प्रेतांच्या सहवासात एकांत शोधणारा हुकूमशहा ईदी अमीन

युगांडाचे कोणे एकेकाळचे हुकूमशहा ईदी अमीन Image copyright Getty Images

बीबीसीच्या बुलेटिनमध्ये 4 ऑगस्ट 1972ला अचानक एक बातमी कानावर पडली. युगांडाचे हुकूमशहा ईदी अमीन यांनी युगांडात अनेक वर्षांपासून राहणाऱ्या 60 हजार आशियायी लोकांना अचानक देश सोडून जाण्यास सांगितलं.

त्यांनी जाहीर केलं की, देश सोडून जाण्यासाठी या लोकांना फक्त 90 दिवसांचा अवधी असेल. 6 फूट 4 इंच उंची आणि 153 किलो वजन असलेल्या ईदी अमीन यांचा समावेश निकटच्या काळातील सर्वांत क्रूर हुकूमशहांमध्ये केला जाते.

एकेकाळी हेवी वेट बॉक्सिंगपटू असलेल्या ईदी यांनी 1971ला मिल्टन ओबोटे यांना हटवून सत्ता हस्तगत केली.

त्यांच्या 8 वर्षांच्या सत्तेत त्यांनी जेवढं क्रौर्य दाखवलं तशी उदाहरणं आधुनिक इतिहासात फार कमी मिळतील.

4 ऑगस्ट 1972ला ईदी अमीन यांना स्वप्न पडलं आणि त्यांनी युगांडातील एक शहर टोरोरोमध्ये लष्करी अधिकाऱ्यांना आदेश दिला- अल्लानं सांगितलं आहे की, आशियातील लोकांना तातडीने देशातून बाहेर काढावं.

ते म्हणाले, "आशियातील लोकांनी युगांडावासियांत फूट पाडली आहे. त्यांनी युगांडातील लोकांशी मिळून मिसळून राहण्याचे काहीही प्रयत्न केले नाहीत. त्यांना फक्त युगांडाला लुटण्यातच रस आहे. त्यांनी गाईचं दूध तर काढलं आहे, पण तिला खाऊपिऊ घालण्याचे कष्ट घेतलेले नाहीत."

सल्ला गदाफींकडून

सुरुवातीला आशियाई लोकांनी ही घोषणा गांभीर्याने घेतली नाही. त्यांना असं वाटलं की, अमिन यांनी त्यांच्या तिरसटपणामुळे हा निर्णय घेतला असेल. पण काही दिवसांनी त्यांच्या लक्षात आलं की अमिन त्यांना देशाबाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले आहेत.

Image copyright Getty Images

त्यांनी हा निर्णय घेण्यासाठी अल्लाने स्वप्नात येऊन सांगितलं असं वारंवार म्हटलं असलं तरी 'घोस्ट ऑफ कंपाला' या पुस्तकाचे लेखक जॉर्ज इव्हान स्मिथ लिहितात, "ही प्रेरणा त्यांनी लिबियाचे हुकूमशहा कर्नल गदाफी यांच्याकडून घेतली होती.

देशावर घट्ट पकड हवी असेल तर अर्थव्यवस्था पूर्ण ताब्यात असली पाहिजे, असा सल्ला गदाफी यांनी त्यांना दिला होता. आम्ही आमच्या देशातून जसं इटालियन लोकांना दूर केलं तसं तुम्ही आशियाई लोकांना दूर करा, असा सल्ला त्यांनी अमिन यांनी दिला होता."

फक्त 55 पाऊंड नेण्यास परवानगी

जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा ब्रिटनने मंत्री जिऑफ्री रिपन यांना कंपालाला पाठवलं. अमिन यांनी हा निर्णय बदलावा यासाठी त्यांची मनधरणी करावी यासाठी रिपन यांना पाठवण्यात आलं होतं. पण रिपन जेव्हा कंपालाला आले तेव्हा अमिन यांनी सांगितलं की, ते कामात फार व्यग्र आहेत आणि 5 दिवस भेटू शकत नाहीत.

त्यामुळे रिपन यांनी लंडनला परत जाण्याचा निर्णय घेतला होता. अमिन यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची मनधरणी केल्यानंतर ते चौथ्या दिवशी रिपन यांना भेटण्यासाठी गेले. पण याचा काहीच उपयोग झाला नाही. अमिन त्यांच्या निर्णयावर अटळ होते.

भारतानेही तिथल्या परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी परराष्ट्र खात्यातील अधिकारी निरंजन देसाई यांना कंपालाला पाठवलं होतं.

निरंजन देसाई सांगतात, "जेव्हा मी कंपालामध्ये आलो तेव्हा तिथं हाहाकार माजला होता. अनेक लोक त्यांच्या पूर्ण आयुष्यात कधी युगांडाबाहेर गेले नव्हते. प्रत्येक व्यक्तीला फक्त 55 पाऊंड आणि सोबत 250 किलो सामान नेण्याची परवानगी देण्यात आली होती. कंपालाच्या बाहेरील लोकांना तर या नियमांचीही माहिती नव्हती.''

लॉनखाली गाडलं सोनं

अमिन यांनी निर्णय इतका अचानकपणे घेतला की युगांडा सरकार त्याची अंमलबजावणी करायला तयार नव्हतं. काही श्रीमंत आशियाई लोकांनी आपल्याकडील पैसे खर्च करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या.

देसाई म्हणतात, "जर आपण पैसे बाहेर घेऊन जाणार नसलो तर पैसा आपल्या स्टाईलने उडवू असा विचार लोकांनी केला होता. काही हुशार मंडळींनी आपल्याजवळील पैसा बाहेर नेण्यात यशही मिळवलं. सर्वांत सोपा उपाय होता तो म्हणजे सर्व कुटुंबासह फर्स्ट क्लासने जगप्रवास करणे, त्यासाठी हॉटेल बुकिंग आधीच करणं अशा क्लृप्त्या केल्या होत्या.

Image copyright Getty Images

काही लोकांनी त्यांच्या कारच्या मॅटखाली दागिने लपवले होते आणि या कार केनियाला पाठवल्या होत्या. काही लोकांना अशी आशा होती की, त्यांना युगांडामध्ये परत येता येईल. म्हणून त्यांनी त्यांचे दागिने घरातील बगीचे आणि लॉनमध्ये लपवून ठेवले होते. काही लोकांनी बँक ऑफ बडोदाच्या लॉकरमध्ये दागिने लपवले होते. काही लोक जेव्हा 15 वर्षांनंतर परत या बँकेत गेले त्यावेळी त्यांना हे दागिने सुरक्षित मिळाले."

सध्या लंडनमध्ये स्थायिक असलेल्या गीता वस्त यांनी ते दिवस आजही आठवतात. लंडनला जाण्यासाठी त्या युगांडातील एनतेबे या विमानतळावर पोहोचल्या होत्या. त्या सांगतात, "आम्हाला फक्त 55 पाऊंड बरोबर नेण्याची परवानगी देण्यात आली होती. विमानतळावर बॅगा उघडून तपासल्या जात होत्या. बॅगेत सोनं किंवा पैसा तर लपवला नाही ना हे तपासण्यासाठी सगळ्या वस्तू बाहेर काढल्या जात होत्या.''

अंगठी कापून काढली

आईवडिलांनी माझ्या बोटात सोन्याची अंगठी घातली होती. ही अंगठी बोटातून निघत नव्हती तेव्हा ही अंगठी कापून काढण्यात आली. हे सुरू असताना शस्त्रधारी सैनिकांनी आम्हाला घेरलं होतं.

आशियाई लोकांना त्यांची दुकानं आणि घर सोडून जायला भाग पाडलं होतं. त्यांना घर आणि घरातील सामान विकण्याची परवानगी नव्हती. जे सामान त्यांना सोबत नेण्याची परवानगी होती, तेही लुटण्याच्या तयारीत इथलं सैन्य होतं.

देसाई सांगतात, "कंपाला शहरातून एनतेबे विमानतळावर पोहोचण्यासाठी 32 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं. युगांडातून बाहेर जाणाऱ्या सर्व आशियाई लोकांची 5 वेळा तपासणी केली जात होती. प्रत्येक वेळी काहीतरी काढून घेण्याचा प्रयत्न सैनिक करत होते."

Image copyright Getty Images

आशियाई लोकाच्या मागं राहिलेल्या मालमत्तेचं आणि संपत्तीचं काय झालं? असा प्रश्न मी देसाई यांनी विचारला. देसाई सांगतात, "बरीच मालमत्ता अमिन सरकारचे भ्रष्ट मंत्री आणि सैनिकांच्या हाती लागली. सामान्य माणसांच्या हाती फार काही आलं नाही. हे लोक हडपलेल्या या संपत्तीला सांकेतिक भाषेत बांगलादेश म्हणतात", असं देसाई यांनी सांगितलं.

"त्यावेळी बांगलादेश नुकताच स्वतंत्र झाला होता. त्यावेळी तिथले लष्करी अधिकारी आमच्याकडे इतके बांगलादेश आहेत, असं सांगताना आम्ही ऐकलं आहे", असं देसाई म्हणाले.

स्मिथ त्यांच्या घोस्ट ऑफ कंपाला या पुस्तकात लिहितात, "अमिन यांनी हडप केलेली दुकानं सैनिकांना दिली. अमिन लष्करी अधिकाऱ्यांबरोबर चालत चालत हे दुकान याला द्या, हे हॉटेल या ब्रिगेडियरला द्या, असं सांगत असतानाचा एक व्हीडिओही आहे."

ते लिहितात, "ज्या अधिकाऱ्यांना आपलं घर चालवण्याची अक्कल नव्हती, ते दुकान काय चालवणार. हे लष्करी अधिकारी त्यांच्या जमातीच्या प्रथांचं पालन करत जमातीतील लोकांना बोलवायचे आणि दुकानातील वस्तू मोफत वाटायचे. त्यांना माहितीच नव्हतं की नव्या वस्तू कुठून विकत घेऊन यायच्या आणि त्या किती पैशांना विकायच्या. परिणाम असा झाला की सारी अर्थव्यवस्थाच अडचणीत आली."

अमीन यांची क्रूरता आणि अमानुषता

Image copyright Getty Images

या घटनेनंतर अमिन यांची प्रतिमा एका विक्षिप्त शासकाच्या रूपात संपूर्ण जगात पसरली. त्यांच्या क्रौर्याच्या कहाण्या जगात सगळ्यांनाच समजायला लागल्या. अमिन यांच्या काळात आरोग्य मंत्री राहिलेल्या हेनरी केयेंबा यांनी 'ए स्टेट ऑफ ब्लड : द इनसाइड स्टोरी ऑफ ईदी अमिन' हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकांत त्यांनी अमिन यांच्या क्रूरतेचे अनेक किस्से लिहीले. हे किस्से वाचून जगात सगळ्यांनाच धक्का बसला.

केयेंबा लिहितात, "अमिन यांनी केवळ आपल्या विरोधकांना संपवलंच नाही तर, त्यांच्या मृतदेहांसोबत अमानुष उद्योगही केले. युगांडाच्या वैद्यकीय क्षेत्रात एक गोष्ट सतत बोलली जायची की, इथल्या शवागारातल्या मृतदेहांसोबत छेडछाड केली जायची आणि त्यांचं यकृत, नाक, ओठ, गुप्तांग गायब झालेलं असायचं. जून 1974मध्ये जेव्हा परराष्ट्र सेवेतले अधिकारी गॉडफ्री किगाला यांना गोळी मारण्यात आली, त्यानंतर त्यांचे डोळे काढण्यात आले. त्यांचा मृतदेह कंपालाच्या बाहेरील जंगलात फेकण्यात आला होता."

केयेंबा यांनी नंतर एकदा आपलं अधिकृत निवदेन देताना सांगितलं की, अनेकदा अमिन मारल्या गेलेल्या लोकांच्या मृतदेहांसोबत काही वेळ एकट्यानं घालवण्याची इच्छा प्रकट करायचे. जेव्हा मार्च 1974मध्ये इथल्या लष्कराचे प्रभारी प्रमुख ब्रिगेडियर चार्ल्स अरूबे यांची हत्या झाली, तेव्हा त्यांचा मृतदेह पाहण्यासाठी मुलागो हॉस्पीटलच्या शवागारात अमिन आले होते.

त्यांनी उपचिकित्सा अधीक्षक क्येवावाबाए यांना सांगितलं की, त्यांना थोडा वेळ या मृतदेहासोबत एकटं रहायचं आहे. अमिन यांनी एकांतात त्या मृतदेहासोबत काय केलं हे कोणालाच कळलं नाही. पण, काही युगांडावासियांना वाटतं की, त्यांनी इथल्या काकवा जमातीच्या नियमाप्रमाणे आपल्या विरोधकाचं रक्त प्यायलं. अमीन हे काकवा जमातीतूनच येतात.

मानवी मांस खाल्ल्याचा आरोप

केयेंबा लिहितात, "अनेकदा राष्ट्रपती आणि इतर नेत्यांसमोर अमिन यांनी मानवी मांस खाल्ल्याच्या चर्चा होत असत. मला आठवतं की, 1975मध्ये जेव्हा काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाएर यात्रेबद्दल सांगताना ते म्हणाले होते की, त्यांना माकडाचं मांस वाढलं होतं. जे मानवी मांसापेक्षा विशेष चांगलं नव्हतं. लढाई दरम्यान आपला सहकारी सैनिक जखमी होतो. अशावेळी त्याला मारून खाल्ल्यामुळे तुमचा भूकबळी जाण्यापासून वाचता येतं."

अमिन यांनी युगांडामधल्या एका डॉक्टरला सांगितलं होतं की, मानवी मांस हे बिबट्याच्या मांसापेक्षा जास्त चटपटीत असतं.

फ्रीजमध्ये कापलेलं मानवी मुंडकं

अमिन यांच्या एका जुन्या नोकरानं केनियामध्ये पळून आल्यानंतर एक अशी कहाणी सांगितली होती की, ज्यावर आजच्या काळात विश्वास ठेवणं अवघड आहे.

अमिन यांच्या काळात युगांडामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून काम करणारे मदनजीत सिंह यांनी त्यांच्या 'कल्चर ऑफ सेपल्करे' या पुस्तकात याबाबत लिहीलं आहे. मोझेस अलोगा असं त्या केनियात पळून गेलेल्या नोकराचं नाव.

अलोगाने सांगितलं होतं की, "अमिन यांच्या जुन्या घरातली एक खोली नेहमी बंद असायची. फक्त मलाच त्या खोलीत प्रवेश करण्याची मुभा होती. मी ती खोली स्वच्छ करण्यासाठी आता जायचो. अमिन यांची पाचवी बायको सारा क्योलाबा यांना या खोलीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती. त्यांनी मला ती खोली उघडण्यास सांगितलं. मी थोडा घाबरलोच. कारण, अमिन यांच्या आदेशानुसार त्या खोलीत अमिन वगळता इतर कोणालाही प्रवेश द्यायचा नव्हता. जेव्हा सारा यांनी खूप इच्छा व्यक्त केली आणि मला पैसे दिले तेव्हा मी त्यांना त्या खोलीची चावी दिली. त्या खोलीत दोन फ्रीज होते. जेव्हा त्यांनी एक फ्रीज उघडला तेव्हा त्यांचे डोळेच चक्रावले. त्या जोरात ओरडल्या आणि बेशुद्ध पडल्या. त्यात सारा यांचा पूर्वीचा प्रियकर जीज गिटा याचं कापलेलं डोकं ठेवलं होतं."

अमिन यांचा जनानखाना

सारा यांच्या प्रियकरामुळे अमिन यांनी अनेक महिलांच्या प्रियकरांची डोकी अशीच छाटली होती. जेव्हा अमिन यांना इंटस्ट्रियल कोर्टाचे प्रमुख मायकल कबाली कागवा यांची प्रेमिका हेलेन ओगवांगा आवडू लागली, तेव्हा त्यांनी मायकल कागवा यांना कंपाला इंटरनॅशनलच्या हॉटेलमधल्या स्वीमिंग पूलमधून उचलून आणलं आणि त्यांना गोळी मारली. नंतर हेलेन यांना पॅरिसमधल्या युगांडाच्या दूतावासात त्यांनी पाठवलं. जिथून हेलेन पळून जाण्यात यशस्वी ठरल्या.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा ईदी अमिन यांची पाचवी बायको सारा क्योलाबा.

अमिन मेकरेरे विद्यापीठाचे प्राध्यापक विन्सेंट एमीरू आणि तोरोरोच्या रॉक हॉटलेचे व्यवस्थापक शेकानबो यांच्या बायकांबरोबर त्यांना शरीरसंबंध ठेवायचे होते. या दोघांचीही रीतसर योजना आखून हत्या करण्यात आली.

अमिन यांच्या प्रेमसंबंधांची मोजदाद करणंच मुश्किल आहे. एक वेळ अशी होती की, त्यांचा कमीत-कमी 30 महिलांचा जनानखाना होता. जो संपूर्ण युगांडाभर पसरला होता. या महिला हॉटेल, ऑफिस आणि हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायच्या.

अमिन यांची चौथी पत्नी मेदीनासुद्धा एकदा त्यांच्या हातून मरता-मरता वाचली होती. फेब्रुवारी 1975मध्ये अमिन यांच्या गाडीवर कंपाला जवळ गोळीबार करण्यात आला. अमिन यांना वाटलं की त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मेदीना यांनीच माहिती दिली असावी. अमिन यांनी मेदीना यांना इतकी जबर मारहाण केली की त्यात त्यांचं स्वतःचं मनगट तुटलं.

आशियाई नागरिक ब्रिटनमध्ये शरणार्थी

आशियाई नागरिकांची युगांडातून हकालपट्टी करण्याचा निर्णय अमिन यांनी घेतला. पण, आशियाई नागरिकांना बाहेर काढल्यानंतर युगांडाच्या अर्थव्यवस्थेलाच सुरुंग लागला.

निरंजन देसाई याबद्दल सांगतात, "देशात वस्तूंची कमतरता जाणवू लागली. ती कल्पनेपलीकडची होती. इथल्या बहुतांश हॉटेलमधून कधी लोणी गायब व्हायचं, तर कधी ब्रेड गायब व्हायचा. कंपालामधल्या रेस्टॉरंटमधले लोक त्यांच्या मेन्यू कार्डची सोन्यासारखी काळजी घेऊ लागले. कारण, शहरातल्या छपाई उद्योगावर आशियाई लोकांचं वर्चस्व होतं."

Image copyright PA
प्रतिमा मथळा युगांडा सोडून आशियाई शरणार्थींनी ब्रिटन गाठलं.

युगांडामधून बाहेर काढण्यात आलेल्या 60,000 लोकांपैकी 29000 लोकांना ब्रिटनने शरण दिली. 11000 लोक भारतात आले. 5000 लोक कॅनडामध्ये गेले आणि इतर लोक जगातल्या दुसऱ्या देशांच्या आसऱ्याला गेले.

शून्यापासून सुरुवात करत या लोकांनी ब्रिटनच्या रिटेल उद्योगाचा चेहरा-मोहरा बदलला. ब्रिटनमधल्या प्रत्येक शहरातल्या चौकात पटेलांची दुकानं उघडली गेली आणि हे लोक वृत्तपत्रं आणि दूधसुद्धा विकू लागले.

आज युगांडामधून ब्रिटनमध्ये जाऊन वसलेला समाज खूप समृद्ध आहे. बाहेरून आलेल्या समाजानं स्वतःला ब्रिटनच्या संस्कृतीमध्ये मिसळून घेतलं. एवढंच नाही तर ब्रिटनच्या आर्थिक विकासांत महत्त्वपूर्ण योगदानही दिलं.

भारताच्या भूमिकेवर प्रश्न

या सगळ्या प्रकारावर भारत सरकारने फारच डळमळीत भूमिका घेतली. त्यांनी याकडे युगांडातलं अंतर्गत प्रकरण म्हणून पाहिलं आणि अमिन प्रशासनाविरोधात वैश्विक जनमत बनवण्यासाठी कोणतीही भूमिका स्वीकारली नाही.

याचे परिणाम असे झाले की, खूप मोठ्या काळासाठी पूर्व अफ्रिकेत राहणारा भारतीय समाज भारत देशापासून दूर गेला. आपल्या देशानं त्यांच्या अवघड काळात साथ दिली नाही असा समज त्यांनी करून घेतला.

ईदी अमिन 8 वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर त्यांना त्याच पद्धतीने सत्तेवरून काढण्यात आलं, ज्या पद्धतीनं त्यांनी सत्ता हस्तगत केली होती. त्यांना प्रथम लीबिया आणि नंतर सौदी अरेबियाने शरण दिलं. 2003मध्ये वयाच्या 78व्या वर्षी ईदी अमिन यांचं सौदी अरेबियामध्ये निधन झालं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)