अॅमेझॉनचे जेफ बेझोस : जगातल्या सर्वांत श्रीमंत माणसाची भन्नाट गोष्ट

अॅमेझॉन, ईकॉमर्स, व्यापार, अर्थव्यवस्था Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझॉस

भविष्यात एका क्लिकवर जगातल्या कुठल्याही ब्रँडची वस्तू खरेदी करता येईल हे भविष्य जेफ बेझोस यांना आधीच दिसलं होतं.

मॉल्सची लोकप्रियता कमी होत जाईल आणि बाकी दुकानं आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असतील. हे लक्षात घेतल्यानंतरच जेफ यांनी अॅमेझॉनचं साम्राज्य उभारण्याचा निर्णय घेतला असावा.

1994मध्ये स्थापन झालेली अॅमेझॉन, अब्जावधींच्याही पुढे कारभार करणारी ही पहिली कंपनी ठरण्याच्या मार्गावर आहे.

अॅमेझॉनवरून एकेकाळी जुन्या पुस्तकांची विक्री होत असे आणि आता तर कोणतीही वस्तू अॅमेझॉनवरून मागवता येते.

जेफ बेझोस ही जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. आता त्यांचं लक्ष्य फक्त पुढे जाणं नाही तर सगळ्या जगाच्या किरकोळ बाजारपेठेची नव्यानं बांधणी करणं हे आहे.

2013 मध्ये त्यांनी 'वॉशिंग्टन पोस्ट'ची मालकी मिळवली. याच्या दहा वर्षं आधी त्यांनी ब्ल्यू ओरिजन नावाच्या एरोस्पेस कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीद्वारे ग्राहकांना पुढच्या वर्षापासून अंतराळाची सफर घडवून आणण्याचा त्यांचा इरादा आहे.

काही वर्षांपूर्वी जेफ यांच्या कॉलेजमधल्या प्रेयसीनं वायर्ड या मासिकाशी बोलताना सांगितलं होतं की, "जेफ नशीब काढेल अशी अपेक्षा होतीच. त्याला अंतराळाविषयीचं आकर्षण खूप आधीपासूनच होतं."

"केवळ पैशांच्या बाबतीत नव्हे तर भविष्य बदलवण्यासाठी त्या पैशाचं काय करता येईल याबाबत त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना होत्या," असं त्यांनी त्या मासिकाला सांगितलं.

अंतराळ वसाहतीची कल्पना

जेफ बेझोस यांच्या डोक्यातल्या महत्त्वाकांक्षी योजनांचा अंदाज काही दशकांपूर्वीच आला होता.

जेफ यांचा जन्म 12 जानेवारी 1964 रोजी न्यू मेक्सिकोतल्या अल्बुकर्क येथे झाला. त्यांच्या आईचं नाव जॅकी जॉरगन्सन तर वडिलांचं नाव टेड जॉरगन्सन असं आहे.

जेफ यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईचं वय केवळ 17 होतं. जॅकी आणि टेड यांचं नातं जेमतेम वर्षभर टिकलं. त्यानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाला.

आई आणि सावत्र वडील माइक बेझोस यांच्या सहवासात जेफ टेक्सास आणि फ्लोरिडा येथे मोठे झाले.

Image copyright Blue origin
प्रतिमा मथळा जेफ यांनी अंतराळात वसाहतीची कल्पना मांडली आहे.

विज्ञान आणि इंजिनियरिंग यांच्याकडे जेफ यांचा ओढा वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच दिसू लागला होता. ब्रेड स्टोनलिखित जेफ यांच्या चरित्रात म्हटलंय की, तीन वर्षांचे असतानाच त्यांनी स्क्रूड्रायव्हरनं पाळण्याचे सगळे भाग मोकळे केले होते.

हायस्कूलचं अर्थात माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर केलेल्या भाषणात जेफ यांनी अंतराळात वसाहत वसवण्याचं डोक्यात असल्याचं म्हटलं होतं.

1986मध्ये त्यांनी प्रिंन्स्ट्न विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये अर्थविषयक कंपन्यांमध्ये काम केलं. याचदरम्यान त्यांची आणि मॅकेन्झी यांची भेट झाली. पुढे मॅकेन्झी याच त्यांच्या आयुष्याच्या साथीदार झाल्या. मॅकेन्झी आता कादंबरीकार आहेत.

इंजिनियरिंग आणि विज्ञानाची आवड, अचाट आणि अतरंगी अशा कल्पना, या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक महत्त्वाकांक्षा यातूनच अॅमेझॉनचा जन्म झाला.

नोकरी सोडली आणि...

इंटरनेटचा वाढता व्याप लक्षात घेऊन 30व्या वर्षी जेफ यांनी नोकरीस रामराम केला.

प्रिन्स्टन विद्यापीठात 2010 मध्ये केलेल्या भाषणात जेफ यांनी त्या निर्णयाबद्दल भाष्य केलं. अॅमेझॉन सुरू करण्याचा तुलनेनं असुरक्षित मार्ग स्वीकारला.

हा निर्णय फारसा विचारपूर्वक घेतला नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा जेफ पत्नी मॅकेन्झीसोबत

ते म्हणाले, "मी एका क्षणात काहीतरी डोक्यात ठेऊन निर्णय घेतला होता. प्रयत्न करून अपयशी झालो तर निराश होणाऱ्यातला मी नाही. मी असं केलं नसतं तर प्रयत्नच केले नाहीत याची खंत मनात राहिली असती."

ईकॉमर्स किंग

जेफ यांनी स्वत:च्या ईकॉमर्स कंपनीत पैसे टाकले. कुटुंबीयांच्या मदतीनं त्यांनी 100,000 डॉलरची गुंतवणूक केली. जेफ यांच्या डोक्यातल्या कल्पना कंपनीद्वारे प्रत्यक्षात साकारू लागल्या.

गॅरेजमध्ये जुनी पुस्तकं विकण्याच्या कल्पनेतून अॅमेझॉनची आयडिया जेफ यांना स्फुरली होती.

'द एव्हरीथिंग स्टोर : जेफ बेझोस अँड द एज ऑफ अॅमेझॉन' या ब्रॅड स्टोनलिखित पुस्तकात अॅमेझॉन कंपनीच्या सुरुवातीच्या दिवसांबाबत उल्लेख आहे. 1995मध्ये कंपनीची स्थापना झाल्यानंतर एक महिन्याच्या आत अमेरिकेतली 50 राज्यं आणि 45 देशांकडून ऑर्डर्स मिळाल्या होत्या.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अॅमेझॉनचा पसारा दिवसेंदिवस वाढत आहे.

पहिल्या पाच वर्षांत अॅमेझॉनच्या ग्राहकांची संख्या एक लाख 80 हजारहून वाढून एक कोटी 17 लाख एवढी झाली आहे. अॅमेझॉनची विक्री 5 लाख 11 हजार डॉलरहून वाढून 1.6 अब्ज डॉलर एवढी झाली आहे.

डॉटकॉमच्या पहिल्या लाटेत बड्या गुंतवणुकदारांनी अॅमेझॉनमध्ये पैसा गुंतवण्यात स्वारस्य दाखवलं आहे. 1997मध्ये अॅमेझॉन शेअर बाजारात दाखल झाली आणि बघता बघता पुस्तकांचे गठ्ठे बांधणारे जेफ 35व्या वर्षी जगातल्या सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक ठरले.

1999 साली टाइम मासिकानं जेफ यांना 'किंग ऑफ सायबर कॉमर्स' अशी उपाधी दिली.

प्रयोगांची भीती नाही

नवनवीन प्रयोग करायला आणि पैसे कमवायला गुंतवणूक करण्यात जेफ मागेपुढे पाहत नाहीत. सेवेची किंमत कमी करणं, मोफत डिलिव्हरी आणि किंडल ई रीडरसारखं डिव्हाइस विकसित करण्यासाठी अनेक वर्षं काम सुरू होतं.

पण जिथे शक्य होतं तिथे अॅमेझॉननं बचतीवर लक्ष केंद्रित केलं. अॅमेझॉन मुख्यालय परिसरात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पार्किंगचं शुल्क घेण्यात येतं. पैसे वेळच्या वेळी चुकते न करणाऱ्या माणसांशी लढाई, गोदामांमध्ये कामगारांच्या संघटना उभ्या राहू नयेत यासाठी प्रयत्न करणं आणि शक्य होईल तेवढा कमीत कमी कर भरणं यासाठी अॅमेझॉन ओळखलं जातं.

अॅमेझॉनने सुरुवातीला Pets.com या कंपनीत केलेली गुंतवणूक चांगलीच महागात पडली होती. मात्र तरीही नवउद्योग अर्थात स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करायला ते कचरत नाहीत.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अॅमेझॉन

गेल्याच वर्षी अॅमेझॉनने होल फूड्स खरेदी केलं. यावर्षी त्यांनी एक फार्मसी कंपनी ताब्यात घेण्याचीही घोषणा केली.

अॅमेझॉनने यंदा जून महिन्यापर्यंत 53 अब्ज डॉलर एवढ्या प्रचंड रकमेच्या वस्तूंची विक्री केली आहे. या व्यवहारातून 2.5 अब्ज डॉलर्सचा नफा कमावला.

अॅमेझॉनमध्ये 5 लाख 75 हजार माणसं काम करतात. तेवढी तर लक्झेंबर्गची नावाच्या देशाची लोकसंख्या आहे.

अॅमेझॉन कंपनी हजारो छोट्या उद्योगांना लॉजिस्टिक्स पुरवते, खरेदी विक्रीसाठी व्यासपीठ देते.

अमेझॉनवर टीका

बाजारात एकीकडे अॅमेझॉनचं वर्चस्व वाढत असतानाच त्यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे. अॅमेझॉनची एकाधिकारशाही, कर न भरण्याची प्रवृत्ती आणि कामगार कायद्यातल्या अटीचं पालन करण्यात खळखळ यामुळे अॅमेझॉन टीकेचं लक्ष्य झालं आहे.

अमेरिकेच्या पोर्टल सर्व्हिसकडून अॅमेझॉन शिपिंगच्या अनावश्यक कमी दरांचा फायदा उकळत आहे, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अॅमेझॉनवर टीका होऊ लागली आहे.

टीकेची तीव्रता कमी करण्यासाठी जेफ ट्विटरवर सक्रिय राहू लागले आहेत. आईवडील तसंच घरच्या कुत्र्याबरोबरचे फोटो शेअर करत लोकांना आपलंसं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Opensecrets.org या वेबसाईटच्या मते 2014 मध्ये लॉबिंग अर्थात दबावगटासाठी त्यांनी दुपटीने पैसे खर्च केले आहेत. गेल्या वर्षी हा आकडा एक कोटी 30 लाख डॉलर एवढा होता.

या सगळ्या प्रयत्नांचा अॅमेझॉनच्या प्रतिमेवर काय परिणाम होतो आणि ते त्याचा कसा सामना करतात हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)