BBC SPECIAL: चीनमध्ये सुरू आहे बॉलीवुडच्या सिनेमांची 'दंगल'

चीन, हिंदी सिनेमा

चीनमध्ये भारतातल्या सिनेमांबद्दल खूप उत्सुकता असते. आमिर खानचे चाहते तर दिवसागणिक वाढतच आहेत. त्याचा आँखो देखा हाल बीबीसी प्रतिनिधी विनीत खरेंच्या शब्दात.

मी चीनच्या आन्हुई प्रांतातल्या एका गावात गेलो होतो. तिथे जेवत असताना एका सात वर्षांच्या मुलानं मला सांगितलं की त्यानं 'दंगल' सिनेमा पाहिला आणि त्याला तो खूप आवडला.

तो मुलगाच नाही तर जेवणाच्या टेबलापाशी असलेल्या बहुतांश लोकांनी सिनेमा पाहिला होता आणि त्यांना तो आवडलाही होता.

'दंगल', 'हिंदी मीडियम', '3 इडियट्स', 'पीके', 'टॉयलेट' या सिनेमांनी चीनच्या शहरांत, गावांमध्ये बॉलीवुड आणि भारताची अशी काही प्रतिमा तयार केली आहे की, ती तशी करणं परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्यांनाही कठीण आहे.

शांघायच्या एका उद्यानात मी आमिर खानचा चाहत्या कॅरन छन यांना भेटलो. हिंदी गाणं म्हणशील, या माझ्या फर्माईशीवर त्यांनी 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमातलं 'मैं चांद हूँ…' हे गाणं म्हटलं.

छन यांना हिंदी भाषेचं ज्ञान नाही. पण त्यांना या गाण्याचा अर्थ माहिती होता. 'दंगल'मुळे त्यांचा फक्त हिंदी सिनेमांशी परिचय झाला एवढंच नाही, तर त्या सिनेमानं त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावरही प्रभाव पाडला.

"दंगल पाहिला तेव्हा माझं वय 98 किलो होतं. सिनेमा पाहिल्यावर मी स्वत:लाच म्हटलं की, मी वजन कमी करू शकते. आता मी कशी दिसतेय बघ!" छन म्हणाल्या.

त्यांच्या सोबत असलेल्या टीना आणि लीफ म्हणाल्या की, त्यांनी सीडीज किंवा वेबसाईटवर भारतीय सिनेमे पाहणं सुरू केलं आहे.

लीफ म्हणाल्या, "भारतीय सिनेमे मी भारतीय संस्कृतीसाठी पाहते. त्यातली नृत्य, देवाची पूजा, हे सगळं मला खूपच भावतं."

चीन, हिंदी सिनेमा
प्रतिमा मथळा दंगलमधल्या गाण्यांवर नाचणारे आमिर खानचे चाहते.

2011मध्ये आलेल्या 3 इडियट्सचेही खूप चाहते आहेत. कॉलेजच्या कित्येक विद्यार्थ्यांनी हा सिनेमा ऑनलाइन पाहिला. त्यातून त्यांची हिंदी सिनेमाशी ओळख झाली.

चित्रपट विषयाच्या जाणकारांच्या मते 2014मध्ये आलेल्या धूम-3ने चीनमध्ये 20 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पण असं मानलं जातं की 2015मध्ये आलेल्या 'पीके'मुळे हिंदी सिनेमातला रस वाढला.

त्यानंतर आलेल्या 'दंगल'सारख्या सिनेमानं सगळे विक्रम तोडले.

चीन, हिंदी सिनेमा
प्रतिमा मथळा कॅरन छन, आमिर खानची चाहती.

हिंदी सिनेमांप्रमाणेच दाक्षिणात्य सिनेमांची चाहती असलेल्या व्हिवियन यांनी पीके पाठोपाठ बाहुबली-2 हा सिनेमाही पाहिला. तो सिनेमा त्यांना इतका आवडला की त्यानी सिनेमाची पोस्टर्स जपानहून मागवली.

जपानी भाषेच्या अनुवादक व्हिवियन म्हणतात, "बाहुबली-2ची कथा, गाणी, डान्स हे सगळं पाहून मी हरखूनच गेले. सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांनी भारतीय संस्कृतीचं अप्रतिम दर्शन घडवलं आहे."

बाहुबलीमधला हिरो, प्रभास यानं शांघायला जरूर यावं, असं व्हिवियनला वाटतं.

मध्य शांघायमधल्या एका कॅफेमध्ये व्हिवियनची भेट झाली. त्यावेळी तिच्या हातात प्रभासचं पोस्टर होतं. "प्रभासची फिट बॉडी, गोल चेहरा, कुरळे केस, स्टायलिश मिशा, गोड हास्य आणि भारदस्त आवाज...यामुळे आम्ही त्याला छोछो असं नाव दिलं आहे. प्रभासला पाहिल्यापासून मला मिशा आवडू लागल्या."

चीनमध्ये प्रत्येक कलाकाराला चिनी नाव दिलं जातं.

गेल्या काही वर्षांत चीनमध्ये थिएटरचं मोठं जाळं उभं राहिलं आहे. त्यामुळेत चीनमधला बॉक्स ऑफिसचा व्यवहार 8.6 बिलियन डॉलर्सपर्यंत गेला आहे.

डिलॉईटच्या एका अहवालानुसार, 2020पर्यंत बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांचे आकडे यात चीनची भरारी ही उत्तर अमेरिकेच्याही पुढे जाईल.

2016मध्ये बाहुबली-1, पीके, फॅन हे सिनेमे चीनमध्ये झळकले.

गेल्या वर्षी फक्त 'दंगल' हा एकमेव सिनेमा चीनमध्ये लागला. त्याला डोकलामचा वाद कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. पण जाणकारांना ते मान्य नाही.

चीन, हिंदी सिनेमा

या वर्षी आतापर्यंत, सीक्रेट सुपर स्टार, हिंदी मीडियम, बजरंगी भाइजान, बाहुबली-2 आणि टॉयलेट एक प्रेमकथा हे सिनेमे चीनमध्ये प्रदर्शित झाले. तर, सुलतान और पॅडमॅन लवकरच झळकणार आहेत.

भारतातले सिनेमे चीनमध्ये एवढे लोकप्रिय होत आहेत की चीनमधल्या सिनेमांच्या कथा, त्याची ट्रीटमेंट यावर प्रश्न विचारले जात आहेत.

बॉलीवुड आणि परदेशी सिनेमा चीनमध्ये मागवणारे चियानपिन ली यांच्या मते, ते कॉलेजच्या काळात 'थ्री इडियट्स'मधल्या सायलेन्सर या व्यक्तिरेखेसारखेच होते. पुस्तकांची घोकंपट्टी करायचे.

बीजिंगच्या पूर्वेला असलेल्या त्यांच्या कार्यालयात चियानपिन ली यांची भेट झाली. त्यांनी 'बींइंग ह्यूमन'चा टी-शर्ट घातला होता आणि त्यांच्या लॅपटॉपमध्ये भारतीय सिनेमांच्या क्लिप्स आणि व्हीडिओ होते.

चीन, हिंदी सिनेमा Image copyright AFP
प्रतिमा मथळा चियानपिन ली

ते म्हणतात, "थ्री इडियटस आणि हिंदी मीडियमसारख्या सिनेमांमध्ये कुटुंबव्यवस्था, नाती, आणि भावनांचं चित्रण असतं जे चिनी चित्रपटांमध्ये नसतं. कुटुंब, प्रेम, नाती भारतीय चित्रपटांच्या केंद्रस्थानी असतं. चीनच्या चित्रपटांमध्ये मात्र अॅक्शन, स्पेशल इफेक्ट्स, विचित्र प्लॉट असलं काही काही दिसतं. जे मला समजत नाही."

चियानपिन ली यांनी 2008 मध्ये 'थ्री इडियटस' पाहिला होता.

ते म्हणतात, "मला वाटलं की आमची शिक्षण व्यवस्थाही अशीच आहे. हा सिनेमा पाहिल्यावर मला माझं कॉलेजचं जीवन आठवलं. मला ही असंच आयुष्य हवं होतं पण मला मिळालं नाही."

चियानपिनना साऊथ इंडियन चित्रपटदेखील पसंत आहेत.

"माझी अशी इच्छा आहे की चीनमध्ये लोकांनी दक्षिण भारतीय चित्रपट पाहावेत. त्यात अॅक्शन मोठी करून दाखवली जाते, लोक आकाशात उडतात. मध्यंतरी मीही या सिनेमांच्या हिरोंसारखे रंगीबेरंगी कपडे घालणं सुरू केलं होतं. तेव्हा मला वाटलं की मी जरा जास्त साऊथ इंडियन सिनेमे पाहिलेत."

चीनमध्ये स्थानिक आणि परदेशी सिनेमांचा बिझनेस जवळपास 50:50 टक्के वाटला गेला आहे. परदेशी सिनेमांसाठी इथे परदेशी कोटा सिस्टीम आहे. म्हणजे दरवर्षी काही ठराविक सिनेमे चीनमध्ये रिलीज होऊ शकतात.

परदेशी चित्रपट म्हणजे हॉलिवुड, बॉलिवुड आणि इतर देशांचे सिनेमे. चियानपिनच्या मते चीनमध्ये दरवर्षी 800-900 सिनेमे रिलिज होतात. यातले 300-400 सिनेमे थिएटरपर्यंत पोहोचू शकतात. बाकी ऑनलाईन किंवा टीव्हीपर्यंत मर्यादित राहातात. त्या थेएटर्समध्ये रिलिज होऊ शकत नाही.

चीन, हिंदी सिनेमा
प्रतिमा मथळा चीनमध्ये स्थानिक आणि परदेशी सिनेमांचा बिझनेस जवळपास 50:50 टक्के वाटला गेला आहे.

बहुतांश सिनेमे तरुणांना समोर ठेवून बनवले जातात. मागच्या वर्षी बनलेल्या 'वुल्फ वॉरियर' नावाच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 5.6 अब्ज युआन कमवले. 1 युआन म्हणजे जवळपास 10 रुपये असा हिशोब आहे.

भारतीय चित्रपटांचा चीनमध्ये इतिहास

चीनमध्ये फिरताना मला लक्षात आलं की, 50-55 वर्षांच्या अनेक लोकांना राज कपूरच्या 'आवारा' सिनेमाच्या टायटलं साँगची चाल लक्षात आहे. 'आवारा हूँ' ला अनेक लोक 'आबालागू' म्हणून गातात.

'आवारा', जितेंद्र आणि आशा पारेखचा 'कारवां' सारख्या सिनमांची कथानकं किंवा गाण्यांच्या चाली लोकांच्या अजूनही लक्षात आहे.

या लोकांपैकीच एक आहे ईस्टार फिल्म्सचे प्रमुख अॅलन ल्यू.

बीजिंगच्या छाओयांग भागातल्या त्यांच्या ऑफिसमध्ये जायला एका मोठ्या हॉलमधून पायऱ्या चढून जावं लागतं.

त्या हॉलच्या भिंतीवर 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाचं पोस्टर लावलं होतं.

अॅलन 10-11 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आयुष्यातला पहिला सिनेमा पाहिला, तो सिनेमा होता आवारा. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे ही.

ते जुन्या आठवणी सांगतात. "मी दर आठवड्याला माझ्या आई-वडिलांसोबत एका मोठ्या मैदानात सिनेमा पाहायला जायचो. मध्यभागी एक मोठा स्क्रीन लावलेला असायचा आणि आम्ही खुर्च्यांवर बसायचो. मी पहिला सिनेमा पाहिला तो आवारा आणि दुसरा पाहिला त्याचं चीनी नाव होतं 'दा पंग छू' (कारवां)

अॅलन सांगतात की, 70 आणि 80 च्या दशकात चीनमध्ये कमर्शिअल थिएटरचं एवढं प्रस्थ नव्हतं. आणि बहुतांश लोक 500 ची आसन क्षमता असलेल्या कल्चरल थिएटरमधल्या सिंगल स्क्रीनमध्ये सिनेमे पाहायचे. परदेशी सिनेमांना डब केलं जायचं.

हिंदी, चिनी सिनेमा
प्रतिमा मथळा चीनमध्ये बहुतांश चित्रपट तरुणांना डोळ्यासमोर ठेवून बनवले जातात.

जाणकार सांगतात की, राजकीय आणि इतर कारणांमुळे अनेक वर्ष भारतीय सिनेमे चीनमध्ये दाखवले जात नव्हते .

आमिर खानच्या दंगल सिनेमाला अॅलन ल्यूच चीनमध्ये घेऊन आले. त्यांनी पहिल्यांदा हा सिनेमा मुंबईत आमिर खानच्या घरी पाहिला होता.

स्थानिक औषधी वनस्पती घालून केलेला चहा घेत ते माझ्याशी गप्पा मारत आहेत. "दंगल संपला तेव्हा मी रडत होतो. मला वाटलं हा सिनेमा माझ्याच आयुष्यावर बेतलेला आहे.

यात दाखवलं आहे की आई-वडील मुलांशी कसं वागतात. मला आठवलं की मी लहान होतो तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला कशा नव्या नव्या गोष्टी शिकवल्या होत्या. मला खात्री होती की हा सिनेमा चीनमध्ये जरूर चालणार."

ल्यू यांना वाटलं दंगल चीनमध्ये साधारण 2 अब्ज रुपयांची कमाई करेल. एवढी कमाई करणं हीसुद्धा कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी मोठी गोष्ट होती. पण या सिनेमाने 13 अब्ज कमाई करून सगळ्यांना चकित केलं.

चीनमध्ये खेळ किंवा ड्रामाशी संबंधित चित्रपट चालणार नाहीत असं वाटतं असतानाच दंगलने तुफान गल्ला जमवला. हा सिनेमा खेळ आणि ड्रामा यांचं पुरेपूर मिश्रण होतं.

हिंदी, चिनी सिनेमा
प्रतिमा मथळा सलमान खानचे फॅन्स

2015 मध्ये नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर होते तेव्हा दोन्ही देशातले संबंध सुधारण्याच्या दृष्टीने चीन सरकार प्रयत्न करत होती.

ल्यू सांगतात की, "2015 मध्ये आम्ही (चीन) सरकारच्या निवेदनानंतर भारतीय सिनेमे चीनमध्ये दाखवायला राजी झालो. आम्हाला वाटलं नव्हतं की, आमच्या थिएटर्समध्ये या सिनेमांना काही रिस्पॉन्स मिळेल. कारण आधी असं कधीच झालं नव्हतं."

चीनमध्ये धर्म संवेदनशील विषय आहे. पण त्यावेळी चीनमध्ये रिलिज झालेला 'पीके' सिनेमा मात्र धर्मावर आधारित होता.

"आम्ही सिनेमाच्या विषयापेक्षा आमिर खानला प्रमोट केलं. आमिर चीनमध्ये आले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केल्या, इंटरव्ह्यू दिले त्यामुळे बाजारावर खूप परिणाम झाला. आम्हाला वाटलं की सिनेमाचा बिझनेस 50 लाख युआन (50 कोटी रुपये) एवढा होईल पण त्याची कमाई 1 कोटी युआन (100 कोटी रुपये) एवढी झाली. चीनमध्ये रिलीज झालेल्या कोणत्याही भारतीय सिनेमासाठी हा एक रेकॉर्ड होता."

पीकेच्या यशाने खूश होऊन ल्यू यांनी 'बाहुबली -1', 'फॅन' सारखे इतरही चित्रपट चीनमध्ये आणले. पण ते सिनेमे नाही चालले. त्यानंतर ते दंगल सिनेमा चीनमध्ये घेऊन आले.

दंगल रिलिज झाल्यानंतर तिकिट बुकिंग अॅपवर लोकांच्या प्रतिक्रिया कशा आहेत ते ल्यू पाहात होते.

हिंदी, चिनी सिनेमा
प्रतिमा मथळा ल्यू दंगल सिनेमा चीनमध्ये घेऊन आले.

ते म्हणतात, "लोकांना दंगलकडे परदेशी चित्रपट म्हणून नाही पाहिलं. शेवटच्या सीनमध्ये दिसणारा भारतीय झेंडा पाहूनही त्यांना काही फरक पडला नाही. त्यावेळेस कोणी भारत किंवा चीनचा विचार करत नसतं."

दंगल नंतर सिक्रेट सुपरस्टारनेही चीनमध्ये जबरदस्त कमाई केली आहे.

पण आव्हानं काय आहेत?

चीनच्या चित्रपट उद्योगाशी संबंधित लोक सांगतात की चीनमध्ये भारतीय आणि हॉलिवुडचे सिनेमे आणण्याची पद्धत एकच आहे. डिस्ट्रिब्युटरला एक मिनिमम गॅरेंटी द्यावी लागते आणि कधी कधी नफ्यात हिस्साही द्यावा लागतो.

एका डिस्ट्रीब्युटरच्या मते, भारतीय चित्रपटांच्या चीनमधल्या जबरदस्त यशामुळे त्यांना चीनमध्ये आणण्याची किंमत हॉलिवुड चित्रपटांपेक्षा जास्त झाली आहे.

ल्यू म्हणतात, "चिनी डिस्ट्रीब्युटर भारतात बनणारे सगळे चित्रपट चढ्या भावाने विकत घेत आहेत. मला याचीच काळजी आहे. जर सगळ्याच प्रकारचे सिनेमे चीनमध्ये आणले तर भारतीय चित्रपटांची इमेज खराब होईल."

"मला एका डिस्ट्रीब्युटरने सांगितलं की जर्मनीतही असंच झालं होतं. तिथे भारतीय चित्रपटांना प्रचंड यश मिळालं. पण मग लोकांनी सगळ्या प्रकारचे भारतीय चित्रपट आयात करायला सुरुवात केली. यामुळे सगळा बाजार खराब झाला. असंच काही चीनमध्ये होईल अशी काळजी मला वाटते."

हिंदी, चिनी सिनेमा
प्रतिमा मथळा सगळ्यांच्या नजरा चीनच्या सिनेमांच्या बाजाराकडे लागल्या आहेत.

ल्यू आमिर खानच्या एका सिनेमाचा रिमेक बनवत आहेत आणि कबीर खानसोबत को-प्रॉडक्शनमध्येही करत आहेत.

"चीनमध्ये आमच्याकडे खूप सारे चांगले सिनेमे आहेत. हे सिनेमे भारतीय बाजारात नक्की चालतील. माझं पुढचं लक्ष्य हेच आहे - चीनच्या चित्रपटांना भारतात आणणं."

हेही वाचलंत का?