हा आहे जगातला सर्वांत कल्पक आणि स्वत:मध्ये रमणाऱ्या लोकांचा देश

लॅटाव्हिया Image copyright Reinis Hofmanis

लॅटव्हिया या देशाचे नागरिक अंतर्मुख अर्थात स्वतःमध्येच रमणारे असतात. ही त्यांची संस्कृतीच आहे म्हणा ना... पण त्याचबरोबर हे लोक अतिशय कल्पक म्हणूनही ओळखले जातात.

अंतर्मुखतेकडे कल असलेल्या या संस्कृतीवर बऱ्याचदा ते विनोदी शैलीत टीकाही करतात. पण त्यांच्या व्यक्तिमत्वातला हाच गुणधर्म तर त्यांच्या कल्पक व्यक्तित्वाची गुरुकिल्ली नसेल?

नुकत्याच पार पडलेल्या लंडन बुक फेअरसाठी लॅटव्हियन लिटरेचर या संस्थेने एक कॉमिक बुक तयार केलं होतं. बाहेरची हवा एकदम योग्य वाटल्यामुळे या कॉमिक बुकमधील प्रमुख पात्राच्या चेहऱ्यावर दुर्मीळ असं हास्य फुलतं. खरंतर, बाहेर जोरदार बर्फ पडत असतं आणि अशा या हवेत बाहेर रस्त्यावर कोणीही भेटण्याची शक्यताच नसते. त्याच्याच शब्दात सांगायचं तर, "शून्याच्या खाली (तापमान) = अचानक गाठीभेटीचा धोका सरासरीपेक्षाही कमी."

लॅटव्हियन साहित्यात सुरू असलेल्या #आयएमइन्ट्रोव्हर्ट या मोहिमेचा हे कॉमिक हा एक भाग आहे. या मोहिमेची आखणी करणाऱ्या लॅटव्हियन प्रकाशक आणि लेखिका एनेट कॉन्स्टे यांच्या मते हा एक प्रकारचा सामाजिक भिडस्तपणा त्यांच्या देशाचे उत्तम प्रतिनिधित्व करतो. हा भिडस्तपणा साजरा करण्यासाठी आणि प्रेमानं त्याची थोडीशी गंमत करण्यासाठी म्हणून त्यांनी ही मोहीम आखली आहे. "मला आमच्या या मोहिमेत कसलीच अतिशयोक्ती वाटत नाही," त्या सांगतात. "प्रत्यक्ष परिस्थिती तर आणखी वाईट आहे!"

या बाल्टिक देशात पाय ठेवताच, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते माझ्या लक्षात आलं. लॅटव्हियाची राजधानी असलेल्या रीगा शहरात पहिल्याच दिवशी मारलेला फेरफटका हा युरोपातील इतर कुठल्याही राजधानीतून चालण्यापेक्षा वेगळा होता. तो जास्त शांत होता. क्रोनवाल्ड पार्कच्या दिशेनं जात असताना मस्त सूर्यप्रकाश होता आणि काही वेळा तर येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्या आणि बडबडणारे पर्यटक वगळता इतर कसलाच आवाज नसल्यासारखे वाटत होते. जेव्हा मी काही लॅटव्हियन लोक एकत्र चालताना पाहीले, तेव्हा ते बहुतेकदा खूप शांतपणे आणि एकमेकांत भरपूर अंतर ठेवून चालत होते. हे लोक काही फारसे कळपात रमणारे नसल्याचं मला जाणवलं.

Image copyright Toms Harjo for Latvian Literature
प्रतिमा मथळा लॅटव्हिया साहित्यातून अंतर्मुखतेवर असे विनोद केलेले असतात.

रिगा ते सिगुल्डा या तासाभराच्या रेल्वेप्रवासात ही भावना आणखी दृढ झाली. पाईनच्या घनदाट जंगलातून ईशान्येकडे जाताना मी आणि माझे मित्र बाहेरच्या निसर्गाचं वर्णन करण्यात आणि चित्रपटाविषयी काही खेळ खेळण्यात मग्न होतो. या खेळात आम्ही चांगलेच रंगलो होतो आणि जोरजोरात आमची उत्तरं ओरडून सांगत होतो, तेव्हा आमच्या लक्षात आलं की त्या रेल्वेच्या डब्यात फक्त आमचीच बडबड तेवढी सुरू होती.

पण, हे लॅटव्हियन लोक एवढे भिडस्त का बरं असतात, किमान सुरुवातीला तरी? या प्रश्नाचं निश्चित असं उत्तर नाही, पण कल्पकता आणि एकाकीपणाला प्राधान्य या दोन गोष्टींमध्ये काहीतरी दुवा असल्याचं अभ्यासअंती दिसून आलं आहे. कॉन्स्टेना त्यांच्या कामातून हे प्रत्यक्षच दिसलं; किंबहुना त्यांचा या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे की, लेखक, कलाकार, वास्तुविशारद यांसारखे रचनात्मक क्षेत्रात काम करणारे लोक खास करुन जास्त अंतर्मुख असतात.

दरम्यान, लॅटव्हियन मनोवैज्ञानिकांनी तर असंही सुचवलं आहे की, लॅटव्हियन लोकांना स्वतःची ओळख म्हणून कल्पकता एवढी महत्त्वाची वाटते की लॅटव्हियन सरकारच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकास योजनांमध्येही कल्पकतेला प्राधान्य दिलं जातं.

युरोपियन कमिशनच्या अहवालानुसार युरोपियन युनियनच्या श्रमिक बाजारपेठेतील सर्वाधिक कल्पक कामगार हे लॅटव्हियातले आहेत.

अंतर्मुखतेकडे, अर्थात सहज उत्तेजित होणारे आणि एकाकी, शांत आणि चिंतन करण्याला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व असण्याकडे, कल असलेल्या या संस्कृतीवर लॅटव्हियन लोक स्वतःच बऱ्याचदा विनोदी शैलीत टीकाही करतात.

झोलिट्यूड (एकांतवास) याच नावाने ओळखला जाणारा रीगा जवळचा परिसर ते अनोळखी लोकांकडे पाहून न हसण्यासारख्या सवयींपर्यंत, अनेक उदाहरणे आहेत.

रिगामध्ये टुर गाईड म्हणून काम करणारे फिलिप बिरझुलिस यांनी 1994 मध्ये लॅटव्हियामध्ये स्थलांतर केलं. लोक एकमेकांना टाळण्यासाठी म्हणून चक्क रस्ता ओलांडतात हे पाहून सुरुवातीला तर त्यांना खूपच आश्चर्यच वाटलं.

"इतरांना कसं टाळायचं याचा निर्णय हे लोक पाच-दहा मिनिटं आधीच घेऊन टाकतात, हेसुद्धा माझ्या लक्षात आलं," ते सांगतात.

दहा हजाराहून जास्त गायकांना एकत्र आणणाऱ्या लॅटव्हियन सॉंग अॅण्ड डान्स फेस्टिव्हलचं पाच वर्षांतून एकदाच होणारं आयोजनसुद्धा त्यांच्या याच अंतर्मुखतेचं चिन्ह आहे. बिरझुलिस तर गंमतीनं असंही सुचवतात की दरवर्षी हे आयोजन केलं तर या लोकांवर प्रचंड तणाव येऊ शकेल आणि पुढं जाऊन असंही म्हणतात की अशा प्रकारे एकत्र येणं हे लॅटव्हियन संस्कृतीमध्ये नियम नसून अपवादच जास्त आहे.

शांत रहाणं नव्हे तर सतत गप्पा मारणं हे उद्धटपणाचं मानलं जातं!

देशातील नागरिकांचा "अंतर्मुखतेकडे असलेला कल" दाखवून देणारं आणखी एक उदाहरण कॉन्स्टे देतात.

"तुमच्या शेजाऱ्यांना तुम्हाला उगाचच भेटून अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून त्या शेजाऱ्याने इमारतीच्या लॉबीबाहेर पडेपर्यंत तुम्ही थांबून रहाणं ही अगदी लॅटव्हियन सवयच म्हणायला हवी," त्या सांगतात. (आपल्यापैकी किती जण असं करतात?)

Image copyright Reinis Hofmanis

मात्र, विनाकारण गप्पा मारत बसण्याबद्दल तिटकारा असण्याचा अर्थ असा नाही की लॅटव्हीयन लोक भावनाशून्य आहेत. प्रवास करत असताना ज्या ज्या वेळी आम्हाला नकाशा बघताना शंका आल्या, त्या प्रत्येक वेळी या शांत प्रवाशांपैकी काही जण चटकन आमच्या मदतीला आले.

लॅटव्हियाच्या ईशान्य भागातील सिसिस या मध्ययुगीन शहरात भाषांतरकार आणि मुक्त पत्रकार म्हणून काम करणाऱ्या जस्टीन व्हर्नेरा सांगतात, "लॅटव्हियामध्ये सतत संभाषण न करणं हे उद्धटपणाचं किंवा अवघडल्यासारखं मानलं जात नाही. तर सतत गप्पा मारणं हे शांत रहाण्यापेक्षाही उद्धटपणाचं आहे."

लॅटव्हीयामध्ये नव्याने येणाऱ्यांना या लोकांच्या भिडस्त सवयींकडे दुर्लक्ष करणं कदाचित कठीण वाटत असले, तरी अनेक लॅटव्हियन्सच्या मते ही अंतर्मुख प्रवृत्ती फक्त त्यांच्याच संस्कृतीत आहे असं नाही. बिरझुलिस यांच्या मते लॅटव्हीयन्सपेक्षाही स्विडस् त्यांच्या खासगीपणाला जास्त महत्व देतात, तर फिन्सदेखील खूपच अंतर्मुख असल्याकडे कॉन्स्टे लक्ष वेधतात.

फाईन यंग अर्बनिस्टस् या आर्कीटेक्चर आणि अर्बन प्लानिंग संस्थेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या एव्हलिना ओझोला म्हणतात, "अंतर्मुखतेच्या बाबतीत तरी आम्ही एस्टोनियन्सपेक्षा खरोखरच वेगळे नाही."

लॅटव्हियन्स हे एकसंघ नाहीत, ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेतली पाहीजे. लॅटव्हियामध्ये रशियन आणि इतर अल्पसंख्याक गटांच्या लक्षणीय प्रमाणाबरोबरच विविध भाषिक आणि सांस्कृतिक एकात्मता आहे. सोव्हिएत युनियनच्या धाकात वाढलेली पिढी आणि भांडवलशाही आणि विश्वबंधुत्वाच्या काळात वाढलेली आजची तरुण पिढी यामध्येही पिढ्यांचे अंतर आहेच. त्यामुळे एका विशिष्ट, सर्वसमावेशक सांस्कृतिक गुणधर्माबद्दल बोलणे अशक्य आहे - मग अगदी तो गुण पिढ्यानपिढ्या चालणारा खासगीपणाबद्दलचा का असेना...

लॅटव्हियन लोकांचा हा भिडस्त स्वभाव त्या देशाच्या भौगोलिक आराखड्याशीही जोडलेला आहे, खास करुन कमी लोकसंख्या घनता आणि विपुल धनसंपदा... ओझोला सांगतात, "(लॅटव्हियन लोकांना) त्यांना आसपास खूप लोक दिसण्याची सवयच नसते. रेस्टॉरंटमध्ये टेबलची वाट बघत थांबावं लागणं किंवा जेवताना दुसऱ्यांच्या खूप जवळ बसावं लागणं यासारख्या घटना फारच दुर्मीळ असतात. इतरांपासून लांब राहाता येईल एवढी पुरेशी जागा या देशात आहे."

Image copyright Zelma Brezinska/EyeEm/Getty Images

लॅटव्हियन लोकांना आसपास खूप लोक दिसण्याची सवयच नसते.

लॅटव्हियातील अगदी शहरी लोकांमध्येही निसर्गाविषयीचे प्रेम आणि खेड्यांची सफर अगदीच नित्याची बाब आहे. खास करुन लॅटव्हियन संस्कृतीत घराची फारच मनमोहक प्रतिमा आहे. इतरांपासून अलग, स्वयंपूर्ण, विशेषतः लाकडात बांधलेले ग्रामीण घरकूल...लॅटव्हियन कल्चरल कॅनन या लॅटव्हियातील सर्वांत लक्षणीय समजल्या जाणाऱ्या 99 वास्तू आणि लोकांच्या यादीत अशाच लॅटव्हियन घराचा समावेश आहे. (त्याचबरोबर यामध्ये लॅटव्हियाच्या सुप्रसिद्ध राय ब्रेडचाही समावेश आहे.)

विसाव्या शतकात सोव्हिएत सरकारने सामूहिकरणावर भर दिल्यामुळे या घराचं वास्तव जरी संपुष्टात आलं असलं तरी या घराची संस्कृतीशी जोडलेली प्रतिमा टिकून आहे, याकडे ओझोला लक्ष वेधतात.

"1948 ते 1950 या काळात, ग्रामीण भागांतील घरांपैकी या घरांची संख्या 89.9 टक्क्यांवरुन 3.5 टक्क्यांवर आली आणि अशाप्रकारे, पारंपरिक जीवन पद्धती प्रभावीपणे समूळ नष्ट झाली," त्या सांगतात.

पण आत्मनिर्भरता ही आजही लॅटव्हीयाच्या ओळखीचा एक भाग असल्याचे व्हेर्नेरा आवर्जून सांगतात. "आमच्याकडे आजही स्वतंत्र शेतीवाडीचा विचार आहेः आम्ही दिवसा कॅफेमध्ये एकत्र जमत नाही, रस्त्यांवर अनोळखी लोकांच्या जवळ जात नाही," त्या सांगतात.

आणखी एक नाट्यमय बदल आहे तो (तुलनेने लहान) फ्लॅटस्मध्ये राहण्याबाबतचा.. "लॅटव्हियामधील लोकवस्ती असमान आहे, शहरी भागात बहुतेक लोक एकमेकांच्या जवळपास रहातात," ओझोला सांगतात आणि पुढं असंही म्हणतात की युरोपातील सर्वाधिक विरळ लोकवस्ती असलेल्या देशांपैकी एक असूनही, जवळजवळ दोन तृतियांश लॅटव्हियन नागरिक इमारतींमध्ये रहातात. युरोस्टॅट या वेबसाईटनुसार इमारतींमध्ये रहाण्याचे हे प्रमाण युरोपात सर्वाधिक आहे.

त्याचवेळी एक्टोरनेट या रियल इस्टेट कंपनीने केलेल्या पाहणीनुसार दोन तृतियांशापेक्षा जास्त लॅटव्हियन लोकांना खासगी, स्वतंत्र घरांमध्ये रहाण्याची इच्छा आहे. ओझोला यांच्या अंदाजानुसार हा डिस्कनेक्टच कदाचित लॅटव्हियन लोकांसाठी वैयक्तिक अवकाश एवढा महत्वाचा का आहे, ते काही अंशी स्पष्ट करू शकतो.

पण लॅटव्हियन लोकांनी नेमकं काय हवं ते काळजीपूर्वक ठरवायला हवं. पोलिटीकोनुसार, बाह्य स्थलांतरामुळे लॅटव्हियाची लोकसंख्या तीव्र प्रमाणात घटत चालली असून इतर कुठल्याही देशाच्या तुलनेत ही घट सर्वाधिक आहे. त्यामुळे आपला अवकाश अतिशय प्रिय असणाऱ्या या देशाला तो कदाचित अधिक प्रमाणात मिळत असेल.

Image copyright Reinis Hofmanis

दरम्यान, शरणार्थींबाबतच्या लॅटव्हियन दृष्टिकोनावर त्यांचा नव्या लोकांप्रती असलेला भिडस्तपणा आणि इतर गुणधर्म काय परिणाम करतील, याचा अभ्यास सध्या तेथील मानसशास्त्रज्ञ करत आहेत. कारण घटत्या लोकसंख्येनं होणारं नुकसान टाळण्याच्या कामात देशात बाहेरुन होणाऱ्या या स्थलांतराची कदाचित मदत होऊ शकेल.

लॅटव्हियन लोकांचा मितभाषीपणाकडे असलेला कल पाहून धक्का बसलेल्या पर्यटकांना आणि नव्यानं येणाऱ्यांना व्हेर्नेरा एक सल्ला देतात, "मी कुठल्याही परदेशी व्यक्तीला एक सल्ला देईन की, त्यांनी या सुरुवातीच्या शांततेला घाबरू नये. परदेशी व्यक्तीशी ओळख झाली आणि काही वेळ गेला की आम्ही खरोखरच चांगले मित्र आहोत. आमचा देश खूप नाटकी नाही, त्यामुळे आम्ही काही बाबतीत खूपच परखड आहोत. आम्ही काही प्रत्येकालाच ते आम्हाला आवडत असल्याचं सांगत नाही, त्यामुळेच जेव्हा एखादी लॅटव्हियन व्यक्ती सांगते की तिला तुम्ही आवडता, तेव्हा ते खरोखरच खरं असतं."

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)