ट्रॅफिकच्या समस्येवरून ढाक्यात हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर

निदर्शनं करणारे विद्यार्थी Image copyright Getty Images

गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात विद्यार्थी ट्रॅफिकच्या समस्येवरून निषेध नोंदवत आहेत, आंदोलनं करत आहेत. त्यांच्या या आंदोलनाची दखल जगभरातल्या माध्यमांनी घेतली आहे.

त्यांचं हे आंदोलन रस्त्यांसाठी आहे. बांगलादेशमध्ये सुरक्षित रस्ते तयार करण्यात यावेत आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

29 जुलैला 2 विद्यार्थी बसखाली येऊन चिरडले गेल्यानंतर ढाक्यात हे आंदोलन पेटलं. त्यांच्या या आंदोलनासमोर बांगलादेश सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि सरकारनं वाहतुकीचे नियम मोडणाऱ्याच्या शिक्षेमध्ये वाढ केली.

याबाबतच्या कायद्याच्या मसुद्याला सरकारनं मान्यता दिली असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीची शिक्षा तीन वर्षांवरून पाच वर्षांच्या तुरुंगवासाची करण्यात येणार आहे. तसंच दंडाची रक्कम 5 लाख टका इतकी करण्यात येणार असल्याचं ढाका ट्रिब्यूननं म्हटलं आहे.

कशामुळे पेटलं हे आंदोलन?

29 जुलै रोजी अब्दुल करीम आणि दिया खनम हे दोन विद्यार्थी ढाका शहरात एका भरधाव बसखाली येऊन चिरडले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर ढाका शहरात निदर्शनं सुरू झाली. त्या आंदोलनांनी हिंसक वळण देखील घेतलं. या आंदोलनानंतर शहरातल्या अनेक शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. ही आंदोलनं फक्त ढाकापुरतीच मर्यादित राहिली नाही तर चित्तगाव, नारायणगंज आणि तंगैल या ठिकाणीदेखील निदर्शनं झाली.

बांगलादेशमध्ये रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या खूप आहे. त्यामध्ये अनेक लोकांचे बळी जातात. बांगलादेशातलं वाहतूक क्षेत्र हे भ्रष्ट मानलं जातं, त्यातूनच जनतेच्या मनात रोष निर्माण झाल्याचं माध्यमांचं म्हणणं आहे.

जहाज वाहतूक, रस्ते आणि रेल्वे सुरक्षाविषयक क्षेत्रात काम करणाऱ्या नॅशनल कमिटी या बिगरसरकारी संस्थेनं तयार केलेल्या अहवालात असं म्हटलं आहे, '2017मध्ये विविध अपघातांमध्ये 4284 लोकांचे बळी गेले, तर 9,112 लोक या अपघातांमध्ये जखमी झाले.' बांगलादेशात वर्षभरात 3,472 अपघात झाल्याची माहिती या नॅशनल कमिटीनं दिलेल्या अहवालात आहे असं ढाका ट्रिब्यूननं म्हटलं आहे.

आतापर्यंत काय घडलं?

अपघातासाठी जबाबदार असलेल्या बस मालकाला अपघाताच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.

Image copyright Getty Images

त्यानंतरही बांगलादेशात रस्त्यावर निदर्शनं सुरू आहेत. आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी तोडफोड केली, रस्ते अडवले. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर रबर बुलेट्स आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. त्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

निदर्शनावेळी अमेरिकेच्या राजदूतांच्या ताफ्यावर देखील हल्ला झाला होता. त्यामुळे त्या अडकल्या होत्या. त्यातून त्या सुखरूप सुटल्या.

असं म्हटलं जात आहे की, सत्ताधारी पक्ष आवामी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनं (बांगलादेश छात्र लीग) आंदोलकांवर हल्ले केले. त्यांच्या हल्ल्यात अनेक विद्यार्थी आणि पत्रकार जखमी झाले. विद्यार्थी संघटनेनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यांच्या या आंदोलनाची दखल संयुक्त राष्ट्रांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांची काळजी योग्य असून रस्त्यांमध्ये सुधारणा व्हावी असं मत त्यांनी नोंदवलं आहे.

अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारनं 20 लाख टकांची मदत जाहीर केली आहे. भविष्यात अपघात होऊ नये म्हणून योग्य पावलं उचलली जातील आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून पीडितांना न्याय दिला जाईल असं आश्वासन पंतप्रधान शेख हसीना यांनी दिलं आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत?

विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांची नऊ कलमी यादी तयार केली आहे. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद असावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

अपघातप्रवण क्षेत्रात गतीरोधकांची संख्या वाढवण्यात यावी, फुटब्रिज बांधण्यात यावेत, वाहनांची आणि चालकांची नोंदणी व्यवस्थितरीत्या पार पाडावी या मागण्या त्यांनी केल्या आहेत.

विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन गृहमंत्री असदुझ्झमान खान यांनी केली आहे. सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत असं त्यांनी म्हटल्याचं बंगाली वृत्तपत्र प्रथम आलोनं म्हटलं आहे.

जोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांवर काम करणं सुरू करणार नाही आणि आम्ही त्याबाबत समाधानी होणार नाहीत तोवर आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू, असं विद्यार्थी म्हणत आहेत.

आपणच याला जबाबदार?

विरोधी पक्षाकडून आंदोलनाचं राजकीय भांडवल केलं जात असल्याचं वक्तव्य वाहतूक मंत्री ओबैदुल कादिर यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या अराजकीय आंदोलनात विरोधी पक्ष विष कालवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सर्व विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरणं हे राजकारण्यांच्या आणि व्यवस्थेच्या अपयशाचं निदर्शक आहे असं राजकीय विश्लेषक ख्वाजा मैन उद्दीन यांनी म्हटलं आहे. याबरोबरच ते म्हणाले, "फक्त राजकीय नेत्यांना नावं ठेवून भागणार नाही, तर आपल्या समाजात जी भ्रष्टाचाराची पाळंमुळं रूजली आहेत त्यातूनच आजची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)