झिंबाब्वे निवडणूक : निकाल खोटे असल्याचा विरोधकांचा आरोप

झिंबाब्वेचे विरोधी पक्षनेते नेल्सन चमिसा Image copyright AFP
प्रतिमा मथळा झिंबाब्वेचे विरोधी पक्षनेते नेल्सन चमिसा

झिंबाब्वेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात इमरसन मंगाग्वा यांची अध्यक्षपदी घोषणा झाल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यानं हे निकाल फसवे आणि खोटे असल्याचं म्हटलं आहे. तब्बल 37 वर्षांनंतर रॉबर्ट मुगाबे यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर झिंबाब्वेत झालेल्या निवडणुकांमध्ये इमरसन मंगाग्वा यांनी बाजी मारली.

इथल्या MDC आघाडीचे नेते नेल्सन चमिसा यांनी या निवडणूकीला न्यायालयीन आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीतील मतदानात घोळ झाल्याचा आरोप चमिसा यांनी केला आहे.

मंगाग्वा यांनी झिंबाब्वेच्या जनतेला त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. निवडणुकांनंतर बुधवारी राजधानी हरारेमध्ये झालेल्या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे हरारे शहरातल्या रस्त्यांवर पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

हरारेमधल्या बीबीसी प्रतिनिधीनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गाड्यांवरील भोंग्यातून मोठ्यानं घोषणा होत आहेत. "झिंबाब्वे आता पुन्हा पुढील व्यवहारांसाठी सुरळीत झालं आहे. आम्ही तुमच्या संरक्षणासाठी इथे आहोत. त्यामुळे रस्त्यांवर येऊन तुमची कामं आणि व्यवसाय करू शकता. सगळं व्यवस्थित असल्यानं तुम्ही कृपया घाबरू नका." अशा घोषणा करणाऱ्या गाड्या शहरभर फिरत आहेत.

94 वर्षीय रॉबर्ट मुगाबे यांना नोव्हेंबरमध्ये राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर झानू-PF पक्षाचे मंगाग्वा यांनी आपल्या कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. झिंबाब्वे देशाला अनेक वर्षांच्या एकछत्री अंमलाखाली असलेल्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी निवडणूका घेण्यात आल्या होत्या. पण, या निवडणूकांनंतर देशात तणाव निर्माण झाला आहे.

मंगाग्वा यांनी 50.8 टक्के मतांसह प्रतिस्पर्धी उमेदवार नेल्सन चमिसा यांना मागे टाकलं. चमिसा यांनी 44.3 टक्के मतं मिळवली. मॅशोनालँड वेस्ट या 10 व्या आणि शेवटच्या प्रांतातील अध्यक्षीय निवडणूकांचे निकाल निवडणूक आयोगानं गुरुवारी दोन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर जाहीर केले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा झिंबाब्वेचे नवनियुक्त अध्यक्ष इमरसन मंगाग्वा

या निवडणुकांचे निकाल या आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर झाले. यात MDC आघाडीच्या झानू-PF पक्षाला 144 जागा मिळाल्या. MDC आघाडी ही 7 पक्षांची मिळून बनलेली आहे. झान-PF वगळता या आघाडीला 64 जागा मिळाल्या आहेत. नॅशनल पॅट्रीऑटीक फ्रंट या मुगाबे समर्थकांच्या पक्षाला 1 जागा मिळाली आहे.

झानू-PF पक्षाच्या जागांमध्ये घट होत आहे. 2013मध्ये त्यांना 160 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी सध्या हयात नसलेल्या मॉर्गन त्सावनगिराई यांच्या नेतृत्वाखालील MDC आघाडीतील इतर पक्षांना 49 जागा मिळाल्या होत्या.

विरोधकांचं नेमकं म्हणणं काय?

"न तपासलेल्या मतांची माहिती जाहीर करणं हा अक्षम्य अपराध आहे," असं ट्वीट शुक्रवारी चमिसा यांनी झिंबाब्वेच्या निवडणूक आयोगाला उद्देशून केलं होतं. ते पुढे म्हणतात, "झिंबाब्वेच्या निवडणूक आयोगानं तपासलेली मतं आणि अधिकृत निकाल जाहीर करावा. अपारदर्शकता, सत्याचा अभाव, नैतिकतेला हरताळ आणि मूल्यांना बसलेला आळा असंच या निवडणूक निकालांचं वर्णन करावं लागेल."

देशातल्या 10 प्रांतात जवळपास 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याबद्दलही विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

निकाल जाहीर होण्याच्या काही वेळेआधी चमिसा यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की, "केवळ मतपेट्यांसोबत खेळ करण्यास वेळ मिळावा यासाठी ते उशिर करत आहेत. म्हणजेच हे निकालांमध्ये होत असलेले अवैध फेरबदल आहेत. असं करणं केव्हाही आक्षेपार्ह असून हे चालणार नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics