इंद्रा नुई : भारतीय स्त्रियांनी या पेप्सीको CEOपासून काय प्रेरणा घ्यावी?

इंद्रा नुई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

इंद्रा नुई

जगातल्या सगळ्यांत मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या पेप्सिकोच्या CEO इंद्रा नुई यांनी आपलं पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ भारतीय वंशाच्या नुई गेली 12 वर्षं पेप्सिकोच्या प्रमुख होत्या.

इंद्रा नुई व्यापार जगातल्या मोठ्या स्थानावर पोहोचलेल्या काही निवडक महिलांपैकी एक आहेत. त्या फोर्ब्स मासिकाच्या सगळ्यांत प्रभावशाली महिलांच्या यादीत आपलं स्थान राखून होत्या. गेल्या वर्षी त्या या यादीत 11व्या क्रमांकावर होत्या.

62 वर्षीय नुई 24 वर्षांपासून पेप्सीसोबत काम करत होत्या.

2006 मध्ये इंद्रा नुई यांनी पेप्सिकोची धुरा सांभाळल्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये 78 टक्के वाढ झाली होती. नुई यांची जागा आता कंपनीचे सध्याचे प्रेसिडेंट रामोन लाग्वार्टा घेतील.

पेप्सिकोने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, लाग्वार्टा 3 ऑक्टोबरला CEO पदभार स्वीकारणार असून कंपनीच्या बोर्डमध्येही ते सहभागी होतील.

लाग्वार्टा गेल्या 22 वर्षांपासून पेप्सीकोमध्ये काम करत आहेत. ते कंपनीचा जागतिक व्यापार पाहायचे. नुई या 2019च्या सुरुवातीच्या महिन्यांपर्यंत पेप्सिकोच्या बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

10 खास गोष्टी

1. इंद्रा नुई यांचा जन्म चेन्नईमध्ये झाला होता. त्यांचं सुरुवातीचं शिक्षणही चेन्नईमध्येच झालं.

2. विज्ञान विषयांत पदवी मिळवल्यानंतर इंद्रा यांनी कोलकाताच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर भारतातच त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली.

3. काही वर्षं काम केल्यानंतर इंद्रा यांनी शिक्षणासाठी अमेरिका गाठलं. तिथे येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं.

फोटो कॅप्शन,

पेप्सीकोच्या शेअरचे दर

4. अनेक कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 1994 साली त्यांनी पेप्सिको कंपनी जॉइन केली. वयाच्या 38व्या वर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली पेप्सिकोमध्ये दीर्घ कालावधीची धोरणं आखण्यास सुरुवात झाली.

5. 10 वर्षांनंतर 2004मध्ये त्या कंपनीच्या मुख्य फायनान्स अधिकारी झाल्या. तर 2006मध्ये त्या कंपनीच्या CEO बनल्या.

6. इंद्रा पेप्सिकोच्या नेतृत्व करणाऱ्या केवळ पहिल्या महिला नसून त्या पहिल्या परदेशी महिला देखील आहेत. 2006 पासून त्या फोर्ब्सच्या जगातल्या सर्वांत शक्तिशाली महिलांच्या यादीत सामील झाल्या.

7. 2007मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला.

8. इंद्रा नुई शाकाहारी आहेत. त्यांनी आपल्या ऑफीसमध्ये एक गणपतीची मूर्तीही ठेवली आहे.

9. इंद्रा यांना संगीताची आवड असून त्यांच्या ऑफीसमध्ये त्या मोठ्या आवाजात गाणी गाताना दिसतात. त्यांच्या आवडत्या संगीतात बीटल्सचा पण समावेश आहे.

10. इंद्रा यांची बहीण चंद्रिका टंडन यांना 2001मध्ये ग्रॅमी पुरस्कारांसाठी नामांकनही मिळालं होतं.

बीबीसी व्यापार प्रतिनिधी योगिता लिमये यांचं विश्लेषण

इंद्रा नुई यांनी यश जागतिक पातळीवर मोठं आहे, म्हणून संपूर्ण भारतात त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहिलं जातं. चेन्नईत जन्मलेल्या नुई यांनी जगातल्या सगळ्यांत मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम केलं.

त्यामुळे दरवर्षी जेव्हा 10 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी अमेरिकेत शिक्षणासाठी जातात, तेव्हा नुईंकडे पाहून त्यांना जाणीव होते की अमेरिकेत मोठं होण्याचं स्वप्न सत्यात उतरू शकतं.

जेव्हा नुई यांची पेप्सीकोच्या CEO पदी नियुक्ती झाली तेव्हा त्या काही एवढ्या मोठ्या कंपनीच्या प्रमुखपदी पोहोचलेल्या पहिल्या भारतीय नव्हत्या. नागपुरात जन्मलेले विक्रम पंडितही तेव्हा सिटीबँकेच्या प्रमुखपदी होतेच. पण नुई यांचं यश खूप निराळं आहे, कारण त्यांना तिथवर पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं.

फोटो स्रोत, AFP

भारतातल्या रुढीवादी आणि पुरुषप्रधान समाजात महिलांची लवकर लग्न लावून देण्यावर भर असतो. अनेक सक्षम महिलांना तर मूलबाळ झाल्यावर नोकरीही सोडावी लागते. अशा समाजातून वर आलेल्या नुई या खऱ्या अर्थाने सर्व स्त्रियांसाठी प्रेरणादायी आहेत.

नुई यांनी काम आणि आयुष्य यातला समतोल साधताना त्याविषयी कोणतीही लाज किंवा भीडभाड न बाळगता आपलं करिअर केलं आहे. यातून सध्याच्या नव्या पिढीतल्या आणि करिअर करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलींनी धडा घेतला पाहिजे.

गेल्या काही वर्षांत भारतीय वंशाच्या अनेकांनी जगातल्या मोठ्या ब्रँड्सची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत, उदाहरणार्थ, मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला आणि गुगलचे सुंदर पिचाई.

या प्रत्येकाच्या यशाबद्दल भारतात बरंच लिहिलं गेलं आहे, तेही तितकेच मोठे आदर्श आहेत. पण नुई यांची यशोगाथा भारतीय स्त्रियांसाठीच नव्हे तर अख्ख्या जगासाठी नेहमीच वेगळी राहिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)