WWE ते राजकीय आखाडा : 'केन' बनला अमेरिकेत महापौर

WWE सुपरस्टार केन Image copyright ALAMY/GETTY
प्रतिमा मथळा WWE सुपरस्टार केन अमेरिकेतल्या नॉक्स काऊंटीचे महापौर म्हणून निवडले गेले आहेत.

WWE पाहणारे खेळप्रेमी आणि त्यातही विशेषतः 2000 आणि 2010 या दोन दशकांमध्ये 'केन' या नावाला ज्यांनी डोक्यावर घेतलं त्यांच्यासाठी एक वेगळी बातमी.

'बॅक सुप्लेक्स' (Back Suplex), 'चॉकस्लॅम' (Chalkslam) या रेसलिंगच्या काही खास फटक्यांनी समोरच्याला रिंगणात चितपट करणारे 'केन' निवडणूकीच्या रिंगणातही यशस्वी झाले आहेत. केन म्हणजेच ग्लेन जेकब अमेरिकेतल्या टेनिसी राज्यातल्या नॉक्स काऊंटीचे महापौर म्हणून निवडून आले आहेत.

ग्लेन जेकब यांनी नॉक्स काऊंटीमध्ये दोन तृतीयांश मतं जिंकत डेमोक्रॅटीक पक्षाच्या लिंडा हॅने यांचा पराभव केला. ग्लेन जेकब यांना त्यांचे भारतासह जगभरातले चाहते केन म्हणून ओळखतात. WWEमध्ये उंच, धिप्पाड आणि आपल्या ताकदीच्या बळावर ज्यांनी-ज्यांनी अनेकांची मनं जिंकली त्यापैकीच ते एक म्हणून ओळखले जातात.

51 वर्षीय जेकब हे अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षाशी पूर्वीपासून संबंधित आहेत. प्रशासनात पारदर्शकता, कर कमी ठेवणे आणि स्थानिकांना वापरासाठी चांगल्या संसाधनांची निर्मिती करणे या मुद्द्यांवर त्यांनी ही निवडणूक लढविली.

इथल्या नॉक्सविले भागात इन्शुरन्सचा व्यवसाय करणारे जेकब येत्या 1 सप्टेंबरला महापौर पदाची शपथ घेणार आहेत.

जेसी वेंचुरा यांच्यानंतर अमेरिकेच्या राजकारणात यशस्वी होणारे जेकब दुसरे WWE स्टार ठरले आहेत. मिनेसोटा प्रांतातल्या ब्रुकलिन पार्कचे महापौर म्हणून 1990मध्ये वेंचुरा निवडून गेले होते. त्यानंतर 1998मध्ये ते या प्रांताचे गव्हर्नर म्हणूनही निवडून गेले होते.

'बालपणातला हिरो'

ग्लेन जेकब हे 2000च्या दशकांत केन नावाच्या भूमिकेत शिरून लोकप्रिय झाले होते. विशेषतः चेहऱ्यावर मास्क लावलेले केन WWEचे सर्वांत गाजलेले सुपरहिरो 'द अंडरटेकर' यांचे सावत्र भाऊ म्हणून त्याकाळी पुढे आले.

लहान मुलांच्या स्वप्नातील अजस्त्र राक्षसाला साजेशा भूमिकेत WWEच्या रिंगणात वावरणारे केन, त्यांच्या मुखवटा लावलेल्या चेहऱ्यामुळे कुतूहलाचा विषय बनले होते. आक्रमकपणे समोरच्यावर तुटून पडण्यात त्यांचा हातखंडा होता. नंतरच्या काळात मास्क काढून त्यांनी या रिंगणात प्रवेश केल्यावरही त्यांची लोकप्रियता कमी झालेली नव्हती.

अशा जेकब यांना त्यांचं हे पूर्वीचं करिअर त्यांच्या नव्या करिअरच्या आड येणार नाही असं ठाम वाटतं.

स्थानिक चॅनल WBIR यांच्याशी बोलताना जेकब सांगतात, "माझ्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला या राजकीय चढाओढीत आखाड्यात आणण्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे कारण, मला नॉक्स काऊंटीचं नाव राष्ट्रीय पातळीवर सकारात्मकरित्या पुढे आणायचं आहे. आपल्या देशाकडे लोकांना देण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. याची संपूर्ण देशवासियांना माहिती होण्याची आवश्यकता आहे."

WWEमधल्या त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी ट्वीट करून त्यांचं लगेचच अभिनंदनही केलं.

मात्र, या नव्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरील रेसलरचा मुखवटा ते कायमचा काढणार आहेत की नाही याबद्दल साशंकता आहे. कारण, केन म्हणून ते यंदाच्या जून महिन्यातच WWEच्या मंचावर अवतरले होते.

दरम्यान, नॉक्स काऊंटी भागातले पत्रकार एका वेगळ्याच समस्येशी सध्या तोंड देताना दिसत आहेत. कारण, उंचीला 6 फूट 8 इंच असलेल्या महापौराची इथून पुढे वारंवार टीव्हीसाठी मुलाखत घ्यावी लागणार आहे. जेकब यांची महापौरपदी निवड झाल्यावर गुरुवारी अशाच एका पत्रकाराची त्यांची मुलाखत घेण्यासाठी तारांबळ उडाली. अखेर त्या पत्रकारानं जवळ पडलेल्या एका क्रेटचा स्टूलासारखा वापर करत जेकब यांची मुलाखत घेतली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)