बलात्काऱ्यालाच पिता व्हायचा हक्क मिळतो तेव्हा...

लैंगिक हिंसा Image copyright Thinkstock

बलात्कारानंतर पीडितेच्या मुलाचा पिता बनण्याचा हक्क बलात्काऱ्यालाच मिळाला तर? विश्वास बसणार नाही, पण अमेरिकेसारख्या देशात असं घडतं.

अमेरिकेतही दरवर्षी तब्बल 32 हजार महिला बलात्कारामुळे गरोदर राहतात.

इथल्या चार राज्यांमध्ये असा नियम आहे की, ज्याच्यामुळे बलात्काऱ्याला त्याने केलेल्या बलात्कारातून होणाऱ्या मुलाचा अधिकार दिला जातो.

अगदी आईला जरी त्या मुलाला कोणाला दत्तक द्यायचं असेल तर तिलाही त्या बलात्काऱ्याची परवानगी घ्यावी लागते.

टिफनीची कहाणी

टिफनी मिशिगनमध्ये राहते. ती फक्त 12 वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यातून ती गरोदर राहिली.

या गोष्टीला 10 वर्षं उलटून गेली ती अजूनही या दडपणाखाली वावरते की, तिच्यावर बलात्कार करणारा तिच्या मुलाला भेटायला तर येणार नाही ना.

टिफनी सांगते, "त्याच्या पुतणीने मला मेसेज केला की तो आपल्या मुलाला भेटू इच्छितो. त्याला (बलात्काऱ्याला) ते माझ्याकडे घेऊन येतील असंही त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं."

"मी घाबरले. मला हे माहीत नव्हतं की तो माझ्या मुलाला कोणत्याही आडकाठीशिवाय भेटू शकतो आणि मलाच त्यांची भेट घालून द्यावी लागेल. मला न्यायाधीशांनी सांगितलं होतं की, त्या बलात्काऱ्याला माझ्या मुलाचं पालक असण्याचा अधिकार आहे."

अर्थात टिफनी अमेरिकेच्या ज्या राज्यात राहतात, तिथल्या कायद्यानुसार बलात्काऱ्याचा पिता होण्याचा हक्क परत घेतला जाऊ शकतो.

पालक असण्याचा अधिकार

पण जर आपल्या बलात्काऱ्याला आपल्या मुलाचा पालक होण्याचा अधिकार द्यायचा नसेल तर टिफनीला कोर्टात जावं लागेल आणि कायदेशीर लढाई लढावी लागेल. यासाठी बराच खर्च होईल. पण टिफनीला आपल्या कोर्टातल्या लढाईसाठी कायदेशीर मदत मिळाली आहे.

Image copyright iStock

तिथून जवळपास 1600 किलोमीटरवर राहाणाऱ्या अॅना लीनलासुद्धा कायद्याची मदत घ्यावी लागली.

तीही एक बलात्कार पीडिता आहे. बलात्कारानंतर आपल्या मुलीला जन्म देण्यासाठी ती दुसऱ्या ठिकाणी निघून गेली पण त्यांच्या बलात्काऱ्याने त्यांना शोधून काढलं आणि आपल्या मुलीला भेटायचा तगादा लावला.

फ्लोरिडामध्ये बलात्कारातून झालेल्या मुलावरचा पित्याचा हक्क रद्द करण्यासाठी किंवा परत घेण्यासाठी कोणताही कायदा नव्हता.

अॅना लीनच्या खटल्यानंतर या राज्याचा कायदा बदलला गेला, आता बलात्काऱ्याचा मुलावरचा हक्क रद्द केला जाऊ शकतो. पण अमेरिकेतल्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगवेगळे कायदे आहेत.

लैंगिक शोषणाची शिक्षा

डेर्विन नावाच्या व्यक्तीने 40 वर्षांचा असताना 15 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यातून ती मुलगी गरोदर राहिली.

Image copyright BBC/ANDRÉ VALENTE

तो राहात असलेल्या मेरीलँड राज्यात याकरिता कठोर शिक्षेची तरतूद नाही. त्यामुळे डेर्विनला फक्त लहान मुलांच्या लैंगिक शोषण कायद्याअंतर्गत शिक्षा झाली. शिक्षा झाली असली तरी बलात्कारातून झालेल्या मुलाचा पालक असण्याचा अधिकार डेर्विनकडे आहे.

"मला सांगितलं गेलं की, मी कोर्टात जाऊन त्या मुलाला भेटण्याचा किंवा त्याच्यासोबत वेळ घालवण्याचा हक्क मागू शकतो," ते सांगतात.

हा हक्क परत घेतला तर त्याचे वाईट परिणाम होतील असं डेर्विनला वाटतं. "एक लहान मुलाला स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाकारणं आणि त्याला सांगणं की तुझ्या आईची इच्छा नाही म्हणून तू तुझ्या वडिलांना भेटू शकत नाही हे कितपत योग्य आहे?"

बलात्कार पीडितेचं काय?

डेर्विनने ज्या महिलेवर बलात्कार केला त्यांनी आपलं नावं गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितलं की, बलात्काऱ्याचा मुलावर हक्क असतो या नियमाबाबत त्यांना काही माहीत नव्हतं.

Image copyright BBC/ANDRÉ VALENTE

आता त्या कोर्टात जाऊन डेर्विनकडून सगळे अधिकार काढून घेण्याच्या तयारीत आहेत.

पण हे एवढं सोपं नाही. त्या म्हणतात, "माझ्याकडे कायदेशीर लढाई लढायला पैसे नाहीत तरीही मी लढेन. मी ते सगळं करीन जे माझ्या मुलासाठी योग्य आहे. पण मला भीती वाटते की पुढे काय होईल."

अमेरिकेतल्या ज्या राज्यांमधे बलात्कार आणि लैंगिक शोषणाशी संबंधित कायदे स्पष्ट नाहीत आणि बलात्कार पीडितेला खूप मोठी किंमत चुकवावी लागते तिथे बरेच प्रश्न आहेत.

अमेरिकेचे कायदे काय म्हणतात?

अमेरिकन जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनकोलॉजीचे आकडे सांगतात की 12 ते 45 वयोगटातील पाच टक्के महिला बलात्कारामुळे गर्भवती राहातात.

2015 साली ओबामा प्रशासनाने रेप सर्व्हायवर चाईल्ड कस्टडी अॅक्ट आणला होता.

या कायद्या अंतर्गत अमेरिकन राज्यांना जास्त बजेट दिलं गेलं. बलात्काऱ्याचा पालक असण्याचा हक्क नाकारण्यासाठी ज्या पीडित महिलांनी कोर्टात केस दाखल केली आहे, किंवा करायची आहे त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी हे बजेट आहे.

अमेरिकेची 43 राज्यं आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियामध्ये हा कायदा अमलात आणला आहे. पण वेगवेगळ्या राज्यांनी हा कायदा वेगवेगळ्या पद्धतीने लागू केला आहे.

डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया आणि 20 राज्यांमध्ये कोणत्याही बलात्काऱ्याचा पिता होण्याचा हक्क रद्द करण्यासाठी त्याला कायद्याने त्याला दोषी ठरवणं गरजेचं आहे.

Image copyright BBC/ANDRÉ VALENTE

टीकाकारांचं म्हणणं आहे की, अशा परिस्थितीत त्या पीडित महिलांना त्रास होतो ज्यांच्या केसेस कोर्टापर्यंत पोहोचत नाहीत.

अमेरिकेच्या सात राज्यांमध्ये असा कोणताही नियम नाही, ज्यामुळे बलात्काऱ्याचा पीडितेच्या मुलावरचा हक्क रद्द करण्यात येईल. यावरूनच परिस्थिती किती भयानक आहे याचा अंदाज येऊ शकतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)