सोडली आणि जर्मनीत गेल्या. काही महिने तिथे राहिल्यानंतर त्यांना अमेरिकेत प्रत्यर्पित करण्यात आलं. अमेरिकन कोर्टानं त्यांच्यावर भ्रष्टाचार, फसवणूक आणि हत्येच्या प्रयत्नाचे आरोप ठेवले. त्यांनी हे आरोप मान्य केले आणि त्यांना 20 वर्षांची शिक्षा झाली.

39 महिने तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्या स्वित्झर्लंडल्या गेल्या. तिथं त्यांनी त्यांचे जुने सहकारी आणि ओशोंचे एकेकाळचे अनुयायी उर्स बर्नस्टिल यांच्याशी लग्न केलं. तिथेच त्यांनी दोन नर्सिंग होम विकत घेतले आणि त्या चालवू लागल्या. आता त्या स्वित्झर्लंडमध्ये राहतात.

"स्कॅंडल्सबद्दल चर्चा करणं किंवा घोटाळ्यांमागे धावणं हा मानवी स्वभाव आहे. लोकांची आयुष्यं घोटाळ्यांनी भरलेली असतात त्यामुळे ते घोटाळ्यांमागे धावतात," असं त्या सांगतात.

"मला काम करत राहायला आवडतं आणि ते मी करते," असं त्या सांगतात. आता त्या त्यांच्या नर्सिंग होममध्ये आजारी आणि वृद्धांची देखभाल करतात. त्या म्हणतात, "आधी मी सर्टिफाइड शहाण्या लोकांमध्ये राहत होते आता मी सर्टिफाइड आजारी लोकांमध्ये राहते."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)