इंडोनेशियाच्या भूकंपातून असा निसटला मुंबईकर

लाँबॉक Image copyright Getty Images

पहिले काही सेकंद काय घडलं हे माझं मलाच कळलं नाही... मला वाटलं की, मी स्वप्न बघतोय आणि स्वप्नात काही तरी हलतंय... पण काही क्षणात डोळे उघडले आणि कळलं की ते स्वप्न नाही वास्तव आहे... सकाळची ६ वाजून ४७ मिनिटं झाली होती आणि इंडोनेशियाच्या लाँबॉक बेटांना भूकंपानं हादरवून सोडलं होतं...

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये एक महिन्याचं ट्रेनिंग आणि काम संपवून मी लाँबॉकजवळच्या गिली बेटांवर सुट्टीसाठी गेलो होतो. गिली त्रावांगम हे ३ गिली बेटांपैकी सगळ्यांत मोठं बेट. गिली मिनो आणि गिली एअर ही दुसरी दोन बेटं.

गिली त्रावांगमवर ४ दिवस मनसोक्त घालवल्यानंतर रविवारचा दिवस माझा परतीच्या प्रवासाचा होता. मी शनिवारी रात्रीच पॅकिंग करून ठेवलं होतं. पण परतीचा प्रवास आणि रविवारची ती सकाळ इतकी भयावह असेल याचा विचारही मी केला नव्हता. मी राहात होतो ती हॉटेल रूम बांबूची आणि लाकडापासून बनलेली होती. जेव्हा फॅनपासून लाकडी कपाटांपर्यंत सगळं गदागदा हलू लागलं तेव्हा कळलं की भूकंप झाला.

मी माझ्या रूमच्या बाहेर पाहिलं तेव्हा मात्र झोप पूर्णपणे उडाली. स्विमिंग पूलनं समुद्राचं रूप धारण केलं होतं. स्विमिंग पूलमध्ये अशा लाटा त्या दिवशी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिल्या.

जेव्हा मी पळत रूमच्या बाहेर गेलो तेव्हा आजू-बाजूच्या रूममधील मित्र-मैत्रिणीही बाहेर आले होते. आम्ही सगळे हॉटेलच्या बाहेर मोकळ्या जागेकडे धावलो. पण हादरणं काही थांबलं नव्हतं. जवळपास ३० सेकंदांनी जरा सगळं थंडावलं आणि आम्ही धीर एकवटला. खरं सांगायचं तर त्या क्षणी मला वाटलं होतं की, आज इथेच माझी समाधी बनते.

मी घाबरलो तर होतो पण आमच्या हॉटेल मॅनेजरनं धीर दिला की, "काही होणार नाही इंडोनेशियात भूकंप होतच असतात." ते खरंही आहे, इंडोनेशियाला भूकंप काही नवीन नाहीत. कारण हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. जवळपास १५ मिनिटांनी आम्ही परत रूमवर गेलो. वाटलं की, आता सगळं झालं असेल पण तितक्यातच पहिला आफ्टरशॉक आला.

तो झटका इतका स्ट्राँग होता की तो 'आफ्टरशॉक' होता की पुन्हा भूकंप झाला, हे कळत नव्हतं. पुन्हा सगळे धावत रूमच्या बाहेर पडले. पण यावेळी बेटावरचे स्थानिकही घाबरलेले दिसले. आमच्या मॅनेजर अँडीला विचारलं तर तो म्हणाला, "इतक्या मोठ्या भूकंपांची आम्हालाही सवय नाही. आमची घरं, हॉटेल, दुकानं ही लाकडी आणि बांबूची आहेत त्यांना काही व्हायला नको आणि कुणाला इजा व्हायला नको बस्स!"

त्यावेळी मला भूकंप म्हणजे काय ते पहिल्यांदा कळलं. भूकंपाचे छोटे-मोठे धक्के मी या अगोदर खाल्ले होते. पण इतक्या मोठ्या भूकंपाचा पहिल्यांदा सामना करत होतो. थोड्या वेळानं पुन्हा सगळं शांत झालं पण पर्यटक बिथरले होते आणि स्थानिक त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते.

तेव्हा सकाळचे ७.३० वाजले असतील. मला लाँबॉक एअरपोर्टसाठी निघायचं होतं, पण अँडीनं ठरवलं की तू आत्ताच नीघ.

त्याच्या आवाजात मला थोडा ताण जाणवत होता पण त्याला नेमकं काय म्हणायचं ते कळत नव्हतं. मी सगळं आवरलं होतंच त्यामुळे मी लगेच तयार झालो आणि चेक आऊट करून जेट्टीसाठी निघालो. जेट्टीकडे निघताना मात्र माझ्या पोटात गोळा आला आणि कळलं अॅंडी नेमकं काय सुचवत होता. तोपर्यंत ८.३० वाजले होते आणि आम्ही जेट्टीवर पोहोचलो होतो. समोरचा समुद्र बघून 'आज काही मी हे बेट सोडत नाही' असं मनात म्हटलं.

Image copyright Getty Images

भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले होते आणि त्यामुळे त्सुनामी येते की काय हा प्रश्न सगळ्यांसमोर आ वासून उभा होता. रात्रभर बेटावर लाईट नसल्यानं माझा फोनही बंद होता. इंटरनेटची अवस्था तर विचारूच नका. पण बेटावरच्या काही ज्येष्ठ नागरिकांनी आणि कोळ्यांनी आम्हाला धीर दिला.

"आम्ही आमच्या समुद्राला ओळखतो, अजून उधाण आलं नाहीये त्यामुळे त्सुनामी काही येणार नाही," असं त्यांनी अगदी छाती ठोकून सांगितलं.

त्यावेळी त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय काय होता. आम्ही जवळपास ८-१० जण सकाळी सकाळी लाँबॉकसाठी निघालो होतो. लाँबॉकवरून विमानतळापर्यंतचा प्रवास गाडीनं २ तासांचा. त्यामुळे कसंही करून गिलीवरून लवकर निघणं भाग होतं. अॅंडी आणि त्याच्या मित्रांनी जुळवाजुळव करून आम्हाला दोन स्पीड बोटी मिळवून दिल्या.

तोपर्यंत कोणी तरी लोकल मीडियाचे रिपोर्ट पाहिले होते. त्सुनामी वॉर्निंग जारी केली नव्हती. जीव भांड्यात पडला आणि गिली ते लाँबॉकचा आमचा प्रवास सुरू झाला.

खरं तर गेले काही दिवस गिलीचा समुद्र उफाळलेलाच होता. याची प्रचिती मला दोन दिवसांपूर्वीच आली होती जेव्ही मी डायव्हिंगसाठी गेलो होतो. येताना समुद्रानं ज्या काही थपडा लगावल्या होत्या, त्या माझ्या डोळ्यासमोर लख्खपणे उभ्या होत्या. पण हे मी कोणाला सांगूही शकत नव्हतो. 'ऑल इज वेल' म्हणत त्या स्पीड बोटीत बसलो खरा पण पाचव्या मिनिटाला समुद्रानं आपलं रूप दाखवलं.

बेटावरची समाधी परवडेल पण जलसमाधी नको, या एकाच विचारानं मी पुरता घाबरलेलो. पण माझ्याबरोबरचे सगळेच घाबरलेले. त्यामुळे त्यात भर नको म्हणून कोणी तोंडातून ब्रसुद्धा काढत नव्हतं. अखेर २० मिनिटांनी आम्ही लाँबॉकच्या किनाऱ्यावर पोहोचलो आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

तोपर्यंत काहीच कल्पना नव्हती की किती मोठा भूकंप आहे? नेमकी काय परिस्थिती आहे? मला घ्यायला आलेल्या ड्रायव्हरनं - सोफियाननं सांगितलं, "सर, ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप होता. तुम्ही होता ना त्यापासून अगदी काही किलोमीटरवर केंद्र होतं म्हणे. आत्तापर्यंत ३ जण दगावलेत."

भूकंपाचं केंद्रस्थान लाँबॉक बेटांच्या उत्तरेकडे असलेल्या माऊंट रिंजानी या ज्वालामुखीच्या जवळ सांगितलं होतं. आम्ही होतो ती गिली बेटं लाँबॉकच्या वायव्येला होती. म्हणजेच त्या ज्वालामुखीच्या जवळपास ३० किलोमीटर अंतरावर.

लाँबॉककडून मी एअरपोर्टकडे निघालो. त्यावेळी लवकरात लवकर एअरपोर्टला पोहोचायचं इतकंच डोक्यात होतं. पण 'प्लीज एअरपोर्ट सुरू असू दे', असंही मनोमन वाटत होतं.

माझा ड्रायव्हर सोफियान सांगत होता, "सर माझा मुलगा पलंगावरून पडला. बायको तर रडायलाच लागली. घराला काही झालं नाही आणि सगळे नीट आहेत यातच सगळं आलं."

पण भूकंपानंतर लगेच तो मला घ्यायला निघाला होता, बायका पोरांना सोडून. त्यामुळे त्यानं विचारलं, "सर माझं घर वाटेवरच आहे, सेंगिगीजवळ. जाता जाता एकदा बायको आणि मुलांना बघून पुढे जाऊया का?"

Image copyright Getty Images

मी नाही म्हणणं शक्यच नव्हतं. तेव्हा विचार आला, बेटावर असलेल्यांचं काय? मी निघेपर्यंत बेट शांत होतं. कुठे काही घडलं नव्हतं. फार पडझड झाली नव्हती आणि कोणाला इजाही झाली नव्हती. पण आत्ता काय परिस्थिती असेल? खरंतर या सगळ्याचा मला विचारही करवत नव्हता.

एकामागून एक आफ्टरशॉक लागतच होते. सोफियानची बायको आणि त्यांचा मोठा मुलगा अगदी मुख्य रस्त्यावर वाट पाहात उभे होते.

त्यांनी सांगितलं, "गावात पडझड झाली आहे. काही घरांची छप्परं पडली आहेत." या बातम्या घेऊन मी एअरपोर्टकडे निघालो.

गाडीत थोडा फोन चार्ज केला पण त्यानं फार साथ दिली नाही.

Image copyright Getty Images

एअरपोर्टवर पोहोचल्यावर जीव भांड्यात पडला कारण तिकडे सगळं काही व्यवस्थित होतं. फोन जिवंत झाल्यावर पहिलं ऑफिसला कळवलं की, मी नीट आहे. तोपर्यंत आफ्टरशॉक्सची संख्याही वाढली होती. त्या भूकंपाने १० जणांचा जीव घेतला होता.

फेसबुकवर जेव्हा लिहिलं तेव्हा, 'काळजी घे रे' पासून 'लगेच परत ये' असे सगळे मेसेज आले. पण आता मी सुरक्षित होतो. किमान मला तरी हे वाटत होतं. त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय देताना, अरे काळजीचं कारण नाही, सगळं व्यवस्थित आहे हेच सांगत होतो.

पण खरं सांगू लाँबॉक सोडताना, मी सुटकेचा निःश्वास टाकला. अशी परिस्थिती परत कोणावरही येऊ नये हेच वाटलं कारण या जीवघेण्या भूकंपातून मी कसाबसा निसटलो होतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)